सनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी (भाग १)

अनुक्रमणिका

१. पू. प्रेमा कुवेलकर यांचा जीवनप्रवास

२. पू. कुवेलकरआजी यांना आलेल्या अनुभूती

३. पू. प्रेमा कुवेलकरआजींच्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे


१. पू. प्रेमा कुवेलकर यांचा जीवनप्रवास

१ अ. शिक्षण आणि चाकरी

आई मूळ अंकोला, कारवार येथील आहे. तिचे शिक्षण कन्नडमध्ये झाले असून ती १० वी पर्यंत शिकली आहे. त्यानंतर तिने खादी ग्रामोद्योगमध्ये चाकरी केली. चाकरीच्या ठिकाणी एका बाईच्या घरी तिने शिर्डीच्या साईबाबांचा चमत्कार पाहिला. त्यानंतर आईची साईबाबांवर भक्ती निर्माण झाली. त्याआधी ती देवांचे लहान ग्रंथ वाचत असे आणि कीर्तन ऐकत असे.

प .पू . डॉक्टर पू. आजींचा सत्कार करतांना !

प .पू . डॉक्टर पू. आजींचा सत्कार करतांना !

१ आ. घरची परिस्थिती आणि भावंडांचे शिक्षण यांसाठी पुढे न शिकता चाकरी करावी लागणे

आईला ती सोडून सात भावंडे होती. त्या वेळी आईला घरची परिस्थिती आणि भावंडांचे शिक्षण यांसाठी पुढे न शिकता चाकरी करावी लागली. तिने मिळणार्‍या वेतनातून स्वतःला काही न घेता भावंडांच्या शिक्षणाला पैसे वापरून सर्व भावंडांना शिकवले. त्यामुळे ते शिकून चांगल्या चाकरीला लागले. ती सर्व भावंडे काही चांगले वृत्त असेल, तसेच त्रासाविषयी काही असेल, तर आईला सांगतात. त्यांना त्रास असेल, तर आई त्यांना उपायसुद्धा सांगते. त्यामुळे त्यांचे त्रास दूर होतात. ते सर्व जण आईला अजूनही मानतात. कधी गोव्यात कामानिमित्त आल्यावर आईला न चुकता भेटून जातात.

१ इ. अंगणामध्ये असलेल्या साईबाबांच्या मंदिरात विविध सेवा करणे आणि आमच्याकडूनही करवून घेणे

नंतर आम्ही वडिलांच्या चाकरीमुळे गोव्यात सावर्डे येथे रहायला आलो. आम्ही रहात होतो, त्याच्या बाजूला अंगणामध्ये साईबाबांचे मंदिर होते. आई तिथे सकाळी उठल्यावर प्रतिदिन मंदिर झाडणे, शेणाने सारवणे, तसेच दिवा लावणे अशा सेवा करत असे. सुटीच्या वेळी आई माझ्याकडूनही मंदिर झाडणे आणि दिवा लावणे अशा सेवा करून घ्यायची. प्रत्येक गुरुवारी मंदिरात भजन असायचे. त्या वेळी ती आम्हा मुलांना भजनाला घेऊन जात असे. तिने साईबाबांचा आणि कुलदेवीचा जप करायला आम्हाला शिकवले. तसेच तिन्हीसांजेच्या वेळी ती आमच्याकडून साईबाबा, तसेच कुलदेवी शांतादुर्गा यांची स्तोत्रे वाचून घेणे इत्यादी करून घेत असे. तसेच पंचमीच्या दिवशी संध्याकाळी आम्हालाही मंदिरात दर्शनाला घेऊन जाऊन २१ प्रदक्षिणा नामजपासहित घालायला लावायची आणि सांगायची, ‘‘ही कुलदेवी आपल्या सर्वांचे रक्षण करील, तसेच गुरूंकडे घेऊन जाईल.’’ त्यामुळेच आम्हाला प.पू. डॉक्टर भेटले, तसेच आमच्यावर संस्कार झाले. (पू. कुवेलकरआजी यांचा मोठा मुलगा श्री. नागराज यांनाही पू. आजींविषयी असेच वाटते.)

१ ई. गरीब परिस्थितीमुळे आई आम्हाला जेवायला वाढून
स्वतः कधी पाणी पिऊन, कधी पेजेचे पाणी पिऊन रहात असणे

वडिलांना अल्प वेतन मिळत असे. आम्ही मुले शाळेत शिकायचो. त्या वेळी कधी कधी आई आम्हाला जेवायला वाढायची आणि स्वतः कधी पाणी पिऊन, कधी पेजेचे पाणी पिऊन रहायची. मामा आणि मावशी यांचे साहाय्य मिळायचे; पण तेवढ्याने भागत नसे. अशा परिस्थितीत आईने आम्हाला शिकवले.

१ उ. आई मूळ घरी रहायला येणे

नंतर वडिलांची बदली फोंड्यात दुर्भाट येथे झाली. त्यामुळे आम्ही आमच्या मूळ घरी रहायला आलो. इथे आम्हाला आमच्या कुलदेवतेचे मंदिर जवळ होते. आई मंदिरात उत्सवाच्या वेळी आम्हालाही घेऊन जात असे.

१ ऊ. नातेवाईक आणि साधक यांच्याप्रतीचा प्रेमभाव

१. आईचे महत्त्वाचे गुण म्हणजे प्रेमभाव आणि व्यापकता. कोणी नातेवाईक घरी आले, तर त्यांच्याजवळ ती त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाची विचारपूस करत असे. त्यांना प्रेमाने चहा करून देत असे. कुटुंबाला खाऊ देत असे. त्यामुळे प्रत्येक नातेवाईकाला आमच्याकडे यायला आवडायचे. कोणाला घरी येणे शक्य झाले नाही, तर ते दूरभाष तरी करत असत. ती कोणत्याही गोष्टीत कर्तेपण स्वतः कडे घेत नाही. तिच्या स्वभावामुळे तिच्याकडून कोणीही दुखवलेही जात नाही.

(पू. कुवेलकरआजी यांचा मोठा मुलगा श्री. नागराज यांनाही पू. आजींविषयी असेच वाटते.)

२. कुटुंबातील प्रत्येकाच्या वाढदिवसाची तिला आठवण असायची आणि ती आम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायला लावायची. तसेच स्वतःही शुभेच्छा द्यायची.

३. नातेवाईक कोणत्याही वेळी घरी आले, तरी त्यांना जेवून जायला सांगायची. स्वयंपाक सिद्ध नसेल, तर तो बनवायची. त्यामुळे ‘कोणत्याही वेळी कुवेलकरआजींकडे आलो, तरी जेवणखाण मिळू शकते. कितीही अपरात्रीला झोपायला आलो, तरी आजींकडे झोपायला मिळते’, असा आत्मविश्वास नातेवाईकांना होता. त्यामुळे कोणत्याही उत्सवाच्या वेळी नातेवाईक घरी यायचे.

४. नातेवाईकांपेक्षा साधक असल्यास तिला जास्त चांगले वाटायचे. साधकांशी कितीही बोलले, तरी तिला थकवा यायचा नाही. तिचे अध्यात्माच्या संदर्भात जास्त बोलणे व्हायचे. ती आमच्याशीही व्यवहारापेक्षा अध्यात्माच्या दृष्टीने अधिक बोलत असे.

१ ए. साधनेला आरंभ

ख्रिस्ताब्द १९९३ मधील प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा रामनाथीला होती. आईने तिथे दोन दिवस सेवा केली. गुरुपौर्णिमा झाल्यावर प.पू. भक्तराज महाराजांचा दर्शन सोहळा होता. त्या वेळी तिने प.पू. भक्तराज महाराजांना नमस्कार केला. त्या वेळेपासून तिची साधना चालू झाली आणि २००५ नंतर तिची प्रगती होत गेली.

– श्री. मनोज कुवेलकर (पू. प्रेमा कुवेलकर यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. पू. कुवेलकरआजी यांना आलेल्या अनुभूती

२ अ. नामजप करतांना ‘प.पू. डॉक्टर आले असून त्यांच्यासमवेत चालत जात आहे, नंतर एका आसनावर
श्री दुर्गादेवी बसलेली असून तिने तिच्या जवळ बसायला सांगून तिच्यासह उंच उंच जात आहे’, असे दृश्य दिसणे

‘वैशाख कृ. पंचमी, कलियुग वर्ष ५११२ (२.८.२०१०) या दिवशी मी नामजप करत होते. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले. मी एका ठिकाणी असून तिथे प.पू. डॉक्टर आले आणि त्यांनी आपल्या उजव्या हाताने माझा डावा हात धरून चालायला लागले. आम्ही दोघे पुढे गेल्यावर एक बंद दार दिसले. आम्ही त्याच्या जवळ गेल्यावर ते उघडले. आम्ही त्यातून आत गेलो. तेव्हा दुसरे बंद दार दिसले आणि जवळ गेल्यावर तेही उघडले. असे करता करता ५ दारे उघडली. पाचवे दार उघडल्यावर एका आसनावर श्री दुर्गादेवी बसलेली दिसली. तिने मला जवळ बोलवले. आपल्या जवळ बसवून घेतले आणि प.पू. डॉक्टर दिसेनासे झाले. श्री दुर्गादेवी मला घेऊन आसनासमवेत उंच उंच गेली. नंतर दिसले, ज्या वाटेवरून आम्ही श्री दुर्गादेवीपर्यंत आलो होतो, त्या संपूर्ण वाटेवर फुले पसरलेली होती.’ – श्रीमती प्रेमा कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा.

२ आ. पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी यांना संत झाल्याविषयी मिळालेल्या पूर्वसूचना !

२ आ १. भाऊबिजेच्या दिवशी प.पू. डॉक्टरांना ओवाळण्याचा विचार मनात येणे, नंतर ते दारातून आत आल्याचे दिसणे आणि त्यांना ओवाळल्यावर त्यांनी ‘तुम्हाला ७० टक्के पातळीची भेट देतो’, असे सांगणे

‘कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११२ (७.११.२०१०) या दिवशी भाऊबीज होती. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. माझी दोन्ही मुले बहिणीकडे (माझ्या मुलीकडे) गेली होती. मी आसंदीवर बसले असतांना माझ्या मनात विचार येऊ लागले, ‘प.पू. डॉक्टर दोन जन्म आधी माझे भाऊ होते. सूक्ष्मा (टीप १) तून त्यांना ओवाळू का ?’ नंतर वाटले, ‘नको, ते माझे गुरु आहेत.’ नंतर सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर दारातून आत आले. माझ्या जवळच्या आसंदीवर बसले आणि मला म्हणाले, ‘मला ओवाळणार ना ! ओवाळा; मात्र माझ्याकडून काही मिळणार नाही.’ मी म्हटले, ‘मला केवळ तुमचे आशीर्वाद आणि कृपा इतकेच द्या.’ नंतर ते म्हणाले, ‘असे कसे होईल ? काहीतरी द्यायला हवे. मी तुम्हाला ७० टक्के पातळीची भेट देतो.’ मी म्हटले, ‘मी आंघोळ करून येते आणि तुम्हाला ओवाळते.’ नंतर मी आंघोळ करून आले. तेव्हा मला एक आसन दिसले. त्याच्याभोवती रांगोळी होती. समई लावलेली होती. ओवाळणीचे ताट होते. मोतीचूर लाडू असलेला खोका दिसला. प.पू. डॉक्टर आसनावर बसले. मी त्यांना कुंकवाचा तिलक लावला. निरांजनाने ओवाळले. मोतीचूर लाडू भरवला. नंतर चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. त्यांनी मला ओवाळणीची भेट म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’ दिले. मी ते उघडून पाहिले. पहिल्याच पृष्ठावर माझे छायाचित्र होते. वर मोठ्या अक्षरांत लिहिले होते, ‘७० टक्के पातळी गाठलेल्या पू. प्रेमा कुवेलकर (आजी) ! ते बघून माझा भाव दाटून आला.’

२ आ २. एकदा प.पू. भक्तराज महाराज आत येतांना दिसणे, ते समोरच्या आसंदीवर बसणे आणि त्यांच्या चरणांवर डोके ठेवल्यावर त्यांनी डोक्यावर हात ठेवून ‘आता तू संत झाली आहेस’, असे सांगणे

‘रविवार कार्तिक अमावास्या, कलियुग वर्ष ५११२ (५.१२.२०१०) या दिवशी दुपारी मी नामजप करायला बसले होते. तेव्हा मनोजचा (माझ्या मुलाचा) भ्रमणभाष वाजायला लागला. त्यात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराजांचे) भजन ऐकायला आले, ‘दीनानाथ माझा नाथ ।’ नंतर मी दाराकडे बघितले. तेथून प.पू. बाबा माझ्याकडे येत होते. ते येऊन माझ्या समोरच्या आसंदीवर बसले. नंतर मी उठून त्यांच्या चरणांवर डोके ठेवले आणि उठून बसले. प.पू. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘आता तू संत झाली आहेस. आणखी काय पाहिजे ?’ नंतर मी म्हटले, ‘मला काही नको, माझी साधना चांगली होऊ दे. तुमची कृपा आणि आशीर्वाद माझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत असू दे.’ नंतर प.पू. बाबा दिसेनासे झाले आणि त्या जागी पांढरा प्रकाश दिसला.’- श्रीमती प्रेमा कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा.

३. पू. प्रेमा कुवेलकरआजींच्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

३ अ. श्री. नागराज नारायण कुवेलकर (मोठा मुलगा), कवळे, फोंडा, गोवा

३ अ १. एकदा सावर्डे येथे असतांना माझ्या छोट्या भावाला मधमाश्या चावल्या होत्या. त्या वेळी आईने साईबाबांना विचारून झाडपाल्याचे औषध लावले. त्याने तो लगेच पूर्ण बरा झाला.

३ अ २. जे काही चांगले घडते, ते ईश्वर आणि गुरु यांच्यामुळे घडते आणि जे काही त्रास होतात, ते आपल्या कर्मांमुळे होतात, हे ती नेहमीच सांगते.

३ अ ३. आई संत कधी होईल, अशी उत्सुकता असणे

२०११ च्या गुरुपौर्णिमेला आईची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के झाली. त्या वेळेपासून मला उत्सुकता होती की, ती संत कधी होईल. मी बर्‍याच वेळा तिला त्याविषयी विचारले. त्या वेळी आईचे एकच उत्तर असायचे, ‘‘मला ठाऊक नाही, ईश्वराला ठाऊक. ज्या वेळी करायचे, त्या वेळी करील.’’

आज आई जी काही प्रगती करून संत झाली, त्याचे पूर्ण श्रेय सनातन संस्था, तसेच प.पू. डॉ. आठवले यांना जाते. याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे आणि मी ईश्वर, तसेच प.पू. डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञ आहे.’

टीप १ : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’ (मूळस्थानी)

लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment