मारुति (हनुमान)

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा एक देव म्हणजे ‘मारुति’ ! शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या मारुतीच्या जन्माचा इतिहास आणि त्याची काही गुणवैशिष्ट्ये या लेखातून आपण समजून घेणार आहोत.

मारुति

हनुमान जयंती व्हिडिओ

 

जन्माचा इतिहास

राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात. वाल्मीकिरामायणात (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे – अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.

कार्य आणि वैशिष्ट्ये

१. सर्वशक्‍तीमान

जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे.

१ अ. भुते आणि मारुति

सगळ्या देवतांमध्ये केवळ मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते आणि तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.

२. महापराक्रमी

राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्‍चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले – ‘वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.’ हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य विरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरि आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.

महापराक्रमी मारुति
महापराक्रमी मारुति

३. भक्‍त

दास्यभक्‍तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अद्याप मारुतीच्या रामभक्‍तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व आणि ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचे मिश्रण ! हनुमान म्हणजे भक्‍ती आणि शक्‍ती यांचा संगम !

हनुमानाची भक्‍ती
हनुमानाची भक्‍ती

४. अखंड सावधता आणि साधना

युद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची.

ध्यानस्थ मारुति

५. बुद्धीमान

‘व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, भाष्य, वार्तिक आणि संग्रह यांत मारुतीची तुलना करणारा कोणी नव्हता.’ (श्रीवाल्मीकिरामायण, उत्तरकान्ड, सर्ग ३६, श्‍लोक ४४-४६) मारुतीला ‘अकरावा व्याकरणकार’ मानतात.

६. मानसशास्त्रात निपुण आणि राजकारणपटू

अनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामानेही याचा समादेश (सल्ला) मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता मारुतीने ‘त्याला घ्यावे’, असे सांगितले आणि रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वतःच्या (रामाच्या) आगमनाविषयी भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठवणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता आणि मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्‍वास डळमळीत केला.

७. जितेंद्रिय

सीतेच्या शोधासाठी रावणाच्या अंतःपुरात गेलेल्या मारुतीची मनःस्थिती ही त्याच्या उच्च चारित्र्याची निदर्शक आहे. त्या वेळी तो स्वगत म्हणतो, ‘निःशंकपणे पडलेल्या या सर्व रावणस्त्रिया मी या अशा पाहिल्या खर्‍या; परंतु त्या पहाण्यामुळे माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला नाही.’(श्रीवाल्मीकिरामायण, सुंदरकांड, सर्ग ११, श्‍लोक ४२, ४३) अनेक संतांनीही या जितेंद्रिय अशा मारुतीची पूजा बांधून त्याचा आदर्श समाजापुढे ठेवला. इंद्रियजित असल्यामुळेच मारुति इंद्रजितालासुद्धा हरवू शकला.

८. साहित्य, तत्त्वज्ञान आणि वक्‍तृत्वकला यांत प्रवीण

रावणाच्या राजसभेतील मारुतीचे भाषण हे वक्‍तृत्वकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

९. संगीतशास्त्राचा प्रवर्तक

मारुतीला संगीत-शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध साहाय्यभूत असावा. त्याला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे शिवाचे एक रूप आहे. मारुति हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला; म्हणून शिवाला संगीताचा कर्ता समजतात. मारुतीच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.

१०. नवसाला पावणारा

हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात. ‘लग्न न होणार्‍या कुमारिकेने ब्रह्मचारी मारुतीची उपासना करावी’, असे जे सांगितले जाते, त्याचे काही जणांना आश्‍चर्य वाटते. ‘कुमारिकेच्या मनात ‘बलदंड पुरुष नवरा म्हणून मिळावा’, अशी इच्छा असते आणि म्हणून ती मारुतीची उपासना करते’, असेही काही जण चुकीचे सांगतात; पण त्याची खरी कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. लग्न न होणार्‍यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्‍तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्‍तींच्या त्रासांमुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होऊ शकतात आणि लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्‍तींचे लग्न भावी वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा न्यून केल्या की, लग्न होते. ५० टक्के व्यक्‍तींचे लग्न प्रारब्धामुळे होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्‍तींचे लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे उपाय योजावे लागतात. – संकलक)

२. अत्युच्च पातळीच्या देवतांत ब्रह्मचारी किंवा विवाहित असा भेद नसतो. सर्वांचे जन्म संकल्पातूनच, म्हणजे ‘अयोनीसंभव’ असल्याने, त्यांच्यात स्त्री किंवा पुरुष असा लैंगिकदृष्ट्या भेद नसतो. माणसाने तसा भेद केलेला असतो. स्त्रीवाचक देवता म्हणजे देवांची शक्‍तीच असते.

११. चिरंजीव

प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात, तेव्हा ते तेच असतात; मात्र मारुति प्रत्येक अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजिवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात आणि त्यांचे स्थान अतिशय उन्नत असे सात जण घेतात.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मारुति’

Leave a Comment