श्रीकृष्णाची आरती

Article also available in :

‘ओवाळू आरती मदनगोपाळा….’ ही श्रीकृष्णाची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली आहे. त्यामुळे या आरतीत मुळातच ओतप्रोत चैतन्य भरलेले आहे. त्यात ‘सनातन’च्या भाव असलेल्या म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असल्याने आणि या आरतीत न्यूनतम वाद्यांचा उपयोग केल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार, शब्द, म्हणण्याची गती, शब्द जोडून म्हणणे किंवा वेगवेगळे म्हणणे इत्यादींवर शब्दांतून निर्माण होणारी सात्त्विकता अन् चैतन्य अवलंबून असते. ही आरती ऐकण्याने आणि तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

आता ऐकूया, श्रीकृष्णाची आरती …..

श्रीकृष्णाची आरती

ओवाळूं आरती मदनगोपाळा ।

श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।।

चरणकमल ज्याचें अति सुकुमार ।

ध्वजवज्रांकुश (टीप १) ब्रीदाचा तोडर ।। १ ।।

नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान ।

हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।।

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी ।

वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।

जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान ।

तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ।। ४ ।।

एका जनार्दनीं देखियेलें रूप ।

पाहतां अवघें झाले तद्रूप ।। ५ ।।

– संत एकनाथ

टीप १ – संत एकनाथ महाराज रचित मूळ आरतीत ‘ध्वजवज्रांकुशरेखा चरणीं’ असे आहे. आरती लयीत म्हणता यावी, यासाठी ‘ध्वजवज्रांकुशरेखा चरणीं’ याऐवजी ‘ध्वजवज्रांकुश’ अशी शब्दरचना केली आहे. आरती लयीत म्हटल्याने भावजागृती होण्यास मदत होते. येथे भावजागृती हा उद्देश असल्याने असे केले आहे. (मूळ स्थानी)

श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ

आरत्यांचा अर्थ काही वेळा समजण्यास कठीण असतो. अर्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी लवकर होण्यास मदत होते. यासाठी प्रथम समजून घेऊया, श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ.

१. ‘ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर ।’ म्हणजे चरणांवर सामुद्रिकशास्त्रानुसार ध्वज, वज्र आणि अंकुश दर्शविणार्‍या रेखा शुभचिन्ह असून, पायातले तोडे भक्तवात्सल्याचे जणू ब्रीद सांगत आहेत.

२. ‘ह्रदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।’ यातील ‘श्रीवत्सलांछन’ या शब्दाचा भावार्थ आहे, भक्तवत्सलता. श्रीविष्णूच्या ह्रदयातील त्याच्या भक्तांबद्दलचे वात्सल्य पदकाप्रमाणे शोभून दिसते.

अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद आपणास मिळो, अशी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आरतीसंग्रह (अर्थासह)’

Leave a Comment