पू. शंकर गुंजेकर संतपदी विराजमान !

बेळगाव – तळमळ, चिकाटी, प्रीती आणि गुरूंवर अपार श्रद्धा असणारे अन् भावपूर्ण सेवा करणारे साधक श्री. शंकर लक्ष्मण गुंजेकर (वय ५० वर्षे) हे सनातनच्या संतरूपी शृंखलेत ५६ वे संतरत्न म्हणून विराजमान झाले आहेत, असे सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी येथील एका कार्यक्रमात घोषित केले. या वेळी उपस्थित साधक भावविभोर झाले. पू. गुंजेकरकाका हे कोल्हापूर सेवाकेंद्रात व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका कु. तृप्ती गावडे यांचे मामा आहेत.

साधकांनो, व्यष्टी साधना वाढवा ! – पू. गुंजेकरकाका

पू. शंकर गुंजेकर
पू. शंकर गुंजेकर

पू. गुंजेकरकाका म्हणाले, साधकांची साधना होऊन त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी प.पू. डॉक्टरांची पुष्कळ तळमळ आहे. यासाठी साधकांनी व्यष्टी साधना वाढवायला हवी. साधकांचा भाव वाढायला हवा. सर्व कृती देव करत आहे, असे भाव ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. साधकांनी आनंदी राहून साधना करायला हवी.

 

 

पू. शंकर गुंजेकर यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे

१. सौ. सुमित्रा गावडे आणि कु. सरिता गुंजेकर (पू. गुंजेकरकाकांची पुतणी) : १५ दिवसांपूर्वी पू. गुंजेकरकाका यांची आध्यात्मिक प्रगती होत आहे, असे वाटत होते. सकाळी काहीतरी आनंदाची बातमी मिळणार, असे वाटत होते आणि तसेच झाले.

२. कु. तृप्ती गावडे : घरची परिस्थिती चांगली नाही, तरीही देवावर श्रद्धा ठेवून पू. गुंजेकरमामा या परिस्थितीतही सतत आनंदी असतात. त्यांना ४ बहिणी आणि ३ भाऊ आहेत. हे सर्वजण साधकच आहेत, असा पू. शंकरमामांचा भाव असतो.

३. शेवंता गुंजेकर (पू. गुंजेकरकाकांची बहीण) : १५ दिवसांपूर्वीच मला माझा भाऊ संत झाल्याचे स्वप्नात दिसले होते. तेव्हा मला त्याच्या गळ्यात घातलेला हार स्पष्टपणे दिसला होता.

४. श्री. यशवंत राणे : माझ्याबाबतीत एक प्रसंग घडल्यापासून पू. गुंजेकरकाकांना भेटावेसे वाटत होते. त्यांनाही माझी आठवण येत होती. त्या वेळी पू. काकांना घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा ते शेतातील कामे सोडून मला भेटण्यास आले. या प्रसंगात पू. काकांनी मला साहाय्य केले.

५. श्री. ज्ञानेश्‍वर गावडे : ८ दिवसांपूर्वी पू. गुंजेकरमामा संत झाले आहेत, असे स्वप्न पडले होते. (अशी जाणीव काही साधकांनाही अगोदरच झाली होती.)

(भाव तेथे देव या उक्तीनुसार, प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या वैयक्तिक आहेत. त्या सरसकट सर्वांना येतीलच असे नाही – संपादक)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा ठेवून
पू. गुंजेकरकाकांनी संतपद प्राप्त केले ! – पू. (कु.) स्वाती खाडये

पू. (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, श्री. गुंजेकरकाका यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर ते संत आहेत, असे मला जाणवले. घरची परिस्थिती हालाखीची असतांनाही प.पू. डॉक्टरांवर अतूट श्रद्धा ठेवून त्यांनी संतपद प्राप्त केले आहे. ते २४ घंटे देवाच्या अनुसंधानात असतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात