गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !


सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

अनु. क्र.

गणेशोत्सवात हे नसावे !

गणेशोत्सवात हे असावे !

१.

वर्गणी बळाने वसूल करणे

ऐच्छिक वर्गणी स्वीकारणे

२.

‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती

शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती

३.

थर्माकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोषणाई)

नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास

४.

फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण

तालबद्ध आरत्या आणि भावपूर्ण नामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचे आयोजन

५.

विसर्जन मिरवणुकीत गुलाल, हिडीस नाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन् मद्यपान

विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचा नामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता

गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा !

१. उत्सवस्थळी चित्रपटगीते, ‘रेकॉर्ड डान्स’, जुगार, मद्यपान, गुटख्यांची विज्ञापने टाळा !

२. उत्सवस्थळी स्तोत्रपठण, राष्ट्र व धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवा !

३. रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करा !

४. राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा वाढवणार्‍या विषयांवरील देखाव्यांचे सादरीकरण करा !

गणेशोत्सव मंडळांनो, लोककल्याणासाठी गणेशोत्सव साजरा करा !

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि सवंग लोकप्रियतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रतिवर्षी चित्रविचित्र रूपांतील आणि अवाढव्य आकारांतील श्री गणेशमूर्ती बसवतात. श्री गणेशाची मूर्ती धर्मशास्त्रानुसार बनवावी आणि तिची उंची एक ते दीड फूट एवढीच का ठेवावी, असे शास्त्र असले तरी, श्री गणेशाच्या रूपात काही नाविन्य वा आकर्षकता नसेल आणि मूर्ती लहान असेल, तर गणेशोत्सवाला गर्दी कशी होणार ?, असा प्रश्‍न मंडळांच्या पदाधिकार्‍यांना पडू शकतो. यासंदर्भात मंडळांनी काय करायला हवे, हे पुढे दिले आहे.

१. समाजाला गणेशोत्सवाकडे पहाण्याची आध्यात्मिक दृष्टी देणे

आपण समाजापुढे जे ठेवू, त्यानुसार समाजाला पहाण्याची सवय लागते. गणेशोत्सव मंडळांनी श्री गणपति अथर्वशीर्षाच्या सामुदायिक पठणासारखे कार्यक्रम आयोजित केले, तरीही लोकांची दाटी होऊ शकते. लोकांची तशी मानसिकता सिद्ध करणे, हे मंडळांचे कर्तव्य आहे. पुणे येथील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपति संस्थान अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण आयोजित करते अन् त्या कार्यक्रमास प्रचंड दाटी होते.

२. राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करणे

सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ सामाजिक सोहळा नसून, हिंदूंची संस्कृती अन् संघटन वर्धिष्णू करण्याची, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची ती एक पर्वणीच आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करावे. याची काही उदाहरणे –
अ. श्री गणेशाची उपासना वाढवणारे धर्मशिक्षण फलक अन् ग्रंथ यांचे प्रदर्शन
आ. संतांनी लिहिलेली भजने, दासबोधाचे निरूपण, राष्ट्रपुरुषांवरील पोवाडे इत्यादी कार्यक्रम
इ. हिंदु धर्मियांवरील अत्याचार, तसेच राष्ट्र अन् धर्म यांची होत असलेली हानी यांच्या विरोधात जागृती करणारी भाषणे
ई. स्वसंरक्षण प्रशिक्षण, उदा. कराटे, दंडसाखळी यांचे वर्ग
उ. क्रांतीकारकांच्या जीवनावरील प्रदर्शने
ऊ. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीचा दर्शनसोहळा
या कार्यक्रमांना होणारी दाटी खर्‍याखुर्‍या राष्ट्रप्रेमी किंवा धर्मप्रेमी लोकांची असेल आणि अशा लोकांच्या प्रयत्नांतूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचे सुराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होईल.

गणेशोत्सव मंडळांनो, असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती तुम्हाला साहाय्य करतील.

देवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका !

सध्या श्री गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या रूपांत आणि पेहरावांत बनवण्याची प्रथा समाजात रूढ झाली आहे. लंगोटी घातलेली, डोक्यावर मोराचे पीस असल्याने कृष्णासारखी दिसणारी, दत्तात्रेयासारखी दिसणारी, झबले घातलेली बालमूर्ती आदी श्री गणेशमूर्तींचे चित्रविचित्र प्रकार आढळून येतात.

वेगवेगळ्या उपकरणापासून श्री गणेशमूर्ती !

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकाग्रहास्तव गांधीजी किंवा नेहरूंचे रूप कल्पून मूर्ती केली जायची. त्याप्रमाणे सध्याही काही ठिकाणी शिवाजी महाराजांसारखी दिसणारी, एखाद्या संतांसारखी दिसणारी मूर्ती केली जाते. फुटबॉल किंवा क्रिकेट खेळणारा गणपति, बुलेटवरील गणपति यांसारख्या गणेशमूर्तीही बनवल्या जातात. मुंबईजवळील कल्याण येथील एका गणेशोत्सव मंडळाने तर वैद्यकीय उपकरणांपासून गणेशमूर्ती बनवली होती. त्यात सोंड म्हणून इंजेक्शनची सिरींज, कान म्हणून किडनी ट्रे, मुकुट म्हणून बाटली, हात म्हणून ग्लोव्हज्, डोळे म्हणून कॅप्सूल, अशा विविध वैद्यकीय उपकरणांचा वापर केला होता. केवळ कल्पनाविलास आणि आधुनिक जीवनप्रवाह यांचा अनाठायी आणि निष्फळ मेळ घालण्याचा प्रयत्न अशा मूर्ती बनवतांना दिसून येतो. हे सर्वस्वी चुकीचे आहे; कारण गणपतीची तुलना नेता, सैनिक, खेळाडू इत्यादींशी करता येत नाही. सवंग लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी गणेशमूर्तीचे मानवीकरण केले जाते. संत आणि देव यांत फरक आहे; म्हणून संतांच्या रूपातही गणेशाची मूर्ती स्थापू नये.

देवतेला चित्रविचित्र रूपांत दर्शवल्याने तो देवतेचा अवमान !

१९५० साली महाराष्ट्र शासनाने गणेशमूर्तीचे वेशांतर आणि मानवीकरण यांवर बंदी घातली होती; मात्र कालांतराने या नियमांमध्ये शिथिलता आली. वेगवेगळ्या रूपांतील आणि वेशभूषांतील मूर्तींमुळे लोकांच्या मनातील त्या देवतेविषयीच्या श्रद्धेवर आणि भावावर परिणाम होतो, तसेच देवतेला चित्रविचित्र रूपांत दर्शवल्याने तो देवतेचा अवमानच ठरतो.

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ करून देणारी मूर्ती बनवा !

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या सिद्धांतानुसार मूर्तीविज्ञानाप्रमाणे योग्य मूर्ती बनवल्यासच त्या त्या मूर्तीमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. या सिद्धांताचे पालन न करता मूर्ती बनवल्यास ते तत्त्व त्या मूर्तीमध्ये येऊ शकत नाही. परिणामी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्या मूर्तीचा भाविकाला लाभ होत नाही.

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'
Facebooktwittergoogle_plusmail