स्त्रियांची गर्भगृह किंवा शनिचौथर्‍यावरील प्रवेशाची मागणी असहिष्णु आणि अहंकारी !

shanidev-.shignapur

      सध्या अनेक वृत्तवाहिन्यांवर महिलांना सर्वच धर्मांनी अन्याय्य वागणूक दिल्याचे सूत्र घेऊन चर्चासत्रे होत आहेत. शनिशिंगणापूर येथे महिलांना शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश देणे, महिला पुजारी नेमणे, हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देणे या सूत्रांवरून ही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यात महिलांना अनादि काळापासून समानतेची वागणूक मिळाली नाही, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यांची गळचेपी झाली, आदी आरोप करण्यात आले. हे आरोप आणि चर्चा पुढील कारणांसाठी चुकीच्या आहेत. १९ मार्च २०१६ या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुन्हा शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न केला. अन्य भाविकांनी सतर्क राहून त्यांना रोखले; मात्र त्यामुळेच या पुढील कारणांविषयी चर्चा करणे अगत्याचे ठरले आहे.

 

१. स्त्री आणि पुरुष यांच्यातील मूळ भेद लक्षात घेणे आवश्यक !

     स्त्री आणि पुरुष यांच्यात मुळातच अनेक भेद आहेत. भिन्नलिंगी असल्याने शारीरिक भेद आहेत, तसेच मनाच्या स्तरावरही भेद आहेत. स्त्रिया अधिक प्रेमळ, भावूक, मनमोकळ्या, मिळून मिसळून रहाणार्‍या असतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांत अहंकार अधिक असतो, यालाच पुरुषी अहंकार म्हणतात. असे असले, तरी काही स्त्रिया पुरुषांपेक्षाही अहंकारी असतात, तर काही सत्पुरुषांत अहंकार नसतो; परंतु हा अपवाद झाला. अपवाद हा नियम होऊ शकत नाही. पुरुषांत स्त्रियांपेक्षा अधिक अहंकार असतो, हा सर्वसाधारण नियम झाला. त्यामुळे अपवाद समोर आणून वाद घालणे हे असमंजसपणाचे, अहंकाराचे लक्षण ठरते.

 

२. स्त्रियांची शारीरिक क्षमता अल्प असणे, हा
निसर्गनियम आपण क्रीडा प्रकारांत सहजपणे स्वीकारतो !

      क्रीडा प्रकारांतही आपण पहातो की, स्त्रियांमध्येच लढत ठेवली जाते. मग तो क्रीडाप्रकार टेबल टेनिस, लॉन टेनिस, क्रिकेट, हॉकी किंवा अन्य कुठलाही असेल. या खेळांत पुरुष विरुद्ध स्त्री, असे कधीच नसते. याचे कारण दोघांची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्या वेळी कोणी समानतेचे सूत्र घेऊन लिअँडर पेस विरुद्ध सानिया मिर्झा अशी पुरुष विरुद्ध स्त्री लढत ठेवा, अशी मागणी करत नाही. सर्वसाधारणपणे स्त्रियांची शारीरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते, हे आपण अशा वेळी स्वीकारतो. ते स्वीकारतांना मनाचा संघर्ष होत नाही; कारण तो निसर्गनियम आहे. त्यात आपण पालट करू शकत नाही, तरीही पुष्यमित्र श्रुंगची पत्नी दिव्या, झांशीची राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, यांसारख्या ऐतिसासिक स्त्रियांनी पुरुष योद्ध्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी युद्धात बजावली आहे; परंतु हा परत अपवाद झाला.

 

३. अध्यात्मशास्त्र जाणून त्यानुसार कृती करून
ते अनुभवत नाही, तोपर्यंत धर्माशी निगडित सूत्रे समजणे अशक्य !

     मुळात धर्मातील सूत्रे ही अध्यात्मशास्त्राशी निगडित असतात. अध्यात्मशास्त्रात संचित-प्रारब्ध, पुनर्जन्म, देवाण-घेवाण आदी सूत्रांचा संबंध येतो. हे जोपर्यंत आपण मानत नाही; म्हणजेच आपण जोपर्यंत अध्यात्मशास्त्र जाणून त्यानुसार कृती करून ते अनुभवत नाही, तोपर्यंत धर्माशी निगडित सूत्रे समजणार नाहीत. त्यांच्यावर विश्‍वास बसणार नाही. अध्यात्मशास्त्र हे कृतीचे शास्त्र आहे, अनुभूतींचे शास्त्र आहे. तेथे पांडित्य कामाला येत नाही. त्यामुळे धर्मातील एखाद्या नियमाचा काय परिणाम होतो, हे बुद्धीच्या स्तरावर समजून घेणे कठीण आहे, तसेच ते बुद्धीच्या स्तरावर पटवून देणेही कठीण आहे. त्यामुळे जे शनिदेवाला मानतात, त्याची पूजा करायची आहे, जवळून दर्शन घ्यायचे आहे, मंदिरांच्या गर्भागृहात प्रवेश करायचा आहे, असा आग्रह धरतात, त्यांनी हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्र, म्हणजेच त्याची मूळ मूल्ये संचित-प्रारब्ध, पुनर्जन्म, देवाण-घेवाण आदी सूत्रेही मान्य करावीत.

 

४. अध्यात्मशास्त्रातील व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग,
या तत्त्वाप्रमाणे स्त्रियांसाठीचे नियमही समजून घेणे आवश्यक !

