देवाला हात जोडून नमस्कार कसा करावा ?

देवाला नमस्कार करण्याची पद्धत

देवाला साष्टांग नमस्कार घालणे शक्य नसेल, तेव्हा हात जोडून नमस्कार करावयाचा असतो. हा नमस्कार सावकाश अन् काही विशिष्ट टप्प्यांनी करायचा असतो. या लेखात हे टप्पे विशद करून सांगितले आहेत, तसेच हात जोडून नमस्कार करण्याची कृती २ चित्रांच्या साहाय्याने दाखवण्यात आली आहे. आपणही आजपासूनच या टप्प्यांनुसार नमस्कार करावयास प्रारंभ करा आणि त्याद्वारे ईश्‍वरी चैतन्य प्राप्त करा !

नमस्कार कसा करावा ?चलच्चित्रपट (Namskar kasa karava?Videos : ९)

१. कृती

अ. ‘देवाला नमस्कार करतांना सर्वप्रथम दोन्ही हातांचे तळवे छातीसमोर एकमेकांवर ठेवून हात जोडावेत.

१. हात जोडतांना बोटे सैल ठेवावीत.

२. हाताच्या दोन बोटांमध्ये अंतर न ठेवता ती जुळवून घ्यावीत.

३. हाताची बोटे अंगठ्यापासून दूर ठेवावीत.

४. प्राथमिक स्तरावरील साधकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी नमस्कार करतांना तळहात एकमेकांना चिकटवून ठेवावेत. हातांमध्ये पोकळी ठेवू नये. साधना चालू करून पाच-सहा वर्षे झालेल्या पुढील स्तरावरील साधकांनी नमस्कार करतांना तळहातांमध्ये पोकळी ठेवावी.

आ. हात जोडल्यावर पाठीतून थोडे खाली वाकावे.

इ. त्याच वेळी डोके थोडे खाली झुकवून दोन्ही हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी करून मन देवतेच्या चरणांशी एकाग्र करण्याचा प्रयत्‍न करावा.

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

ई.त्यानंतर जोडलेले हात सरळ खाली न आणता जोडलेल्या हातांचे अंगठे छातीच्या मध्यभागी टेकतील, अशा रीतीने काही वेळ ठेवून मग खाली आणावेत.

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

२. शास्त्र

अ. नमस्कारासाठी हात जोडतांना बोटे पुष्कळ ताठ ठेवू नयेत; कारण त्यामुळे प्राणमयकोष आणि मनोमयकोष यांतील सत्त्वगुणाचे प्राबल्य न्यून होऊन रजोगुण कार्यरत होतो. बोटे सैलसर ठेवल्याने सत्त्वगुणावरील सत्त्वगुण (अतिसूक्ष्म सत्त्वगुण) कार्यरत झाल्याने जिवाला वाईट शक्‍तींशी लढणे शक्य होऊ शकते.

आ. नमस्काराच्या मुद्रेमुळे हातांच्या बोटांमध्ये देवतेचे चैतन्य किंवा शक्‍ती अँटिनाप्रमाणे ग्रहण होत असते. हात जोडतांना बोटे एकमेकांना जोडलेली असायला हवीत; कारण बोटांमध्ये जर अंतर ठेवले, तर दोन बोटांच्या पोकळीत शक्‍तीचे संचयन होते आणि या शक्‍तीचे लगेच विविध दिशांनी थोड्याफार प्रमाणात प्रक्षेपण झाल्यामुळे नमस्कार करत असलेल्या जिवाला होणारा लाभ न्यून होतो.

इ. दोन हातांत पोकळी ठेवणे आणि न ठेवणे, या संदर्भातील विश्लेषण : प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी भावजागृती होणे पुष्कळ महत्त्वाचे असते. नमस्कार करतांना दोन्ही हात एकमेकांना चिकटवल्यावर पृथ्वी आणि आप तत्त्वांचा होणारा संयोग भावजागृतीसाठी साहाय्यभूत ठरतो. यासाठी प्राथमिक स्तराच्या साधकांनी आणि जनसामान्यांनी नमस्कार करतांना तळहात चिकटवून ठेवावेत. तळहातांमध्ये पोकळी ठेवू नये.

पुढील टप्प्याची साधना करणारे साधक, म्हणजे जे पाच-सहा वर्षे साधनेत आहेत, त्यांना हातात पोकळी ठेवल्यावर शांतीची अनुभूती येते. यासाठी अशा साधकांनी नमस्कार करतांना तळहातांमध्ये पोकळी ठेवावी.’

– डॉ. आठवले, पौष शुक्ल तृतीया, कलियुग वर्ष ५११० (३०.१२.२००८))

ई. हात जोडून झाल्यावर पाठीतून थोडे खाली झुकावे. यामुळे होणार्‍या मुद्रेमुळे नाभीचक्रावर दाब येऊन नाभीस्थित पंचप्राण कार्यरत होतात. या पंचप्राणांच्या शरिरातील वहनामुळे शरीर सात्त्विक लहरी ग्रहण करण्याच्या कार्यात संवेदनशील बनते. पंचप्राणांच्या शरिरातील वहनामुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होते. या ऊर्जेच्या बळावर जिवाचा भाव जागृत होण्यास साहाय्य झाल्याने त्याला देवतेकडून येणारे चैतन्य जास्तीतजास्त प्रमाणात ग्रहण करणे शक्य होते.

उ. हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी करावा. या मुद्रेमुळे जिवातील शरणागतभाव जागृत झाल्याने ब्रह्मांडातील आवश्यक त्या देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होतात आणि त्या जिवाच्या आज्ञाचक्रातून आत जाऊन, आज्ञाचक्राला समांतर असणार्‍या डोक्याच्या पाठीमागच्या पोकळीत स्थित होतात. या पोकळीत चंद्र, सुषुम्ना आणि सूर्य या नाड्यांची द्वारे एकत्रित मिळालेली असतात. या पोकळीतील स्थित सूक्ष्मतर लहरींच्या हालचालीमुळे सुषुम्नानाडी कार्यरत होते. त्यामुळे या लहरींचे शरीरभर वेगाने संक्रमण होण्यास साहाय्य झाल्याने एकाच वेळी स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांची शुद्धी होते.

ऊ. नमस्कार केल्यामुळे ग्रहण झालेले देवतेचे चैतन्य किंवा शक्‍ती शरिरात पूर्णपणे पसरण्यासाठी, नमस्कार करून झाल्यावर जोडलेले हात थेट खाली न आणता ते छातीच्या मध्यभागी मनगटे छातीला टेकतील, अशा पद्धतीने ठेवावेत. छातीच्या ठिकाणी अनाहतचक्र असते आणि आज्ञाचक्राप्रमाणे अनाहतचक्राचे कार्यही सात्त्विकता ग्रहण करणे, हे आहे. मनगटे छातीला टेकवल्याने अनाहतचक्र जागृत होऊन सात्त्विकता ग्रहण होण्यास साहाय्य मिळते.

 

३. परिणाम

’अशा प्रकारे नमस्कार केल्यावर देवतेचे चैतन्य नमस्काराच्या इतर पद्धतींतून मिळणार्‍या चैतन्यापेक्षा जास्त प्रमाणात शरिरात ग्रहण होते आणि त्यामुळे वाईट शक्‍तींना जास्त प्रमाणात त्रास होतो. व्यक्‍तीच्या देहात शिरून प्रकट झालेल्या वाईट शक्‍तींना नमस्कारासाठी भ्रूमध्याच्या ठिकाणी अंगठे टेकवताच येत नाहीत. (वाईट शक्‍ती सूक्ष्म असतात; पण काही वेळा त्या व्यक्‍तीच्या देहात शिरून, त्या माध्यमातून प्रकट होतात. – संकलक)’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १५.११.२००४, रात्री १०.२९ व १९.११.२००४, रात्री ९.३९)

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’

Leave a Comment