केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग २)

या लेखात देवता आणि उन्नत यांच्या केसांची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी ‘केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग १)’ यावर ‘क्लिक’ करा !

५. उन्नतांचे केस

सर्वसाधारण व्यक्तीच्या केसांतून रज-तमात्मक लहरी बाहेर पडतात, तर उन्नत, म्हणजेच आध्यात्मिक स्तर ७० टक्क्यांच्या पुढे असणार्‍या जिवांतील सात्त्विकतेचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या केसांतून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत असते.

५ अ. दृष्ट काढल्यावर जाणवलेले परिणाम

५ अ १. कु. शुभांगी साळुंखे (विवाहानंतरच्या सौ. शुभांगी पिंपळे) यांची दृष्ट एका संतांच्या केसाने काढतांना करण्यात आलेले सूक्ष्म-परीक्षण

अ. दृष्ट काढून घेण्यापूर्वी डोक्यात वेदना होणे, दृष्ट काढून स्वतःला सेवेसाठी सिद्ध करण्यासाठी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना होणे आणि त्यानंतर देहातील काळी शक्ती बाहेर पडून देहात चैतन्य पसरत असल्याचे जाणवणे

अ १. दृष्ट काढण्यापूर्वी : ‘डोक्यात वेदना होत होत्या. मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘प.पू. डॉक्टर, हा देह तुमचा आहे. तुम्हीच या देहाची दृष्ट काढून त्याला शुद्ध करा आणि तुमच्या सेवेसाठी सिद्ध करा.’

अ २. दृष्ट काढतांना : मला माझ्या शरिरातील काळी शक्ती, वाईट शक्तींची स्थाने आणि यंत्रे बाहेर खेचली जात असल्याचे जाणवत होते. त्याच वेळी देहात चैतन्य पसरत असल्याचे जाणवले. माझा नामजप चांगला होत होता.

अ ३. दृष्ट काढल्यावर : छाती आणि पाठ येथे वेदना होत होत्या.’

– कु. शुभांगी

आ. डोक्याभोवती असणारे काळ्या शक्तीचे आवरण उणावणे आणि त्यानंतर देहाभोवती पिवळे संरक्षक-कवच निर्माण होणे

आ १. दृष्ट काढण्यापूर्वी : ‘कु. शुभांगीताईच्या डोक्याभोवती बरेच काळ्या शक्तीचे आवरण दिसले.

आ २. दृष्ट काढतांना : पाठीच्या मणक्यातील काळी शक्ती उणावल्याचे जाणवले. कु. शुभांगीताईच्या भोवती पिवळे संरक्षककवच दिसले. पुडीतील निर्गुण चैतन्य आज्ञाचक्रातून शरिरात जाऊन काळ्या शक्तीचे आवरण घटले.

आ ३. दृष्ट जळतांना : धुरातून ‘ॐ’ बाहेर पडतांना दिसला.’

– सौ. मनीषा गाडगीळ, पनवेल.

६. देवतांचे केस

‘देवता सगुण रूप धारण करतात, तेव्हा त्यांचे डोळे, आशीर्वादाचा हात, चरण आणि केस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्तीचे प्रक्षेपण होते.
१. अनेक देवता त्यांचे केस मोकळे सोडतात. केसांच्या टोकांतून निर्गुण-सगुण स्तरावरील शक्तीच्या लहरींचे पाताळाच्या दिशेने सतत प्रक्षेपण होत असते. त्यामुळे पाताळातून प्रक्षेपित होणारी निर्गुण-सगुण स्तरावरील काळी शक्ती नष्ट होण्यास साहाय्य मिळते. मनुष्याच्या केसांची टोके मोकळी सोडली, तर त्यातून वाईट शक्ती शरिरात प्रवेश करू शकतात; मात्र देवतांनी त्यांचे केस मोकळे सोडले, तर वाईट शक्तींना त्रास होऊन त्या दूर पळतात.
२. दैत्यांचा नाश करण्यासाठी देवी मारक रूप धारण करते, तेव्हा ती तिचे केस मोकळे सोडते.

६ अ. तारक आणि मारक शक्ती अन् केसांचा मऊपणा आणि ताठरपणा

केसांतून मारक शक्ती कार्यरत असते, तेव्हा केस ताठ आणि सरळ असतात, उदा. श्रीदुर्गादेवीचे केस. जेव्हा तारक शक्ती केसांच्या माध्यमातून कार्यरत असते, त्या वेळी केसांचा ताठरपणा न्यून होतो आणि केसांचा मऊपणा वाढतो, उदा. श्री सरस्वतीदेवी किंवा श्री लक्ष्मी यांचे केस.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १७.५.२००७, दुपारी ३.४०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’