महाराष्ट्रातील थोर हिंदु आणि मराठी पत्रकारितेचे पितामह विष्णुशास्त्री चिपळूणकर !

Vishnushastri_Chiplunkar
विष्णुशास्त्री चिपळूणकर

महाराष्ट्रातील थोर हिंदूंची सूची सिद्ध केली, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ! अवघे ३२ वर्षे आयुष्य लाभलेल्या या विचारशास्त्र्यांनी स्वधर्म अन् स्वदेश निष्ठा यांच्या बळावर महाराष्ट्रात विचारक्रांती घडवली ! त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा लोकमान्य टिळकांसारखा शिष्य घडवला. शालापत्रक, निबंधमाला, काव्येतिहास संग्रह आदी मासिकांचे क्रमाने संपादन करणारे आणि मराठा आणि केसरी या दैनिकांचे एकाच वेळी संपादकपद भूषवणारे विष्णुशास्त्री मराठी पत्रकारितेतील पितामह होते. त्यांचे स्थान मराठी पत्रकारितेत आणि विचारवंतांत शककर्त्यासारखे आहे. या थोर हिंदूने भारतियांसाठी दिलेले योगदान येथे देत आहे.

 

१. व्यक्तीवेध

१ अ. सुसंस्कारित पार्श्‍वभूमी !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे वडील इंग्रजी शिकलेले आणि सुधारक; पण काहीसे छंदीफंदी होते. त्यामुळे आजोबा आणि आजीने आपल्या नातवानेही त्या वाटेने जाऊ नये, याची काळजी घेतली. त्याचा परिणाम धर्म, नीती, आचारविचार आदी संस्कार विष्णुशास्त्र्यांवर आजोबा-आजींकडून होण्यात झाला.

१ आ. विचारक्रांती घडवणे, हे जीवनाचे उद्दिष्ट ठरवणे !

राष्ट्रवादाचे एक अस्त्र म्हणून विष्णुशास्त्री वृत्तपत्रांकडे पहात होते. लिखाण करून जहाल राष्ट्रवादी विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विचारक्रांती घडवणे, हे त्यांनी त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले होते. विचारक्रांती आणि राजकीय विचारक्रांती हे त्यांचे ध्येय आणि जीवितकार्य होते. इंग्लंंड, फ्रान्स आधी देशांत वर्तमानपत्रांद्वारे लोकांनी राज्यक्रांती घडवून आणली, ती विष्णुशास्त्र्यांना अभिप्रेत होती. तथापी त्यांचे अंधानुकरण त्यांना नको होते. वर्तमानपत्रे काढणारे विष्णुशास्त्री स्वतः वर्तमानपत्रे (ती विचारशून्य असल्याने) वाचीत नसत.

 

२. पत्रकारितेतील योगदान

२ अ. शालापत्रक मासिक

२ अ १. अवघ्या १७ वर्षी शालापत्रक मासिकाचे संपादक म्हणून पत्रकारितेला आरंभ !

विष्णुशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री १८६५ पासून शालापत्रक मासिकाचे संपादक होते. ग्रामीण भागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय शिक्षण खात्याच्या वतीने ते चालवले जात होते.

२ अ २. धर्म आणि राज्य या विषयावर सांगोपांग विचार करून त्याविषयीची सूत्रे आग्रहाने मांडणारे आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांवर टीका करणारे हिंदुत्ववादी संपादक !

शालापत्रकात विष्णुशास्त्र्यांनी कालिदास, दंडी, भवभूती, बाणभट्ट आदी संस्कृत कवींवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले. या कवींनी काव्य लिहित असतांनाही धर्म आणि राज्य या विषयावर सांगोपांग विचार केला होता. संस्कृत कविपंचक या नावाने पुढे हे लेख त्यांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. मराठी कवींवर अशीच लेखमाला ते गुंफणार होते. त्यातील एका लेखात मिशनर्‍यांसंबंधी काही टीकास्पद मजकूर त्यांनी लिहिला होता. तो डायरेक्टर साहेबांना आक्षेपार्ह वाटून त्यांनी १८७५ मध्ये शालापत्रकाचे प्रकाशन बंद करून टाकले. विष्णुशास्त्री मात्र बधले नाहीत, त्यांनी पुढे स्वतःची नियतकालिके काढून परदेशी मिशनर्‍यांनी बाटवाबाटवीचा जो उद्योग चालवला होता, त्याविरुद्ध जहालपणे लिहिले.

२ आ. निबंधमाला मासिक

२ आ १. निबंधमाला मासिकाचा ३२ ते ३४ पानांचा अंक एकटा लिहून काढणारे विचारशास्त्री !

२५ जानेवारी १८७४ ला निबंधमालेचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. मालेचे ८४ अंक निघाले. प्रत्येक अंकाची किंमत दोन आणे होती. वार्षिक वर्गणी अडीच रुपये होती. प्रत्येक अंक ३२ ते ३४ पानांचा असे. संपूर्ण अंक विष्णुशास्त्री एकटे लिहून काढीत.

२ आ २. शासकीय दबावाखाली न झुकता परखड लिखाण !

ते शासकीय शाळेत शिक्षक होते. परदेशी मिशनर्‍यांवर टीका आणि इंग्रज लेखकांनी भारताचा इतिहास खोटा आणि चुकीचा लिहिला, या त्यांच्या टीकेने त्यांचे स्थलांतर डिसेंबर १८७७ मध्ये रत्नागिरीच्या शासकीय शाळेत करण्यात आले. पुढे १८७८ मध्ये लॉर्ड लिटनच्या नेतृत्वाखाली शासनाने कायदा करून वृत्तपत्र स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध आणले; परंतु त्यास भिणारे किंवा दबून जाणारे विष्णुशास्त्री नव्हते.

 

३. कला, शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रांतील कार्य

३ अ. चित्रशाळेची स्थापना आणि त्याद्वारे केलेले कार्य !

१८७८ मध्येच त्यांनी चित्रशाळेची स्थापना केली. या चित्रशाळेत सिद्ध झालेली ऐतिहासिक पुरुषांची चित्रे काव्येतिहास संग्रह मासिकांतून छापणे चालू केले.

३ आ. साहित्याच्या विक्रीसाठी किताबखाना

विष्णुशास्त्र्यांनी या सर्व साहित्याच्या विक्रीसाठी १८७९ मध्ये किताबखाना हे पुस्तकाचे दुकानही त्यांनी काढले.

३ इ. आर्यभूषण छापखान्याची स्थापना !

स्वावलंबन हे विष्णुशास्त्र्यांच्या कार्याचे ब्रीद होते. स्वतंत्र मते प्रसिद्ध करायची, तर स्व-मालकीचा छापखाना हवा; म्हणून त्यांनी आर्यभूषण छापखान्याचीही स्थापना केली.

३ ई. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि केसरी अन् मराठा दैनिकांचा आरंभ !

१४ ऑक्टोबर १८७९ या दिवशी शास्त्रीबोवांनी शासकीय शाळेचे त्यागपत्र दिले आणि १ जानेवारी १८८० या दिवशी मोरोबादादा फडणीस यांच्या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तरुण, विद्वान, धडाडीची आणि ध्येयवादाने प्रेरित झालेली मंडळी विष्णुशास्त्र्यांना येऊन मिळाल्याने केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी अशी वर्तमानपत्रे चालू करण्यात आली. विष्णुशास्त्री त्यांचे पहिले संपादक होते.

 

४. विचारकार्य आणि लेखनाची वैशिष्ट्ये

४ अ. देशाच्या दारिद्य्राचे एकमेव कारण ब्रिटीश
राजवटच असल्याचे ठासून मांडणारे पहिले राजकीय विचारवंत !

देशाचे दारिद्य्र आणि संकट यांचे एकमेव मुख्य कारण ब्रिटीश राजवटच आहे, हे ठासून मांडणारे विष्णुशास्त्री हे प्रथम राजकीय विचारवंत आहेत. ब्रिटीश राजवटीला राज्य घटनेचा वैधानिक आधार नाही. नोकरशहांच्या लहरीप्रमाणे तो चालतो; म्हणून ही राजवट दायित्वशून्य आणि नीतीशून्य आहे, असे जळजळीत विचार ते मांडायचे. इंग्रज राज्यकर्ते विविध डावपेच, नाना क्लुप्त्या, कारस्थाने करून आपणास फसवत आहेत, हा विष्णुशास्त्र्यांचा आक्रोश तरुण मने आणि माणसे त्यांच्याकडे आकर्षित होण्यात झाला.

४ आ. देशाच्या प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्य,
हाच उपाय आहे, अशी राजकीय विचारसरणी !

विष्णुशास्त्रांचे राजकीय विचारांचे स्वरूप परिस्थिती सापेक्ष होते. दुष्काळ, बंडे, शेतकर्‍यांकडून दुष्काळातही बलपूर्वक शेतसारा वसूल करणे, इथला कच्चा माल न्यून किमतीत घेऊन विलायतेत नेऊन पक्का बनवून येथे आणून चढ्या भावात विकून येथील ग्रामीण उद्योग आणि व्यापार इस्ट इंडिया कंपनी शासनाने बुडवायला घेतला होता. त्यावर त्यांची झोड उठवली. सारांश, गुलाम राष्ट्राची स्थिती त्यांनी लोकांपुढे उभी केली आणि त्यावर राजकीय स्वातंत्र्य, हाच उपाय आहे, हे त्यांच्या राजकीय धोरणाचे सूत्र होते.

४ इ. मराठीला शक्तीमान बनवण्याचा ध्यास !

इंग्रजी भाषा बौद्धिक आणि राष्ट्रीय जागरूकतेचे महत्त्वाचे साधन आहे; म्हणूनच तिला त्यांनी वाघिणीचे दूध म्हटले आहे. ती शक्ती मराठी भाषेला देण्याचा त्यांचा ध्यास आणि प्रयत्न होता.

४ ई. भारतियांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याचा प्रयत्न !

कोणत्याही राष्ट्राच्या उद्धारासाठी जात्यभिमान (राष्ट्राभिमान) हा गुण आवश्यक असतो. याठिकाणी भारतातील आम्ही सर्व भारतीय हा जात्यभिमान, याचा अर्थ आहे. देशाच्या प्रचंड आकारमानामुळे भाषा, प्रांत, जात, पंथ यांनी समाजाच्या चिरफळ्या झाल्या आहेत. ज्यामुळे स्वदेशप्रेम आणि स्वदेशनिष्ठा लुप्त झाली आहे, ती जागृत करण्याचा विष्णुशास्त्र्यांचा प्रयत्न होता.

दैनिक लोकसत्ता, २१ मे २०००