सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

‘ज्येष्ठ कृष्ण पक्ष सप्तमी ते ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११४ (१० ते १४.६.२०१२) या कालावधीत विविध मान्यवरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

 

१. अतिशय उत्तम आश्रमव्यवस्था !

‘सनातन आश्रमा’ची संपूर्ण व्यवस्था अतिशय उत्तम आहे. मी ‘सनातन संस्थे’च्या कार्यामुळे प्रभावित झाले आहे.’
– डॉ. निमिषा वर्मा, विदिशा, मध्यप्रदेश.

 

२. सनातनच्या सात्त्विक वस्तूंच्या
उपयोगामुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे शक्य !

‘सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव मानवी जीवनावर होतो, हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्यांवर उपाय म्हणून गोमूत्र, कुंकू, अत्तर यांसारख्या सात्त्विक वस्तूंचा उपयोग करून वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षणही होऊ शकते.’ – श्रीमती तारिका बेळकर, हुब्बळ्ळी, कर्नाटक.

 

३. असा आश्रम मी कोठे पाहिला नाही
आणि तो कोठे बघण्यासही मिळणार नाही !

‘आपल्या आश्रमामध्ये प्रवेश केल्यावर मला आनंद झाला. अशा प्रकारचा आश्रम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेला नाही आणि असा आश्रम कोठे बघण्यासही मिळणार नाही; कारण इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न होते. येथे ‘सनातन संस्थे’चे कार्य अतिशय नियोजनपूर्वक होत आहे.’ – श्री. गणेश जोतिबा जाधव, निपाणी, महाराष्ट्र.

 

४. आश्रमातील शिस्त, नीटनेटकेपणा पाहून समाधान झाले !

‘आश्रमातील प्रत्येक विभागातील कामाची शिस्त, नीटनेटकेपणा इत्यादी पाहून समाधान झाले. येथील साधकांची सेवा पाहून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयीची त्यांची तळमळ ध्यानात येते.’ – श्री. सुहास विनायक हुडेकर, करमळे, केरी, फोंडा, गोवा.

 

५. हिंदुत्वाचे कार्य व्यक्तीगत स्तरावर करणारे हिंदुत्वनिष्ठ !

५ अ. श्री. सतीश चंद्र शर्मा, जमशेदपूर, झारखंड.

अ. वेगवेगळ्या विभागांतील कार्यव्यवस्था स्वच्छ आणि व्यवस्थित होती.

आ. साधकांची त्यांच्या सेवेतील निष्ठा, तसेच इतर साधक आणि अतिथी यांच्याशी नम्रतेने व्यवहार अन् बोलणे पुष्कळ चांगले वाटले.

इ. येथे येऊन ‘नकारात्मक शक्तींचे प्रकोप कसे असतात’, ते कळले.

ई. प्रत्येक विभागामधील सामानांची मांडणी आणि व्यवस्था अतिशय चांगली होती. पूर्ण आश्रमाचा प्रत्येक कोपरा स्वच्छ राखणे हे अतिशय प्रशंसनीय काम आहे.

 

५ आ. श्री. ए.एस्. सुब्बुरत्नम, कोईमत्तूर, तमिळनाडू.

सध्याच्या काळात सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे, जी राष्ट्रीय चळवळीचे काम निःस्वार्थी भावाने करत आहे. शाळेतील मुलांनाही यामध्ये सहभागी करून घेतल्यास जुनी कात टाकून हिंदु धर्म एक नवीन रूप धारण करू शकेल आणि यातूनच एक चांगले हिंदू राष्ट्र निर्माण होईल, असे मला वाटते.

 

५ इ. श्री. पोन्नूस्वामी, कोईमत्तूर, चेन्नई.

आश्रमात मी जे अनुभवले, ते मी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवीन. या कार्यासाठी माझे आयुष्य वेचण्याची माझी सिद्धता आहे.

 

५ ई. श्री. उमेश रघुनाथ बादवकर, दौंड, पुणे.

आश्रम पाहून मनामध्ये धर्माविषयी अनेक भाव निर्माण झाले. आश्रमाची रचना सुंदर आहे. आपण जे काम हिंदु धर्मासाठी, हिंदू लोकांसाठी करत आहात, हे फार मोठे कार्य आहे. यासाठी ईश्वर मला आणि आपल्याला मोठे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बळ देवो, हीच ईश्वराप्रती प्रार्थना.

 

५ उ. पंडित परशुराम मोडक, पुणे

सनातनचा रामनाथी येथील आश्रम बघितल्यानंतर तेथील व्यवस्था फार आवडली. माणसाने माणसाशी कसे वागावे, हे मला आश्रमात शिकायला मिळाले. साधकांचा धर्म आणि इतर साधक यांच्याविषयी असलेला सेवाभाव कौतुकास्पद आहे.

 

५ ऊ. श्री. सुहास पोफळे, चिंचवड, पुणे.

सनातनचा आश्रम पाहून चकित झालो. हिंदु धर्मासाठी वाहून घेतलेले इतके साधक आहेत; म्हणून आपणास हे कार्य उत्कृष्ट स्वरूपात सादर करता आले. आपण आधुनिकतेचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतला आहे. आपण अतिशय चांगले काम करून दाखवले आहे. ही दृष्टी इतरांनाही लाभावी आणि त्यांनी आपल्या आश्रमातून स्फूर्ती घ्यावी.

 

५ ए. श्री. बाबा कुलकर्णी, विलेपार्ले, पूर्व मुंबई.

आश्रमातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची वागणूक, आचरण आणि बोलणे या दृष्टीने वंदनीय आहे. हे कार्य निर्माण करणे आणि ते कार्यान्वित ठेवणे यामागे केवळ ईश्वराची कृपा आहे. प.पू. डॉक्टरांच्या या समग्र कार्याचा अभिमान प्रत्येक राष्ट्रभक्त हिंदूला असलाच पाहिजे !

 

५ ऐ. श्री. नीळकंठ शंकरराव माने,
काळम्मावाडी वसाहत, हुपरी, हातकणंगले, जि. कोल्हापूर.

यतो धर्मः ततो जयः ।। म्हणजे ‘जेथे धर्म आहे, तेथे विजय निश्चितच आहे.’

‘आश्रम’ याविषयी माझी संकल्पना, मत फारच वेगळे होते. मी हिंदुत्वाचे काम करतो. मला अध्यात्माचे ज्ञानही आहे; परंतु ‘आश्रम असा असतो’, हे मला ठाऊकच नव्हते. आश्रम असा असेल, प्रत्येक साधक धर्मासाठी इतके काही करत असेल आणि त्यातून स्फूर्ती, प्रेरणा घेऊन हिंदुत्वास अध्यात्माची जोड देऊन काम केले, तर हे राष्ट्र ‘हिंदू राष्ट्र’होणार, यात काही शंकाच नाही.

सनातन आश्रम, सनातन संस्था आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ याविषयी बोलण्यास मत मांडण्यास शब्द अपुरे पडावेत, असे हे धर्मकार्य आहे. ‘गुरुजींना (प.पू. डॉक्टरांना) भेटून जिवाचे सोने झाले’, असे वाटत आहे. त्यांचा कृपाशीर्वाद माझ्यावर राहो, हीच प्रार्थना !’

 

५ ओ. श्री. शशिकांत सहदेव बागुल, रत्नागिरी

या प्रदर्शनात सद्‌गुरुमूर्तीच्या अथक साधनेने त्यांच्या नित्य वापरातील वस्तूंवर झालेला परिणाम सिद्ध करते की, या वैज्ञानिक युगामध्ये आमच्या सनातन धर्माच्या आध्यात्मिक वृत्तींचे कायम वास्तव्य आहे आणि राहील. हीच आशा आम्हास धर्मस्थापनेच्या कार्यात सहकार्य करील.

 

५ औ. श्री. शिवनाथ बाबुराव वाळके, म्हापसा, गोवा.

आश्रमाला भेट देऊन आणि येथील निःशुल्क पद्धतीने चालू असलेले कार्य पाहून मला समाधान वाटले.

 

६. हेना दास, धनबाद

प्रारंभीपासून मी सनातन संस्थेच्या कार्याने प्रभावित झाले आहे. आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर अधिकच प्रभावी झाले. संस्थेचे कार्य अधिकाधिक लोक या कार्याने प्रभावित होतील, अशी आशा व्यक्त करते.

 

७. डॉ. नील माधव दास, संस्थापक, अध्यक्ष, ‘तरुण हिंदू’, धनबाद

सनातन संस्थेचे कार्य हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने सशक्त कार्य असल्याचे सिद्ध होईल.

 

८. पी.पी. नायर, केरळ क्षेत्र परिपालन समिती, मुंबई.

सुंदर, अतिसुंदर कार्य आहे.

 

९. श्री अश्विनी कुमार शृंगू, अध्यक्ष ‘पनून कश्मीर’, जम्मू

आपण एक अलौकिक कार्य करत आहात. हे अंधारात दीप लावण्यासारखेच आहे. हिंदु समाजासाठी अथक प्रयत्न करणे हा काट्याकुट्यातून जाणारा मार्ग आहे आणि तो आपण स्वतःहून स्वीकारलेला आहे. या कार्यात यश लाभण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळो.

 

१०. श्री. गुरुदिपसिंगजी खुराना, पर्वरी, गोवा.
‘बेती गुरुद्वाराचे अध्यक्ष’, शीख धर्मियांचे प्रतिनिधी (नेते)

हिंदू राष्ट्राच्या या कार्यात पूर्ण सहकार्य करू !

‘हिंदू राष्ट्रासाठी आपण हे चांगले कार्य चालू केले आहे. आमच्या गुरूंनी स्वतःचे आयुष्य हिंदू राष्ट्रासाठी समर्पित केले होते. हे कार्य आमचेही आहे. या कार्यात आम्ही कोणत्या प्रकारे साहाय्य करू शकतो, ते सांगा. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू !’

 

११. बाबा दामोदर वैष्णव, दिल्ली (सिद्धबाबा)

प.पू. भक्तराज महाराज यांच्या
छायाचित्रातून दिव्य प्रकाशाचे दर्शन होणे

मी ‘सनातन आश्रमा’त निरनिराळ्या प्रकारची प्रदर्शने पाहिली, तसेच देवतास्वरूप संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे दर्शनही घेतले. त्या छायाचित्रातून एक दिव्य प्रकाश निघाला. तो माझे हृदय आणि आत्मा यांना परमदिव्य वाटला.’

 

१२. श्री. विक्रम प्रकाश बर्गे, कर्वेनगर, पुणे.

सनातनचा रामनाथी येथील आश्रम बघून ‘हे सगळेच अद्भूत आहे’, असे वाटले. या कार्याविषयीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला हवी.

 

१३. श्री. अनिल श्रीकृष्ण देवराव,
बजरंग दल, विनायक नगर, अहमदनगर.

सनातनचा रामनाथी येथील आश्रम सुंदर आहे आणि साधकही फार प्रेमळ आहेत.

 

१४. डॉ. नीलेश निवृत्ती लोणकर,
‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’, पुणे.

विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचे मानवांवर होणारे परिणाम आणि त्याचे आध्यात्मिक, तसेच वैज्ञानिक परीक्षण पाहिले. कदाचित अशा प्रकारचा अभ्यास केवळ सनातन संस्थेतच चालत असावा. या कार्यासाठी आपले अभिनंदन आणि शुभेच्छा !

 

१५. श्री. विद्यानंद जोग, महामंत्री
‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’, रत्नागिरी.

सनातन संस्थेचा रामनाथी आश्रम पहाण्याची अनेक वर्षे सुप्त इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. यासाठी परमेश्वराचा मी मनोमनी आभारी आहे. येथील दैनंदिन जीवनातील बारीक सारीक गोष्टींचा सेवा या हेतूने व्यवस्थापनाकडून, तसेच साधकांकडून समर्पण भावनेचा आविष्कार विलक्षणच आहे. तसेच सर्व कार्य सेवाभावी वृत्तीने केलेले, तरीही काटेकोर आहे, ही तेथील दुर्मिळ गोष्ट आहे.

 

१६. श्री. हरिदास पडळकर, ‘शिवसेना’, सांगली.

आश्रमामध्ये यायला आम्हास उशीर झाला. या अगोदरच येऊन हे वैभव डोळ्यांत साठवून घ्यायला हवे होते.

 

१७. श्री. मिलिंद एकबोटे,
अध्यक्ष, ‘समस्त हिंदू आघाडी’, पुणे.

सेवाभावी साधक वर्ग आणि त्यांचे सुनियंत्रित कार्य (सेवा) बघून मन प्रभावित झाले. असेच लोक आपल्या धर्माभिमानाने हिंदू राष्ट्र बनवण्याच्या कार्यात नक्कीच यशस्वी होतील. हे सगळेच प्रेरणादायी आहे. आज सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या दर्शनाने प्रत्येक कार्यकर्ता जागृत झाला आहे. आम्हाला सनातन संस्थेचा अभिमान वाटतो.

