अष्टविनायक

१. श्री मयुरेश्वर, मोरगाव

श्री मयुरेश्वर, मोरगाव
श्री मयुरेश्वर, मोरगाव

अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगाव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मयुरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली. जवळच कर्‍हा नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मयुरेश्वराच्या डोळ्यांत आणि नाभीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे.

 

२. श्री सिद्धीविनायक, सिद्धटेक

श्री सिद्धीविनायक, सिद्धटेक
श्री सिद्धीविनायक, सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक हे भीमा नदीवर वसलेले अष्टविनायकांपैकी एक स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे. जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत. जवळच विष्णु, शिवाई, महादेव आदि देवांची मंदिरे आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि.मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि.मी. अंतरावर आहे.

 

३. श्री बल्लाळेश्वर, पाली

श्री बल्लाळेश्वर, पाली
श्री बल्लाळेश्वर, पाली

या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यांत हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आणि सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

 

४. श्री वरद विनायक, महड

श्री वरद विनायक, महड
श्री वरद विनायक, महड

महडचा वरदविनायक हे अष्टविनायकांपैकी स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे, त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला अन् मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. ख्रिस्ताब्द १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूरच्या दरम्यान आहे.

 

५. श्री चिंतामणि, थेऊर

श्री चिंतामणि, थेऊर
श्री चिंतामणि, थेऊर

थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणि म्हणतात. या गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे; पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.

पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणि देव यांनी बांधले आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि.मी. अंतरावर आहे.

 

६. श्री गिरिजात्मज, लेण्याद्री

श्री गिरिजात्मज, लेण्याद्री
श्री गिरिजात्मज, लेण्याद्री

जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावरील लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हे गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

 

७. श्री विघ्नेश्वर, ओझर

1348570260_vighneshwar ozar
श्री विघ्नेश्वर

येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत गणपति म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यांत माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि.मी. वर तर पुण्यापासून ८५ कि.मी. अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा देखील जवळच आहे.

 

८. श्री महागणपति, रांजणगाव

श्री महागणपति, रांजणगाव
श्री महागणपति, रांजणगाव

हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे, ती अशी – त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारीवदे महागणपति, असेही म्हटले जाते.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

टीप : यांतील गणपतींचा क्रम ‘भारतीय संस्कृतीकोष’ या संदर्भग्रंथांत दिल्याप्रमाणे घेतला आहे. समाजात अष्टविनायकांचा क्रम वेगवेगळा मानला जातो.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

1 thought on “अष्टविनायक”

Leave a Comment