भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

अनुक्रमणिका

पू. डॉ. मुकुल गाडगीळ

‘साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

पुष्कळ वर्षे साधना करूनही उन्नती न झालेल्या साधकांनी, तसेच स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांनी स्वतःचे निरीक्षण केले, तर लक्षात येईल की, साधनेच्या आरंभी जसा सहजतेने भाव जागृत होत होता, तसा आता होत नाही. तेव्हाप.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉक्टर यांचे छायाचित्र किंवा देवतेचे चित्र पाहिले की, लगेच हात जोडले जायचे आणि त्यांना प्रार्थना व्हायची; पण आता तसे होत नाही. पूर्वी नामजप करायची आठवण होत होती; पण आता होत नाही. दायित्व घेऊन सेवा करू लागल्याने ‘आपल्याला सर्व जमू लागले’, असे वाटते. त्यामुळे देवाचे साहाय्य न घेतल्याने सेवा भावपूर्ण होत नाही. थोडक्यात काय, तर आपल्यात भावाचा अभाव झाला आहे. भावाचा अभाव असल्याने आपला अहं वाढला आहे आणि आपल्याकडून चुका होत आहेत.

सतत भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न केल्यासच आपण ताळ्यावर राहू शकतो. गुरु आणि गुरुसेवा यांप्रती भाव असेल, तरच आपल्यावर गुरुकृपा होईल. आपल्यात कर्तेपणा येणार नाही आणि आपल्याकडून चुकाही होणार नाहीत. त्यामुळे साधनेच्या आरंभी आपण जसे भावजागृतीचे प्रयत्न करत होतो, तसेच प्रयत्न पुढेही चालू ठेवणे पुढील उन्नतीसाठी आवश्यक आहे.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

१. प्रत्येक कृती देवासाठी आणि देवाला अपेक्षित अशी करणे म्हणजे भाव !

व्यवहारातही कोणतीही कृती करतांना ‘ती सत्‌साठी, म्हणजे ईश्वरासाठी त्याची सेवा म्हणून करत आहे’, असा भाव असेल, तर प्रत्येक कृती करतांना साधना होते. त्यामुळे घर, कार्यालय, समाज आणि राष्ट्र कार्य हे सत्‌ची म्हणजे ईश्वराची सेवा म्हणून केले, तर त्याचा लाभ होतो. ‘प्रत्येक कृती देवासाठी आणि देवाला अपेक्षित अशी करणे’ हाच देवाप्रतीचा भाव आहे. त्यामुळे ती कृती भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यास साहाय्य होते.

साधना करतांनाही स्नान करणे, जेवणे यांसारख्या व्यष्टी कृती, तसेच नामजप, प्रार्थना, सेवा, दोष-निर्मूलन प्रक्रिया यांसारख्या साधनेच्या कृती भावपूर्ण केल्या, तर त्याचा अधिक पटींनी लाभ होतो आणि त्या ईश्वरचरणी अर्पण होतात !

 

२. भाव ठेवल्याने होणारे लाभ !

अ. ‘श्री दुर्गादेवीला सकाळी भांडी घासलेली आवडणार नाही’,
असा विचार करून रात्रीच भांडी घासल्याने घरात देवीचे अस्तित्व जाणवणे
आणि विसर्जनानंतर नमस्कार करतांना ती आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे !

‘१८.१०.२००७ या दिवशी नवरात्रीमधील सातव्या दिवशी रात्री ‘भांडी सकाळी घासावीत’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु ‘श्री दुर्गादेवी येथे आहे, तिला हे आवडेल का ?’, असा विचार येऊन मी लगेच भांडी घासली. त्या रात्री झोपल्यानंतर माझ्या मुलीला घरात श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवले. ‘श्री दुर्गादेवी रागाने युद्ध करत आहे’, असे तिला जाणवले. स्वयंपाकघरातून तिला पैंजणांचा आवाज आला. तेव्हा मला आनंद झाला. श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनानंतर मी नमस्कार करत असतांना मला तिथे श्री दुर्गादेवीचे पुष्कळ मोठे रूप दिसून ‘ती मला आशीर्वाद देत आहे’, असे जाणवले.’ – एक साधिका, विशाखापट्टणम्

 

३. भावामुळे सूक्ष्मातील कळून योग्य कृती होणे !

‘मी जेवतांना परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना भरवत आहे’, असा भाव ठेवून जेवत होतो. तेव्हा एका साधिकेने जिलेबीचे भांडे समोर ठेवून ‘शिल्लक राहिलेली जिलेबी संपवा’, असे सांगितले. तेव्हा मी जवळील ४-५ साधकांच्या ताटामध्ये जिलेबी वाढली. काही साधक दुसऱ्या ठिकाणी गेले होते. एका ताटामध्ये मी अधिक वाढली. माझ्या हातून हे सर्व नकळत घडले. १ मिनिटाने साधक आल्यानंतर ज्या ताटामध्ये अधिक जिलेबी वाढली होती, तो साधक म्हणाला, ‘‘अरे वा ! मला जिलेबी आवडते. मला कुणी एवढी जिलेबी वाढली ?’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. भावजागृतीचे प्रयत्न करतांना आवश्यक कृती कशा आपोआप घडतात, याची अनुभूती आली.’ – श्री. परेश कानडे, कोल्हापूर

 

४. भावामुळे पुढे घडणाऱ्या गोष्टी आधीच दिसणे !

‘सनातनच्या मिरज आश्रमात प.प. भगवान श्रीधरस्वामी यांच्या पादुकांच्या पूजनाचा मंगल सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. आदल्या दिवशीपासून मी पाद्यपूजेशी संबंधित सेवा करतांना  परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत मला चरण दिसत होते. त्यानंतर मी जिथे जात होते, तिथे मला पादुका दिसत होत्या आणि ‘मी पादुकांचीच सेवा करत आहे’, असे वाटत होते. त्यानंतर मला आश्रमावर मोठ्या पादुकांचे दर्शन झाले. आदल्या दिवशीपासून विविध प्रसंगांत मला ज्या पादुका (सूक्ष्मातून) दिसत होत्या, त्याच चरणपादुका प्रत्यक्षात प.प. श्रीधरस्वामींच्या भक्तांनी आणल्या होत्या !’ – कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५. भावामुळे निर्माण होणारी उत्कट भावावस्था !

माझ्या मनात विचार येतो, ‘गावोगावी फिरावे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे गुणगान (कीर्तनभक्ती करावी) करावे. आपला देह आणि वाणी यांसाठीच झिजवावी. प.पू. डॉक्टरांप्रती सर्वांची भावभक्ती कशी वाढेल ? यासाठीच प्रयत्न करावेत. प.पू. डॉक्टरांचे माहात्म्य जाणून सर्व लोक त्यांच्या चरणी शरण आले, तर सर्वांचा उद्धार होणे शक्य होईल आणि असेच व्हावे.’ – एक साधिका

 

६. साधकातील भाव कसे कार्य करतो ?

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची
सेवा करून आलेल्या साधकात भाव नसल्याने त्याच्या मनाची
स्थिती चांगली नसणे; मात्र त्या साधकाकडे पहाणार्‍या अन्य साधकाचा
भाव चांगला असल्याने त्या साधकाला संतांतील चैतन्याचा अधिक लाभ होणे

‘एक साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करायचा. एकदा त्याला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्याच्या मनाची स्थिती चांगली नव्हती. परात्पर गुरु डॉक्टरांना मर्दन करून झाल्यावर तो सहसाधकांशी नेहमीप्रमाणे सेवेच्या काही विषयांवर बोलत होता. संतसेवा करणार्‍या साधकाला पाहून एका साधकाला मनोमन पुष्कळ आनंद झाला आणि त्याची भावजागृती होऊ लागली. तेव्हा त्या साधकाचा भाव होता, ‘संतांचा प्रत्यक्ष सत्संग लाभलेल्या, त्यांची स्थुलातून सेवा करणार्‍या साधकाचा सहवास मला लाभत आहे’, हे माझे भाग्यच आहे.’ त्यामुळे त्या साधकाची संतांची सेवा करणार्‍या साधकाच्या चरणीही कृतज्ञता व्यक्त होत होती. संतसेवा करणार्‍या साधकाच्या मनाची स्थिती मात्र आतून चांगली नव्हती. तो प्रत्यक्ष संतसेवा करूनही भावाच्या अभावामुळे कोरडाच राहिला होता.

संतसेवा करणार्‍या साधकाची स्थिती चांगली नसली, तरी त्याच्याकडे पहाणार्‍या साधकाचा भाव मात्र चांगला असल्याने प्रत्यक्ष संतसेवा करणार्‍या साधकापेक्षा दुसर्‍या साधकाला संतांच्या चैतन्याचा अधिक लाभ झाला.

आ. साधकाने भावजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे
‘सर्वत्र देवाला कसे पहायचे ?’, हे त्याला शिकायला मिळून साधनेत प्रगती करून घेता येणे

‘भाव तेथे देव’, असे का म्हणतात ?’, हे यातून लक्षात येते. भावसत्संगात जे भावप्रयोग सांगितले जातात, भावजागृतीसाठी आपण जे प्रयत्न करतो, ते साधकाला केवळ आनंद आणि उत्साह देण्यापुरते नसून त्याच्या इतरांकडे पहाण्याच्या दृष्टीमध्येही योग्य पालट घडवून आणतात. त्यामुळे साधक ‘सर्वत्र देवाला कसे पहायचे’, हे शिकतो आणि प्रगती करून घेतो.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Leave a Comment