 

१८. श्री. योगेश साळेगावकर, राष्ट्रीय कीर्तनकार
(स्वा. सावरकर प्रेमी मित्रमंडळ), परभणी.

‘ऋषिस्मरण’ ग्रंथामध्ये महर्षि याज्ञवल्क्यांचे चरित्र वाचनात आले. त्यात त्यांच्या त्या काळातील आधुनिक आश्रमाचे वर्णन आहे. या आश्रमाच्या दर्शनानंतर सध्याच्या काळातील हा महर्षि याज्ञवल्क्यांचाच आश्रम आहे, असे वाटते. ‘अनिर्वचनीय आणि मुकास्वादनवत’ म्हणजे ‘ज्याचे आपण वर्णन करू शकत नाही, असे अवर्णनीय आणि मूक राहूनच ज्याचा आस्वाद घेता येतो असे.’

 

१९. प्रो. रामेश्वर प्रसाद मिश्र, अध्यक्ष,
संस्कृती विभाग, धर्मपाल शोधपीठ, भोपाल.

सनातन संस्थेचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे. सनातनच्या रामनाथी आश्रमात दिव्य स्पंदने आहेत. येथील साधक आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य अन् साधकत्व आहे. तसेच त्यांच्यात आत्मनिरीक्षण, आत्मदर्शन आणि सातत्याने आत्मशुद्धी करण्याची प्रवृत्ती आहे. हे सर्वजण हिंदू राष्ट्राच्या विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवून राष्ट्रीय जीवनात एका समर्थ चैतन्याचे चक्र फिरवण्याच्या सामर्थ्याने संपन्न आहेत. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या सदुपयोगाच्या सामर्थ्यापासून वेदपाठ, कलात्मकता, इतकेच नाही, तर पाककला, स्वच्छता, सुव्यवस्था, शिस्त अशा सर्वच दृष्टींनी आंतरिक आणि बाह्य सामर्थ्याच्या महान साधनेचे केंद्र विराट पुरुषार्थाला प्रवाहित करण्यास समर्थ असेल, असे वाटते.

‘सनातन प्रभात’ एवढ्या भाषांमधे, इतक्या सुंदर रूपात धर्मचेतनेचे प्रसारपत्रक आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित नसतांना तांत्रिक गोष्टींचा सहज विकास हा पारंपारिक भारतीय शिक्षणप्रणालीची शक्ती आणि कार्योत्पादकतेचे प्रमाण आहे. सुंदर वेशभूषा, अद्वितीय स्वच्छता आणि सुव्यवस्था, सहज शांती, विनय तसेच आध्यात्मिक स्पंदने ही येथील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी अशाच संस्था समर्थ असतील.

 

२०. श्री. विद्याधर जयराम नारगोलकर,
‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’, पुणे.

‘सनातन आश्रमात प्रवेश केल्यानंतर माझे मनपरिवर्तन होऊ लागले. आश्रम बघून नवीन अनुभूती मिळाली. ‘सूक्ष्मातून माझ्या मनात कोणती तरी चांगली शक्ती प्रवेश करत आहे’, असे मला जाणवत होते. आपले पुरातन शास्त्र नवीन शास्त्राशी (टेक्निकशी) मिळून लोकांच्या समोर ठेवण्याच्या प्रयत्नासाठी अभिनंदन. येथील प्रत्येक विभागांमध्ये अप्रतिम व्यवस्थापन पहावयास मिळाले. घरातील तीन सदस्यांचे स्वयंपाकगृह आवरतांना आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. इथे भलेमोठे स्वयंपाकगृह अत्यंत कुशल व्यवस्थापनाच्या आधारे सांभाळण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की, माझा पुढील जन्म आश्रमात होवो !’

– श्री. विद्याधर नारगोलकर, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

 

२१. आचार्य योगेश शास्त्री, समन्वयक,
‘आर्य प्रतिनिधी सभा’, कोलकाता.

धर्म, संस्कृती, सभ्यता आणि राष्ट्रोत्थान या हेतूने सनातन करत असलेले प्रयत्न अत्यंत प्रभावकारी सिद्ध होतील.

 

२२. श्री. कैलाश वर्मा, धर्मजागरण समिती, अंधेरी, पूर्व मुंबई.

सनातनच्या आश्रमासारखे कार्य आणि व्यवस्थापन क्वचितच इतर आश्रमात असेल. येथील साधक आणि साधिका स्वयंस्फूर्तीने सेवा करतात. येथे आल्यावर असे वाटले, ‘हे सर्व कार्य ईश्वराच्या कृपेमुळेच होत आहे.’ या आश्रमाचा आदर्श देशातील सर्व धार्मिक मठ आणि संस्था यांनी घ्यायला हवा.

आश्रमात आल्यानंतर प्रवेशद्वारातच एक विशिष्ट अनुभूती येऊ लागली. दर्शनानंतर असे वाटू लागले की, जगातल्या हिंदू साधकांनी येथे येऊन हे व्यवस्थापन आणि समर्पित भावनेने सेवा करणारे साधक यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. ती प्रेरणा घेऊन जगात ईश्वरी शक्तीद्वारे हिंदू राष्ट्राची निर्मिती करून या राष्ट्राला परत वैभवाकडे घेऊन जावे. सर्वांनी मिळून धर्माधिष्ठित राज्य निर्माण करणे आवश्यक आहे !

 

२३. श्री. बी. रवीचंद्रन

१. आश्रमात आल्यावर मन शांत होणे

आश्रमात येण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार होते. त्यामुळे माझे मन अस्थिर होते; परंतु इथे आल्यावर माझे मन शांत झाले. भाव जागृत झाल्याने मला बोलता येत नाही.

 

२. आश्रमातील सर्व विभाग म्हणजे
आदर्श हिंदू संघटना कशी असायला हवी, याचे उदाहरण असणे

मला आश्रमातील प्रत्येक विभागाचे छायाचित्र हवे. आदर्श हिंदू संघटना कशी असायला हवी, याचे हे सर्व विभाग म्हणजे उदाहरण आहे. माझे गुरु कांचीमठाचे प.पू. जयेंद्र सरस्वती यांना आश्रमातील सर्व विभागांची छायाचित्रे दाखवायची आहेत.

 

३. संपूर्ण विश्वात असा आश्रम कोठेही नाही !

आश्रमव्यवस्था पुष्कळ चांगली आहे. सर्व जण निःस्वार्थीपणे सेवा करतात, असे उदाहरण दुसरीकडे पहायला मिळाले नाही. संपूर्ण विश्वात असा आश्रम कोठेही नाही.

 

४. आश्रमात ३०० साधकांना
निःस्वार्थीपणे सेवा करतांना पाहून आनंद होणे

आश्रमात ३०० पूर्णवेळ साधक रहातात, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. एखाद्या कार्यक्रमाला हिंदूंना बोलावले, तर ते एकतर येत नाहीत आणि आले, तरी स्वार्थासाठी येतात. येथे असलेले ३०० साधक निःस्वार्थीपणे सर्व सेवा करतांना पाहून आनंद होत आहे.

 

५. आश्रमातील चुकांचा फलक पाहून
पूर्वीच्या काळी ऋषी-मुनींनी घेतलेल्या प्रायश्चित्ताची आठवण होणे

पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी जसे चुका झाल्यावर प्रायश्चित्त घेत, ते आश्रमातील चुकांचा फलक पाहून मला आठवले. फलक पाहून माझा भाव जागृत झाला.

 

६. स्वयंपाकघरातील व्यवस्थितपणाचे कौतुक करणे

स्वयंपाकघरासारखा व्यवस्थितपणा मी अन्यत्र कोठेच पाहिला नाही.

 

७. सनातनच्या सात्त्विक ग्रंथसंपदेचा आणि उत्पादनांचा विश्वभरात प्रसार करीन !

सनातनचे ग्रंथ प्रदर्शन आणि उत्पादने पाहून ते म्हणाले, ‘‘मी तामिळनाडू राज्यात या सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणार आहे. अशी सात्त्विक ग्रंथसंपदा कोठेच मिळत नाही. संपूर्ण विश्वभरात मी या ग्रंथांचा प्रसार करणार आहे. लोकांना ही माहिती त्वरित उपलब्ध करून द्यायला हवी. त्यासाठी मला ग्रंथांचे दरपत्रक द्या. मी वितरक बनू इच्छितो. माझ्याकडे असलेल्या चारचाकी वाहनाने मी हे ग्रंथ आणि उत्पादने घेऊन गावोगावी फिरीन. हे करतांना मला माझे नाव नको आहे. हे सनातनचेच आहे. हे ईश्वरी आहे, हिंदूंचे आहे. त्यासाठी नावात अडकायचे नाही. तामिळनाडू राज्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही मला द्या. तेथे मी ग्रंथ वितरण करीन.

८. प्रदर्शनात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून ते म्हणाले, ‘‘हे चित्र जागृत आहे. मी ज्या दिशेने जातो, तिकडे ते डोळे माझ्याकडे पहात असतात.

९. वाईट शक्तींचे प्रदर्शन पाहून वाईट शक्तींचे हल्ले कसे होतात, हे कळले. मला त्या त्रासांवरील सर्व उपायांची माहिती करून घ्यायची आहे.

१०. माझ्या चॅनेलवर तामिळी भाषेत सनातनचे कार्यक्रम दाखवता येतील.

(इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या कार्य करणार्‍या तीन शक्तींपैकी ज्ञानशक्ती सर्वांत प्रबळ असून ती हिंदू धर्मात सांगितलेली आहे. ब्राह्मतेजात ज्ञानशक्ती आहे. ‘सनातन संस्थे’चा आणि ‘हिंदू जनजागृती समिती’चा प्रसार ज्ञानशक्तीच्या आधारे जगभर होत आहे. आताच आपण ऐकलेत की, श्री. रवीचंद्रन यांनी सांगितले, ‘तामिळनाडू राज्यातच नाही, तर संपूर्ण विश्वभरात मी या ग्रंथांचा प्रसार करणार आहे. माझ्या चॅनेलवर तामिळी भाषेत सनातनचे कार्यक्रम दाखवता येतील.’ त्यांना असे करायला कोणी विनवले नव्हते, तर ग्रंथांतील ज्ञानशक्तीनेच त्यांना प्रेरित केले. हे आहे ज्ञानशक्तीचे महत्त्व !’ – डॉ. आठवले)

 

२४. श्री. मकरंद रामचंद्र महाडिक, हिंदू मानवाधिकार मंच, मुंबई.

‘सनातन आश्रमाचे आज दर्शन घेतले आणि मन प्रसन्न झाले. आश्रमातील नीटनेटकेपणा आणि साधक करत असलेली निःस्वार्थी सेवा ही आजच्या युगातली अनाकलनीय गोष्ट वाटली.’

 

२५. प्रसिद्ध मराठी कलाकार शरद पोंक्षे यांची
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या माध्यमातून पं. नथुराम गोडसे यांची भूमिका सशक्तपणे सादर करणारे प्रसिद्ध मराठी नाट्य कलाकार, तसेच चित्रपट अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनचे संत आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे माजी समूहसंपादक पू. पृथ्वीराज हजारे यांनी श्री. पोंक्षे यांना आश्रमातील विविध विभागांची माहिती करून दिली. या वेळी पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते श्री. पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.

 

राष्ट्र आणि धर्म हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय !

१. मी बालपणापासून हिंदु धर्माचे कार्य करत आहे. आणीबाणीच्या काळात मी नऊ वर्षांचा असतांनाही माझ्या नावाने अटक वॉरंट होते. मुख्याध्यापकांनी ‘तू चांगले करत असून तुला आम्ही परीक्षेत उत्तीर्ण करू’, असे अभिवचन दिले होते.

२. आक्रमक स्वभाव असल्याने मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व जवळचे वाटले. गेली दहा वर्षे मी सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यास करत असून ठिकठिकाणी त्याविषयी व्याख्याने देत आहे.

३. सिनेसृष्टीत राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्य करू इच्छित नाही; पण राष्ट्र आणि धर्म हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय असल्याने सिनेसृष्टीत वावरूनही मी त्याविषयी बेधडकपणे कार्य करतो.

४. देशाची सद्यस्थिती अत्यंत विदारक आहे. संघकार्याला दिशा राहिलेली नाही ! पंधरा वर्षे संघामध्ये स्वयंसेवक म्हणून राष्ट्रसेवा केली. अलीकडे मात्र संघकार्य अतिशय निस्तेज झाले आहे. संघकार्याला दिशा राहिलेली नाही.

 

श्री. पोंक्षे यांनी आश्रमाविषयी कृतज्ञतापूर्वक व्यक्त केलेला अभिप्राय

आश्रम अतिशय सुंदर आहे. हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे ज्या पद्धतीने तुम्ही रक्षण आणि प्रसार करत आहात, त्या कार्यास शतशः धन्यवाद ! येथील प्रत्येक सेवेकर्‍यास माझा दंडवत !

Leave a Comment