     अध्यात्मशास्त्रात व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग, हे एक तत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती त्याचे पूर्वजन्मीचे संचित घेऊन जन्माला आलेली असते. या संचितात साधनाही अंतर्भूत असते. एखाद्याची एका विशिष्ट टप्प्याची साधना गेल्या जन्मांतच झालेली असते. त्यामुळे त्याला पुढच्या टप्प्याची साधना करणे आवश्यक असते. हे अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीच सांगू शकतात. यानुसार कुटुंबातील एखाद्याला आनंदी जीवन जगण्यासाठी शिवाची उपासना करणे आवश्यक असेल, तर दुसर्‍याला गणपतीची उपासना लाभदायक ठरते; परंतु गणपतीची उपासना आवश्यक असलेल्याने मीपण शिवाची उपासना करणार, असा हट्टाग्रह धरला, तर त्याचीच आध्यात्मिक हानी होणार. अगदी जुळ्या भावंडांचीही उपासना वेगवेगळी असते. हेच तत्त्व स्त्रियांसाठी काही देवतांच्या संदर्भात नियम असण्यामागे आहे. यात अपमानास्पद असे काहीच नाही.

 

५. शास्त्र जाणून न घेता
तुलना करून हट्टाला पेटणे, हा असमंजसपणा !

     अध्यात्मशास्त्रानुसार ॐ चा जप केल्यास शरीरातील उष्णता वाढते. काहींना तोंडात अल्सरसारखे फोड येणे, डोक्यात पुरळ येणे, डोळ्यांतून उष्णता बाहेर पडत असल्याचे जाणवणे, असे त्रास होतात. याचा अर्थ पुरुष असो कि महिला दोघांनाही शरीरातील उष्णता वाढते, हा अनुभव येतो. आता पुरुषांची जननेंद्रिये बाहेर असतात, तर स्त्रियांची ओटीपोटात असतात. त्यामुळे ॐ चा जप केल्यावर उष्णता वाढल्यास त्याचा गर्भाशयावर परिणाम होतो. यामुळे मासिक पाळीच्या वेळी वेदना होणे, गर्भधारणेनंतर त्रास होणे आदी गर्भाशयाचे आजार होतात. आपण ॐ चा जप केल्यास शरीरातील उष्णता वाढते, हे अनुभवले तरच हे सर्व पटू शकते. तसेच यातही काही अपवाद असतात; परंतु तो अपवाद झाला. त्यामुळे काही महिलांना त्रास झाला नाही; म्हणून इतरांना होणार नाही, असे नसते.

     हीच गोष्ट उग्रदेवतांच्या दर्शनाच्या संदर्भात आहे. त्यामुळे शनिशिंगणापूरच्या स्वयंभू शिळेपाशी जाण्यास महिलांना अनुमती नाही, तर अन्य ठिकाणच्या शनीच्या मंदिरांत जाण्यास त्यांना कुणी अडवलेले नाही. आपल्यात संमजसपणा असेल, तरच हे पटू शकते; पण हट्टाग्रहामुळे आपण शनीच्या अन्य मंदिरांत अनुमती आहे, तर येथे का नाही ?, असा प्रश्‍नही उपस्थित करून स्वयंभू शिळा आणि स्थापित मूर्ती यांतील भेद, त्यांच्यातील शक्ती ही सर्व सूत्रे दुर्लक्षित करतो.

 

६. जराही जिज्ञासा किंवा विवेक
नसलेले तथाकथित सुधारणावादी !

       ज्यांना हे शास्त्र पटत नाही, ते काही वर्षे साधना करून किंवा प्रयोग करून आपण हे सर्व जाणून घेऊया आणि नंतर त्याविषयी चर्चा करूया, असाही विवेक दाखवत नाहीत. काहींना या संदर्भात जराही जिज्ञासा नसते. काही जण स्वतःचे आधुनिक विचार खरे करण्यासाठी; म्हणजेच अहंकारापोटी, काही जण प्रसिद्धीसाठी, तर काही जण त्यांच्या संघटनेचा अजेंडा राबवण्यासाठी या सर्व गोष्टींच्या विरोधात बोलत असतात आणि अपप्रचारही करत असतात.

 

७. धार्मिक क्षेत्रात धर्मानुसारच आचरण करणे आवश्यक !

शासनानेही या संदर्भात जिज्ञासूपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. संविधानाने केवळ एक दिशा दाखवली आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीसंदर्भात किंवा प्रत्येक धार्मिक गोष्टीविषयी संविधानात भाष्य केलेले नाही. जसे भारतमाता की जय असे म्हणायला हवे, असे संविधानाने सांगितलेले नाही; पण आपल्या देशाविषयी अभिमान बाळगावा, देशाचा अपमान होईल असे कृत्य करू नये, असे संविधानाने सांगितले आहे. त्यामुळे भारतमाता की जय म्हणणार नाही, असे म्हणणे हा संविधानानुसार देशद्रोह ठरतो, तसेच संविधानाने स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार दिले आहेत ते सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी. त्यातही स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काही विशेष अधिकार दिले आहेत; परंतु धार्मिक क्षेत्रात धर्मानुसारच आचरण करायचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या धर्मानुसार आचरण करावे, असे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. त्यामुळे त्या त्या धर्मियांनी त्या त्या धर्मानुसार, त्यांतील शास्त्रानुसार आचरण करावे. धर्मशास्त्रात संशोधन करण्याचा अधिकार आहे; पण धर्मशास्त्र पालटण्याचा अधिकार कुणालाही नाही.

– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात