अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर केलेल्या कलशारोहणामुळे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम बनले तीर्थक्षेत्र !

कलशारोहणाने सनातन आश्रमरूपी तीर्थक्षेत्र उजळले ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस महर्षींचे आशीर्वाद लाभले ॥

रामनाथी (गोवा), ९ मे (वार्ता.) – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्यासारखा ऐतिहासिक विधी येथील सनातनच्या आश्रमात झाला ! नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर ३ दैवी कळसांची अक्षय्य तृतीयेला म्हणजे ९ मे या दिवशी स्थापना झाली. सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेतील वेदब्राह्मणांनी भावपूर्णरित्या केलेल्या विधीत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी १२.१५ ते १.४५ या वेळेत या षोडशोपचार पूजा करून कळसांची स्थापना झाली. कलशारोहणापूर्वी कळसाच्या खाली नवग्रहांचे खडे ठेवण्यात आले. सकाळी ९.४० वाजता सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कळसांना स्पर्श केला. काळाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या कळसांच्या स्थापनेमुळे आश्रमाला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. या कळसांमध्ये ब्रह्मा, विष्णु, महेश, सर्व देवता आणि ८८ सहस्र ऋषिगण आकाशमंडळातून चैतन्य प्रक्षेपित करणार आहेत अन् सर्व साधकांना आशीर्वाद देणार आहेत.

IMG_0275_c
सनातनचे कार्य विश्‍वव्यापी व्हावे, यासाठी आश्रमावर स्थापन करण्यात आलेल्या ३ कळसांपैकी १ कळस

सनातनचे कार्य विश्‍वव्यापी व्हावे, तसेच घोर आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षि साधकांवर या कळसांच्या माध्यमातून कृपेचा वर्षाव करत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !

८ मे २०१६ या दिवशी संकल्प, वरूणपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण या धार्मिक विधीनंतर कळसांवर विविध देवीतत्त्वांचे आवाहन करण्यात आले. सनातनचे साधक दाम्पत्य श्री. भानु पुराणिक आणि सौ. आरती पुराणिक हे या विधीचे यजमान होते. पहिल्या कळसावर श्री योगेश्‍वरीदेवी, दुसर्‍या कळसावर श्री वज्रेश्‍वरीदेवी, तर तृतीय कळसावर श्री राजराजेश्‍वरी ललिता महात्रिपुरसुंदरी देवी यांचे आवाहन करण्यात आले. देवीतत्त्वाच्या आवाहनानंतर उटणे, तूप, मसुरीचे पीठ, जवाचे पीठ, हळद, पल्लवोदक (आंब्याची पाने ठेवलेले पाणी), अक्षतोदक (अक्षता घातलेले पाणी) यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच पंचामृत स्नान घालून षोडषोपचारे पूजा करण्यात आली. त्यानंतर कळसांना शय्याधिवास म्हणजे झोपवण्याचा विधी करण्यात आला. त्यानंतर हवन करण्यात येऊन समिधा, तीळ, मध, तूप, चरू (भात) यांची आहुती देण्यात आली.

IMG_0190_c
कळसाला हस्तस्पर्श करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि मंत्रपठण करतांना वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी
IMG_0224_Clr
कळसाला हस्तस्पर्श करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ
IMG_0227_Clr
कळसाला हस्तस्पर्श करतांना पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ

क्षणचित्रे

१. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने या कळसांचे, तसेच ज्या ठिकाणी कळस स्थापन करण्यात आले, त्या ठिकाणांचे (कळस स्थापनेच्या पूर्वी आणि नंतर) यु.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) आणि थर्मल इमेजिंग या उपकरणांद्वारे संशोधन करण्यात आले.

२. कलशारोहणाच्या वेळी सनातनचे संत पू. संदीप आळशी, एस्.एस्.आर्.एफ्.चे (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे) संत पू. सिरीयाक वाले यांची वंदनीय उपस्थित होती.
कलशारोहण पहाण्यासाठी महर्षि प्रत्यक्ष आल्याची मिळाली साक्ष !

