शंकानिरसन (अन्य विषय)

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गावोगावच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

‘शंकानिरसन’ या सदरातून प्रश्नोत्तराच्या रूपात हे, सर्वच वाचकांसाठी उपलब्ध करत आहोत. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अध्यात्मातील विविध नियम, शास्त्र तसेच ‘जटा’, ‘वास्तू’, ‘कौल लावणे’ इत्यादिंविषयी बहुतेकांना ज्ञात नसलेली माहिती प्रश्नोत्तराच्या रूपात मांडली आहे.

प्रश्न : जटा कशामुळे निर्माण होतात ?

उत्तर : प्रत्येक गोष्ट ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होते. काही जणांविषयी जटा शारीरिक कारणांमुळे असतील, तर काही जणांविषयी मानसिक कारणांमुळे असू शकतात. बर्‍याच मनोरुग्णांच्या जटा झालेल्या असतात. केवळ एखाद टक्का व्यक्तींमध्ये आध्यात्मिक कारणांमुळे जटा निर्माण होतात.

प्रश्न : वास्तूदेवता म्हणजे काय ? वास्तूदेवतेची स्थापना केली नसेल, तर काय त्रास होतो ? केल्यावर काय लाभ होतात ?

उत्तर : जेथे जेथे भूमीवर चार भिंती घातल्या जातात (छप्पर असो वा नसो), त्याला ‘वास्तू’ म्हणतात. जेथे जेथे भूमीवर कुंपण (कंपाऊंड) घातले जाते, त्याला एक स्थान म्हटले जाते. चार भिंती बांधल्या की, तिकडे स्पंदने निर्माण होतात. एकतर पृथ्वीतून येणारी स्पंदने आणि लहरी, दुसर्‍या म्हणजे त्या वास्तूत रहाणार्‍या माणसांच्या विचारलहरी आणि तिसर्‍या ईश्वरीय शक्तीच्या लहरी येत असतात.

ईश्वराच्या सत्त्वगुणांच्या, माणसाच्या रजोगुणांच्या आणि पृथ्वीतून येणार्‍या तमोगुणांच्या लहरी तेथे येत असतात. ज्या लहरी आणि स्पंदने येतात, त्या चार भिंतींमुळे तिथल्या तिथे भिंतींवर आणि छत असेल, तर त्याला आपटत तिथल्या तिथे वेड्या-वाकड्या रितीने फिरतात. त्यामुळे त्या सगळ्या लहरींचा एकप्रकारे गोंगाट झाल्यासारखे होते. आपण वास्तूशांत करतो, तेव्हा त्या वास्तूतील सगळी स्पंदने एका विशिष्ट रितीने म्हणजे जशी आपण एकाच दिशेने प्रदक्षिणा घालतो, त्या रितीने त्या वास्तूत फिरायला लागतात. म्हणजे गोंधळाचे रूपांतर ध्वनीत झाले. ‘ध्वनी’, ‘नाद’ हे ऐकायला चांगले वाटतात. गोंगाट ऐकायला नको वाटतो; म्हणून ‘वास्तूशांत’, ‘वास्तूपूजा’ करायची आपल्याकडे पद्धत आहे. ती एकदा केली की, साधारणतः दहा वर्षांनी आपल्याला पुन्हा करावी लागते. कलियुगात माणसांचे विचार सात्त्विक नाहीत. नवरा-बायकोची भांडणे, मुले ऐकत नाहीत, हे सर्व त्या चार भिंतीत घडत असते. पुन्हा शुद्धी करण्यासाठी परत वास्तूशांती करावी लागते.

प्रश्न : पती हा परमेश्वर मानावा. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पत्नीने आचरण करावे, असे धर्मामध्ये सांगितले आहे. पती नास्तिक आहे, परमेश्वर मानत नाही. पतीचा धर्म तो पत्नीचा धर्म. मग पतीचा साधनेला विरोध असेल आणि पत्नीला साधनेची ओढ असेल, तर पत्नीने काय करावे ?

उत्तर : स्त्रियांना साधना सर्वांत सोपी करून टाकली आहे. एक तर तुम्ही सत्संग, नामस्मरण या मार्गाने स्वतःला विसरा किंवा पतीशी पूर्णपणे एकरूप होऊन जा. गुरूंकडे शिष्य जातो, तेव्हा तो एकप्रकारे गुरूंची पत्नीच झालेला असतो. गुरूंनी सांगायचे आणि शिष्याने ऐकायचे. आपले मन, बुद्धी काही वापरायचे नाही. बायकांनीही तसे केले, ‘पती सांगतो ते मी करते’, तर तीही या जीवनातून मुक्त होऊन जाईल. यासंदर्भात पुराणात एक गोष्ट आहे. एका स्त्रीचा नवरा बाहेरख्याली होता. इकडे तिकडे गेल्यामुळे त्याला रोग झाले. रोग झाल्यावर त्याला चालता येईना; पण वासना काही त्याला थांबू देईना. पत्नीला याविषयी काही वाटत नव्हते. पतीची सेवा करायची, एवढेच तिला ठाऊक होते. ती पतीला खांद्यावर घेऊन वेश्येकडे जायची. पुढे तेही जाणे कठीण झाले, तर वेश्येला घेऊन घरी यायची. वेश्येची सेवा करायची. ‘ही वेश्या माझ्या पतीला सुख देते ना, मग मी तिची सेवा केली पाहिजे.’

एकदा एक जण आमच्याकडे आले होते. त्यांनी आमच्या गुरूंची पुष्कळ सेवा केली होती. जवळजवळ ३-४ वर्षे कामधंदा-चाकरी काही केले नाही. गुरूंसमवेत राहून सातत्याने वाहनचालक म्हणून सेवा केली. ते मुंबईला आले आणि म्हणाले की, मी आता घर घेत आहे. घराला थोडे पैसे अल्प पडत आहेत. ते तुम्ही देता का ? माझ्याकडे तर काहीच पैसे नसतात. जे काही असतात, ते कोणी संस्थेला अर्पण केलेले असतात. मग त्याला पैसे द्यायचे कि नाही ? की सर्व सतच्या कार्याला वापरायचे ? तर तसे नाही. त्यांनी माझ्या गुरूंची सेवा केली आहे. मी तेव्हा नव्हतो. त्याची सेवा करणे, हे माझे कर्तव्य आहे. त्या वेश्येची सेवा ती बायको करत असे. एक दिवस दुसर्‍या एका गावाला एक सुंदर वेश्या आहे, असे त्याला कळले. नवरा म्हणाला, ‘‘मला तिकडे घेऊन चल.’’ त्या नवर्‍याला खांद्यावर घेऊन पत्नी त्या गावाला निघाली. मार्गातून जातांना अंधार झाला. मार्गात तिचा कशालातरी पाय लागला. तिथे एक ऋषी ध्यानाला बसले होते. त्यांना पाय लागल्यामुळे ध्यानातून ते जागृतावस्थेत आले. ध्यानभंग झाल्यामुळे ते चिडले. ऋषींना तर सर्वच कळते, काही सांगावे लागत नाही. त्यांनी तिला लगेच शाप दिला की, ज्या नवर्‍याच्या सुखासाठी तू एवढी धावपळ करत आहेस, एवढी सेवा करत आहेस, तो उद्या सूर्यास्त झाल्यावर मरून जाईल. ही स्त्रीसुद्धा पतिव्रता होती. तिने त्या ऋषींना सांगितले, ‘‘उद्या सूर्योदय कसा होतो, तेच मी पहाते.’’

इतका तर वाईट नवरा कोणाचा नसतो ना ! दुसर्‍या दिवशी सूर्योदय झाला नाही. त्यामुळे सूर्योदयापासून चालू होणारी सगळी यज्ञयागादी कामे थांबली. देवांना त्यांचा हविर्भाग मिळेनासा झाला. सर्व देव घाबरले. शंकराकडे, विष्णूकडे गेले. त्यांनी सांगितले की, एका पतिव्रतेच्या संदर्भातील समस्येवर दुसरी पतिव्रताच यातून काहीतरी मार्ग काढू शकेल. तुम्ही अत्रिऋषींच्या बायकोकडे जा. ती महान पतिव्रता आहे. ती या स्त्रीकडे आली आणि म्हणाली, ‘‘अगं, तुझ्यामुळे विश्वाचे काय चाललंय, बघ !’’ त्यावर ती स्त्री म्हणाली, ‘‘मी तर बोलून बसले. असे काही होईल, याची मला कल्पना नव्हती. आता मी काय करू ?’’ यावर अत्रिऋषींची पत्नी म्हणाली, ‘‘तू असे कर, तू म्हण, ‘मी जे काही ‘सूर्योदय कसा होईल’ बोलले, ते मागे घेते.’ त्यानंतर तुझा नवरा त्या ऋषींच्या शापाने मरेल; पण मी त्याला पुन्हा जिवंत करीन.’’ केवढे सामर्थ्य आहे, स्त्रियांमध्ये ! मग स्त्रियांनी कशाला रडायचे ?

प्रश्न : गावातील देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे कि प्रथा ?

उत्तर : कौल लावणे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. देवळातली सात्त्विकता, मूर्तीतील सात्त्विकता, तसेच कौल लावणारे सात्त्विक आहते का, देवळात येणारे, प्रतिदिन पूजा करणारे सात्त्विक आहेत का ? एकंदर त्या मूर्तीत सात्त्विकता किती आहे यावर सगळं अवलंबून असते. कौल लावतांना बर्‍याचदा नातेवाईक, प्रश्न विचारणारे सर्व बाजूला गर्दी करून बसलेले असतात. त्यांना जर आतमध्ये न घेता त्यांची प्रश्नांची सूची घेऊन केवळ सात्त्विक लोक जर आत गेले, तर मूर्तीची सात्त्विकता, देवळातले, गाभार्‍यातले सात्त्विक वातावरण, कौल लावणारे सात्त्विक आहेत, अशा वेळेला उत्तर अचूक येण्याची शक्यता पुष्कळ जास्त असते. सात्त्विकता जेवढ्या प्रमाणात न्यून होत जाईल, तितके उत्तर अचूक येण्याचे प्रमाणही न्यून होत जाईल. देवस्थान सात्त्विक असणे, उदा. गोव्यातील शांतादुर्गा, शेगाव येथील गजानन महाराजांचे समाधीस्थान इत्यादी आणि बाकी कौल लावणारे सात्त्विक असले की, उत्तरे अचूक येतात अन् मग बुद्धीच्या पलीकडच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला निश्चित मिळू शकतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ध्वनिचकती ‘अध्यात्मविषयक शंकानिरसन’

Leave a Comment