छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळची श्रीसमर्थ रामदासस्वामींची अनुपस्थिती !

गुरु-शिष्यपण विमल आणि धवल राखण्याची दक्षता अन् प्रगल्भता
दर्शवणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळची श्रीसमर्थ रामदासस्वामींची अनुपस्थिती !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर महाराष्ट्राला राजा मिळाला. विनयशील आणि सद्गुरूंविषयी उत्कट भाव असणार्‍या शिष्याच्या या सोहळ्याला श्रीसमर्थ रामदासस्वामी यांची अनुपस्थिती हा आजही वादाचा मुद्दा बनून राहिला आहे; मात्र शासकीय संत होण्याऐवजी राजसत्तेवरील अंकुश ठेवता यावा, यासाठीच समर्थांनी सोहळ्याला जाण्याचे टाळले.

 

१. कविकुलगुरु कालिदासांनी शाकुंतल
या कथेत रेखाटलेले भारतीय राजाचे मनोरम चित्र

शिकारीसाठी अरण्यात आलेल्या दुष्यंत राजाला तपस्व्यांनी आश्रमाची माहिती दिल्यावर राजाला वाटले, आपण या रम्य परिसरातील आश्रमाचे पुण्यदर्शन घ्यावे. तपस्व्यांना उपद्रव होऊ नये; म्हणून त्याने सारथ्याला रथ दूर कुठेतरी ठेवण्यास सांगितले. आपल्या अंगावरची सर्व भूषणे आणि धनुष्यबाण सारथ्याजवळ देऊन तो उद्गारला, विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम । म्हणजे विनयशील वेष धारण करून तपोवनात प्रवेश करायचा असतो. कविकुलगुरु कालिदासांनी शाकुंतल या कथेत रेखाटलेले भारतीय राजाचे हे मनोरम चित्र आहे.

 

२. विनय हा राजसंस्थेचा अंगभूत अलंकार
स्वतःमध्ये जोपासणारे छत्रपती शिवाजी महाराज !

भारतीय राजनीतीप्रमाणे विनय हा राजसंस्थेचा अंगभूत महान अलंकार आहे. विनय म्हणजे नम्रता आणि शिस्त. कोणतीही राजसंस्था विनयाविना कल्याणकारी ठरू शकत नाही. अकुतोभय (भय ठाऊक नसलेल्या) आणि चंडप्रतापी (प्रचंड सामर्थ्यशाली असलेल्या) राजसंस्थेने कुठेतरी मस्तक नमवले पाहिजे, स्वयंस्फूर्तीने अन् आत्मसंतोषाने कुणासमोर तरी झुकले पाहिजे. विनयाविना राज्यान्ते नरकं घोरम् । म्हणजे राजसंस्थेचा शेवट घोर नरकामध्ये होतो हा राजसंस्थेस असलेला अभिशाप टळत नाही. विनयाविना राज्यसंस्थेचा स्वाभाविक माज, जाच आणि अन्याय यांनाही आवर घालता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजही याच राजनीतीच्या आहारावर वाढले असल्यामुळे वरील दोन्ही अर्थांनी ते निरतिशय विनयशील होते.

 

३. श्रीसमर्थांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असणे
आणि महाराजांचा सद्गुरूंविषयी उत्कट भाव असणे

छत्रपती शिवाजी महाराज विनयशील होते. श्रीसमर्थांना अशा प्राणप्रिय शिष्याचे कौतुक नव्हते का ? छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सद्गुरूंविषयी म्हणावा, तेवढा उत्कट भाव नव्हता का ? यांमुळे तर महाराज श्रीसमर्थांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या उपस्थितीविषयी उदासीन राहिले नाहीत ? हे दोन्हीही शक्य नव्हते. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती वादातीत आहे. परस्परांना एकमेकांचे अहर्निश चिंतन होते, हे निर्विवाद !

 

४. संतत्व लवमात्र ढळू न देता
उदंड राजकारण करणारे श्रीसमर्थ रामदासस्वामी !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित न रहाण्याविषयी श्रीसमर्थांच्या बाजूने विचार करता निःशंकपणे अन् ठामपणे म्हणता येते की, त्या वेळी गांधीयुग उगवायचे होते, म्हणजे संतही म्हणवावयाचे आणि जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ (तुकाराम गाथा, अभंग ५५०, ओवी २) म्हणजे जे लोक राज्य आणि द्रव्य मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, ते दांभिक आहेत. त्यांना मान हवा असतो. ही उठाठेवही करावयाची, ही कल्पना त्यांच्या डोक्यात येणे शक्य नव्हते. त्यांनी उदंड राजकारण केले असले, तरी ते स्वतःमधील संतत्व लवमात्र ढळू न देता, दास डोंगरी रहातो । यात्रा देवाची पहातो ॥ (समर्थ रामदासस्वामी) म्हणजे (रामाचा) दास डोंगरावर राहून देवाची यात्रा पहातो, या विरागी पद्धतीने प्रत्यक्ष राजकारण न खेळता केले. त्यामुळे त्यांचे बावनकशी संतपण निखळ राहिले. राज्याभिषेकास उपस्थित रहाणे म्हणजे शासकीय संत बनण्यासारखेच झाले असते. राजसत्तेवरील अंकुश म्हणून त्यांची अनुपस्थितीच योग्य होती.

 

५. अकलंकित संतत्व जोपासणे,
विनयप्रवर्तक अंकुश तीव्र करणे इत्यादी कारणांस्तव
श्रीसमर्थांनी महाराजांच्या अभिषेकोत्सवास अनुपस्थित रहाणे

स्वतःला चरणरज बनवून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज इंद्राच्या ऐश्‍वर्यानिशी श्रीसमर्थांच्या देखत सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणे आणि त्याच वेळी विनीतवेषाने पायताण झाल्यासारखी सेवा करणे, या दोन्हीही गोष्टी करू शकले असते का ? श्रीसमर्थांना मनोमन निश्‍चिती होती की, राजांना त्यांच्यादेखत राजसिंहासन अलंकृत करणे प्रत्यक्षात तर राहोच, स्वप्नातही जमले नसते. महाराजांना अडचणीत आणून राज्याभिषेकोत्सवात संकोच-कलंकाने मलीन करणे समर्थांनाही रूचले नसते. अकलंकित संतपण जोपासणे, विनयप्रवर्तक अंकुश तीव्र करणे आणि राजांना अवघडल्यासारखे न करणे इत्यादी कारणांस्तव श्रीसमर्थ अभिषेकोत्सवास उपस्थित राहिले नसले, तर त्यात कोणतेच नवल नाही. गुरु-शिष्यपण विमल आणि धवल राखण्याची सर्व दक्षता अन् प्रगल्भता यातच होती.

संदर्भ : त्रैमासिक प्रज्ञालोक, जुलै १९७४