साधना करून पुण्य वाढवण्याचे महत्त्व

मनुष्यजन्मात केलेले पुण्य पुढील जन्मातही कशा प्रकारे उपयोगी पडते, तसेच पुण्यकर्म करण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

हा लेख वाचून वाचकांना पाप-पुण्याकडे पहाण्याची एक नवी दृष्टी लाभावी आणि पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन आनंदप्राप्ती करून घेण्यासाठी सदैव साधना करण्याची प्रेरणा मिळावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

 

१. पुण्याईच्या बळावर अनुकूल गोष्टी घडून येणे

अ. पुण्याई शिल्लक आहे, तोपर्यंत व्यक्तीचा इतरांकडून आदर-सन्मान होतो.

आ. जगाच्या पाठीवर कोठेही गेल्यास व्यक्तीची सर्व प्रकारे सोय होते. अनोळखी प्रांतामध्ये व्यक्तीजवळ पैसे नसल्यास किंवा तेथील भाषा येत नसतांनाही व्यक्तीची जेवण, रहाणे इत्यादींची उत्तम सोय होते.

इ. व्यक्तीला लोकांकडून अमाप प्रेम मिळते.

ई. ‘हात लावेल, त्याचे सोने होते’, या उक्तीनुसार व्यक्तीला सर्वत्र यश प्राप्त होऊन तिचे मोठे नाव होते.

अ. सुख भोगत असतांना ईश्वराच्या अधिकोशातील पुण्य
अल्प होत असल्याने पुण्याई वाढवत रहाण्यासाठी सतत प्रयत्न (साधना) करायला हवे असणे

सध्या झालेल्या अत्याधुनिक सुविधांपैकी एक सुविधा म्हणजे ‘क्रेडिट कार्ड’. या सोयीमुळे एकदा अधिकोशात ठराविक रक्कम भरल्यानंतर मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे पैसे समवेत न घेता त्या कार्डाच्या आधारे आपली जगात कोठेही पैशांची सोय होते आणि आपल्याला सुख उपभोगता येते. व्यावहारिक जीवनातील या क्रेडिट कार्डप्रमाणेच ईश्वराच्या अधिकोशातील क्रेडिट कार्ड म्हणजे व्यक्तीने मिळवलेले पुण्य. गतजन्मांमध्ये व्यक्तीने केलेली चांगली कर्मे, दानधर्म आणि परोपकार यांचे फळ पुण्याच्या रूपात जमा होते आणि पुढील जन्मात ते सुखाच्या रूपात भोगायला मिळते. सुख भोगत असतांना व्यक्तीचे पुण्य अल्प अल्प होत जाते. यासाठी पुण्याई सतत वाढवत रहायला हवी. पुण्याई वाढवण्यासाठी साधनाच करणे आवश्यक असते.

 

२. दानधर्म आणि परोपकार करण्याचे महत्त्व

अ. वैद्यांनी आवश्यक तेवढाच मोबदला घेऊन रुग्णांची सेवा करून पुण्य मिळवावे !

‘रुग्णांची सेवा करणे’, हा वैद्यांचा खरा धर्म होय. असे केल्याने वैद्यांना पुण्य मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होते. म्हणूनच ईश्वराने दिलेल्या या संधीचा जास्तीतजास्त लाभ करून घेण्यासाठी वैद्यांनी पैशाच्या मागे न लागता आवश्यक तेवढाच मोबदला घेऊन रुग्णांची सेवा करावी.

आ. दानधर्म आणि परोपकार न करणार्‍या व्यक्तींच्या बुद्धीवर वाईट शक्तींनी
नियंत्रण मिळवणे, मृत्यूनंतर अशा व्यक्ती वाईट शक्ती बनणे अन् घराण्याला पुढे अनेक वर्षे दारिद्र्य येणे

ज्या व्यक्ती स्वार्थी असतात, परोपकार आणि दानधर्म करत नाहीत, अशांच्या बुद्धीवर काही काळाने वाईट शक्ती आपला प्रभाव पाडतात. त्यामुळे अशा व्यक्तींची बुद्धी हळूहळू वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाते. वाईट शक्तींच्या तालावर या व्यक्ती नाचू लागतात. अशा व्यक्ती स्वार्थी, सतत असमाधानी आणि अशांत बनतात आणि मृत्यूनंतर त्या स्वतःच वाईट शक्ती बनतात. अशा व्यक्तींच्या घराण्याला पुढे अनेक वर्षे दारिद्र्य येते.

इ. प्राणीयोनीतील जिवांना मिळणारे भौतिक सुख
हे त्यांना पूर्वीच्या मनुष्यजन्मात केलेल्या दानाविना प्राप्त न होणे

मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही प्रारब्ध असते. एखाद्या जिवाने मनुष्यजन्मात पुष्कळ दानधर्म केलेला असतो; पण त्याच्या हातून घडलेल्या काही वाईट कर्मांमुळे त्याला मृत्योत्तर काही काळ प्राण्याची योनी प्राप्त होते. दुसर्‍या एका जिवाला आधीच्या मनुष्यजन्मात त्याच्या हातून झालेल्या अनेक घोर चुकांचे प्रायश्चित्त भोगण्यासाठी या जन्मात प्राण्याची योनी प्राप्त होते. येथे समजून घ्यायचे सूत्र असे की, वरील दोन्ही जिवांना सारखीच प्राणीयोनी प्राप्त होऊनही त्यांना मिळणारे भौतिक सुख मात्र भिन्न असते. पुढे दिलेल्या उदाहरणावरून हे सूत्र अधिक स्पष्ट होईल.

 

एखादा कुत्रा चारचाकी गाडीतून फिरतो. त्याच्या दिमतीला नोकर-चाकर असतात. कुत्रा रुग्णाईत झाल्यास आधुनिक वैद्य त्याच्यावर उपचार करतात. याउलट एखादा कुत्रा रस्त्यावरून उपाशीतापाशी फिरत असतो. त्याला अनेक रोग होतात; पण त्यावर औषधोपचार करणारा कोणी नसतो. त्याला कोणाचाही आधार मिळत नाही. त्याला पुष्कळ हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आता या दोन कुत्र्यांचे प्रारब्ध भिन्न भिन्न का ? श्रीमंत कुटुंबात रहायला मिळणार्‍या कुत्र्याच्या रूपातील जिवाने पूर्वीच्या मनुष्यजन्मात पुष्कळ दानधर्म केलेला असल्याने त्याला आताही सुखाचा लाभ झाला. याउलट हालअपेष्टा सहन कराव्या लागणार्‍या कुत्र्याच्या रूपातील जिवाने पूर्वीच्या मनुष्यजन्मात केलेल्या अनेक चुकांचे प्रायश्चित्त तो आताही भोगत असतो. म्हणजेच प्राणीयोनीतील जिवांना मिळणारे सुख हे त्यांनी पूर्वीच्या मनुष्यजन्मात केलेल्या दानावर अवलंबून असते.

 

३. मुलीने संतांनी लिहिलेले ग्रंथ धर्मप्रसारासाठी लोकांना वाटल्याने
निर्माण झालेल्या पुण्यामुळे तिच्या मृत वडिलांची वाईट शक्तींच्या योनीतून सुटका होणे

एका गृहस्थाचा उत्कर्ष न पहावणार्‍या एका व्यक्तीने त्या गृहस्थावर करणी केली होती. त्यातच त्या गृहस्थाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर ते गृहस्थ वाईट शक्तींच्या योनीत गेले. त्या गृहस्थाची मुलगी धार्मिक होती. ती एका संतांकडे जात असे. त्या संतांनी सांगितलेल्या साधनेनुसार साधना करत असे. त्या संतांनी लिहिलेले ग्रंथ जास्तीतजास्त लोकांनी वाचावेत, या तळमळीमुळे ती त्या संतांचे ग्रंथ भेट म्हणून सर्वांना देत असे. एकदा रात्री तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिचे दिवंगत वडील तिला दिसले. ते मुलीला म्हणाले, ‘संतांचे ग्रंथ लोकांना भेट म्हणून दिल्याने निर्माण झालेल्या तुझ्या पुण्याईमुळे माझी वाईट शक्तींच्या योनीतून सुटका झाली. अशीच सेवा करत रहा. यापुढे मी घरातील कोणाच्याही स्वप्नात येणार नाही.’

 

४. नामजपाचे पुण्य दुसर्‍याला अर्पिता येणे

‘एकाने आपल्या मित्राचे महत्त्वाचे कार्य सिद्ध होण्यासाठी आपला एक कोटी नामजप त्याच्या हातावर पाणी सोडून अर्पण केला. त्यामुळे त्या मित्राचे कार्य झाले.’ – श्री. रा.कृ. कामत चंदगडकर

 

५. पुण्यकर्म (केलेले पुण्य) गुप्त ठेवावे

‘माणसाने पुण्य करावे, सतत करत रहावे; पण त्याचा स्वमुखाने उच्चार करू नये आणि त्याला प्रसिद्धी देऊ नये’, असे देवलाने (एक स्मृतिकार) सांगितले आहे. तो म्हणतो,

तस्मादात्मकृतं पुण्यं वृथा न परिकीर्तयेत् ।

अर्थ : उच्चारलेले पुण्य नष्ट होत असल्यामुळे स्वतः केलेल्या पुण्याची वायफळ वाच्यता करू नये.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’

 

पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी साधना आवश्यक !

साधना करून पुण्य वाढवण्याचे महत्त्व यांविषयी आपण या लेखात जाणून घेतले.

येथे लक्षात घ्यावयाची गोष्ट ही की, जिवाला पाप-पुण्य लागण्याच्या मुळाशी जिवाचा ‘अहं’ हाच कारणीभूत असतो. विविध योगमार्गांनुसार अहं दूर करता येतो. उदाहरणादाखल
नामसंकीर्तनयोगात नामधारकाचा नामजप चालू असतांना त्याच्याकडून जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया असते, म्हणजेच कर्म हे ‘अकर्म कर्म’ होते, म्हणजेच त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही. नामसंकीर्तनयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, गुरुकृपायोग अशा विविध योगमार्गांनुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाता येते.

गुरुकृपायोगानुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्याबरोबरच जलद आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी नेमकी कोणती साधना करावी हे जाणून घेण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ यावर क्लिक करा !

Leave a Comment