मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १)

Article also available in :

अनुक्रमणिका

व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवसापर्यंत करावयाच्या महत्त्वाच्या कृती

१. मृत्यूनंतर करण्यात येणारे आरंभीचे क्रियाकर्म

२. दहनविधीची सिद्धता

३. अंत्ययात्रा


 

नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो. यामुळे त्याच्याकडून (पूर्वजांकडून) कुटुंबियांना त्रास होण्याची, तसेच असा लिंगदेह वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते.

या लेखात आरंभीचे क्रियाकर्म, क्रियाकर्म कोणी करावे, क्षौरविधी, दहनविधीची सिद्धता, अंत्ययात्रा इत्यादींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवसापर्यंत करावयाच्या महत्त्वाच्या कृती

व्यक्तीच्या मृत्यूनंतर धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे क्रियाकर्म पुरोहिताकडून करून घ्यायचे असते. बहुतेक ठिकाणी अंत्यसंस्कारांविषयी ज्ञान असणारा पुरोहित लगेच मिळणे कठीण असते. अशा वेळी सर्वसाधारणतः कोणत्या कृती करायच्या असतात, ते पुढे दिले आहे. यांपैकी काही कृतींमध्ये पाठभेद, तसेच प्रांतानुसार / परंपरेनुसार भेद (फरक) असू शकतात. जेथे असे भेद आढळतील तेथे आपल्या पुरोहितांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

 

१. मृत्यूनंतर करण्यात येणारे आरंभीचे क्रियाकर्म

१ अ. क्रियाकर्मासाठी पुढील साहित्य गोळा करणे

१. बांबू,

२. सुंभ, म्हणजे काथ्याची दोरी (एक किलो),

३. एक लहान आणि एक मोठे मडके,

४. मृतदेह झाकण्याएवढे पांढरे कापड,

५. तुळशीचा हार,

६. तुळशीच्या मुळातील माती,

७. २५० ग्रॅम काळे तीळ,

८. ५०० ग्रॅम तूप,

९. दर्भ,

१०. १०० ग्रॅम कापूर,

११. काडीपेटी,

१२. सातूच्या / तांदळाच्या पिठाचे ७ गोळे,

१३. पळी-पंचपात्री, तांब्या आणि ताम्हण,

१४. आंबा-फणस यांची लाकडे,

१५. कोयती,

१६. भस्म / विभूती,

१७. गोपीचंदन,

१८. चंदनकाष्ठ,

१९. गोवर्‍या,

२०. १ वाटी पंचगव्य (गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप यांचे मिश्रण),

२१. सोन्याचे ७ तुकडे.

१ आ. मृताला अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल, तर धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे. तोही नसेल, तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा, जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते. क्रियाकर्म करणार्‍या पुरुषाला ‘कर्ता’ म्हणतात.

अविवाहित पुरुष / स्त्री, तसेच निपुत्रिक व्यक्ती आदींचे क्रियाकर्म अनुक्रमे त्यांचा पाठचा भाऊ, वडील किंवा मोठा भाऊ, नाहीतर आप्तेष्ट यांना करता येते.

१ इ. व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो लगेचच तिचे हात-पाय आणि मान सरळ करावी. डोळे बंद करावेत. त्यानंतर काही काळाने असे करणे कठीण असते.

१ ई. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आक्रोश करणे, उर बडवणे यांसारख्या कृती करू नयेत.

१. घरातील व्यक्तींनी मृत व्यक्तीच्या लिंगदेहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून (हल्ल्यांपासून) रक्षण होण्यासाठी मधूनमधून दत्ताला प्रार्थना करावी – ‘हे दत्तात्रेया, ….(मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) यांच्या लिंगदेहाभोवती तुझे संरक्षक-कवच सतत असू दे. त्यांना पुढची पुढची गती द्यावी, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

२. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा दत्ताचा नामजप करीत पुढील सर्व क्रियाकर्म करावे.

१ उ. मृतदेहाला भूमीवर ठेवण्यापूर्वी भूमी शेणाने सारवावी. ते शक्य नसल्यास भूमीवर गोमय किंवा विभूती यांचे पाणी शिंपडावे. भूमीवर दर्भ पसरून त्यावर गवती चटई, घोंगडी, रग किंवा धाबळी अंथरून त्यावर मृतदेह दक्षिणोत्तर ठेवावा (झोपवावा). मृतदेहाला दक्षिणोत्तर ठेवतांना त्याचे पाय दक्षिणेकडे करावेत.

मृतदेह दक्षिणोत्तर ठेवावा
मृतदेह दक्षिणोत्तर ठेवावा

मृतदेहाच्या सभोवती अप्रदक्षिणेने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेने) थोडेसे अंतर ठेवून भस्म किंवा विभूती घालावी.

१ ऊ. मृत्यूपूर्वी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले नसल्यास मृतदेहाच्या तोंडात गंगाजल घालून तोंड बंद करून त्यावर तुळशीपत्र ठेवावे. तसेच त्याचे कान आणि नाक यांत कापसापेक्षा तुळशीच्या पानांचा एकत्रित तुरा ठेवून ते बंद करावेत.

१ ए. मृतदेहाच्या डोक्यापासून काही अंतरावर भिजवलेल्या गव्हाच्या पिठाच्या (कणकेच्या) गोलावर एकच वात असणारी तेलाची पणती / निरांजन / समयी लावून ठेवावी. त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करावी.

मृतदेह तेथून हलवल्यानंतरही हा दिवा पुढे दहाव्या दिवसापर्यंत तेवत ठेवावा.

१ ऐ. कर्त्याने क्षौर करावे (डोक्यावरचे केस पूर्णपणे काढावेत.), तसेच दाढी-मिशा काढून नखेही कापावीत. क्षौर करतांना बटूप्रमाणे केसांचा घेर न ठेवता केवळ शेंडी ठेवावी.

कर्त्याचे अन्य भाऊ, तसेच मृत व्यक्तीपेक्षा लहान असलेले कुटुंबीय (ज्यांचे वडील विद्यमान नाहीत असे) यांनीही त्याच दिवशी क्षौर करावे. ते शक्य नसल्यास दहाव्या दिवशी क्षौर करावे.

कर्ता मृत व्यक्तीपेक्षा वयाने मोठा असल्यास त्याने क्षौर करू नये.

१ ओ. सूर्यास्तानंतर क्षौर वर्ज्य असल्याने सूर्यास्तानंतर क्षौर करू नये. अशा वेळी मृताची उत्तरक्रिया (प्रतिदिन करावयाचे पिंडदान अन् द्यावयाची तिलांजली) ज्या दिवशी चालू करणार त्या दिवशी कर्त्याने क्षौर करून उत्तरक्रिया आरंभ करावी. इतरांनी १० व्या दिनी क्षौर करावे.

स्त्रियांनी केस किंवा नखे कापू नयेत.

१ औ. कर्त्याने स्नान करावे आणि कोरे वस्त्र, उदा. धोतर नेसावे. अंगावर उपरणे घेऊ नये.

१ अं. मृत व्यक्तीपेक्षा लहान असणार्‍या कुटुंबियांनी आणि नातेवाइकांनी मृतदेहाला नमस्कार करावा.

१ क. मृतदेहास घराच्या पुढील अंगणात नेऊन तेथे त्याचे पूर्वेस डोके आणि पश्चिमेस पाय करून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मोठ्याने करत कर्त्याने त्याला आंघोळ घालावी.

१. आंघोळ घालणे शक्य नसल्यास पायांवर पाणी घालावे.

२. नंतर एकदा पंचगव्यस्नान (गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप एका फुलपात्रात एकत्रित करावे. त्यात दर्भ ठेवून पाणी घालावे. ते मिश्रण तो दर्भ किंवा तुळशीपत्र यांच्या साहाय्याने मृतदेहावर शिंपडणे), तसेच मस्तकापासून पायांपर्यंत १० वेळा मातीचे स्नान (पाण्यात तुळशीच्या मुळातील माती घालून ते पाणी मृतदेहावर शिंपडणे) घालावे.

३. गोपीचंदन आणि भस्म / विभूती मृतदेहास लावावी. गळ्यात तुळशीचा हार घालावा.

टीप – प्रत्येकाने मृतदेहाला पुष्पमाला, तसेच त्याच्या तोंडात साखर घालण्याची आणि कपाळावर कुंकू वहाण्याची पद्धत बर्‍याच ठिकाणी आढळते. असे करणे शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे.

१ ख. आंघोळ घातल्यानंतर मृतदेहास नवीन वस्त्रे (धोतर-अंगरखा (सदरा) किंवा साडी) घालावीत. ही वस्त्रे धुपवून (वस्त्रे धुपावर धरून) किंवा गोमूत्र वा तीर्थ शिंपडून शुद्ध केलेली असावीत.

१. कुमारिकेचा मृत्यू झाल्यास तिला पांढर्‍या रंगा-व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रंगाचे पातळ (लुगडे) नेसवावे.

२. सुवासिनीच्या मृत्यूनंतर –

२ अ. नवीन हिरवी साडी नेसवावी.

२ आ. काचेच्या हिरव्या बांगड्या भराव्यात आणि केसांत फुलांची वेणी घालावी.

२ इ. मळवट भरावा. अन्य सुवासिनींनी मृत सुवासिनीला हळदी-कुंकू लावावे.

१ ग. मृतदेह चटई / अन्य अंथरुण यावर ठेवावा. पावले उघडी ठेवून उर्वरित मृतदेह अखंड कोर्‍या पांढर्‍या वस्त्राने झाकावा. मुखमंडलावरील वस्त्राच्या भागाला छेद देऊन मुख (चेहरा) उघडे ठेवावे. पायाकडील वस्त्राचा भाग (एकूण वस्त्राच्या एक चतुर्थांश भाग) कापून कर्त्याने त्याचा उत्तरीय (उपरणे) म्हणून १२ व्या दिवसापर्यंत वापर करावा. हे उत्तरीय हरवू नये. हे वस्त्र १२ व्या दिवशी सपिंडीविधीत पिंडांच्या ठिकाणी ठेवतात आणि पिंडांसह विसर्जित करतात.

१ घ. अन्य सूचना

१. पती मृत झाल्यास पत्नीने मंगळसूत्रातील मुहूर्तमणी, तसेच सोन्याच्या तारेत गुंफलेले काळे मणी वेगळे करून ते पतीच्या मृतदेहासमवेत चितेत ठेवण्यासाठी द्यावेत. मंगळसूत्रातील अन्य सुवर्ण अन् सौभाग्यालंकार काढून सुरक्षित ठेवावेत.

२. मृतदेह अधिक काळ ठेवू नये. काही कारणास्तव तो ठेवावा लागल्यास त्याच्या भोवती दत्ताच्या नामजपपट्ट्यांचे मंडल करावे. तसेच घरात दत्ताचा नामजप किंवा संतांनी गायलेली भजने चालू ठेवावीत. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप उपस्थितांनीही सातत्याने करावा.

३. मृतदेहाचे दहन शक्यतो दिवसा करावे.

४. १३ व्या दिवसापर्यंत सर्व कुटुंबियांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत करावा. त्याला सूत्र ‘१ अ ४’ यात उल्लेखल्याप्रमाणे प्रार्थनेची जोड द्यावी.

५. मृतदेहाला कोणीही अनावश्यक स्पर्श करू नये.

६. ३ वर्षांपर्यंतचा मुलगा-मुलगी मृत झाल्यास त्यांच्या संदर्भात कोणताही धार्मिक विधी केला जात नाही. त्याचा / तिचा मृतदेह पुरावा.

२. दहनविधीची सिद्धता

२ अ. तिरडी बांधणे

१. तिरडी, तसेच अग्नीचे मडके ठेवण्यासाठी कामट्या (पट्ट्या) बनवण्याकरिता बांबूचा वापर करावा.

२. तिरडी बनवण्यासाठी बांबूचे सर्वसाधारणपणे ६ फुटांचे दोन तुकडे करून भूमीवर आडवे ठेवावेत. त्या दोहोंत सर्वसाधारणपणे दीड फुटांचे अंतर ठेवून त्यांवर बांबूच्या कामट्या मध्ये मध्ये बांधाव्यात. कामट्या बांधतांना सुंभ कोठेही कापू नये. प्रत्येक अंगाला (बाजूला) उरणारे सुंभ मृतदेह तिरडीवर ठेवल्यानंतर तो तिरडीला बांधण्यासाठी वापरावेत.

३. अग्नी ठेवलेले मडके घेऊन जाण्यासाठी बांबू चिरून त्याच्या तीन कामट्या (पट्ट्या) काढाव्यात. अग्नीचे मडके मावेल, एवढ्या त्रिकोणी आकारात त्या बांधाव्यात.

४. बांधून झालेली तिरडी घराबाहेर, उदा. अंगणात पूर्व-पश्चिम ठेवावी.

२ आ. मृत व्यक्तीच्या निवासस्थानी होणारे सर्व सोपस्कार झाल्यावर मृतदेह तिरडीवर पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून ठेवावा.

२ इ. मृतदेहाच्या दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना बांधावेत.

२ ई. तिरडीच्या टोकांना असलेल्या सुंभाच्या साहाय्याने मृतदेह तिरडीला बांधावा.

२ उ. मृताने वापरलेले कपडे आणि अंथरूण-पांघरूण अंत्ययात्रेसमवेत घेऊन जावे. ते साहित्य चितेत ठेवावे.

३. अंत्ययात्रा

३ अ. अंत्ययात्रेमध्ये कर्त्याने पुढे रहावे. त्याने गोवर्‍या घालून त्यावर निखारे किंवा कापूर यांच्या साहाय्याने अग्नी पेटवलेले मडके उजव्या हातात घ्यावे.

कर्त्याने डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेले मडके घ्यावे. शारीरिक क्षमतेअभावी कर्त्याला पाण्याचे मडके घेणे त्रासदायक होत असल्यास ते अन्य व्यक्तीकडे द्यावे.

३ आ. कुटुंबियांनी, नाहीतर नातेवाइकांनी, तेही उपस्थित नसल्यास शेजार्‍यांनी तिरडी उचलावी आणि कर्त्याच्या मागून जावे. तिरडीला चौघांनी खांदा द्यावा.

कर्ता आणि तिरडी यांच्यामध्ये कोणीही असू नये. सर्वांनी तिरडीच्या मागून जावे.

३ इ. अंत्ययात्रेमध्ये मृतदेहाचे डोके पुढील दिशेस करावे.

३ ई. अंत्ययात्रा स्मशानात पोहोचेपर्यंत सर्वांनी मोठ्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.

मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी आपापल्या साधनेनुसार नामजप मनात करावा कि दत्ताचा नामजप सामूहिकरित्या मोठ्याने करावा ?

सर्वांनी मोठ्याने श्री गुरुदेव दत्त । हा नामजप केल्याने सर्वांच्या मनात व्यापक भाव निर्माण होऊन वातावरणावर पटकन परिणाम होतो, तसेच समष्टी साधनेचे फळ मिळण्यास साहाय्य होते आणि सर्वांना दुःखद प्रसंगाला धैर्याने तोंड देता येते. तसेच इतरही जीव यांतून स्फूर्ती घेऊन नामसाधनेला लागतात. याउलट स्वतःच्या साधनेनुसार मनात नामजप केल्याने अध्यात्माचा प्रसार न झाल्याने इतरांना समष्टी साधनेचे महत्त्व कळत नाही. मनात नामजप केल्याने संकुचितपणाची वृत्ती वाढीस लागून केवळ मी नामजप करतो, असा अहं जोपासला जातो; म्हणून कोणतेही कर्म करतांना सर्वांना साधनेचा दृष्टीकोन देऊन त्यांना आपल्यासमवेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

३ उ. अंत्ययात्रा अर्ध्या वाटेवर, नाहीतर स्मशानाच्या प्रवेशद्वाराबाहेर पोहोचल्यावर तिरडी खाली ठेवावी. कर्त्याने हातातील साहित्य खाली ठेवून सातू / तांदूळ यांच्या पिठाचे दोन पिंड द्यावेत. हे पिंड घरातून करून आणले तरी चालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ घालावेत. मृतदेहाच्या उजवीकडे अन् डावीकडे दर्भावर पिंड ठेवावेत. उजवीकडील पिंडावर ‘श्यामाय अयं पिण्ड उपतिष्ठतु ।’ असे म्हणून उजव्या हाताच्या पितृतीर्थाने (अंगठा आणि तर्जनी यांच्यामधील तळहाताच्या स्थानावरून) तिळमिश्रित पाणी सोडावे. नंतर डावीकडील पिंडावर ‘शबलाय अयं पिण्ड उपतिष्ठतु ।’ असे म्हणून त्याच्यावरही वरीलप्रमाणे तिळमिश्रित पाणी सोडावे.

३ ऊ. त्यानंतर मागचे खांदेकरी पुढे आणि पुढचे खांदेकरी मागे, असा पालट करून तिरडी उचलावी अन् पुढे न्यावी.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवसापर्यंत करावयाच्या उर्वरित महत्त्वाच्या कृतींविषयीची सविस्तर माहिती वाचण्यासाठी पहा, ‘मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)’

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’

Leave a Comment