श्राद्धाचे प्रकार

अनुक्रमणिका


श्राद्ध हा हिंदु धर्मातील एक पवित्र विधी असून मानवी जीवनात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्दीष्टांनुसार श्राद्धाचे विविध प्रकार आहेत. त्याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

१. मुख्य आणि प्रचलित प्रकार

मत्स्यपुराणात म्हटले आहे, ‘नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविधं श्राद्धमुच्यते । – मत्स्यपुराण १६.५’ अर्थात नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे श्राद्धाचे तीन मुख्य प्रकार आहेत. यमस्मृतीमध्ये वरील तीन प्रकारांसह नांदीश्राद्ध आणि पार्वण श्राद्ध हेही मुख्य प्रकार सांगितले आहेत.

अ. नित्य श्राद्ध

प्रत्येक दिवशी केल्या जाणार्‍या श्राद्धाला ‘नित्य श्राद्ध’ म्हणतात. हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते.

आ. नैमित्तिक श्राद्ध

मृतात्म्यासाठी केली जाणारी एकोदि्दष्ट इत्यादी प्रकारची श्राद्धे ही नैमित्तिक श्राद्धे आहेत.

इ. काम्य श्राद्ध

विशिष्ट कामना धरून, म्हणजे ‘कामनापूर्ती व्हावी’, या उद्देशाने केल्या जाणार्‍या श्राद्धाला काम्य श्राद्ध, असे म्हणतात. फलप्राप्तीच्या उद्देशाने विशिष्ट वार, विशिष्ट तिथी आणि विशिष्ट नक्षत्र यांना श्राद्ध केल्यास ती ती फलप्राप्ती होते. त्यांची माहिती पुढे दिली आहे.

१. वार आणि श्राद्धफले
वार श्राद्धफल वार श्राद्धफल
सोमवार सौभाग्य शुक्रवार धनप्राप्ती
मंगळवार विजयप्राप्ती शनिवार आयुष्यवृद्धी
बुधवार कामनासिद्धी रविवार आरोग्य
गुरुवार विद्याप्राप्ती
२. तिथी आणि श्राद्धफले
श्राद्धाची तिथी श्राद्धफले
प्रतिपदा उत्तम संतान आणि पशू यांची प्राप्ती होणे
द्वितीया कन्याप्राप्ती होणे
तृतीया अश्वप्राप्ती, मानसन्मान मिळणे
चतुर्थी पुष्कळ क्षुद्र पशूंची प्राप्ती होणे
पंचमी पुष्पळ संतान प्राप्ती, सुंदर संतान प्राप्ती होणे
षष्ठी तेजस्वी संतान प्राप्ती, द्युतामध्ये विजय मिळणे
सप्तमी शेत-भूमी प्राप्त होणे
अष्टमी व्यापारात लाभ होणे
नवमी घोड्यासारख्या जनावरांची प्राप्ती होणे
दशमी गोधनाची समृद्धी होणे, दोन खुरांच्या जनावरांची प्राप्ती होणे
एकादशी भांडीकुंडी, वस्त्रे आणि ब्रम्हवर्चस्वी संतान यांचा लाभ होणे
द्वादशी सोने रूपे इत्यादींची प्राप्ती होणे
त्रयोदशी ज्ञातीबांधवांत श्रेष्ठपणा प्राप्त होणे
चतुर्दशी शस्त्राच्या आघाताने किंवा युद्धात मरण पावलेले यांना गती मिळणे, सुप्रजाप्राप्ती होणे
अमावस्या / पौर्णिमा सखलइच्छापूर्ती होणे

टीप १ : पौर्णिमा वगळून सर्व तिथी कृष्ण पक्षातील असून भाद्रपद मासातील (महिन्यातील) कृष्ण पक्षात (महालयात) त्या विशेष फळ देणार्‍या आहेत.

२ अ. भीष्माष्टमी श्राद्ध

अपत्य होत नसल्यास ते व्हावे किंवा गर्भपात होत असल्यास गर्भ सुखरूप रहावा, या कामनापूर्तींकरिता माघ शुद्ध अष्टमी, म्हणजेच भीष्माष्टमी या तिथीला भीष्माचार्यांसाठी श्राद्ध किंवा तर्पण करावे.

३. नक्षत्र आणि श्राद्धफले
नक्षत्र श्राद्धफले
१. अश्विनी अश्वप्राप्ती
२. भरणी दीर्घायुष्य
३. कृत्तिका पुत्रासह स्वतःला स्वर्गप्राप्ती
४. रोहिणी संतान प्राप्ती
५. मृग ब्रह्मतेजाची प्राप्ती
६. आर्द्रा क्रूरकर्म्यांना गती मिळणे (टीप १), कर्मांची सिद्धी होणे
७. पुनर्वसु द्रव्यप्राप्ती, भूमीप्राप्ती
८. पुष्य बलवृद्धी
९. आश्लेषा धैर्यशाली संतान प्राप्ती, कामनापूर्ती
१०. मघा ज्ञातीबांधवांत श्रेष्ठपणा प्राप्त होणे, सौभाग्यप्राप्ती
११. पूर्वा भाग्य, संतान प्राप्ती आणि पापनाश
१२. उत्तरा भाग्य, संतान प्राप्ती आणि पापनाश
१३. हस्त इच्छापूर्ती, ज्ञातीबांधवांत श्रेष्ठपणा प्राप्त होणे
१४. चित्रा रूपवान संतान प्राप्ती, पुष्कळ संतान प्राप्ती
१५. स्वाती व्यापारात लाभ, यशप्राप्ती
१६. विशाखा पुष्कळ संतान प्राप्ती, सुवर्णप्राप्ती
१७. अनुराधा राज्यप्राप्ती (मंत्रीपद वगैरेंची प्राप्ती), मित्रलाभ
१८. ज्येष्ठा श्रेष्ठत्व, अधिकार, वैभव आणि आत्मनिग्रह यांची प्राप्ती, राज्यप्राप्ती
१९. मूळ आरोग्यप्राप्ती, शेत-भूमी प्राप्त होणे
२०. पूर्वाषाढा उत्तम कीर्ती, समुद्रापर्यंतची सफल यात्रा

टीप १ : क्रूरकर्मी व्यक्ती मरण पावल्यावर तिला गती मिळावी, याकरिता तिच्यासाठी आर्द्रा नक्षत्रावर श्राद्ध केले असता ते फलदायी होते. (मूळस्थानी)

विशेष टीप : सूत्र ‘२’ आणि ‘३’ यांतील सारणींमध्ये काही ठिकाणी एकाच तिथीला किंवा नक्षत्राला एकापेक्षा जास्त श्राद्धफले दिली आहेत. ती पाठभेदानुसार दिली आहेत.

ई. नांदीश्राद्ध

मंगलकार्याच्या आरंभी, गर्भाधान इत्यादी सोळा संस्कारांच्या आरंभी, पुण्याहवाचनाच्या वेळी कार्य सुसंपन्न व्हावे; म्हणून जे श्राद्ध करतात, ते नांदीश्राद्ध होय. यात सत्यवसु (किंवा क्रतुदक्ष) संज्ञक विश्वेदेव असून पितृत्रयी, मातृत्रयी आणि मातामहत्रयी एवढ्यांचाच उच्चार असतो. कर्मांगश्राद्ध आणि वृद्धीश्राद्ध ही नांदीश्राद्धे आहेत.

१. कर्मांगश्राद्ध

गर्भाधान संस्काराच्या वेळी करावयाचे श्राद्ध

२. वृद्धीश्राद्ध

नवजात अपत्याच्या जन्मानंतर करावयाचे श्राद्ध

उ. पार्वण श्राद्ध

श्रौत परंपरेतील पिंडपितृयज्ञ हा साग्निकाने (अग्निहोत्र धारण करणार्‍याने) करायचा एक यज्ञ आहे. त्याचाच पर्याय म्हणजे गृह्यसूत्रांतले पार्वण श्राद्ध होय. पितरांचा पार्वणांच्या सूचीत समावेश झाल्यावर त्यांच्यासाठी हे श्राद्ध करण्यात येते. एकपार्वण, द्विपार्वण आणि त्रिपार्वण, असे या श्राद्धाचे प्रकार आहेत. महालयश्राद्ध आणि तीर्थश्राद्ध ही पार्वण श्राद्धे आहेत.

१. महालयश्राद्ध

महालयश्राद्ध

महालयश्राद्ध

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत केले जाणारे ते पार्वण श्राद्ध.

२. मातामहश्राद्ध (दौहित्र)

ज्याचे वडील जिवंत आहेत; पण आईचे वडील जिवंत नाहीत, अशा व्यक्तीने करावयाचे श्राद्ध. आजोबांच्या वर्षश्राद्धापूर्वी हे श्राद्ध करता येत नाही. मातामह श्राद्ध केवळ आश्विन शुद्ध प्रतिपदेसच करता येते. हे श्राद्ध करण्यासाठी श्राद्धकर्ता तीन वर्षांपेक्षा मोठा असावा. त्याची मुंज झालेली नसली, तरी त्यास हे श्राद्ध करता येते.

३. तीर्थश्राद्ध

प्रयागादी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेल्यावर किंवा पवित्र नदीवर केले जाणारे श्राद्ध. तीर्थ श्राद्धाच्या वेळी महालयातील सर्व पार्वणे घेतात.

२. इतर प्रकार

वर दिलेल्या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त १२ अमावास्या, ४ युगे, १४ मन्वंतरे, १२ संक्रांती, १२ वैधृती, १२ व्यतीपात, १५ महालय, ५ पहिली, ५ अष्टके, ५ अन्वाष्टके, असे श्राद्धाचे ९६ प्रकार सांगितले आहेत. श्राद्धाच्या इतर प्रकारांपैकी काही प्रकारांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अ. गोष्ठीश्राद्ध

ब्राह्मण समुदाय आणि विद्वान एकत्र मिळून तीर्थाच्या ठिकाणी पितरांची तृप्ती व्हावी, तसेच संपत्ती आणि सुख प्राप्त व्हावे, या उद्देशाने श्राद्ध करतात, त्या श्राद्धाला किंवा श्राद्धाविषयी चर्चा होत असतांना एकाएकी स्फूर्ती होऊन जे श्राद्ध केले जाते, त्या श्राद्धाला ‘गोष्ठीश्राद्ध’, असे म्हणतात.

आ. शुद्धीश्राद्ध

आपली शुद्धी होण्यासाठी ब्राह्मणभोजन घालतात, त्याला ‘शुद्धीश्राद्ध’ असे म्हणतात. हे प्रायश्चित्तांग श्राद्ध आहे.

इ. पुष्टीश्राद्ध

शरीरवृद्धी होण्यासाठी आणि द्रव्यादी संपत्तीची वृद्धी होण्यासाठी केलेल्या श्राद्धाला पुष्टीश्राद्ध असे म्हणतात.

ई. घृतश्राद्ध (यात्राश्राद्ध)

तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी यात्रा निर्विघ्न होण्यासाठी पितरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घृताने श्राद्ध करतात, याला घृतश्राद्ध असे म्हणतात.

उ. दधीश्राद्ध

तीर्थयात्रेहून परतल्यावर करण्यात येणारे श्राद्ध

ऊ. अष्टकाश्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)

अष्टका म्हणजे कोणत्याही मासातील वद्य अष्टमी ही तिथी होय. वेदकाळी अष्टका श्राद्ध हे विशेषतः मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार मासांतील वद्य अष्टमीला करत असत. या श्राद्धात भाज्या, मांस, वडे, तीळ, मध, तांदळाची खीर, फळे, कंदमुळे इत्यादी पदार्थ पितरांना अर्पण करत. विश्वेदेव, अग्नि, सूर्य, प्रजापति, रात्री, नक्षत्रे, ऋतू इत्यादी श्राद्धाच्या देवता मानीत.

ए. दैविकश्राद्ध

देवाची कृपा प्राप्त व्हावी, या उद्देशाने केलेल्या श्राद्धाला दैविकश्राद्ध असे म्हणतात.

ऐ. हिरण्यश्राद्ध

भोजन न घालता नुसती दक्षिणा देऊन केलेले श्राद्ध. धान्याचा अभाव असेल, तर धान्याच्या किमतीच्या चौपट किमतीचे सुवर्ण ब्राह्मणांना देऊन हे श्राद्ध करावे.

ओ. हस्तश्राद्ध

श्राद्धीय ब्राह्मणांना भोजन देऊन करण्यात येणारे श्राद्ध. भोजन नसेल, तर हिरण्याने(पैशाने), आमान्नाने (कोरड्या शिध्याने) हे श्राद्ध करतात.

औ. आत्मश्राद्ध

ज्यांना संतती नसते किंवा ज्यांची संतती नास्तिक असते, त्यांनी जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध स्वतःच करावे. याचा विधी शास्त्रात सांगितला आहे.

अं. चटश्राद्ध

चटश्राद्ध

चटश्राद्ध

श्राद्धासाठी देव आणि पितर यांच्या स्थानांवर बसण्यासाठी ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत, तेव्हा त्या स्थानावर दर्भ ठेवतात. त्यास चट (किंवा दर्भबटू) म्हणतात. चट मांडून केलेल्या श्राद्धास चटश्राद्ध म्हणतात. वर श्राद्धाचे विविध प्रकार दिलेले असले, तरी कालमानाप्रमाणे मृत व्यक्तीची ती गेल्यापासून पहिल्या ते अकरा दिवसांपर्यंत करायची श्राद्धे, मासिक श्राद्धे, सपिंडीकरण श्राद्ध, अब्दपूर्तीश्राद्ध, द्वितीयाब्दिक श्राद्ध म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालयश्राद्ध एवढीच श्राद्धे सर्वसामान्यपणे प्रचलित आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्ध’

4 thoughts on “श्राद्धाचे प्रकार”

    • नमस्कार,

      अनसुथ/अनसुध महालय असे काही नाही. प्रतिपदा ते अमावास्या महालय श्राद्ध करतात.

      Reply
  1. माझ्या दिवंगत मुलाच्या बाबतीत मला भडजिंनी सांगितले कि आपण त्याचे १३ व्या ला शाश्सोक्त पिंडदान केले आहे या नंतर त्याचे कोणतेही म्हणजे, मासीक किंवा वार्षिक श्राध्द करायचे नाही. वडील जिवंत असताना त्यांना मुलांचे श्राध्द करता येत नाही.
    या बाबतीत मी ३ – ४ ठिकाणी चौकशी केली तेव्हा मला अशाच प्रकारे सांगितले गेले. पण आता एका मित्राने सांगितले की असे काही नाही तुला त्याचं श्राध्द करायला हवं.
    याबाबत धर्मशास्त्र काय सांगतं हे कृपया कळवावे ही विनंती.
    सौर्दंभ मिळाल्यास उत्तम.

    Reply
    • नमस्कार,

      धर्मशास्त्राप्रमाणे वडील मुलाचे श्राद्ध करू शकतात. संदर्भ ग्रंथ – धर्मसिंधू

      Reply

Leave a Comment