औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !

१ अ. औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करण्याचे महत्त्व

माणूस ज्या वातावरणात वाढतो त्यानुसार त्याचा स्वभाव बनतो. माणसातील गुणदोषांसाठी जसे आजूबाजूचे वातावरणही एक कारण असते, तसेच वनस्पतींच्या संदर्भातही आहे. औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. साधनेमुळे सत्त्वगुण वाढतो. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

१ आ. लागवड करतांना करावयाच्या प्रार्थना आणि ठेवायचा भाव

१ आ १. प्रार्थना

अ. वनस्पती लावण्यापूर्वी धरणीमातेला हे धरणीमाते, तू जसा मला आधार दिला आहेस, तसा या वनस्पतीलाही आधार दे. तू हिचे पोषण कर आणि हिच्यामध्ये योग्य ते औषधी गुणधर्म निर्माण कर !, अशी प्रार्थना करावी.

आ. औषधी वनस्पती लावतांना त्या वनस्पतीलाही प्रार्थना करावी की, हे औषधी वनस्पती, तुझ्यात आणि माझ्यात मित्रत्वाचे नाते निर्माण होऊ दे. तुझ्यापासून रुग्णाइत माणसांना त्यांचे रोग दूर होण्यास साहाय्य होऊ दे.

इ. लागवड करते वेळी लागवडीसाठी वापरण्यात येणारी कुदळ, टोपली आदी उपकरणांनाही प्रार्थना करावी.

१ आ २. भाव

औषधी वनस्पतींच्या लागवडीतून मला देव भेटणार आहे, असा भाव ठेवावा. वनौषधींविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवावा.

१ इ. झाडांशी कसे वागावे ?

१. वनस्पतीच्या जवळ जातांना त्या वनस्पतीचा मुलगा किंवा तिचा पालक बनून जावे.

२. अभिमान किंवा गर्व बाळगल्यास वनस्पती तुम्हाला जवळ करत नाहीत.

३. झाडांशी प्राथमिक मैत्री करण्यास २ वर्षांचा कालावधी लागतो.

४. लहानपणीच झाडांवर चांगले संस्कार करावे लागतात.

पू. डॉ. दीपक जोशी तथा गणेशनाथजी (२३.४.२०१३)

१ ई. लागवडीमधील सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी काय करावे ?

१. लागवडीच्या ठिकाणी चैतन्य टिकून रहावे; म्हणून लागवडक्षेत्रात प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या उच्चकोटीच्या संतांच्या आवाजातील भजनांची ध्वनीफीत लावून ठेवावी, तसेच प्रतिदिन अग्निहोत्र करावे.

२. लागवडीच्या क्षेत्रामध्ये नियमितपणे अग्निहोत्रातील, यज्ञातील, देवळातील किंवा सात्त्विक उदबत्तीपासून बनलेली विभूती फुंकरावी. यामुळे क्षेत्रातील त्रासदायक शक्ती दूर होण्यास साहाय्य होते.

३. वनस्पतींना होणारे रोग हे कीड किंवा अन्य सूक्ष्म जीव यांमुळे होत असले, तरी त्या रोगांमागे रज-तमांचे प्रदूषण हेही एक कारण असू शकते, हे लक्षात घेऊन कीड किंवा सूक्ष्म जीव यांचा प्रतिकार करण्यासह नियमितपणे आध्यात्मिक उपायही करावेत.

४. लागवडीमध्ये वावरतांना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. धसमुसळेपणा करू नये.

५. मासिक पाळी चालू असतांना स्त्रियांनी औषधी वनस्पतींना स्पर्श करू नये.

१ ऊ. मध्यम आणि मोठे भूधारक यांनी समाजहितासाठी मोठ्या
प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही त्यांची समष्टी साधनाच असणे

ज्यांच्याकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचाही विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. पुढील आपत्काळात या लागवडीमुळे अनेकांना आयुर्वेदीय औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या निःस्वार्थी समाजसेवेच्या माध्यमातून अशा व्यक्तींची समष्टी साधना होईल !

भावी भीषण आपत्काळात आरोग्याचे रक्षण होण्यासाठी प्रत्येकाकडून आयुर्वेदीय औषधी वनस्पतींची लागवड होवो, तसेच सुजनांना या वनस्पतींचा सुयोग्य वापर करण्याची बुद्धी आणि शक्ती प्राप्त होवो, ही श्री धन्वन्तरीच्या चरणी प्रार्थना !

॥ धं धन्वन्तरये नमः ॥

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’

Leave a Comment