नामसंकीर्तनयोग आणि त्याची वैशिष्ट्ये

वेदमंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणजे वेदारंभी ‘नामच’ होय. नामजपानेसुद्धा चित्तवृत्तीनिरोध होतो; म्हणून नामजपाला ‘नामयोग’ असेही म्हटले आहे. नामजपाची वैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

 

नामसंकीर्तनयोग म्हणजे काय ?

नामसंकीर्तनयोग
नामसंकीर्तनयोग

‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे, म्हणजे जीव शिवाला जोडणे.

१. समानार्थी शब्द

अ. नामजप

आ. नाम

 

आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी, प्राप्तीपर्यंत
आणि प्राप्तीनंतरही अखंड उद्घोष म्हणजे नामस्मरण

‘आपल्याला आनंदस्वरूप आत्मा मायेच्या आत दडला आहे, असे वाटते; पण ज्ञानयोगाप्रमाणे विश्वाची उत्पत्तीच झालेली नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, ‘अगा जे घडलेचि नाही । त्याची वार्ता काय पुसशी ।।’ म्हणून न दडलेल्या आपल्याच आत्मस्वरूपाचा, त्याच्याच प्राप्तीसाठी, प्राप्तीपर्यंत आणि प्राप्तीनंतरही अखंड उद्घोष म्हणजे नामस्मरण.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

नामयोग

‘योगः चित्तवृत्तीनिरोधः ।’, अशी भगवान पतंजलींनी योगाची व्याख्या केली आहे. नामजपानेसुद्धा चित्तवृत्तीनिरोध होतो; म्हणून नामजपाला ‘नामयोग’ असेही म्हटले आहे.

 

‘जप’ या शब्दाचे अर्थ आणि प्रकार

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. ‘जकारो जन्म विच्छेदकः पकारो पापनाशकः ।’ याचा अर्थ, `पापांचा नाश करून जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सोडवितो, तो जप होय’, असा आहे.

आ. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

२. प्रकार

अ. नामजप

नामजप म्हणजे नाम पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

आ. मंत्रजप

मंत्रजप म्हणजे एखादा मंत्र पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

 

नामाची वैशिष्ट्ये

१. अनादी आणि अनंत

विश्वाच्या उत्पत्तीच्या आरंभी नाम होते आणि अंतीही ते असणारच आहे; कारण ते स्वयंभू आहे.

२. वेदांचे उत्पत्तीस्थान म्हणजे नाम

वेद हे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे मूलाधार अन् प्रमाण धर्मग्रंथ होत. परमेश्वराने सृष्टीची उत्पत्ती केली आणि तिच्या कल्याणासाठी वेद निर्माण केले. वेद आणि नाम यांची तुलना करतांना प.पू. भक्तराज महाराजांनी म्हटले आहे, ‘वेदांपेक्षाही नाम श्रेष्ठ, कारण नामातूनच (ओंकारातूनच) वेद निर्माण झाले आहेत; म्हणून वेद, उपनिषदे, गीता वगैरेंच्या अभ्यासापेक्षा नामाचा अभ्यास (जप) महत्त्वाचा.

३. वेदारंभी नाम

‘वेदमंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणजे वेदारंभी ‘नामच’ होय.

४. नामाविषयीचे विकल्प नामानेच दूर होणे

‘नामाविषयी संशय किंवा विकल्प आले, तरी ते निग्रहाने घ्यावे. सर्व संशय नाहीसे होतील.’

५. श्रद्धेविनाही फळ

`श्रद्धाविरहित केलेली होम, दान, तप इत्यादी कर्मे असद्रूप (असत्) ठरतात’, असे गीतेत (अध्याय १७, श्लोक २८) म्हटले आहे.

 

नामजपातील तत्त्व

१. मायेची ओढ न्यून करण्यासाठी नामजप आवश्यक

‘कलियुगात प्रभूप्राप्तीसाठी घरदार सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही’, असे आवर्जून सांगितले जाते. संसार वाईट नाही; कारण तो तर ईश्वर-निर्मित आहे. संसाराची आसक्ती वाईट, बंधनकारक अन् जन्ममरणाच्या फेर्‍याचे मूळ कारण आहे. एवढेच नव्हे तर संसारातील नाती, धन आदी आसक्तींचे विषय पालटून सर्वसाक्षी परमात्मा आसक्तीचा केंद्रबिंदू करायचा आहे आणि हे नामजपाने सहज साधणार आहे.’

२. अनाम्याचा (नाम नसलेल्याचा, ईश्वराचा) नामजप करण्याची आवश्यकता

प.पू. काणे महाराज

प.पू. काणे महाराज

‘ईश्वर हा अनामी आहे. त्याच्या प्राप्तीसाठी नाम घ्यावयाची तरी आवश्यकता काय ? मुळीच नाही; परंतु आपण नामी असल्यामुळे आपल्याला त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या नामाची आवश्यकता भासते. शास्त्रात ‘तस्य वाचकः प्रणवः’, म्हणजे ‘ॐ’ हे ईश्वराचे नाम सांगितले आहे. असे का, तर सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी जो पहिला ध्वनी उत्पन्न झाला त्याचा उच्चार ‘ॐ’ असा आहे; म्हणून पहिला जो शब्द उमटला ते त्याचे नाव पडले. आता इतर अज्ञानी भक्तीभावाने त्याच ‘ॐ’चा उच्चार रामकृष्णादी शब्दाने करतात. त्यांनाही ईश्वराची प्राप्ती हेच फळ मिळते. केवळ ‘ॐ’चा दुसर्‍या शब्दरूपाने केलेला तो उच्चार मात्र वेदसंमत असावा, असा दंडक आहे, म्हणजे तो ईश्वराच्या कोणत्याही अवताराचा असावा.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment