शिवाची वैशिष्ट्ये

शिव Shiv

शिव

ईश्‍वराने प्रजापति, ब्रह्मा, शिव, श्रीविष्णु आणि मीनाक्षी या पाच देवतांपासून (तत्त्वांपासून) विश्‍वाची निर्मिती केली. या पाच देवतांत ईश्‍वराची सर्व वैशिष्ट्ये आहेत, तसेच त्या त्या देवतेची आपापली वैशिष्ट्येही आहेत. या लेखात आपण शिवाची वैशिष्ट्ये पाहूया.

१. शिवाची तसेच श्रीविष्णूची तीन रूपे

१ अ. शिवाची तीन रूपे

१. शैव पंथियांचा निर्बीज समाधी अवस्थेतील शिव म्हणजे शिवाचे निर्गुण रूप, म्हणजेच परमेश्‍वर (महाशिव) होय.

२. त्यांचा ध्यानस्थ शिव म्हणजे ईश्‍वर.

३. नृत्य करणारा किंवा पार्वतीसह सारीपाट खेळणारा शिव म्हणजे माया होय.

१ आ. श्रीविष्णूची तीन रूपे

१. वैष्णव पंथियांचा शेषशायी, अनंतशयनी श्रीविष्णु म्हणजे श्रीविष्णूचे निर्गुण रूप, म्हणजेच परमेश्‍वर (महाविष्णु) होय.

२. त्यांचा भक्‍तवत्सल श्रीविष्णु म्हणजे ईश्‍वर.

३. लक्ष्मीसहित श्रीविष्णु म्हणजे माया होय.

२. निर्गुणातील शिव आणि सगुणातील ध्यानस्थ शिव

‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. जर ऑक्सिजन, नायट्रोजन आदींकडे आपण तत्त्व म्हणून पाहिले, तर त्यांचे गुणधर्म (त्यांच्या अस्तित्वाचे गुणधर्म) ही त्यांची स्थिती असते, त्याप्रमाणे हे आहे. सगुण साधना करणार्‍यांसाठी शिव त्याच्या चित्रातील रूपाप्रमाणे आहे आणि निर्गुण साधना करणार्‍यांसाठी शिवाच्या तत्त्वाची निवळ अनुभूती महत्त्वाची आहे.’ – कु. सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २००४)

३. शिवाची वैशिष्ट्ये

३ अ. शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये

१. शिवाचा राखाडी रंग

मूळ पांढर्‍या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत; म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरिरावर असते.

२. गंगा
२ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

१. ‘गमयति भगवत्पदमिति गङ्गा ।’ म्हणजे ‘जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’.

२. ‘गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिति गङ्गा । – शब्दकल्पद्रुम’ म्हणजे ‘मोक्षार्थी अर्थात मुमुक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय’.

२ आ. पृथ्वीवरील गंगा

गंगा नदी हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावून अनेक उपनद्यांद्वारे बंगालच्या उपसागराला मिळते. हिची एकूण लांबी २५१० कि.मी. आहे. गंगा नदीत आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदूषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते; म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तरी गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे सूक्ष्मातील कळणार्‍यांनाच नाही, तर शास्त्रज्ञांनाही जाणवते.

३. चंद्र

शिवाच्या मस्तकी चंद्र आहे. चंद्रमा ही ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य (आल्हाद) या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

४. तिसरा डोळा

अ. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्‍त शक्‍तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्‍तीचे महापीठ आहे. यालाच ज्योतिर्मठ, व्यासपीठ इत्यादी नावे आहेत.

आ. शिवाचा तिसरा डोळा हा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शिवाच्या चित्रातही तिसर्‍या डोळ्याचा आकार ज्योतीसारखा आहे.

इ. शिवाने तिसर्‍या डोळ्याने कामदहन केले आहे. (खर्‍या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. एवढेच नाही, तर खरा ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाग्नीने कामनांना जाळून टाकतो.)

ई. योगशास्त्रानुसार तिसरा डोळा म्हणजे सुषुम्ना नाडी.

उ. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.

५. नाग

अ. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते. विश्‍वातील नऊ नागांना ‘नवनारायण’ असेही म्हणतात. नवनाथांची उत्पत्ती नऊ नागांपासूनच झाली आहे.

आ. कार्तिकेय, जोतिबा, रवळनाथ आणि सब्बु हे नागरूप देव आहेत.

इ. सर्व देवदेवतांच्या रूपात कोणत्यातरी संदर्भात नाग असतो.

ई. नाग हे पुरुषतत्त्वाचे प्रतीक आहे. तो संतानदाता देव आहे.

६. भस्म

शिवाने सर्वांगाला भस्म लावले आहे. भस्माला `शिवाचे वीर्य’ असेही समजतात.

७. रुद्राक्ष

केसांचा बुचडा, गळा, दंड, मनगटे आणि कटी (कंबर) अशा ठिकाणी शिवाने रुद्राक्षमाळा धारण केल्या आहेत.

८. व्याघ्रांबर

वाघ (रज-तम गुण) क्रूरतेचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.

३ आ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. उत्तम गुरुसेवक

शंकराची महाविष्णूवर फार श्रद्धा आहे. त्याने महाविष्णूच्या पायाखालची गंगा आपल्या मस्तकी धारण केली आहे.

२. महातपस्वी आणि महायोगी

सतत नामजप करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो. पुष्कळ तप केल्याने वाढलेले तापमान न्यून करण्यासाठी गंगा, चंद्र, साप यांसारख्या थंडावा देणार्‍या वस्तूंचा शिव वापर करतो, तसेच हिमाच्छादित कैलास पर्वतावर रहातो.

३. क्रोधी

स्वतः करीत असलेले अखंड नामस्मरण शिवाने स्वतःच थांबविल्यास त्याचा स्वभाव शांतच असतो. मात्र नामस्मरणात कोणी विघ्न आणल्यास (उदा. मदनाने विघ्न आणले तसे), साधनेमुळे वाढलेले तेज तत्क्षणी (एकदम) बाहेर पडते आणि ते समोरच्या व्यक्‍तीला सहन न झाल्याने तिचा नाश होतो. यालाच ‘शंकराने तिसरा डोळा उघडून भस्मसात केले’, असे म्हणतात. त्रास देणार्‍याला १०० टक्के त्रास झाला, तर शिवाला केवळ ०.०१ टक्के एवढाच त्रास होतो. त्या त्रासाने शिवाचा नाडीबंध सुटतो; पण आसन मात्र सुटत नाही. मग शिव पुन्हा बंध लावतो.

४. वैरागी

विषयभोगाची सामग्री जवळ असूनही ज्याचे चित्त अविकारी असते, तो कूटस्थ होय. पार्वती मांडीवर असतांनाही शिव निर्विकार असतो, त्याला कामवासना स्पर्शत नाही. असा शिव खरा जितेंद्रिय होय.

१९.७.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधे प.पू. डॉक्टरांनी गुरुकृपायोगाचा उगम याविषयी लिहिले आहे. त्यात ‘अपेक्षाविरहित कर्म म्हणजे वैराग्य !’, अशी वैराग्याची व्याख्या दिली आहे. शिवाला वैरागी म्हणतात. वरील सूत्रानुसार भगवान शिवाचे आचरण कसे असेल ?, असा विचार मनात आला. त्या वेळी पुढील सूत्रे सूचली.

१. पूर्वी असुर कठोर साधना करून शिवाला प्रसन्न करून त्यांना हवा तो वर शिवाकडून मिळवत असत. त्या वेळी शिव असुरांना हा वर तुमच्यासाठी हितावह नसल्याचे सांगत, तरी असुर स्वतःच्या मतावर ठाम राहून त्याचा अपलाभ घेत. त्या वेळी शिवाला असुरांनी माझे ऐकावे, अशी अपेक्षा नसायची.

२. असुर शिवाकडून विशिष्ट वरदान मिळवून त्याचा उपयोग शिवाला त्रास देण्यासाठी करत; पण शिवाच्या मनात मी वर दिला आहे, हे असुरांनी लक्षात घ्यावे, अशी अपेक्षा नसायची. अशा विविध प्रसंगातून शिवाचे वैराग्य व्यक्त होते, हे लक्षात येते.
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१६)

५. दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिध्द (तयार) असलेला

समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी कोणताही देव त्याचा स्वीकार करण्यास पुढे येईना. तेव्हा शिवाने हालाहल प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले. विषप्राशनामुळे त्याचा कंठ काळा-निळा झाला आणि त्याला नीलकंठ असे नाव मिळाले.

६. महाकालीचा आवेग शांत करणारा

‘दैत्यसंहार करतांना महाकाली सुसाट वादळासारखी भयंकर झाली. तिला आवरणे असंभव झाले ! तेव्हा शंकराने प्रेतरूप घेतले आणि तिच्या कालनृत्याच्या वाटेत ते शिवाचे शव पडले. राक्षसांची प्रेते तुडवीत ती कालरात्री शंकराच्या शवावर आली. त्या शवाचा स्पर्श होताच कालरात्रीच्या नृत्याचे भयंकर वादळ शांत झाले, आवेग शांत झाला. हेच ते शिवत्व ! तेच परमतत्त्व !!’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

७. सहज प्रसन्न होणारा (आशुतोष) आणि प्रसन्न झाल्यावर काहीही देणारा

एकदा प्रसन्न होऊन शिवाने रावणाला आत्मलिंगही (आत्मा) दिले होते. (ते आत्मलिंग घेऊन रावणाला स्वतः शिव बनायचे होते.)

८. देव आणि दानव दोघेही उपासक असलेला

क्षुद्रदेवता, कनिष्ठ देवता, स्वर्गलोकातील काही देवता, तसेच स्वतः श्रीविष्णु हे शिवाचे उपासक आहेत. (शिव हा श्रीविष्णूचा उपासक आहे.) केवळ देवच नाही, तर दानवही शिवाचे उपासक आहेत, हे शिवाचे वैशिष्ट्य आहे. बाणासुर, रावण इत्यादी दानवांनी श्रीविष्णूचे तप केले नाही किंवा श्रीविष्णूनेही कोणा दानवाला वर दिला नाही; पण त्यांनी शिवाची उपासना केली आणि शिवाने त्यांना वर दिला. त्याचा त्रास बर्‍याचदा त्याला अन् इतर देवांना झालेला आहे. श्रीविष्णूने दर वेळी त्यातून मार्ग काढला आहे.

९. भुतांचा स्वामी

शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.

३ इ. एकमेकांच्या विरुद्ध असलेली वैशिष्ट्ये

(स्वीकृती आणि विकृती) एकत्र असलेला

उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज), सात्त्विक-तामसिक इत्यादी एकमेकांच्या विरुद्ध असलेली वैशिष्ट्ये शिवात आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव भाग १’

1 thought on “शिवाची वैशिष्ट्ये”

  1. भगवान शिवाच्या चरणी भावपूर्ण नमस्कार

    Reply

Leave a Comment