ईश्वरप्राप्तीसाठी विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !

विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, ते या लेखात देत आहोत.

१. विवाहमंडपात व्यासपिठावर सर्वांना दिसतील, अशा पद्धतीने श्री गणेश, कुलदेवता, उपास्यदेवता आणि गुरुप्राप्ती झाली असल्यास गुरु यांचे चित्र / छायाचित्रे लावून त्यांची पूजा करावी. ही जागा फुलांनी सजवून तिथे अखंड दीपप्रज्ज्वलन करावे.

२. वर-वधू, तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांपैकी पुरुषांनी धोतर / पायजमा-सदरा आणि महिलांनी सहावारी / नऊवारी साडी नेसावी.

३. विवाहस्थळी ध्वनीक्षेपकावर सनईवादनाची ध्वनी-चकती (ऑडीओ सीडी) लावावी. शक्य असल्यास संतांनी रचलेल्या किंवा गायलेल्या भजनांची ध्वनी-चकती लावावी.

४. विवाहविधीसाठी आलेल्या सर्वांना कुंकवाचा टिळा लावावा.

५. विवाह लवकर उरकण्यासाठी त्यातील विधी वगळू नका किंवा त्यासाठी पुरोहितांच्या मागे तगादा लावू नका. त्यांना ते धर्मशास्त्रानुसार परिपूर्ण करण्यास सांगा.

६. गाण्यांच्या चालीवर रचलेली किंवा विडंबन करणारी मंगलाष्टके म्हणू नयेत.

७. मंगलाष्टकांच्या वेळी वधू-वरांवर अक्षता टाकू नयेत. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पमाळ घालून झाल्यावर त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या मस्तकांवर अक्षता वहाव्यात.


८. वधू-वरांना शुभेच्छा देतांना सर्वांनी पादत्राणे काढावीत.

९. वधू-वरांना शुभेच्छा देतांना किंवा पाहुण्यांचे स्वागत करतांना हस्तांदोलन (शेकहँड) न करता हात जोडून नमस्कार करावा.

१०. विधी चालू असतांना त्यांचा अर्थ आणि महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्याविषयी पुरोहितांना सांगावे अन्यथा आपण सांगावे.

११. कोणत्याही धार्मिक कार्याच्या वेळी गोंगाट करणे अयोग्य आहे. म्हणून विधी चालू असतांना गोंगाट होणार नाही, याविषयी कुटुंबीय, नातेवाईक आदी सर्वांनीच दक्षता घ्यावी.

१२. अती तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ वा पाव, कृत्रिम शीतपेये यांसारखे तामसिक पदार्थ भोजनात ठेवू नयेत. यापेक्षा वरण-भात-तूप, कोशिंबीर, लाडू यांसारखे सात्त्विक पदार्थ भोजनात ठेवावेत.

१३. पाश्चात्त्य प्रथा दर्शवणारी स्वरुची-भोजन (बुफे) पद्धत नव्हे, तर पारंपरिक भारतीय पद्धत असावी.

१४. अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने अन्नपदार्थ ताटात टाकावे लागतील, एवढे वाढू नयेत किंवा वाढून घेऊ नयेत.

१५. विधी चालू असतांना वर / वधू यांना उचलणे, वर-वधू यांना एकमेकांच्या अंगावर ढकलणे असे अपप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

विवाहसोहळ्याचे अध्यात्मीकरण करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचे सहकार्य मिळावे, यासाठी आवश्यक सूचना (उदा. अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर वहाव्यात, विधी चालू असतांना गोंगाट करू नये, वधू-वरांना हस्तांदोलन करून शुभेच्छा न देता नमस्कार करून शुभेच्छा द्याव्यात आदी) ध्वनीक्षेपकावरून द्याव्यात, जेणेकरून त्यांचे तुम्हाला सहकार्य मिळेल.

विवाहानंतरही माहेरचे आडनाव लावून हिंदु संस्कृतीतील दुसर्‍याशी एकरूप होण्याचे तत्त्व नाकारणारी स्त्रीमुक्ती नको !

विवाहानंतर स्त्रीने स्वत:च्या नावासोबत सासरचे आडनाव लावण्याची हिंदु संस्कृतीतील प्राचीन परंपरा आहे. हल्ली पुरोगामीत्वाचा पगडा असलेल्या काही महिला स्त्रीमुक्तीच्या नावाखाली माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही आडनावे लावतात. स्वला त्यागून दुसर्‍यात विलीन होणे हा हिंदु धर्मातील मूलभूत सिद्धांत आहे. प्राचीन परंपरेनुसार विवाहानंतर मुलीने सासरचे आडनाव लावण्यामागे तिने सासरच्या कुटुंबामध्ये विलीन व्हावे, असा उद्देश होता.

अध्यात्मशास्त्रानुसार पुण्यवान पुरुषाची पुण्यकर्मे आणि साधना करणार्‍या पुरुषाची साधना यांचे अर्धे फळ त्याच्या पत्नीला मिळते. या फलप्राप्तीमुळे तिच्या जीवनाचे कल्याण होते; मात्र त्यासाठी तिने तिच्या पतीशी अधिकाधिक एकरूप होणे आवश्यक आहे. त्याकरता तिने स्वतःचे नाव, तसेच माहेरचे आडनाव यांचा त्याग करणे, पतीच्या कुटुंबियांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे, इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या साध्य झाल्यास स्त्रीचा अहंभाव न्यून होऊन तिला विवाहाचे आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण फळ प्राप्त होऊ शकते. यावरून आपल्या हेही लक्षात येते की, पुरुषाने पत्नीच्या कुटुंबियांशी एकरूप होणे, हे त्याला मानसिक स्तरावर सुख देणारे आहे, तर स्त्रीने पतीशी आणि त्याच्या कुटुंबियांशी एकरूप होणे, हे तिला आध्यात्मिक स्तरावर लाभ देणारे आहे.

अनेक संतांनीही स्वत:च्या शिष्यांची नावे पालटल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिष्यांची नावे पालटण्यामागे नावासोबत आलेले सर्व संस्कार आणि अहंभाव त्यागून गुरूशी एकरूप व्हावे, ही संकल्पना असते. हीच प्रक्रिया स्त्रीने विवाहानंतर माहेरचे नाव त्यागून सासरचे नाव अंगिकारण्यामागे होती. तात्पर्य विवाहानंतर स्त्रीचे आडनाव पालटण्यामागे तिला जोखडात ठेवण्याचा नव्हे, तर तिला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे विवाहित स्त्रीने माहेरचे आडनाव लावणे, म्हणजे इतरांमध्ये विलीन होण्याची आध्यात्मिक संधी नाकारणे होय.

 

मुला-मुलींनी प्रेमविवाह करण्याचा आई-वडिलांना होणारे लाभ आणि हानी !

१. लाभ

अ. स्थळ शोधावे लागत नाही.

आ. मुलीच्या लग्नात तिच्या सासरच्यांना हुंडा म्हणून देण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत.

इ. पुढे मुलाचे पत्नीशी आणि मुलीचे पतीशी न जमल्यास ते आई-वडिलांना दोष देऊ शकत नाहीत. हल्लीच्या कलियुगांतर्गत कलियुगात न पटण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा लाभ लक्षणीय आहे.

२. हानी

अ. मुलाचे पत्नीशी आणि मुलीचे पतीशी न जमल्याचे दुःख भोगावे लागते. असे असले, तरी आई-वडिलांनी त्यांचे लग्न जुळवलेले नसल्यामुळे त्यांना कर्मफलन्यायानुसार पाप लागत नाही.

आ. काही आई-वडिलांना उगाचच वाटते की, त्यांनी प्रेमविवाह होऊ द्यायला नको होता. ते त्यांच्या कर्तव्यात न्यून पडले. त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धानुसारच होत असल्याने ते विवाहाला उत्तरदायी नसतात.

– प. पू. डाॅ. आठवले

1 thought on “ईश्वरप्राप्तीसाठी विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !”

  1. लग्न घरी जेवताना लागेल तितकेच अन्न घ्यावे, हे सर्व पाहुण्यांनी लक्षात घ्यावे अन्नाचा अपव्यय होऊ देऊ नये.
    खूप छान माहिती मिळाली.

    Reply

Leave a Comment