प्रार्थना का करावी ?

प्रार्थना करतांना

‘देवता किंवा गुरु यांना शरण जाऊन इच्छित गोष्ट याचना करून मागणे, म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते, अशक्य गोष्टही शक्य होते आणि आसुरी शक्‍तींपासून रक्षण होते.

 

प्रार्थना करण्याची काही उदाहरणे

१. श्री अन्नपूर्णादेवी

तुझ्या कृपेने मिळालेले हे अन्न सेवन केल्याने त्यातून मला साधना करण्यासाठी / कार्य करण्यासाठी शक्‍ती आणि स्फूर्ती मिळू दे. हे अन्न माझ्याकडून नामजपासह आणि उपास्यदेवतेविषयी / गुरूंविषयी भाव जागृत ठेवून सेवन होऊ दे.

 

माझ्या अन्नमयकोषात अन्नाविषयी असणार्‍या सर्व वासना नष्ट होऊ देत. या अन्नाद्वारे गुरुकार्यासाठी आवश्यक असलेली शक्‍ती आणि विचार मला मिळू देत. माझा पहिला घास देव माझ्याबरोबर रहाण्यासाठी असू दे. दुसरा घास मला देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी असू दे. तिसरा घास माझी हनुमानाप्रमाणे भक्‍ती होण्यासाठी असू दे. चौथा घास देवाने माझ्याकडून साधना करवून घेण्यासाठी असू दे. पाचवा घास माझ्यात चैतन्य निर्माण होण्यासाठी असू दे. माझा सहावा घास माझ्याकडून अध्यात्माचा अभ्यास होण्यासाठी असू दे. माझा सातवा घास हिंदु राज्याची स्थापना होण्यासाठी असू दे.

२. श्री गणपति

‘तू विघ्नहर्ता आणि बुद्धीदाता आहेस. माझ्या सेवेत / कार्यात येणार्‍या सर्व अडथळ्यांचे तुझ्या कृपेने निवारण होऊ दे, तसेच मला सेवा / कार्य योग्य प्रकारे करण्यास सुबुद्धी लाभू दे. वाईट शक्‍तींच्या त्रासापासून माझे रक्षण होऊ दे. तुझ्या

 

नामजपाने माझी प्राणशक्‍ती वाढू दे आणि मला चांगले आरोग्य लाभून माझ्याकडून राष्ट्र अन् धर्म कार्य होत राहू दे. तू आरंभदेवता असून माझ्या आध्यात्मिक प्रगतीला आरंभ होऊ दे. तू बुद्धीमान असून महर्षि व्यासमुनींनी महाभारत लिहिण्यासाठी तुला प्रार्थना केली, याचे मला स्मरण राहू दे.

३. श्री सरस्वतीदेवी

हे श्री सरस्वतीदेवी, तू विद्येची देवता आहेस. गुरुसेवेत / मी हाती घेतलेल्या कार्यात तू मला योग्य मार्गदर्शन कर. संत ज्ञानेश्‍वरांनी गौरव केल्याप्रमाणे तू ‘अभिनव वाग्विलासिनी’ आहेस. इतरांची मने जिंकणारे शब्द मला सुचू देत.

४. ग्रामदेवता आणि क्षेत्रपालदेवता

हे …… (ग्रामदेवतेचे नाव) आणि……..(क्षेत्रपालदेवतेचे नाव), तुम्ही अनिष्ट शक्‍ती, तसेच अन्य अरिष्टे यांच्यापासून माझे रक्षण करा अन् येथील वातावरण माझ्या साधनेसाठी पोषक करा.

५. वाईट शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी उपास्यदेवतेला करायची प्रार्थना

हे …..(उपास्यदेवतेचे नाव घ्यावे), मी नामजप आणि साधना करतो, त्यांचे फळ भूत, पिशाच आदी वाईट शक्‍तींना मिळू नये. माझ्या साधनेत आणि गुरूंच्या कार्यात अडथळे आणणार्‍या वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर कर अन् माझ्याभोवती सातत्याने संरक्षककवच निर्माण कर.

६. राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी प्रार्थना

हे श्रीकृष्णा, राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही, वाईट शक्‍ती आदी विविध माध्यमांतून राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात तुझ्या कृपेने निष्प्रभ होऊन राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण होऊ दे. आम्हा सर्वांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक बळ मिळू दे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘भावजागृतीसाठी साधना’

Leave a Comment