सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाची अल्प प्रमाणात हानी

         उज्जैन – येथील सिंहस्थपर्वात अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस यांमुळे सहभागी आखाडे, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचा मांडव पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही आखाड्यांचे मांडव जमीनदोस्त झाले आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसारासाठी उभारलेल्या प्रदर्शनालाही या मुसळधार पावसाची झळ पोचली आहे; मात्र तुलनेत अल्प प्रमाणात हानी झाली आहे.

P_20160505_164117
सनातनच्या प्रदर्शनस्थळी एका बाजूने काठ्या लावून दुसर्‍या बाजूने छतावर साठलेले पाणी काढतांना सनातनचे साधक
P_20160505_172722
जयघोष करून उत्साहाने आणि जिद्दीने सर्व पूर्ववत करण्यासाठी सेवेला आरंभ करणारे सनातनचे साधक आणि संत १. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे अन् २. पू. (कु.) स्वाती खाडये

       या मुसळधार पावसामुळे प्रदर्शनाच्या मंडपातील काही ठिकाणी चिखल झाला आहे. काही गृहोपयोगी साहित्य भिजले आहे. ज्याप्रमाणे गोवर्धन पर्वंत भगवान श्रीकृष्णाने करंगळीवर उचलल्यावर गोप-गोपींनी काठ्या लावल्या होत्या, त्याप्रमाणे या जोरदार पावसामुळे प्रदर्शनाला हानी पोहोचू नये, यासाठी साधकांनी प्रदर्शनाच्या मंडपाला आधार दिला होता. मुसळधार पाऊस पडत असतांना कुणीही साधक घाबरले नव्हते. सर्व साधक ॐ निसर्ग देवो भव, ॐ वेदं प्रमाणम्, हरि ॐ जयमे जयम्, जय गुरुदेव, हा नामजप करत होते आणि बचावकार्य कसे करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करत होते. त्या वेळी ग्रंथांचा साठा असलेल्या खोलीतील पाणी बाहेर काढण्यासाठी आणि बाहेरील पाणी आत येऊ नये यासाठी साधकांनी मंडपाच्या बाहेर लहान नाले बनवले. या वेळी फ्लेक्सचे फलक पडले; मात्र मंडप पडला नाही. पाऊस येण्याच्या अर्धा घंटा आधीच साधकांनी ग्रंथ आणि इतर साहित्य झाकून ठेवले होते. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. इतर संस्था, आखाडे यांचे मंडप, तंबू यांच्यामध्ये पाणी शिरून त्यांची मोठी हानी झाली आहे. एका संतांचा मंडप पूर्णपणे कोसळला आहे; मात्र त्यांच्याच बाजूला असलेल्या सनातनच्या प्रदर्शनाला मात्र कुठलीच झळ पोचली नाही. सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या शेजारी असलेल्या अन्य एका संस्थेचा मंडप पूर्णपणे कोसळला आहे. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून एका मोठ्या प्रदर्शनासह इतरत्र दोन लहान प्रदर्शनेही लावण्यात आली होती. या दोन लहान प्रदर्शनांची कोणतीही हानी झाली नाही.

महर्षींची कृपा आणि सनातनच्या संतांनी केलेला
जप यांमुळे सनातनच्या साधकांचे तीव्र आपत्काळातही रक्षण !

नामजपातील आध्यात्मिक शक्तीमुळे
सनातनच्या प्रदर्शनस्थळाची हानी ३० टक्क्याने उणावली !

        १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७ मध्ये महर्षींनी हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे अन् याच कालावधीत उज्जैनमध्ये महाकालेश्‍वराचे स्थान असलेल्या ठिकाणी महाकुंभ होत आहे, असे सांगून आपत्काळाविषयी सूचित केले होते, तसेच ५.५.२०१६ या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे दोन घंटे आधी समजल्यानंतर सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे नामजप चालू केला. नामजप करण्यासाठी दोन घंटे एवढा अल्प कालावधी मिळाला, तरीही महर्षींच्या कृपेमुळे आणि संतांनी केलेल्या नामजपातील आध्यात्मिक शक्तीमुळे सनातनचे प्रदर्शन असलेल्या मांडवाची हानी ३० टक्के उणावली. पावसाने माजवलेल्या हाहाःकारामुळे इतर काही संप्रदायांचे मांडव पूर्ण कोसळले, तसेच जीवित आणि वित्त हानी झाली. सनातनच्या प्रदर्शनाची हानी तुलनेने कमी होणे, हा महर्षींची कृपा आणि संतांनी केलेला नामजप यांचा प्रत्यक्ष लाभ आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे कृती केल्यास कसा लाभ होतो, याची प्रत्यक्ष अनुभूतीच संत आणि तेथे सेवेसाठी उपस्थित असलेले साधक यांना या वेळी घेता आली. सध्याच्या तीव्र आपत्काळात जसजसा उपायांसाठीच्या नामजपाचा कालावधी वाढत जाईल, तसतसे साधकांचे रक्षण होण्याचे प्रमाण ५० टक्के, ७० टक्के असे १०० टक्के होईल, हेच यातून स्पष्ट होते.

साधकांचे आपत्काळात रक्षण करणार्‍या महर्षींप्रती कृतज्ञता !

        महर्षींनी या आपत्काळाविषयी साधकांना आधीच सूचित केले होते. आपत्काळाची तीव्रता न्यून होण्यासाठी महर्षींनी जपही सांगितला, तसेच आताही पावसामुळे झालेल्या हानीनंतर तेथे सर्व पूर्वस्थितीत आणण्याची सेवा करण्यासाठी महर्षीच साधकांना शक्ती पुरवत आहेत. महर्षींच्या अपार कृपेमुळेच या आपत्काळाला तोंड देणे साधकांना शक्य होत आहे. त्यामुळे महर्षींच्या चरणी सनातन परिवार कोटी कोटी कृतज्ञ आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात