मानवकल्याणासाठी सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय ! – स्वामी श्री सुकचरानन्दजी, शिवसेना, उत्तर प्रदेश

स्वामी श्री सुकचरानन्दजी यांची
देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट !

स्वामी श्री सुकचरानन्दजी यांना ग्रंथ भेट देतांना श्री. शिवाजी वटकर (डावीकडे), समवेत श्री. वाल्मिकी (उजवीकडे)
स्वामी श्री सुकचरानन्दजी यांना ग्रंथ भेट देतांना श्री. शिवाजी वटकर (डावीकडे), समवेत श्री. वाल्मिकी (उजवीकडे)

देवद (पनवेल), २८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु धर्मावरील आघात रोखून सनातन संस्था सनातन हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. मानवकल्याणासाठी होत असलेले हे कार्य प्रशंसनीय आहे. हिंदु धर्मरक्षणाचे कार्य वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये सनातन संस्थेला सहकार्य करू. आश्रमात एवढे साधक आणि कार्य होत असतांनाही येथे पुष्कळ शांतता आहे, हे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर प्रदेश येथील उपप्रमुख स्वामी श्री सुकचरानन्दजी यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमाला २७ जानेवारी या दिवशी भेट दिल्याच्या प्रसंगी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी आश्रमात केल्या जाणार्‍या सेवांविषयी त्यांना अवगत केले.

     श्री. वटकर यांनी त्यांना हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेला ‘लव्ह जिहाद’, ‘हिंदु राष्ट्र की आवश्यकता’ हे ग्रंथ आणि हिंदी पाक्षिक सनातन प्रभात भेट दिला. या वेळी स्वामींच्या समवेत त्यांचे मुंबई येथील कार्यकर्ते सर्वश्री राजेंद्र सिंह, विजयनारायण मिश्रा आणि सुरेंद्र प्रसाद तिवारी हेही उपस्थित होते. मिर्जापूर येथे त्यांचा आश्रम असून ते सामाजिक आणि धार्मिक कार्य करत आहेत.

     मुंबईतील शिवसेना कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी श्री. मनोज वाल्मिकी हेही या वेळी आश्रमभेटीसाठी आले होते. ते हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमांमध्ये सक्रीय भाग घेतात. ते म्हणाले, “आश्रम पाहिल्यावर चांगले वाटून आम्ही प्रभावित झालो आहोत. यापुढे आम्हाला धर्मासाठी पुष्कळ कार्य करावयाचे आहे.”

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात