यज्ञविद्या म्हणजे भारतियांचे पूर्णत्वाला गेलेले प्राचीन रहस्यमय विज्ञान

यज्ञाचे महत्त्व

विश्वसंचालक शक्तींना सतत केलेल्या यज्ञांतून हविर्भाग देऊन संतुष्ट राखल्याने त्यांनी सृष्टीसंचालनाचे आपापले कार्य उत्तम प्रकारे पार पाडले.

 

वातावरण शुद्धी

अ. महाभयंकर युद्धानंतर दूषित झालेले वातावरण शुद्ध करण्यासाठी रामाने १० अश्वमेध यज्ञ केले आणि कृष्णाने पांडवांकडून राजसूय यज्ञ करवून घेतले.

आ. सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला.

 

यज्ञाचे आरोग्याला होणारे लाभ

अ. अथर्ववेदात ऋषींनी रोगजंतूंचा नाश करण्यासाठी यज्ञाग्नीस केलेली प्रार्थना

अथर्ववेदात अनेक प्रकारच्या रोगोत्पादक कृमींचे वर्णन आले आहे. त्यांना ऋषींनी यातुधान, व्रेव्यात्, पिशाच, रक्षः (राक्षस) वगैरे नावे दिली आहेत. यज्ञाद्वारे अग्नीत कृमीनाशक औषधींच्या आहुती देऊन या रोगजंतूंचा नाश करता येतो, याची पुरेपूर जाणीव ऋषींना होती. अथर्ववेदाचा ऋषी यज्ञाग्नीस प्रार्थना करतो, हे प्रकाश अग्ने, गुप्तात गुप्त अशा स्थानी लपून बसलेल्या भक्षक रोगजंतूंना तू जाणतोस. वेदमंत्रांच्या सोबत वाढत जाऊन तू त्या कृमीकीटकांना शेकडो बंधनांनी जखडून टाक. यज्ञाचा धूर कानाकोपर्‍यात पसरून रोगजंतूंचा नाश करतो, हाच या ऋचेचा भावार्थ आहे. – आचार्य श्रीराम शर्मा, अनुवादक : प्रा. ब.लु. सोनार, अमळनेर (यज्ञ दर्शन अर्थात् यज्ञ कशासाठी ?)

आ. आधुनिक वैज्ञानिकांनी केलेल्या यज्ञप्रक्रियेतील विज्ञाननिष्ठतेच्या पाठपुराव्याची काही उदाहरणे

१. मद्रासच्या (इंग्रजकालीन) आरोग्य खात्यातील प्रमुख अधिकारी डॉ. कर्नल किंग आर्.एम्.एस्. (सॅनिटरी कमिशनर) यांनी मद्रास येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला असता कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितले होते, शुद्ध तूप, तांदूळ आणि केशर मिश्रित पदार्थांनी हवन केल्यास प्लेगपासून संरक्षण लाभेल.

२. फ्रान्सचे विज्ञानवेत्ते प्रो. टिलवर्ट यांनी म्हटले होते, आगीत साखर जाळली असता त्या धुरात वायू शुद्धीकरणाची मोठी शक्ती प्रकट होते. त्यामुळे कॉलरा, टायफॉइड, देवी इत्यादी रोगांना प्रतिबंध करता येतो.

३. डॉ. टॉटलिट यांनी प्रयोगपूर्वक सिद्ध केले आहे की, मनुका आणि खिसमिस यांसारख्या सुक्या फळांचे हवन केल्यास त्या धुराने टायफॉइडचे जंतू अर्ध्या तासात मरतात. इतर रोगजंतू दोन-तीन तासांत मरतात.

४. कविराज पं. सीताराम शास्त्री म्हणतात, मी अनेक वर्षांपासून यज्ञोपचाराचा अनुभव घेतला आहे. जे मोठे मोठे रोग औषधांच्या भक्षणाने दूर झाले नाहीत, ते वेदोक्त यज्ञाद्वारे दूर होतात.

५. बरेलीचे रहिवासी डॉ. कुंदनलाल अग्निहोत्री म्हणतात, मी प्रथम २५ वर्षे अनेक प्रयोग आणि परीक्षणे केली. गेल्या २६ वर्षांपासून यज्ञाद्वारे क्षयरोगाचा उपचार करून शेकडो रोग्यांना व्याधीमुक्त केले आहे. ज्या रोग्यांच्या जखमा (कॅविटी) काही इंच खोल होत्या आणि अनेक वर्षेपर्यंत आरोग्यधामात (सॅनेटोरियम) किंवा पहाडी भागात राहूनही ज्यांना डॉक्टरांनी असाध्य रोगी म्हणून परत पाठविले होते, अशांचाही यात समावेश होता. ते यज्ञचिकित्सेने पूर्ण निरोगी झाले असून आपापला संसार करत आहेत.

– आचार्य श्रीराम शर्मा, अनुवादक : प्रा. ब.लु. सोनार, अमळनेर (यज्ञ दर्शन अर्थात् यज्ञ कशासाठी ?)

 

कर्मकांड म्हणजे सर्वोच्च प्रतीचे विज्ञानापलीकडील प्रयोग !

हिंदु धर्मातील जन्म ते मृत्यू यांच्या दरम्यान होणारे विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्वरप्राप्तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती प्रत्यक्ष ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या आहेत. विज्ञानातील एकतरी प्रयोग ईश्वराची प्राप्ती करून देतो का ? – डॉ. आठवले (१६.१.२००७)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’