नाडीपट्टीमध्ये कलशारोहणाच्या वेळी गरुडरूपाने महर्षि स्वत: येणार असल्याचा उल्लेख होता. प्रत्यक्षातही ९ मे या दिवशी कलशारोहणाच्या वेळी गरुड ३ वेळा आकाशात घिरट्या घालून गेला. (महर्षींनी सांगितले आहे की, जेव्हा एखादी शुभ घटना घडतांना तेथे गरुड किंवा गाय येणे, हे कार्य यशस्वी होणार असल्याचेच लक्षण आहे.)

रामनाथी येथे होत असलेल्या कळसस्थापना सोहळ्याच्या
वेळी मंगळुरु येथील साधकांना यज्ञ चालू असतांना येणार्‍या सुगंधाप्रमाणे सुगंध येणे

मंगळुरू येथील सेवाकेंद्रात ९.५.२०१६ या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून यज्ञ चालू असतांना जसा सुगंध येतो, तसा सुगंध येत होता. दुपारी १२ वाजता सनातनच्या संत पू. राधा प्रभुआजी उपायांसाठी बसल्या होत्या आणि काही साधकही तेथे नामजप करत होते. त्या वेळी पू. राधा प्रभुआजी यांना फुलांचा, तर काही साधकांना यज्ञाचा सुगंध येत होता आणि तो बाजूच्या विभागातही थोड्या प्रमाणात पसरत होता. – श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू (९.५.२०१६)

 

कळसाची स्थापना करण्यामागील
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उलगडलेले कारण

कळसाची पूजा आणि स्थापना केल्याने
ब्रह्मांडातील सर्व प्रकारच्या ईश्‍वरी लहरी कळसामध्ये प्रवेश
करत असल्याने साधकांना सर्व देवतांचे आशीर्वाद मिळणार असणे

१०.२.२०१६ या दिवशी महर्षींनी दोन तांब्याचे आणि एक पितळेचा, अशा तीन कळसांची पूजा वसंतपंचमीच्या दिवशी करायला सांगितली. १२.२.२०१६ या दिवशी महर्षींनी या तीन कळसांची स्थापना करण्यास सांगण्यामागील शास्त्र उलगडले. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अर्धघुमट, देवळांचे कळस, भारतातील दक्षिणेकडे असलेल्या मंदिरांचे गोपूर आणि पिरॅमिड या सर्वांचा आकार पाहिला असता तो खालच्या बाजूने मोठा अन् वरच्या दिशेने निमुळता होत गेलेला दिसतो. मंदिरे शेकडो फूट उंच असतात आणि त्या अनुषंगाने त्याची लांबी अन् रूंदीही ठराविक आकाराच्या नियमांप्रमाणेच असते. त्यामुळे त्यामध्ये ठराविक कंपनसंख्येची स्पंदने आकर्षिक करून घेण्याची, साठवण्याची आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते. मंदिराच्या कळसाचे कार्य भ्रमणभाषच्या टॉवरप्रमाणे अथवा दूरदर्शनच्या अ‍ॅन्टिनाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे एखाद्या गावामध्ये भ्रमणभाषचा टॉवर असतो आणि त्या टॉवरमुळे भ्रमणभाषला चांगली रेंज मिळते, त्याप्रमाणे कळसांचे असते. कळस म्हणजे Antenna to receive Gods energy. (अँटिनामुळे देवाची शक्ती मिळते.) ब्रह्मांडातून वैश्‍विक ऊर्जा, तसेच निर्गुण स्पंदने कळसात ग्रहण केली जातात. त्यामुळे कळसाची पूजा आणि स्थापना केल्याने ब्रह्मांडातील सर्व प्रकारच्या ईश्‍वरी लहरी कळसामध्ये प्रवेश करतील आणि साधकांना सर्व देवतांचे आशीर्वादही मिळतील.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात