कौशेय (रेशमी) वस्त्र सर्व वस्त्रांमध्ये सात्त्विक

देवपूजेसाठी, मंगलप्रसंगी आणि सोवळ्यासाठी कौशेय (रेशमी) वस्त्र वापरतात. प्रकृतीनुसार सुती, कौशेय आणि लोकरी कपडे वापरण्याचे लाभ याविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

कौशेय (रेशमी) वस्त्र चकचकीत असूनही सात्त्विक कसे ?

प.पू. डॉ. आठवले (वर्षे १९९१ मध्ये थोडक्यात दिलेले उत्तर)

कौशेय वस्त्र सत्त्व-रज प्रधान असते. चकचकीतपणा रजोगुणाशी संबंधित आहे. सात्त्विक असल्यामुळेच कौशेयवस्त्रातून प्रक्षेपित झालेल्या लहरींमुळे वस्त्र परिधान करणार्‍या व्यक्तीचे त्रासदायक शक्तींपासून रक्षण होते.

सूक्ष्म-जगतातील एक विद्वान (२१.६.२००८ या दिवशी दिलेले सविस्तर उत्तर)

ज्या वेळी सात्त्विक तेजरूपी चैतन्य सगुण रूपात कार्य करण्यासाठी अवतरते, त्या वेळी ते चमकदार, म्हणजेच दैदिप्यमान दिसते; परंतु निर्गुण तेजरूपी चैतन्य मात्र चमकदार नसते; कारण त्यातील कार्यकारी सगुणत्व संपुष्टात आलेले असते. हे चैतन्य अव्यक्त स्वरूपात कार्य करत असल्याने ते दैदिप्यमान दिसत नाही. कौशेय वस्त्र हे सत्त्व-रज या गुणांशी संबंधित असल्याने ते त्या त्या स्तरावर ईश्वराचे सगुणधारी चैतन्य सत्त्वाच्या साहाय्याने ग्रहण करून रजाच्या गतीशीलतेच्या साहाय्याने ब्रह्मांडात वेगाने प्रक्षेपित करत असल्याने ते दैदिप्यमान दिसते. कौशेयात ही क्षमता असल्याने ते चकचकीत असूनही सगुण चैतन्य ग्रहण करण्याच्या स्तरावर सात्त्विक समजले जाते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ कृष्ण तृतीया, कलियुग वर्ष ५११० (२१.६.२००८, सायं. ६.१२)

कौशेय वस्त्र सर्व वस्त्रांमध्ये सात्त्विक असते. कौशेय वस्त्रातील सात्त्विकतेमुळेच ते देवपूजेसाठी, मंगलप्रसंगी आणि सोवळ्यासाठी वापरतात.

कौशेय वस्त्राच्या संदर्भातील सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण (टीप १)

अ. पूजेसाठी बसणार्‍या यजमान पती आणि पत्नी यांनी
कौशेय वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होऊन
त्यांची सात्त्विकता ३-४ टक्के वाढून त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होणे

‘कौशेय वस्त्रांमध्ये चैतन्य ग्रहण करण्याचे प्रमाण इतर वस्त्रांच्या तुलनेत जास्त असते. यजमान पती आणि पत्नी यांनी जरीचे कौशेय वस्त्र परिधान केले असल्याने त्यांना विधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य जास्त प्रमाणात ग्रहण करता येत होते. त्यामुळे त्यांच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होऊन त्यांची सात्त्विकता ३-४ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होत होते.’ – कु. मधुरा भोसले (सनातनचे साधक श्री. आत्माराम जोशी यांना ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ केलेल्या ‘षष्ठी शांती विधी’च्या वेळी केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण, २९.४.२००६)

आ.वस्त्रात वातावरणातील सात्त्विकता आकृष्ट होणे

‘विधीच्या वेळी उपस्थित असलेल्यांपैकी ज्यांनी कौशेय वस्त्र परिधान केले होते, त्यांच्या वस्त्रात वातावरणातील सात्त्विकता आकृष्ट होत होती.’ – कु. मधुरा भोसले (१३.५.२००६)

प्रकृतीनुसार सुती, कौशेय आणि लोकरी कपडे वापरण्याचे लाभ

आयुर्वेदानुसार शरीरप्रकृती वात, पित्त आणि कफ अशी तीन प्रकारची असते.

१. वात प्रकृती असलेल्याने सुती आणि कौशेय कपडे घालणे योग्य

‘वात म्हणजेच वायू. वातकारक प्रकृती असलेल्या जिवाला वायूतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत असणार्‍या वरिष्ठ वाईट शक्तींपासून धोका असल्याने या उच्च स्तरावर सत्त्वगुणाचे पाठबळ उपलब्ध करून देणार्‍या सत्त्वगुणी सुती आणि कौशेय कपड्यांचे प्रयोजन केले जाते. ही वस्त्रे ब्रह्मांडातील सात्त्विक स्पंदने इतर वस्त्रांपेक्षा अधिकतम प्रमाणात आकृष्ट करून घेण्यात अग्रेसर असल्याने वात प्रकृती असणार्‍या जिवाला संरक्षणाच्या दृष्टीने विशेष लाभदायक असतात.

२. पित्त प्रकृती असलेल्याने सुती कपडे घालणे योग्य

पित्तकारक प्रकृती तमप्रधान असल्याने या तमोगुणाचा लय होण्यासाठी सत्त्वगुण आकृष्ट करणारे सुती वस्त्र वापरणे इष्ट ठरते.

३. कफ प्रकृती असलेल्याने लोकरीचे कपडे घालणे योग्य

कफप्रकृती रजोगुणी असल्याने रजोगुणाला उत्तम कर्मासाठी आध्यात्मिक स्तरावर उद्युक्त करण्यासाठी रज-सत्त्वगुणाचे संवर्धन करण्यास योग्य असे लोकरी वस्त्र वापरले जाते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११० ड३.३.२००८, सकाळी ११.२९)

दोन प्रकृती एकत्रित असलेल्याने जी प्रकृती प्रधान असेल, त्या प्रकृतीशी संबंधित कपडे घालावेत. (आयुर्वेदानुसार आपली प्रकृती वातप्रधान, पित्तप्रधान कि कफप्रधान आहे, हे काही लक्षणांवरून ठरवता येते. त्या लक्षणांविषयीचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदाची मूलतत्त्वे’ यात दिले आहे.)

टीप १ (सूक्ष्म-परीक्षण) : एखाद्या घटनेची सूक्ष्मातून, म्हणजे देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर, आत्मशक्तीच्या बळावर दृश्यस्वरूप, विचारस्वरूप किंवा जाणीवस्वरूप होणारी जाणीव म्हणजे ‘सूक्ष्म-परीक्षण’. थोडक्यात सूक्ष्म-परीक्षणात एखादे दृश्य दिसते, विचार स्फुरतात किंवा मनाला जाणवते. (मूळ स्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment