गुरुपौर्णिमा निमित्त भगवंत आणि गुरु यांच्याप्रती भाव वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे ?

डावीकडून कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, सौ. कीर्ती जाधव, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन

साक्षात् श्रीमन्नारायणाचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. हे श्रीहरिस्वरूप गुरुनाथा, या भाव वाढवण्याच्या प्रयोगातील प्रत्येक भावक्षण आम्हाला अंतर्मनापासून अनुभवता येऊ दे. ‘हे भगवंता, तू आमच्यापासून दूर नाहीस. तू आमच्या जवळच आहेस. आमचे मन, वाणी, कृती आणि चराचर यांत तूच व्यापला आहेस. तुझी ही लीला प्रत्येक क्षणाला आम्हाला अनुभवता येऊ दे. प्रत्येक कृती आणि विचार तुला अपेक्षित असे होऊ दे’, अशी तुझ्या पावन चरणी प्रार्थना आहे.

आता आपण सर्व भक्त मिळून श्रीविष्णूच्या दर्शनासाठी विष्णुलोकात जाऊया. ब्रह्मांडाचा पालक असणार्‍या श्रीविष्णूच्या वैकुंठलोकात जाऊन आपल्या मनातील सर्व शंकाचे निरसन करून घेण्याची आज आपल्याला संधी मिळत आहे; म्हणून आपण सर्व जण श्रीविष्णूच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.

आपण डोळे मिटून विष्णुलोकातील प्रसन्न वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करूया. विष्णुलोकातील या प्रसन्न वातावरणाने आपले मन प्रसन्न झाले आहे. या प्रसन्न, उत्साही मनाने आपण श्रीमन्नारायणाचे भावपूर्ण दर्शन घेऊया. ‘शेषशय्येवर विराजमान असलेला श्रीविष्णु स्थिर आणि आनंद मुद्रेत आहे. त्याचे हे मनमोहक आणि सुंदर रूप आपल्या या छोट्याशा नेत्रांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हा प्रत्येक दैवी क्षण आपण आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवून ठेवत आहोत. श्रीविष्णूच्या चरणकमलांच्या सेवेत लक्ष्मीमाता मग्न आहे. अशा लक्ष्मीमातेचे आपण दर्शन घेत आहोत. भगवान विष्णूच्या या मनोहारी दर्शनाने आपण धन्य झालो आहोत. आपण त्याच्या चरणी पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

श्रीमन्नारायणाच्या चरणी अजून एक देवी बसली आहे. ‘ती कोण आहे ?’ असा प्रश्‍न आपल्या मनाला पडला आहे. साक्षात् लक्ष्मीमातेला आपण विचारत आहोत, ‘श्रीविष्णूच्या चरणी बसलेली ही माता कोण आहे ?’ आपल्याला लक्ष्मी माता सांगत आहे, ‘ही देवी म्हणजे भू माता आहे.’ साक्षात् भू मातेचे दर्शन घेऊन आपल्याला पुष्कळ आनंद होत आहे. ‘ज्या भूमातेने आतापर्यंत आपल्याला सांभाळले, ज्या भूमातेच्या आधारानेच आज आपण साधना करत आहोत, अशा भूमातेला आपल्यामुळे किती त्रास होत असेल ?’ याचा आपण कधी विचारही केला नाही.

अत्यंत सहनशीलतेमुळे ईश्‍वरी तेज प्राप्त झालेली ही तेजस्वी पृथ्वी आज साक्षात् देवीच्या रूपात आपल्यासमोर आहे. आता आपल्याला भूमाता आणि साक्षात् श्रीमन्नारायण यांच्यामधील संवाद ऐकायला मिळेल, अशी उत्सुकता आपल्या मनात आहे. मानवांमधील संवाद आपण ऐकतो; पण ‘देवतांचा संवाद कसा असेल ?’ हे ऐकण्याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाच्याच मनात असेल. कृतज्ञताभावाने आपण भूमाता आणि श्रीमन्नारायण यांचा संवाद ऐकत आहोत.

