स्वातंत्र्यवीर सावरकर – आरोप आणि वास्तव ! (भाग २)

प्रथम भाग वाचण्यासाठी भेट द्या. भाग १

आरोप क्र. २

(म्हणे) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी
आपल्या सुटकेनंतर काहीच देशकार्य केले नाही,
त्यांनी ब्रिटिशांना सहकार्य केले आणि नेताजी बोस यांना विरोध केला !

खंडण

१. स्थानबद्धतेच्या काळातील
सावरकरांचे अस्पृश्यता निर्मूलनाचे प्रचंड कार्य
आणि ज्येष्ठ पुढार्‍यांनी त्यांची रत्नागिरीत घेतलेली भेट !

Ranjeet_Savarka_clr
श्री. रणजित सावरकर

रत्नागिरीच्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांना राजकीय कामाची बंदी होती. त्यामुळे त्यांनी हिंदु समाजातील अनिष्ट जातीप्रथांविरुद्ध आणि अनिष्ट रूढी, अंधविश्‍वासाविरुद्ध लढा पुकारला. त्यांचे रत्नागिरीतील १४ वर्षांचे अफाट कार्य बघून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी रत्नागिरी येथे केलेल्या भाषणात कौतुक करून माझे उरलेले आयुष्य देवाने सावरकरांना द्यावे, असे जाहीर उद्गार काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अस्पृश्यताच नव्हे, तर जातीसंस्थेचेच निर्मूलन झाले पाहिजे, अशा विचारांशी सहमत असलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये आपण आहात, याविषयी मला आनंद आहे, असे म्हटले होते. सावरकरांच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले प्रचंड कार्याचे संपूर्ण विवरण आज सगळ्यांना उपलब्ध असल्यामुळे या विषयावर अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही; परंतु एवढेच सांगणे पुरे की, सावरकर हे श्री. टकले यांच्या आरोपानुसार ब्रिटिशांना सहकार्य करणारे असते, तर भारतातील असंख्य ज्येष्ठ पुढारी, ज्यात महात्मा गांधींचाही समावेश आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी रत्नागिरीसारख्या दुर्गम भागात गेले नसते.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फाळणी
टाळण्यासाठी अविरत कष्ट घेऊन केली लोकजागृती !

वर्ष १९३७ नंतर जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची बंधने काढून टाकण्यात आली, तेव्हा ते हिंदु महासभेचे अध्यक्ष झाले. मुस्लिम लीगच्या अवास्तव मागण्या आणि काँग्रेस लीगचा करत असलेला अनुनय, या पार्श्‍वभूमीवर भारतापुढे फाळणीचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फाळणी टाळण्यासाठी अविरत कष्ट घेऊन लोकजागृती केली. सावरकरांची संपूर्ण अध्यक्षीय भाषणे हिंदुराष्ट्रदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहेत.

२१ मार्च १९४२ या दिवशी रासबिहारी बोस रेडिओवरून सावरकरांना उद्देशून म्हणाले, तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकारी योद्ध्याला प्रणाम करणे, हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो. भारतीय राजनीती ही कधीही परकीय देशाच्या नीतीवर अवलंबून नसावी आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असावा, या धोरणाचा पुरस्कार करून आपण आपली थोरवी पुन्हा सिद्ध केली आहे.

३. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि
रासबिहारी बोस यांनी केलेले सावरकरांचे कौतुक !

२५ जून १९४४ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद रेडिओवरून म्हणाले, लहरी आणि भ्रामक राजकीय विचार अन् दूरदृष्टीच्या अभावामुळे आज बहुतांश काँग्रेस नेते भारतीय सेनेच्या सैनिकांना भाडोत्री म्हणून हिणवत असतांना वीर सावरकर निर्भयतेने भारतीय युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. याच सैनिकांमधून आपल्या भारतीय राष्ट्रीय सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळत आहेत.

savarkar_2_antim
स्वातंत्र्यवीर सावरकर

त्याचप्रमाणे या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर जपानमधील क्रांतीकारक आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांच्या संपर्कात असल्याचे निर्विवाद पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार सावरकरांनी चालू केलेल्या सैन्य भरतीला रासबिहारी बोस यांचे समर्थन असल्याचे सिद्ध होते. रासबिहारी बोस यांनी मार्च आणि एप्रिल १९३९ मध्ये दाई आजिया शुगी या जपानी मासिकात सावरकरांचे चरित्र लिहिले. या चरित्राचे शीर्षक होते, सावरकर- नव्या भारताचा उगवता नेता – कर्तृत्व आणि व्यक्तीमत्त्व! या लेखात सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाची आणि हिंदुत्ववादाची ओळख जपानी जनतेला करून देतांना त्यांनी लेखाच्या शेवटी काढलेला निष्कर्ष महत्त्वाचा आहे. लेखाचा शेवट करतांना ते म्हणतात, तुम्ही सावरकरांच्या विचारांशी सहमत झालात, तरच तुम्ही राजकीय दृष्टीने सामर्थ्यशाली बनाल. सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्थान अढळ आहे.

 

आरोप क्र. ३

(म्हणे) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला !

खंडण

१. वस्तूस्थितीचा विपर्यास करणार्‍या
वृत्ताचा संदर्भ देणारे लेखक निरंजन टकले !

याबद्दल पुरावा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १५ ऑगस्ट १९४३ या दिवशी नागपूर येथे केलेले खालील कथित वक्तव्य श्री. टकले सादर करतात.
I have no quarrel with Mr. Jinnahs two-nation theory. We, Hindus are a nation by ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two nations. परंतु काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले हे वक्तव्य वस्तूस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट केले होते.

२. सावरकरांनी हिंदु महासभेच्या
कार्यकर्त्यांना फाळणीविरुद्ध लढण्याचे आदेश दिले होते !

१९ ऑगस्ट १९४३ या दिवशी दैनिक काळमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, पत्रकार परिषदेत त्यांची मांडलेली विस्तृत मते जागेअभावी अथवा हेतूतः विपर्यास्त स्वरूपात मांडून स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्विराष्ट्रवादाचे प्रणेते हे खोटे वृत्त प्रकाशित झाले आहे. मुळातच जगभरातील मुसलमान स्वतःला खलिफाच्या नेतृत्वाखालील धार्मिक राष्ट्र मानत आले आहेत आणि या दृष्टीने मुसलमान स्वतःला वेगळे राष्ट्र मानतात; परंतु वस्तूस्थितीनुसार राजकीय लोकशाहीच्या दृष्टीने हिंदू हेच राष्ट्र आहे; कारण अनादि कालापासून तेच इथे बहुसंख्येने आहेत अन् मुस्लिम एक अल्पसंख्यांक अन् आक्रमक जमात आहे. मुस्लिमांच्या या धोरणामुळे भारतापुढे फाळणीचा धोका निर्माण झाल्याने सावरकरांनी हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांना फाळणीविरुद्ध लढण्याचे आदेश दिले.

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा मुळातच १९ व्या शतकात सर सय्यद अहमद यांनी मांडला होता. त्यानंतर उर्दू कवी इक्बाल याने त्याचा पुरस्कार केला आणि शेवटी जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने ही मागणी उचलून धरली. यात सावरकरांचा काहीही संबंध नाही. हे त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून स्पष्ट होते. पुन्हा हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की, उद्धृत केलेले वक्तृत्व विपर्यास करणारे असल्याचे सावरकरांनी लगेचच स्पष्ट केले होते.

 

आरोप क्र. ४

(म्हणे) स्वातंत्र्यवीर सावरकर गांधीहत्येत सहभागी होते !

खंडण

१. महाराष्ट्रद्वेषी कपूर कमिशनच्या
अहवालाचा दाखला देत सावरकरांना
गांधीहत्येत दोषी धरणारे लेखक निरंजन टकले !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गांधीहत्येच्या आरोपातून निर्विवाद सुटका झाली होती. नथुराम गोडसे हे एकेकाळी त्यांचे अनुयायी होते; परंतु सावरकर या कटात सहभागी होते, असा कणमात्र पुरावा न्यायालयापुढे येऊ शकला नाही. असे असतांनाही आता टकले यांनी कपूर कमिशन अहवालाचा दाखला देत कमिशनने स्वातंत्र्यवीर सावरकर या कटाचे सूत्रधार असल्याचा निष्कर्ष काढल्याचे धादांत खोटे विधान केले आहे.

कपूर कमिशनच्या पूर्ण अहवालात गोडसे आणि इतर आरोपी यांचा सावरकरवादी, असा हेतूतः उल्लेख सतत करण्यात आला आहे. गोडसे आणि इतर हे हिंदु महासभेचे अनुयायी होते आणि सावरकर अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या संपर्कात होते. गांधी हत्येच्या सुमारे दोन वर्षे आधी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा गोडसे यांच्याशी संपर्क नव्हता. असे असतांना केवळ द्वेषामुळे या अहवालात आरोपींचा उल्लेख सावरकरवादी म्हणून करण्यात आला आहे. कपूर यांच्या महाराष्ट्रद्वेषाचा उघड पुरावा म्हणजे त्यांनी त्यांच्या अहवालाच्या निष्कर्षात छेदक (सूत्र) २६.११२ मध्ये गोडसे यांची तुलना मराठा सैन्याच्या वेगवान हालचालींशी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधिशाने अशा प्रकारे दायित्वशून्य (बेजबाबदार) विधाने करणे योग्य नाही.

२. द्वेषबुद्धीने कपूर कमिशनने
अहवालात मध्येच कुठेतरी घुसडलेले सावरकरांचे नाव, संदर्भ
नसलेले वाक्य हा हत्येच्या कटातील सहभागाचा पुरावा कसा होईल ?

त्याहीपुढे जाऊन कपूर कमिशनने २५ व्या प्रकरणात मुंबईमधील तपासाचा उहापोह करतांना नगरवाला यांना मिळालेला उपलब्ध पुरावा, हा हत्येच्या कटाकडे निर्देश करत असल्याचे म्हणत नगरवाला यांनी त्या दिशेने तपास करायला हवा होता, अशा अर्थाची विधाने केली आहेत; परंतु कुठलाही पुरावा नसतांना मध्येच त्यांनी All these facts taken together where destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group असा उल्लेख दायित्वशून्यपणे केला आहे. प्रकरण २५ व्या निष्कर्षात याविषयी काहीच नाही, तसेच अहवालाच्या अंतिम निष्कर्षातही असा एकही शब्द नाही. तेव्हा द्वेषबुद्धीने अहवालात मध्येच कुठेतरी घुसडलेले, शेंडाबुडका नसलेले वाक्य हा कपूर कमिशनचा निष्कर्ष आहे, हे संपूर्ण खोटे आहे.

३. कपूर कमिशनपुढे सावरकरांचे
सचिव आणि अंगरक्षक यांनी साक्ष दिली, असे
सांगणे हा लेखक टकले यांचा खोटारडेपणाचा कळस !

याही पुढे जाऊन टकले यांनी खोटारडेपणाचा कळस करत कपूर कमिशनपुढे सावरकरांचे सचिव गजानन दामले आणि अंगरक्षक आप्पा कासार यांनी सावरकर हे गांधीहत्येत सहभागी असल्याची आम्हाला माहिती होती, अशी साक्ष दिल्याचे निखालस खोटे विधान केले आहे; परंतु या दोघांनी कपूर कमिशनपुढे कधीही साक्ष दिली नव्हती. गांधीहत्येच्या खटल्यातही या दोघांना साक्षीदार करण्यात आले नव्हते. कपूर कमिशनपुढे तपासलेल्या १०१ साक्षीदारांच्या सूचीत त्यांचे नाव नाही.

 

आरोप क्र. ५

(म्हणे) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तिरंगा राष्ट्रध्वजाला विरोध होता !

खंडण

चरखा असलेला तिरंगा राष्ट्रध्वज करण्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तीव्र विरोध होता, ही वस्तूस्थिती असली, तरी स्वतंत्र भारताच्या चक्रांकित ध्वजाला त्यांचा पाठिंबा होता. त्यांनी निर्मिलेला आणि मादाम कामा यांनी स्टुटगार्ड आंतरराष्ट्रीय परिषदेत २१ ऑगस्ट १९०७ या दिवशी फडकवलेला भारताचा राष्ट्रध्वजही तिरंगा होता.

– श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात