दीपज्योति नमोस्तुते !

Article also available in :

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदाम् ।

शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते ॥

आपण सर्वजण लहानपणी संध्याकाळी ‘शुभंकरोति कल्याणम्’ हा श्‍लोक देवापुढे दिवा लावल्यावर म्हणत असू. आजही संध्यासमयी कुठेही दिवे लागल्यावर किंवा बसमध्ये दिवे लागल्यावर बहुतांशी लोक वा बसमधील प्रवासी हात जोडून नमस्कार करतात. ती दिव्याप्रतीची श्रद्धा आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिव्याला सर्वत्र आदराचे, मानाचे आणि श्रद्धेचे अनन्यसाधारण स्थान अगदी पुरातन काळापासून आहे. आज विजेच्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे रोषणाईच्या झगमगाट होतो खरा; पण जे तेज दिव्यात जाणवते, ते त्या झगमगाटात अजिबात जाणवत नाही. सायंकाळ ते उष:कालपर्यंतचे मानवी जीवन म्हणजे दीपविश्‍वच असते. मग ते दीप कोणतेही असोत. दीप किंवा दिवा हे ‘प्रकाश देणारे साधन’, असा त्याचा सर्वसामान्य अर्थ असला, तरी त्याचे कार्य आणि महत्त्व अनन्यसाधारण अन् असामान्य आहे, हे नि:संशय.

 

संतांसारखा विवेकदीप उजळवणे, हीच खरी दिवाळी !

दीपविश्‍व सतत मानवाच्या जीवनाशी निगडित असतात. दीपांशिवाय जीवनाचा दीप अपूर्णच. म्हणूनच या दिव्यांच्या विश्‍वात माणूस जगतो, जगला अन् जगत राहील. माणूस जेवढे दीप लावील, तेवढी त्याची अन् पर्यायाने समाजाची, राष्ट्राची उन्नती होत राहील. संत ज्ञानेश्‍वर माऊलींनीही ‘मी अविवेकाची काजळी । फेडोनि विवेकदीप उजळी । तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥’, असे म्हटले आहे. त्याप्रमाणे मानवाने जर अविवेकाची काजळी नष्ट करून विवेकदीप उजळवला, तर योगियांसारखा तो पण निरंतर दिवाळीचा आनंद घेईल. तीच त्याच्यासाठी खरी दिवाळी असेल.’

 

दिव्यांचे प्रकार !

मानवाने शतकानुशतके या दिव्यांचे विविध प्रकार निर्माण केले आणि आजही करत आहे. तरी प्रामुख्याने हे ३ वर्गांत मोडतात. तेलाचे दिवे, गॅसचे दिवे आणि विजेचे दिवे. याशिवाय सौरऊर्जेचे दिवे जरी असले, तरी ते ‘विजेचे दिवे’, या प्रकारातच येतात.

 

नयनमनोहारी दीपोत्सव !

 

गंगाआरतीच्या वेळी वापरण्यात येणारे दीप

अनेक मंदिरांच्या प्रांगणात आजही दीपमाळ अस्तित्वात आहेत. सण किंवा उत्सवांच्या दिवशी त्यांचे प्रज्वलन करतात. तेव्हा दिसणारे नयनमनोहारी रूप शब्दातीत आहे. मंदिरांच्या खालच्या पायरीपासून ते कळसापर्यंत केली जाणारी दिव्यांची आरास आणि आकर्षक मांडणी सर्वश्रुत आहे. आजही असा दीपोत्सव करतातच. असे दिवे जेव्हा नदीच्या पात्रातही सोडले जातात तेव्हा फार मनोहारी दृश्य दिसते. हरिद्वारला गंगा नदीच्या पात्रात असे असंख्य दीप सोडले जातात, तेव्हा पाण्यासमवेत वहात जाणारे हे दीप अन् त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब हे नयनमनोहारी दृश्य मनात कायमचे घर करते.

प्राचीन काळातील दिवे !

अगदी प्राचीन काळी समुद्राचे शिंपले किंवा खळगे पाडलेले दगड यांचा उपयोग करून सिद्ध केलेले दिवे वापरण्याची प्रथा होती. दीप बनवण्यासाठी जव्हारासारख्या वनस्पतीचा वात म्हणून उपयोग केला जात होता. प्राचीन काळी लोक खळगा केलेले दगड वापरायचे. त्यात कापसाच्या वाती अन् तेल असायचे.

Leave a Comment