मारुतीची उपासना का करावी ?

मारुति

मारुतीमधील प्रकट शक्ती इतर देवांच्या तुलनेत अतिशय जास्त आहे, त्यामुळे मारुतीची उपासना केल्याने मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी लोकांची धारणा आहे. मारुतीमध्ये असलेल्या अधिक प्रकट शक्तीमुळे अनेक कारणांसाठी लोक मारूतीची उपासना करतात, त्यातील काही कारणे या लेखाद्वारे समजून घेऊया.

१. वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ उपासना

कलियुगात समाजातील अनेक व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास असू शकतो. काही वेळा वाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, तसेच जीवनात इतरही अडचणी येतात. वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडथळेही आणतात; पण दुर्दैवाने बहुतेक जण वाईट शक्तींच्या त्रासांविषयी अनभिज्ञ असतात. समाजातील काही जण वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी मांत्रिक वा भगत यांच्याकडे जातात; परंतु त्यांनी केलेली उपाययोजना बहुतेक वेळा तात्कालिक स्वरूपाची असते. काही काळाने वाईट शक्ती त्या व्यक्तीला पुन्हा त्रास देऊ शकतात. तसेच बहुतांशी मांत्रिक वा भगत भोंदू असतात, ते लोकांना लुबाडतात. म्हणून वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी भोंदू मांत्रिक इत्यादींच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा आणि न संपणारी कर्मकांडे करण्यापेक्षा साधना करणे, हाच प्रभावी उपाय आहे. वाईट शक्तींचे निवारण करणार्‍या देवतांपैकी एक म्हणजे मारुति. मारुतीच्या नामजपाने वाईट शक्तींच्या त्रासांपासून मुक्तता करता येते.

२. रोगनिवारण

रोगग्रस्त माणसाला बरे वाटण्यासाठी त्याला हनुमानाच्या मंदिरात नेण्याची पद्धत आहे. रोगमुक्तीसाठी वीरहनुमान-मंत्राचेही प्रयोग करण्यात येतात.

३. चांगल्या शक्तीवर नियंत्रण

जागृत कुंडलिनीच्या मार्गात अडथळा आला, तर तो दूर करून तिला योग्य दिशा देण्यासाठी मारुतीची उपासना करतात.

४. नवसाला पावणारा

हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्री-पुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात. याविषयीच्या अधिक विवेचनासाठी येथे क्लिक करा !

५. संतान प्राप्ती

काही स्त्रिया संतान प्राप्तीच्या इच्छेनेही मारुतीची उपासना करतांना आढळतात. यात निपुत्रिक-स्त्री भिंतीवर शेंदुराने मारुतीची आकृती काढते आणि प्रतिदिन त्याची पूजा करते. त्याच्यापुढे चढते-उतरते कणकेचे दिवेही लावते. शनिवारी त्याच्या गळ्यात रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडीद अन् मीठ अर्पण करते.

६. सिद्धीप्राप्ती

हनुमानाची तांत्रिक उपासना मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे. या तांत्रिक उपासनेत अनेक सिद्ध मंत्रांचा समावेश आहे.

मारूतीचे पूजन

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे पूजन चांगले होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन मारूतीच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्‍त अध्यात्मशास्त्रीय माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मारुति’

Leave a Comment