पनवेल (जिल्हा रायगड) येथे विविध ठिकाणी झालेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन

raigad_haldi_kumkum
सनातन संस्था पुणे या न्यासाच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करतांना सौ. चौगुले

     पनवेल – संस्कृती महिला बचत गट सेक्टर ९, कामोठे येथे मकरसंक्रांतिनिमित्त हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. येथे सनातन संस्थेच्या सौ. वंदना आपटे यांनी महिलांना हळदीकुंकवाचे महत्त्व आणि सात्त्विक वाण का द्यावे, तसेच महिलांनी सक्षम होण्यासाठी काळाची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाचे उपाय यांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचा १५० महिलांनी लाभ घेतला. या वेळी सनातनने प्रकाशित केलेले रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र हे लघुग्रंथ महिलांना वाण म्हणून देण्यात आले.

     शांतिसागर सोसायटी, सेक्टर ११ कामोठे, येथे हळदीकुंकवाचे महत्त्व आणि धार्मिक परंपरा पाळण्याचे महत्त्व विषद केले. याचा ६५ महिलांनी लाभ घेतला. सावित्रीबाई फुले महिला मंडळ, कळंबोली येथे सद्यस्थितीमध्ये वातावरणाचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा ४५० महिलांनी लाभ घेतला. सौ. वंदना आपटे यांनी येथेही मार्गदर्शन केले.

 

सनातन संस्था पुणे या न्यासाच्या वतीनेही कार्यक्रमाचे आयोजन

     आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शिरढोण ग्रामपंचायत, ता. पनवेल येथेही हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन येथील सरपंच सौ. अचला वाजेकर यांनी केले. या वेळी माजी सरपंच सौ. साधना वाजेकर यांनी भोगी, संक्रांत आणि किंक्रांत याविषयी माहिती दिली. सनातन संस्था पुणे या न्यासाच्या वतीने सौ. पुष्पा चौगुले यांनी भारतीय संस्कृती आणि आजची सद्यस्थिती, महिलांवर होणारे अन्याय आणि उपाययोजना, लव्ह जिहाद, तसेच वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या शौर्याविषयी सांगितले. या कार्यक्रमाचा ५५० महिलांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठी सनातन संस्थानिर्मित देवीपूजनाशी संबंधित शास्त्र, रांगोळी आणि अन्य लघुग्रंथ असे एकूण ५१८ ग्रंथ वाण म्हणून देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात