नवीन वस्त्राची घडी मोडणे

Article also available in :

सण, शुभदिन आणि धार्मिक विधी यांच्या दिवशी नवीन वस्त्राची घडी मोडावी. आसक्ती निर्माण होऊ नये; म्हणून नवीन वस्त्र प्रथम दुसर्‍याला घालायला द्यावे किंवा देवासमोर ठेवावे आणि नंतर वापरावे. नवीन वस्त्रे वापरणे, त्यांच्यावर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे, कपड्यांची शुद्धी यांविषयी या लेखातून पाहू.

आसक्ती निर्माण होऊ नये; म्हणून नवीन वस्त्र
प्रथम दुसर्‍याला घालायला द्यावे किंवा देवासमोर ठेवावे आणि नंतर वापरावे

हिंदु धर्म हा ब्रह्माशी निगडित आसक्तीविरहित जीवन जगण्यास शिकवतो. आपल्या प्रत्येक आचार-विचारातून त्या त्या गोष्टीविषयक आसक्तीची निर्मिती होत असते. आसक्तीविषयक विचाराने आपण मायेत अडकण्याची शक्यता जास्त असते, उदा. वस्त्र परिधान करणे. नवीन वस्त्राविषयी आपल्या मनात जास्त आसक्ती असते. आपले नवीन वस्त्र प्रथम दुसर्‍या जिवाला घालायला देणे, म्हणजेच त्या व्यक्तीतील देवत्वाची पूजा करणे आणि नंतर तेच वस्त्र देवतेने दिलेला कृपाप्रसाद समजून आपल्या अंगावर परिधान करणे. या कृतीमुळे आपली त्या गोष्टीविषयक असलेली आसक्ती न्यून होण्यास साहाय्य होते.

प्रत्येक गोष्ट प्रथम ईश्वराला अर्पण करून त्यानंतर ईश्वराचा प्रसाद म्हणून ती गोष्ट स्वीकारून त्यातील ईश्वरी चैतन्याचा लाभ करून घेणे, म्हणजेच ते ते कर्म ईश्वरविषयक सात्त्विक विचारातून करण्यास आपल्याला धर्म शिकवतो. म्हणूनच प्रथम नवीन वस्त्र दुसर्‍याला नेसायला देण्याची किंवा देवासमोर ठेवून नंतर वापरण्याची प्रथा आहे.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, सायं. ६.२०)

नवीन वस्त्र प्रथम कोणाला घालायला द्यावे अन् कोणाला देऊ नये ?

अ. ‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या व्यक्तीला आपले नवीन वस्त्र प्रथम वापरण्यास देऊ नये; कारण त्या व्यक्तीने वस्त्र परिधान केल्याने वस्त्रात येणार्‍या त्रासदायक लहरींमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

आ. सात्त्विक आणि उन्नत व्यक्तीला वस्त्र प्रथम वापरायला दिल्यास जिवाला त्या वस्त्रातून मिळणारा सात्त्विकतेचा लाभ अधिक असतो.

इ. समोरच्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास आहे कि नाही, हे कळत नसेल, तर कुणा उन्नत व्यक्तीला विचारून मगच ते वस्त्र दुसर्‍या व्यक्तीला वापरण्यास द्यावे, अन्यथा प्रत्येक गोष्ट देवासमोर ठेवून त्या गोष्टीतून आपल्याला चैतन्य देण्याविषयी देवतेला प्रार्थना करून ती वस्तू वापरणे अधिक लाभदायक आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१२.२००४, सकाळी ११.२४)

कपड्यांची शुद्धी करणे

कपडे आणि अंग यांवर सुगंधी द्राव (सेंट) मारण्याचे तोटे

अ. ‘बहुधा सुगंधी द्राव (सेंट किंवा परफ्यूम) कृत्रिम रासायनिक पदार्थांपासून निर्माण केलेले असते. त्यामुळे त्याचा सुगंधही कृत्रिम असतो; म्हणून त्याचा वापर शरीर आणि कपडे यांवर केल्यावर त्यांना बाह्य सुगंध येतो; परंतु त्यांच्यातील रज-तम लहरी अन् त्यांच्यावर काळ्या शक्तीचे आवरण आलेले असेल, तर ते नष्ट होत नाही.

आ. कृत्रिम सुगंधाकडे वातावरणातील रज-तम लहरी आकृष्ट होऊन त्या व्यक्तीचा देह अन् कपडे यांमध्ये प्रवेश करून आणि तेथे कार्यरत होऊन तेथील सात्त्विकता नष्ट करतात. वायूमंडलातील वाईट शक्ती, रज-तमप्रधान कपडे अन् स्थूलदेह यांकडे लवकर आकृष्ट होतात आणि त्यांवर आक्रमण करून त्यांमध्ये काळी शक्ती भरून व्यक्तीला त्रास देतात.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १५.११.२००७, रात्री ८.२५)

वस्त्रांवरील आक्रमणे (वाईट शक्तींमुळे कपड्यांना दुर्गंध येणे) आणि त्यावरील उपाय

१. प्रक्रिया

‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांच्या शरिरात मांत्रिक काळी शक्ती साठवतात आणि काळ्या शक्तीची स्थाने निर्माण करतात. त्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांनी वापरलेल्या कपड्यांमध्ये काळीशक्ती साठते. वाईट शक्तींनी कपड्यांवर आक्रमण केल्यास कपड्यांमध्ये काळी शक्ती साठून रहाते. प्रामुख्याने अंतर्वस्त्रांमध्ये काळी शक्ती साठण्याचे प्रमाण जास्त असते. (आजकाल बहुतांश प्रत्येकालाच वाईट शक्तींचा त्रास न्यून-अधिक प्रमाणात होत असतो. तसेच वातावरणातही रज-तमाचे प्राबल्य आहे. यांचा परिणाम म्हणजे कपडे काळीशक्ती आणि रज-तम यांनी दूषित होतात. – संकलक)

२. त्रास

काळी शक्ती अन् रज-तम यांनी दूषित झालेल्या कपड्यांकडे पाहिल्यावर आणि ते परिधान केल्यावर दुर्गंध येणे, मळमळणे, डोळे जड होणे यांसारखे त्रास होतात.

३. उपाय

अ. प्रार्थना : वस्त्रांमधील काळी शक्ती आणि रज-तम यांचे प्रमाण न्यून होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी.

आ. कपडे धुण्याची पद्धत : कपडे १० मिनिटे खडेमिठाच्या पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर कपडे साबणाने धुवावेत आणि विभूतीमिश्रित पाण्यात खळबळून सूर्यप्रकाशात वाळत घालावेत.

इ. कपडे धुऊन दुर्गंध न गेल्यास करावयाचे उपाय : कपड्यांना दुर्गंध येण्याचे प्रमाण जास्त असल्यास कपडे सुकल्यावर त्यांना थोडी विभूती लावून त्यांत सात्त्विक उत्पादने (देवतांच्या नामपट्ट्या, कापूर, उदबत्ती, उदबत्तीचा रिकामा खोका) ठेवावीत.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, सायं. ६.३०)

कपडे धुतल्यावर विभूती आणि उदबत्ती यांनी शुद्धी केलेले
कपडे वापरल्याने व्यक्तीतील सात्त्विकता वाढून तिचे वाईट शक्तींपासून रक्षण होणे

‘कपडे धुतल्यामुळे त्यांतील रज-तम लहरी आणि काळी शक्ती न्यून होते. धुतलेल्या कपड्यांना विभूती लावल्यामुळे किंवा कपड्यांमध्ये उदबत्तीचे तुकडे ठेवल्यामुळे त्यांच्यातील चैतन्य आणि सुगंध यांचा परिणाम कपड्यांवर होऊन कपड्यांमधील काळी शक्ती रज-तम नष्ट होण्यास साहाय्य होते. तसेच उदबत्तीतील सात्त्विक सुगंध कपड्यांनाही मिळून त्यांनाही तो सुगंध येतो. अशा प्रकारे शुद्धी झालेले कपडे परिधान केल्याने व्यक्तीतील सात्त्विकता वाढून तिला वायूमंडलातील देवतांच्या सूक्ष्म-लहरी ग्रहण करणे सोपे जाते. तसेच त्या लहरींना व्यक्तीतील सात्त्विकतेच्या साहाय्याने व्यक्तीभोवती संरक्षककवच निर्माण करणे सोपे जाते आणि त्यामुळे व्यक्तीचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १५.११.२००७, रात्री ८.२५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment