हिंदूंनो, विजयोपासनेला आरंभ करा ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (2012)

विजयादशमी निमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

प.पू. डॉ. जयंत आठवले H.H. Dr. Jayant Athavale
प.पू. डॉ. जयंत आठवले

शुंभ, निशुंभ, महिषासुरादी प्रबल दैत्यांवर महादुर्गेने आणि अहंकारी रावणावर श्रीरामाने विजय मिळवला, तो दिवस म्हणजे विजयादशमी ! दसरा म्हणजे केवळ हिंदु देवतांच्या विजयाचे स्मरण करण्याचा सण नव्हे, तर विजिगीषू वृत्तीचे संवर्धन करण्याचा दिवस आहे; म्हणूनच या दिवशी राक्षसी प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हिंदु धर्मात विजयोपासना सांगितली आहे. शत्रूंपासून अजिंक्य रहाण्यासाठी अपराजिता देवीचे पूजन, शस्त्रे शत्रूंचा संहार करतात म्हणून शस्त्रपूजन आणि नंतर प्रत्यक्ष शत्रूच्या पराभवासाठी सीमोल्लंघन करणे, या कृती दसर्‍याला केल्या जातात.

आज या विजयोपासनेचे विस्मरण झाल्याने सर्वत्र हिंदू पराभूत होत आहेत. युद्धाचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे विजय ! विश्‍वात पराभवासाठी एकही युद्ध होत नाही. हिंदूंनो, विजयाचे हे माहात्म्य आणि विजयादशमीच्या विजयोपासनेचे महत्त्व लक्षात घ्या ! केवळ कर्मकांड म्हणून विजयादशमीला विजयोपासना करू नका, तर या वर्षीपासून सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील भ्रष्टाचारादी दुष्प्रवृत्तींच्या निवारणार्थ खर्‍या विजयोपासनेला आरंभ करा !

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (१०.९.२०१६)

 

 विजयादशमी म्हणजे हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस !

विजयादशमी म्हणजे हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस ! याच दिवशी श्री दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी अनुक्रमे महिषासुर आणि रावण या दोन असुरांचा वध करून आसुरी (अधर्मी) शक्तींचे निर्मूलन केले. याच दिवशी विराटपुत्राला सारथ्य करण्यास सांगून बृहन्नडेच्या वेशातील अर्जुनाने शमीच्या ढोलीतील शस्त्रे काढून त्याद्वारे वीरवृत्तीचे प्रगटीकरण तर केलेच; पण त्यासह कौरवसेनेतील महारथींचा पराभव करून धर्मविजयासाठी लढल्या जाणार्‍या महाभारतीय युद्धाचे सीमोल्लंघनही केले म्हणून हा दिवस केवळ धर्मविजयाचाच आहे असे नाही, तर धर्मविजयासाठी सीमोल्लंघन करण्याचाही आहे.

धर्म-अधर्म यांच्यातील लढा युगानुयुगे चालू आहे. काळानुसार कधी धर्मनिष्ठांचा विजय होतो, तर कधी अधर्मीं वृत्तीच्या जनांचा ! आजही धर्म-अधर्म यांच्यातील लढा परमोच्च बिंदूला येऊन ठेपला आहे. गेली काही शतके सातत्याने पराभूत झालेल्या हिंदू समाजासाठी आगामी काळ हा धर्मविजयासाठी अनुकूल आहे. केवळ काळ अनुकूल आहे; म्हणून धर्मविजय मिळतो, असे नाही; तर त्यासाठी अर्जुनाप्रमाणे वीरवृत्तीचे प्रगटीकरणही आवश्यक आहे. हिंदू समाजाने काळाची पावले ओळखून वीरतेचे दर्शन घडवले आणि धर्मविजयासाठी सीमोल्लंघन केले, तरच यंदाची विजयादशमी सार्थकी झाली, असे समजता येईल !

– सनातनचे प्रेरणास्थान (प.पू.) डॉ. जयंत आठवले