शिष्यभावाचे महत्त्व

‘साधना करतांना साधकाने शिष्याचे गुण अंगी बाणवणे अतिशय महत्त्वाचे असते. साधक शिष्य झाला की, त्याची पुढची प्रगती गुरुकृपेने वेगाने होत जाते. शिष्य झाल्यावरच गुरु खर्‍या अर्थाने साधकाचे सर्व उत्तरदायित्व स्वीकारतात. तो साधनेत घसरू नये, यासाठी त्याला सतत मार्गदर्शन करतात. तसेच तो घसरू लागताच त्याला पुन्हा आधार देऊन पुढेच घेऊन जातात. हे सर्व ते अत्यंत प्रेमाने करतात; कारण गुरूंच्या जीवनात शिष्यांची प्रगती करवून घेणे याव्यतिरिक्त दुसरे ध्येयच नसते. शिष्य झाल्यावर मात्र शिष्याला आपला शिष्यभाव टिकवून ठेवावा लागतो, तरच तो पुढची प्रगती वेगाने करू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १०० टक्के पातळीपर्यंत साधकाला सतत शिकतच पुढे जावे लागते. त्याला अभ्यास वाढवावा लागतो. साधना अधिक चांगल्या प्रकारे आणि तळमळीने करावी लागते. तसेच आपले दोष आणि अहं यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत सतत सतर्क रहावे लागते. यासाठी शिष्य संत झाला, तरी त्याने सतत शिष्यभावात रहाणे आवश्यक असते. या लेखात शिष्यभावाचे महत्त्व आणि प.पू. डॉ. आठवले यांचा शिष्यभाव ही सूत्रे पाहूया.

 

१. शिष्यभावाचे महत्त्व

१ अ. सेवाभाव निर्माण होणे आणि तो टिकून रहाणे

शिष्यभावामुळे साधकात सेवाभाव निर्माण होण्यास आणि तो टिकून रहाण्यास साहाय्य होते. सेवेमुळेच गुरु अधिक प्रसन्न होत असल्यामुळे शिष्याला सतत सेवेचा ध्यास लागणेच अपेक्षित असते. सततच्या सेवेमुळे त्याचे सर्व देह शुद्ध होतात. तसेच सेवेमुळे त्याला सतत गुरूंचे अनुसंधान रहाते. सेवेमुळेच त्याची गुरूंच्या निर्गुण रूपाची साधना होऊन तो लवकर निर्गुणाकडे जाऊ शकतो. याद्वारे गुरु त्याची शीघ्र प्रगती करवून घेतात.

१ आ. संत झाल्यावरही शिष्यभावात राहिल्याने
अहंभाव लवकर न्यून होणे, त्यामुळे पुढची प्रगती शिघ्रतेने होणे

साधक संत झाल्यावरही शिष्यभावात राहिल्यामुळे त्याचा अहंभाव लवकर न्यून होतो. पुढच्या टप्प्यात अहंभाव अल्प होणेच महत्त्वाचे असते. त्यामुळे पुढची प्रगती शिघ्रतेने होते. स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजल्याने अहंभाव वाढण्याची शक्यता असते. तसेच ‘स्वतःची प्रगती झाली’, या विचारानेही सेवाभाव अल्प होऊ शकतो. यासाठी ‘मला शेवटच्या क्षणापर्यंत गुरु सांगतील ती सेवा करत रहायचे आहे’, या विचाराने साधक सतत सेवारत रहातो. संत झाल्यावर त्याची सूक्ष्मातील कार्य करण्याची क्षमताही वाढलेली असते. त्यामुळे तो आता अधिक व्यापक आणि मोठ्या प्रमाणात गुरुसेवा करू शकतो. शिष्यभावात राहिल्याने तो सतत नवीन सूत्रे शिकत रहातो आणि त्याद्वारे अधिक गुरुसेवा करू लागतो.

१ इ. शिष्यभावात राहिल्याने इतर साधकांना शिकता येणे

साधकांना शब्दांद्वारे मार्गदर्शन करून ते जे शिकतात, त्यापेक्षा ते एखाद्याच्या कृतीतून पटकन शिकतात. त्याचा संस्कार साधकांच्या मनावर पटकन होतो आणि ते लवकर शिकून पुढे जाऊ शकतात. शिष्यभावात असलेले संत इतर साधकांसारखीच सेवा करत असतात. त्यामुळे साधकांना अधिक शिकायला मिळते. तसेच प्रगती झाली, तरी सतत सेवेत राहिल्याने आपली क्षमता वाढून अहंभावही अल्प होतो, हे साधकांना शिकायला मिळते. यासाठी संत झाल्यावरही सतत सेवा करण्याचे फार महत्त्व आहे. त्यामुळे इतरांनाही आपण त्यांच्यातलेच एक वाटतो. त्यामुळे आपण त्यांच्याशी पटकन जवळीक साधू शकतो.

 

२. प.पू. डॉक्टरांचा शिष्यभाव

प.पू. डॉक्टरांचा शिष्यभाव
प.पू. डॉक्टरांचा शिष्यभाव

प.पू. डॉक्टर ‘परात्पर गुरु’ आहेत, तरीही ते सतत शिष्यभावात असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनच साधकांना ‘उत्तम शिष्य कसे बनावे’, हे शिकता येते. त्याची काही उदाहरणे पुढे देत आहे.

अ. प.पू. डॉक्टर स्वतःच्या सेवा इतर साधकांना करू देत नाहीत. त्यांना जेवढे शक्य आहे, ते सर्व ते स्वतःच करतात.

आ. खरेतर त्यांनी साधकांना साधनेसाठी पोषक वातावरण मिळावे आणि त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी आश्रम स्थापन केले आहेत. असे असले, तरी आश्रमात रहातांना प.पू. डॉक्टरांचा भाव असतो की, मी माझ्या गुरूंच्या आश्रमात रहातो आणि मलाही इथे त्यांची सेवा करायची आहे. त्यामुळे ते इतर सर्व साधकांप्रमाणेच सतत सेवेत असतात.

इ. तसेच आश्रमात ज्या विविध कार्यपद्धती आहेत, उदा. सेवेच्या वेळा, जेवणाच्या वेळा इत्यादींचे ते काटेकोरपणे पालन करतात.

ई. स्वतःच्या चुकाही ते इतरांसमोर अत्यंत सहजपणे सांगतात.

उ. स्वतः एवढे मोठे संत असूनही ते स्वतःला कोणतीही सवलत घेत नाहीत.

ऊ. प.पू. डॉक्टर साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांनी केलेले चांगले प्रयत्न यांतून ‘मलाही शिकायला मिळाले’, असे म्हणतात.

२ ए. साधकांची सेवा करणे

स्वतः एवढे मोठे संत असूनही साधकांनी त्यांना गुरुस्थानी मानून त्यांचे ऐकावे, त्यांची सतत सेवा करावी, अशी त्यांची कोणतीच अपेक्षा नसते. उलट तेच साधकांची सेवा करतात. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. पूर्वी ते रात्री-अपरात्रीही आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर आध्यात्मिक उपाय करायचे. एखाद्या साधकाला फारच त्रास होत असेल, तर ते त्याच्या खोलीत स्वतः जाऊन उपाय करत असत.

२. त्यांच्यासाठी बनवलेले जेवण ते बर्‍याचदा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना देतात. त्याद्वारे त्यांना चैतन्य मिळून त्यांचा त्रास न्यून व्हावा, असा त्यांचा उद्देश असतो.

३. साधकांच्या मन आणि बुद्धी यांवर आलेले काळे आवरण नष्ट होऊन त्यांची सेवा चांगली व्हावी आणि साधकांना सेवेसाठी शक्ती मिळावी, यासाठी ते साधकांना सतत खाऊ (प्रसाद) देतात.

४. रुग्णाइत साधकांची ते सतत विचारपूस करतात. प्रसंगी त्यांना भेटायलाही जातात.

५. साधकांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको, याची ते सतत काळजी घेतात.

२ ऐ. स्वतःला साधकांपेक्षा वेगळे न समजणे

१. प.पू. डॉक्टर पूर्वी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यासमवेत फिरत असत, तेव्हा ते इतर साधकांप्रमाणेच सेवा करत असत. प.पू. भक्तराज महाराज ज्या भक्ताच्या घरी रहात असत, तिथेही ते सेवा करत असत.

२. पूर्वी प.पू. डॉक्टरांनी विविध जिल्ह्यांत धर्मजागृती सभा घेतल्या आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी जे जेवण बनवले जाई, तेच सर्व साधकांसाठी आहे ना, याची ते खात्री करत. स्वतःला इतर साधकांपेक्षा वेगळी वागणूक दिलेली त्यांना मुळीच चालत नसे.

३. अगदी पूर्वी शीव सेवाकेंद्रात काही साधक काही दिवस राहून सेवा करत असत, तेव्हा सनातनचे कापडी फलक, पोस्टर्स आदींवरील लिखाण सात्त्विक अक्षरांत लिहिण्याची सेवा असे. बर्‍याचदा साधक सेवा झाल्यावर रंगांच्या डब्या, ब्रश इत्यादी तसेच ठेवून जात. प.पू. डॉक्टर ते सर्व आवरून ठेवत असत.

४. प.पू. डॉक्टर कुठेही गेले की, एखाद्या साधकाचे घर इमारतीत ३ र्‍या – ४ थ्या माळ्यावर असेल आणि समवेत बरेच साहित्य असेल, तर चालकसाधकाला जास्त हेलपाटे मारायला लागू नयेत; म्हणून स्वतःच काही साहित्य वर घेऊन जात असत.

२ ओ. इतर संतांचीही शिष्यभावाने सेवा करणे

१. प.पू. डॉक्टरांनी या वयातही प.पू. शामराव महाराज यांची सेवा करून त्यांचे मन जिंकून घेतले. तसेच ‘आदर्श शिष्य कसा असावा’, याचा एक धडाच साधकांपुढे घालून दिला. प.पू. डॉक्टर त्यांच्या सेवेसाठी गेल्यावर प्रथम प्रतीदिन त्यांची चप्पल धुऊन ठेवत असत. एकदा प.पू. शामराव महाराज हे स्वेटर घालत होते. त्यांना तो नीट घालता येत नव्हता. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी पटकन उठून त्यांना स्वेटर व्यवस्थित घालून दिला. तेव्हा प.पू. शामराव महाराज म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांनी आमचे मन जिंकून घेतले.’’

२. प.पू. दास महाराज यांच्या पायाचा अस्थीभंग आणि शस्त्रकर्म झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी त्यांना रामनाथी आश्रमात ठेवून घेतले होते. तेव्हा त्यांनी साधकांना संतसेवा उपलब्ध करून दिली आणि ते स्वतःही त्यांच्या प्रकृतीची जातीने विचारपूस करायचे.

२ औ. गुरुपदी असूनही स्वतःचे पूजन कधीच करवून न घेणारे प.पू. डॉक्टर !

प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार जगभरातील सहस्रो साधक साधना करत आहेत आणि आध्यात्मिक प्रगतीही करत आहेत. तसेच त्यांच्या कृपेमुळेच सनातनमध्ये अत्यंत अल्प कालावधीत ८१ संत (ऑगस्ट २०१८) झाले असून शेकडो साधकांनी ६० टक्के पातळी गाठलेली आहे. असे असूनही ते गुरुपौर्णिमेला स्वतःची पूजा कधीच करून घेत नाहीत. एरव्ही ते कधीही स्वतःची पाद्यपूजा इत्यादी करून घेत नाहीत. ते साधकांना कधी नमस्कारही करू देत नाहीत. ते साधकांनाही प.पू. भक्तराज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करायला सांगतात. सनातनच्या देश-विदेशांतील सर्व गुरुपौर्णिमा महोत्सवांत केवळ प.पू. भक्तराज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होते.

असे आदर्श महान गुरु संपूर्ण ब्रह्मांडात एकमेवच असतील, असे मला वाटते. केवढी ही निःस्पृहता. सर्व करून-सवरून नामानिराळे रहाण्याची आणि स्वतःकडे कसलेच श्रेय न घेण्याची ही वृत्ती विरळाच म्हणावी लागेल.

प्रार्थना : प.पू. डॉक्टर, आम्हा सर्व साधकांमध्येही आपल्यासारखाच शिष्यभाव येऊ दे आणि तो कायमस्वरूपी टिकून राहू दे अन् त्याद्वारे आम्हा सर्व साधकांना आपले मन सतत जिंकता येऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– सौ. राजश्री खोल्लम (आषाढ कृ. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (३०.७.२०१०))

 

गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व !

‘गुरु’ हा शब्द उच्चारल्या बरोबर मनात एकदम एक आदरार्थी भावना निर्माण होऊन शरणागत भाव निर्माण होतो. गुरूंच्या ठिकाणी शिष्य आपोआप नतमस्तक होतो. गुरूंचे स्थान हे शिष्यासाठी सर्वस्व आहे; कारण गुरु हे त्याची माता, पिता, बंधू, सखाच नव्हे, तर त्याचे सर्वस्व आहेत. शिष्याने गुरूंना आपले तन, मन, धन अर्पण केल्यामुळे शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये भेदच रहात नाही. गुरुसुद्धा शिष्याला आपल्यासारखे करून सोडतात. परीस लोखंडाचे सोने करतो; परंतु गुरु शिष्याला गुरुपद देतात. हा त्यांचा महिमा अगाध आहे. शिष्याची उन्नती व्हावी, म्हणून गुरूंचा प्रेमवर्षाव शिष्यावर होत रहातो. यामुळे नुसते गुरूंचे स्मरण झाले, तरी शिष्याचे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात. सहस्रो जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटण्यासाठी भगवंताने त्याला या जन्मात संधी दिलेली असते. गुरूंमुळेच त्याचा उद्धार होतो आणि तो या जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त होतो. ज्याला अशा प्रकारचे गुरु लाभून त्याचे कल्याण झाले असेल, तो खरोखरच भाग्यवान आहे.

आज सनातन संस्थेतील साधकांना परात्पर गुरु प.पू. डॉक्टर आठवले हे लाभले आहेत. त्यांनी दिलेल्या अष्टांग साधनेमुळे आज ८१ साधक संत (ऑगस्ट २०१८) झाले असून अनेक साधक ६० ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत केवळ १४ वर्षांत पोहोचले आहेत. तेव्हा साधकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अष्टांग योग साधनेप्रमाणे अविरत साधना करत रहावी. अशा साधकांना गुरुकृपेचा लाभ मिळावा, अशी प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.

– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment