पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमण्याविषयी धर्मशास्त्रीय भूमिका

sunil_ghanvat
श्री. सुनील घनवट

झी २४ तास या वृत्तवाहिनीवरील चर्चेत पंढरपूर येथील श्री रूक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमले आहेत. या धोरणाचे स्वागत करणार का ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना विचारण्यात आला. त्याविषयीची धर्मशास्त्रीय भूमिका येथे देत आहोत.

१. प्रत्येक मंदिरात पौरोहित्य करण्याचे निकष आणि पूजा करण्याच्या पद्धती या कर्मकांडातील नियमानुसार अन् परंपरेनुसार ठरलेल्या असतात. हे नियम आणि परंपरा त्या मंदिरात वंशपरंपरेने पूजा करणार्‍या पुरोहितांना अवगत असतात. पौरोहित्य करणार्‍यांमध्ये अचानक पालट झाल्यास दैनंदिन पूजेच्या प्रथा परंपरांमध्ये खंड पडतो. शासनाने श्री रुक्मिणी मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून पूजा करणार्‍या उत्पातांना तडकाफडकी हटवून पूजाविधी अवगत नसलेल्या महिला पुजार्‍यांची नियुक्ती करून धार्मिक परंपरांची पुष्कळ मोठी हानी केली आहे आणि त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यालाही बाधा पोचली आहे.

२. हिंदु धर्मशास्त्रानुसार कोणत्याही मंदिरातील पौरोहित्य हे पौरोहित्याचे शिक्षण घेतलेल्या पुरुष पुरोहिताने करण्याचा प्रघात आहे. महिला पौरोहित्य ही संकल्पना ही धर्मशास्त्रसंमत नाही. त्यामुळे श्री रुक्मिणी मंदिरात महिला पुरोहित नियुक्त करण्याचे शासनाचे धोरण हे निषेधार्हच आहे.

३. राजसत्ता ही धर्मसत्तेच्या अंकुशाखालीच असते. हा भारताचा इतिहास आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्रातील धर्मपरंपरांविषयी राजसत्तेने निर्णय घेणे, म्हणजे राजधर्म डावलण्यासारखे आहे आणि हे समाजहितासाठी हानीकारक आहे. रस्ते आणि पूल बांधण्यासारखे शासनाचे लहानसहान निर्णयही चुकल्याची अनेक उदाहरणे आहेत. या पार्श्‍वभूमीवर धर्मशास्त्राचा अभ्यास नसतांना पंढरपूर येथील रुक्मिणी मंदिरात महिला पुजारी नेमण्याचा निर्णय स्वतःच घेणे चुकीचे आहे. रुक्मिणी मंदिरामध्ये महिला पुरोहितांची नियुक्ती करण्यासारखा धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेतांना शासनाने धर्ममार्तंड, संत-महंत, शंकराचार्य यांचे मार्गदर्शन घेतलेले नाही. त्यामुळे धर्मसत्तेला मान्य नसलेला निर्णय राज्यकर्त्यांनी परस्पर घेणे ही मग्रुरी आहे.

४. धर्माचे पालन हे कठोरतेनेच करायचे असते. त्यामध्ये सामाजिक भाव-भावनांना थारा नसतो. केवळ लोकेषणेपोटी पुरोगामी आणि सत्ताधारी लोक महिला पुरोहित, स्त्रीमुक्ती, धार्मिक क्षेत्रातील स्त्री-पुरुष समानता यांसारखे लोकानुनय करणार्‍या भूमिका घेत असतात. यातून समाज परिवर्तन होत असल्याचे वरकरणी दिसत असले, तरी धर्महानीमुळे समाजाची अवनती होत असते. कालांतराने या अवनतीची पापे सामाजिक कलह, नैसर्गिक आपत्ती या माध्यमातून फेडावी लागतात. याला सर्वस्वी धर्मविरोधी निर्णय घेणारे राज्यकर्ते आणि त्यांचे पाठीराखे उत्तरदायी असतात.

५. रुक्मिणी मंदिरातील पूजाविधी वंशपरंपरेने करणार्‍या उत्पातांना हटवून ते महिला पुजार्‍यांना करण्यास सांगितल्यामुळे अनेक धार्मिक परंपरांना छेद दिल्याचे ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक यांनी सांगितले आहे. हा सर्व प्रकार देवस्थान समितीला अवगत आहे; पण देवस्थान समिती मंदिरातील पूजेतील धार्मिक परंपरा चालू ठेवण्याविषयी जागरूक नाही. रुक्मिणी मंदिरातील पूजाविधी नीट होत नसल्यामुळे ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मनोमन दुःखी आहेत. रुक्मिणी मंदिरातील पूजेतील धार्मिक परंपरा पूर्वीप्रमाणे चालू करून भाविकांच्या श्रद्धांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राज्यकर्त्यांनी बजावावे.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात