आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता !

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता !

१. संत किंवा मठाधीश यांना चांगले उत्तराधिकारी न मिळणे आणि बहुतांश संतांकडे किंवा मठांमध्ये संपत्तीच्या लालसेमुळे वेतनधारी साहाय्यकांमध्ये संघर्ष चालू असणे : मी धर्मप्रसारानिमित्त अनेक संत आणि मठाधीश यांना भेटतो. तेव्हा ते सर्व जण सांगतात, तुमचे साधक आम्हाला सेवेसाठी द्या. आम्ही चांगले शिष्य शोधत आहोत; मात्र सध्या चांगले शिष्य किंवा अनुयायी लाभत नाहीत. बहुतांश संतांकडे किंवा मठांमध्ये वेतनधारी साहाय्यक आहेत. बरेच वेतनधारी साहाय्यक पांढरी किंवा संन्याश्यांप्रमाणे भगवी वस्त्रे धारण करतात. त्यांना संत किंवा मठ यांच्या संपत्तीविषयी लालसा असल्याने साहाय्यकांमध्ये तेथील संपत्तीविषयी संघर्ष चालू असतो.

२. काही तथाकथित संतांना दुसरा कुणीतरी आपली संपत्ती हडप करील, याचे भय वाटणे : मोठी संपत्ती गोळा केलेले काही तथाकथित संतसुद्धा चांगला उत्तराधिकारी मिळत नाही, असे सांगतात. त्यांच्या मनात आपली संपत्ती दुसरा कुणीतरी हडप करील, असे भय असल्याचे दिसून येते. संपत्तीसाठी मठाधिशांची हत्या होऊन उत्तराधिकार्‍यांनी मठाचे नियंत्रण घेण्याचे प्रकार काही तीर्थक्षेत्री घडले आहेत.

३. धर्ममार्तंडांनी धर्मरक्षणासाठी भोंदू संत आणि त्यांचे साहाय्यक किंवा उत्तराधिकारी यांना धडा शिकवण्याचे कार्य हातात घ्यायला हवे ! : एकूणच हिंदु धर्म आणि चांगले संत यांना कलंकित करणारे भोंदू संत अन् त्यांचे साहाय्यक किंवा उत्तराधिकारी यांना धडा शिकवण्याचे कार्य आता धर्ममार्तंडांनी हातात घेतले नाही, तर या अधर्माचे पातक त्यांच्या माथी येणार आहे, हे निश्‍चित ! आता तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे आवश्यक झाले आहे.

– पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक, सनातन संस्था आणि राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.