संंतांच्या जीवनातील घटनांचे दाखले कुठेही जोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

     नुकतेच महाराष्ट्रात भूमाता ब्रिगेडच्या महिलांचे समानतेचे नाटक पार पडले. या नाटकाचा प्रयोग पुरता फसला, हे निराळे. या घटनेविषयी वृत्तवाहिन्यांवरून जी चर्चासत्रे झाली, त्यातील एका चर्चासत्रातील धर्मद्रोही वक्तव्यांचे खंडण करणे अपरिहार्य आहे; कारण त्यामुळे समाजात योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो.

१. सामाजिक व्यासपिठावर वावरतांना अभ्यासपूर्ण आणि
त्रयस्थपणे सूत्रे मांडणे आवश्यक असते, याचेही भान नसलेले सूत्रसंचालक !

Prajakta_Dhotamal
कु. प्राजक्ता धोतमल

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर शनिशिंगणापूर येथे प्रजासत्ताक पोचले आहे का ?, अशा आशयाचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी सांगितले, महिलांनी चौथर्‍यावर चढून शनिदेवाचे दर्शन घ्यावे कि न घ्यावे, हा संपूर्णपणे धर्माशी संबंधित प्रश्‍न असल्याने हा निर्णय शंकराचार्यांना विचारून घ्यायला हवा. यावर सूत्रसंचालक प्रसन्न जोशी म्हणाले, म्हणजे संत ज्ञानेश्‍वरांना शुद्धीपत्र न देण्याचा निर्णय घेणार्‍या तत्कालीन कर्मठ धर्माचार्यांप्रमाणे तुम्ही करणार का ? या प्रश्‍नावरून प्रसन्न जोशी यांचा अभ्यास किती एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे, हे लक्षात येते. सामाजिक व्यासपिठावर वावरतांना आपण अभ्यासपूर्ण आणि त्रयस्थपणे सूत्रे मांडायला हवीत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

 

२. भूमाता ब्रिगेडच्या महिला संत ज्ञानेश्‍वरांसारखी साधना का करत नाहीत ?

     प्रसन्न जोशी यांनी पुढील सूत्रांचाही अभ्यास करायला हवा. संत ज्ञानेश्‍वरांना आणि त्यांच्या भावंडांना तत्कालीन काशीच्या विप्रपंडितांनी शुद्धीपत्र नाकारले. त्यांनी धर्मशास्त्राप्रमाणे हा निर्णय घेतला होता. त्यात त्यांच्या कर्मठपणाचा अन् अहंकाराचा भाग होता, असे गृहित धरले, तरी संत ज्ञानेश्‍वरांनी त्यांच्याविरुद्ध आताच्या पुरोगाम्यांप्रमाणे बालीश बंड पुकारले नाही. जीवात्म्याला जडत्व आणणार्‍या या अहंकाराला आणि ब्रह्मांंडव्यापी भगवंताला केवळ कर्मकांडाच्या बंधनात अडकवणार्‍या या द्विजांचे संत ज्ञानेश्‍वरांनी आपल्या ज्ञानदीप्तीने चक्षू उघडले. आपल्या साधनासामर्थ्याने रेड्यामुखी वेद वदवून मोठ्या आदराने आणि मायेने त्यांनी काशीच्या तत्कालीन पंडितांचा अहंकार वितळवला आणि त्यांना कर्मकांडाच्या टप्प्यातून उपासनाकांडात आणले, म्हणजे भक्तीमार्गाकडे वळवले.

   स्वयंप्रकाशी सूर्याच्या अस्तित्वाने अंधःकार नाहीसा होतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्‍वरांच्या दिव्यत्वाने आपोआपच पंडितांच्या अज्ञानाचा अंधःकार दूर झाला. शनिदेवाच्या कृपेसाठी आसुलेल्या (?) आणि स्वतःला त्याच्या भक्त म्हणवणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या महिला संत ज्ञानेश्‍वरांसारखी साधना का करत नाहीत ? प्रसन्न जोशी यांनी विचारलेला हा प्रश्‍न म्हणजे एकांगी अभ्यासहीन वक्तव्य आहे. पूर्वग्रहाने केवळ विरोधासाठी केलेला हा विरोध आहे. स्वतः पुष्कळ बुद्धीवान आणि समयसूचक आहोत, हे दर्शवण्याचा हा लंगडा प्रयत्न आहे.

 

३. स्त्री-पुरुष समानतेचे कारण पुढे करणार्‍या महिलांनो,
प्रभु श्रीरामानेही धर्मशास्त्राचे पालन केले, हे लक्षात घ्या !

     हिंदु धर्म हा चिरंतन आहे. तो मानवनिर्मित नसून ईश्‍वरनिर्मित आहे. धर्मातील परंपरांचे प्रत्यक्ष भगवंतानेही पालन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्रेतायुगात दशरथाचे श्राद्ध करतांना भगवान श्रीरामाने केलेले पिंडदान स्वीकारण्यासाठी स्वतः दशरथाने आपले दोन्ही हात पुढे केले; परंतु धर्मशास्त्रानुसार तसे करता येत नसल्याने श्रीरामाने राजा दशरथाच्या हातावर पिंड न ठेवता धर्मात सांगितल्याप्रमाणे श्राद्धविधी केला. जिथे प्रत्यक्ष ईश्‍वरानेही धर्मशास्त्रातील नियमांचे पालन केले, तेथे स्त्री-पुरुष समानतेचे कारण पुढे करणार्‍या महिलांना धर्मशास्त्रातील नियमांचे वावडे का ?

 

४. देवाला धर्माचरण करून भक्ती वाढवणे अपेक्षित असल्याने
त्याने स्त्रियांना तत्कालीन समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारायला सांगितले नाही, हे लक्षात घेणे आवश्यक !

     रहाता राहिला प्रश्‍न देवाकडे स्त्री-पुरुष समानता आहे का, याचा ! अरे, ज्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले, त्याला स्त्रियांचे वावडे असणार आहे का ? याच देवाने संत कान्होपात्रेला स्वतःत सामावून घेतले, जनाबाईंचे दळण दळले, तिला गोवर्‍या थापायला साहाय्य केले, संत मीराबाईसाठी विषाचे अमृतात रूपांतर केले, हे आपण कसे विसरतो ? येथे देवाने त्या स्त्रियांना तत्कालीन समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारायला का सांगितले नाही ? या गोष्टीचा विचार कुणी का करत नाही ? कारण स्पष्ट आहे, देवाला पोकळ बुद्धीप्रामाण्याच्या आधारे विरोध नव्हे, तर धर्माचरण करून भक्ती वाढवणे अपेक्षित आहे. भक्ती वाढवून आध्यात्मिक उन्नती करवून घेतल्यास नुसते चौथर्‍यावरच काय, तर देवाच्या हृदयात जाऊन बसता येईल.

 

५. धर्मप्रेमींनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर
चढू पहाणार्‍या महिलांना रोखण्यामागचे कारण

     आज शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढू पहाणार्‍या महिलांना धर्मप्रेमी रोखत आहेत. हा त्यांचा अहंकार आणि कर्मकांड यांचा भाग नसून त्या महिलांना त्रास होऊ नये यासाठी, तसेच हिंदु धर्मातील रूढी-परंपरा कुणी वाटेल तशा मोडून धर्माचा होणारा अपमान टाळण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. असे करणे आवश्यक आहे; कारण येणार्‍या पिढीला प्रथा-परंपरा मोडणे योग्य आहे, असे वाटू शकते अन् ते चुकीच्या मार्गाला लागू शकतात.

– कु. प्राजक्ता धोतमल (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात