देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून प्रसाद बनवून घ्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नव्हे; तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – चवीसाठी बनतो तो शिरा आणि भावापोटी बनतो तो प्रसाद, असे एक वाक्य प्रसिद्ध आहे. कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कारागृहातील महिला कैद्यांकडून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरासाठी लागणारे प्रसादाचे लाडू बनवून घेण्याचा निर्णय हा सर्वथा अयोग्य आहे. हे एखादे व्यावसायिक कंत्राट न समजता देवीसाठी सात्त्विक प्रसाद बनवण्याची सेवा आहे, असा सेवाभाव असणार्‍या भक्तांना ही सेवा द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याविषयी कोल्हापूरमधील हिंदुत्ववादी संघटनांचाही विरोध असून या संदर्भात लवकरच सर्व संघटना एकत्रितपणे जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी कळवली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, देवाचा प्रसाद ग्रहण केल्याने ईश्वरी चैतन्य मिळते, असे धर्मशास्त्र सांगते आणि भाविकांचा तसा भाव असतो. धर्मशास्त्रानुसार कोणताही प्रसाद बनवतांना शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. शुचिर्भूततेच्या नियमांमध्ये स्नानादी कृत्ये, शाकाहार आणि मासिक धर्माचे पालन आदी गोष्टी अंतर्भूत असतात. कारागृहातील महिला कैद्यांकडून या नियमांचे पालन होईल, याचे दायित्व कोण घेणार ? तसेच कारागृहात कैद्यांमध्ये अन्य धर्मीय कैद्यांचा समावेशही असल्यामुळे त्यांचा देवतेप्रती भाव असेलच, असे गृहित धरता येत नाही. कळंबा कारागृहात गांजासारखे अमली पदार्थ सापडतात, तसेच तेथील अनेक गैरकृत्ये वारंवार उघडकीस आली असून या कारागृहाची भयावहता त्यातून स्पष्ट होते. त्यामुळे श्री महालक्ष्मीसारख्या जागृत देवीचा पवित्र प्रसाद कैद्यांकडून करवून घेणे, हे आध्यात्मिक आणि आरोग्य अशा दोन्ही दृष्टीने अयोग्य ठरते.

कारागृहातील महिलाही देवीची भक्ती निश्‍चितच करू शकतात, कारण भक्तीमार्गात उपासनेला कोणतेही बंधन नसते; मात्र प्रसाद हा षोडशोपचार पूजेतील एक भाग असल्याने कर्मकांडातील एक भाग आहे. कर्मकांडातील नियम पाळले, तरच त्याचा लाभ भाविकांना होतो. त्यामुळे मंदिर समितीने श्री महालक्ष्मी मंदिरासाठीचा प्रसाद बनवण्याची सेवा कारागृहातील महिला कैद्यांना देऊ नये. सत्त्वगुणी भक्तांकडून सेवा म्हणून तो बनवून घ्यावा. श्री महालक्ष्मीदेवीवर श्रद्धा असणारे आणि शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळून प्रसाद बनवण्याची सेवा करण्यास इच्छुक असणारे अनेक महिला बचत गट कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. त्यांचाही विचार मंदिर व्यवस्थापनाने करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात