मारुतीची आरती

Article also available in :

हनुमान Hanuman

मारुति

मारुतीची (हनुमंताची) आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

 

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।। दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।। – समर्थ रामदासस्वामी *पाठभेद : सुरवर, निशाचर

 

आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ

आरती ऐकण्यापूर्वी आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने. ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू. ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.

‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘आरतीसंग्रह (अर्थासह)’

Leave a Comment