पृथ्वी माता आपल्या मनातील व्यथा श्रीमन्नारायणाला सांगत आहे. ‘हे परमेश्‍वरा, ज्या मानवाला मी सांभाळत आहे, ते सर्व लोक अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडून गेलेले आहेत. याचा मला फार त्रास होत आहे. या सर्वांच्या पापाचे ओझे माझ्या डोक्यावर आहे, आता ते मला सहन होत नाही. हे सहन करण्याची क्षमता संपून जात आहे. हे श्रीमन्नारायणा, तुझ्या चरणी शरणागत होऊन मी निवेदन करत आहे. हे सहन करण्याची क्षमता तुम्हीच मला द्या. या पृथ्वीवर जो अधर्म चालू आहे, त्यापासून तुम्हीच मला वाचवा आणि मार्ग दाखवा.’ श्रीमन्नारायण भू मातेची प्रार्थना कृपाळूपणेे ऐकत आहे. ते भू मातेकडे पाहून मनात स्मित करत आहेत.

साक्षात् श्रीमन्नारायण सांगत आहे, ‘ही सर्व स्थिती आम्हाला ठाऊक आहे. आम्हा त्रिदेवांचे यासंदर्भात काय करायचे, याचे आधीच नियोजन झालेले आहे. या पृथ्वीला अधर्मापासून मुक्त करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी पृथ्वीवर परत अवतार घेण्याची वेळ आलेली आहे.’

साक्षात् श्रीमन्नारायणाचे हे शब्द ऐकून भूमाता श्रीमन्नारायणाच्या चरणी संपूर्ण नतमस्तक झाली आहे. भूमाता म्हणत आहे, ‘तुमच्या चरणांच्या स्पर्शासाठी मी केव्हापासून तळमळत होते. तुम्ही लवकर या प्रभु, तुम्ही लवकर या.’

आता साक्षात् श्रीमन्नारायण या पृथ्वीतलावर अवतार धारण करणार आहे. हे पहाण्याची आपल्या मनात अत्यंत उत्कंठा लागलेली आहे. भूमाता आपल्याला देवीच्या रूपात दिसत होती. तिचे रूपांतर पृथ्वीच्या रूपात होत आहे. श्रीमन्नारायणाच्या कृपेमुळे आपल्याला अखिल ब्रह्मांडाचेच दर्शन होत आहे. आता श्रीमन्नारायणाच्या दिव्य देहातून एक शक्ती प्रकट होत आहे आणि ती पृथ्वीवर येत आहे. अत्यंत कृतज्ञताभावाने आपण हे दृश्य पहात आहोत. साक्षात् परमेश्‍वराचा पृथ्वीवर अवतार कसा होतो ? हे दृश्य आपण स्वतःच्या डोळ्यांनी पहात आहोत. अत्यंत विशाल अशी पृथ्वी माता आहे. या पृथ्वीपेक्षाही अनंत पटींनी श्रीविष्णूचे रूप आपल्याला दिसत आहे. आता त्याच्या विराट रूपासमोर आपल्याला पृथ्वीमाताही दिसत नाही. जसा एकेक क्षण पुढे जात आहे, तसे श्रीमन्नारायणाचे रूप अत्यंत विराट होत आहे.

अखिल ब्रह्मांडाचे पालनकर्ते, धर्मसंस्थापनेसाठी कार्यरत असलेल्या श्रीमन्नारायणाचा आता या क्षणी पृथ्वीला चरणस्पर्श होत आहे. (शंखध्वनी होतो.)

या दिव्य अवताराच्या दर्शनासाठी आकाशातून सर्व देवता, ऋषिमुनी, सप्तर्षि आणि उन्नत जीव उपस्थित आहेत. ते सर्व जण  श्रीमन्नारायणावर भावपूर्ण पुष्पवृष्टी करत आहेत. श्रीमन्नारायण परात्पर गुरूंच्या या कलियुगात पृथ्वीवर आताच्या या क्षणी अवतीर्ण झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात आनंदी आनंद पसरला आहे. सर्व देवता, ऋषिमुनी, सर्व उन्नत जीव यांना आनंद होत आहे. पृथ्वीमाताही अत्यंत आनंदी आहे. प्रत्येक जीव श्रीमन्नारायणाच्या चरणी, परात्पर गुरुदेवांच्या चरणी अत्यंत कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करत आहे. साक्षात् जगद्गुरु प्रत्यक्षच या पृथ्वीवर अवतरले आहेत. आज हे गुरुदेव पृथ्वीवर एका विशाल सिंहासनावर विराजमान झाले आहेत. अखिल ब्रह्मांडाचे अधिपती परात्पर गुरुदेव हे साक्षात् श्रीमन्नारायणाचेच रूप आहेत. ते आज ब्रह्मांड सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. अशा विराट, विशाल श्रीगुरूंच्या समोर आपले अस्तित्व काहीच नाही. अशा साक्षात् विश्‍वगुरूंच्या चरणी आपण साष्टांग नमस्कार करूया. त्यांची सर्वश्रेष्ठता आणि महानता यांच्या समोर आपण नतमस्तक आहोत. या क्षणी असे वाटत आहे की, सारी सृष्टी त्यांच्या या पावन दर्शनासाठी जणूकाही स्तब्ध झालेली आहे. अशा तेजोमय गुरुमाऊलीच्या तेजाने सारे ब्रह्मांड दिपून गेलेले आहे. त्यांच्या तेजस्वी अस्तित्वामुळे चंद्र-तारेही प्रकाशून गेले आहेत. या गुरुमाऊलीने काही क्षणांतच आपल्यासारख्या या जिवांना आपलेसे करून घेतले आहे. त्यांनी दर्शन दिल्याबद्दल कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.

 

सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत
सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घेण्याची संधी मिळणे

आताच आपण विश्‍वगुरूंचे दर्शन घेतले. परम पूज्य गुरुदेव हे आपल्या सर्वांसाठीच परम पूजनीय आहेत. ‘या महान श्रीगुरूंच्या चरणांचे पूजन करण्याची संधी मिळावी’, असे प्रत्येकालाच वाटत आहे. खरं म्हणजे गुरुपूजन म्हणजे केवळ त्यांच्या चरणांची पूजा एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर गुरुपूजन म्हणजे गुरूंच्या गुणांचे पूजन, त्यांच्या अवतारत्वाचे पूजन, त्यांच्या संस्कारांचे आणि त्यांच्या शिकवणीचे पूजन आहे. या पूजनाची आपल्याला गुरुदेवांनी सेवेच्या माध्यमातून भरभरून संधी दिली आहे. ‘गुरुपूजनासाठी गुरुपौर्णिमाच हवी’, असे नाही, तर दिवसातील प्रत्येक क्षणी करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घेण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक क्षण आपल्यासाठी गुरुपूजनच आहे.

गुरुमाऊलीची कृपा संपादन करण्यासाठी समर्पित भावाने प्रयत्न करूया !

श्रीगुरूंनी प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. श्रीगुरूंनी प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या माध्यमांतून जोडून ठेवलेले आहे. प्रत्येक जण आहे त्या स्थितीत आपले साधनेचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु आता जे आपले प्रयत्न चालू आहेत, तेवढ्यापुरते न रहाता गुरुमाऊलीची कृपा संपादन करण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करायचे आहेत.

भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे,
त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे प्रयत्न तळमळीने वाढवूया !

साधना करणार्‍या साधकांचे पुढीलप्रमाणे गट आहेत.

१. अनेक साधकांना सेवेसाठी कुटुंबियांच्या विरोधामुळे घरातून बाहेर पडता येत नाही किंवा सेवा करता येत नाही, तर काही जणांना शारीरिक अडचणी आहेत किंवा वयस्कर असल्याने सेवेसाठी घरातून बाहेर पडता येत नाही.

२. काही साधकांना अर्ध वेळ सेवा आणि अर्ध वेळ नोकरी करावी लागते.

३. काही जण प्रसारात पूर्णवेळ साधना करतात, तर काही जण आश्रमात पूर्णवेळ सेवा करतात.

४. काही साधक गुरुभावाने सेवा करतात.

आताच्या या ४ टप्प्यांपैकी ‘पूर्णवेळ सेवा करण्याची संधी ज्यांना मिळते, त्यांच्यावरच गुरुकृपेचा वर्षाव अधिक आहे’, असे मुळीच नाही. काही साधक घरी राहूनही सेवा करत भगवंताचे स्मरण करत आहेेत, भगवंताला मनापासून आळवत आहेत. ज्या परिस्थितीत ते आहेत, त्या परिस्थितीत गुरुमाऊलीला आवडेल, असे करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यावरही या परम दयाळू गुरुमाऊलीचे तेवढेच लक्ष आहे. गुरुमाऊली आपल्या सर्वांसाठी एवढे सगळे करत आहेत. आपण सर्वांनी भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे, त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे अजून दुप्पट प्रयत्न करूया आणि त्यासाठी मनातील साधनेची तीव्र तळमळ वाढवण्याचा प्रयत्न करूया.

 

घरी राहून साधना करणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

काही साधक घरी राहून सेवा करतात. काही साधक घरातील अडचणींमुळे बाहेर जाऊ शकत नाहीत. काही जण घरी साधनेचे व्यष्टीचे प्रयत्न करत नाहीत. काहींना प्रयत्न करण्यामध्ये दोष आणि अहंचा भागही आड येतो. त्या साधकांनाही साक्षात् महान श्रीगुरु लाभले आहेत. त्यांच्याकडून श्रीविष्णूचे स्मरण, त्याची सेवा तळमळीने कशी करता येईल ? कसे प्रयत्न करायचे आहेत ? ते आता आपण पाहूया.

१. गुरुप्राप्तीची तळमळ आणि भावाची जोड देऊन दोष आणि अहं यावर मात करूया ! : स्वभावदोष आणि अहं यांमध्ये आपण स्वतःच स्वतःला अडकवून ठेवतो आणि श्रीगुरूंच्या कृपाछत्रापासून दूर जातो; पण आता आपल्यापैकी कुणीच या स्वभावदोष आणि अहं यांच्या बेड्यांमध्ये अडकायचे नाही. आपल्या सर्वांनी गुरुप्राप्तीची तळमळ आणि भाव यांची जोड प्रयत्नांना देऊया, या बेड्या तोडूया आणि गुरूंची सेवा करण्यासाठी तन-मनाचा त्याग करूया.

२. अधिकाधिक सेवेसाठी अधिकाधिक वेळ देऊया ! : श्रीगुरूंच्या सेवेनेच आपण त्यांची कृपा संपादन करू शकतो; म्हणूनच जे सेवेसाठी वेळ देऊ शकत नाहीत किंवा घरातील अडचणींमुळे ज्यांना घरातून बाहेर पडता येत नाही, त्यांनी ‘आपण ज्या स्थितीत आहोत, त्या स्थितीत आपण अधिकाधिक सेवेसाठी किती वेळ देऊ शकतो आणि सेवेसाठी कसे बाहेर पडू शकतो’, हे लक्षात घेऊया आणि प्रत्येकानेच प्रयत्न वाढवायला हवेत. आपली सेवेची वेळ निश्‍चित करून केंद्रसेवक आणि जिल्हासेवक यांना सांगूया.

३. भावजागृतीचा प्रयत्न करूया ! : आताचा हा काळ आपल्या सर्वांसाठी फार अमूल्य आहे. हे सुवर्णक्षण आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आपण अनेकदा ऐकत आलो आहोत, ‘गुरुसेवेने जन्मोजन्मीचे प्रारब्ध नष्ट होते.’ हे आता केवळ ऐकून सोडून द्यायचे नाही, तर हे शब्द आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवूया. आपल्या अंतरातील गुरूंप्रतींचा भाव हाच गुरूंचा परम भक्त आहे. हा भक्त गुरूंसाठी कोणत्याही क्षणी तन आणि मन यांचा त्याग करण्यास सिद्ध आहे. आता आपण प्रत्येकामध्ये असलेल्या या गुरूंच्या परम भक्तरूपी आत्म्याला जागृत करायचे आहे.

४. संतांप्रमाणे एकही क्षण ‘स्व’चा विचार न ठेवता केवळ गुरूंचाच, गुरुसेवेचाच विचार करूया ! : आपण प्रत्येक जण सनातनच्या संतांच्या सहवासात असतो. प्रत्येकानेच त्यांची गुरुकार्याप्रतीची, गुरूंप्रतीची मनातील तळमळ अनुभवली आहे. एकही क्षण ‘स्व’चा विचार न ठेवता ते केवळ गुरु आणि गुरुसेवा यांचाच विचार करतात. त्याप्रमाणे आपणही ध्येय ठेवून आपला वैयक्तिक, घरातील वेळ न्यून करून ‘सेवेला कसे प्राधान्य देऊ शकतो ?’ यासाठी प्रयत्न करूया.

५. गुरूंवरची श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करूया ! : काही जणांना घरून विरोध असतो, घरात काही अडचणी असतात किंवा घरात काही प्रसंग घडत असतात. तेव्हा ‘गुरूंनी आपल्याला गुरूंवरची श्रद्धा वाढवण्याची ही संधी दिली आहे’ हा भाग आपण लक्षात घेऊया. जरी आपल्याला घराच्या बाहेर पडता आले नाही, तरी ‘घरात जे काही करत आहोत, ते गुरूंच्या चरणी राहून कसे आपल्याला करता येईल ?’, हे पाहूया.

६. साधनेचे प्रयत्न कुठे अल्प होतात, याचे चिंतन करून प्रयत्न वाढवूया ! : श्री स्वामी समर्थांचे वचन आहे ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ आपली गुरुमाऊली केवळ आपल्या पाठीशी नाही, तर अखंड आपल्या समवेत आहे. ही अनुभूती प्रत्येकाला प्रत्येक क्षणी घ्यायची आहे. प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत आपल्याला ही अनुभूती घ्यायची आहे. आपल्याला गुरुदेवांनी जी साधना सांगितली आहे, ती आपल्याकडून तेवढ्या गांभीर्याने होत नाही. व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत. ‘आपण साधनेच्या दृष्टीने कुठे अल्प पडतो ?’ याचे चिंतन करून महिनाभर प्रयत्न वाढवायचे आहेत.

७. सामर्थ्यवान श्रीगुरूंना प्रत्येक क्षणी आठवूया ! : काही साधकांना काही अडचणींमुळे सेवेसाठी बाहेर पडता येत नाही, साधना करता येत नाही किंवा घरातून विरोध असतो, अशा वेळी साधकांना निराशा येते; पण अशा वेळी निराश न होता ‘आतापर्यंतच्या प्रत्येक अडचणीत, संकटात श्रीगुरु कसे आपल्या समवेत आहेत ? आजपर्यंत अनेक वर्षे आपल्याला त्यांनी कसे बाहेर काढले आहे’, असा विचार करून अशा सामर्थ्यवान श्रीगुरूंना प्रत्येक क्षणी आठवूया. इतकी वर्षे त्यांनी माझा सांभाळ केला, तर आता ते आपल्याला या परिस्थितीतूनही बाहेर काढणार नाहीत का ? आपण आपल्या सामर्थ्यशाली श्रीगुरूंवरील श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत श्रीगुरूंनी साधकांना अनेक संकटांमधून अलगदपणे बाहेर काढले आहे. यासाठी ‘आपला कृतज्ञताभाव कसा वाढेल ?’, हे पहायला हवे. सेवा करतांना कृतज्ञताभाव जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न करूया.

 

अर्धवेळ सेवा करणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

१. भान हरपून सेवा करूया !

आपल्याला जेवढा वेळ सेवेसाठी मिळाला आहे, त्या वेळेत मनापासून सेवा कशी करायची ? भान हरपून सेवा कशी करायची ?, असे आपल्याला वाटायला हवे. श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी केवळ साधकच नव्हे, तर चराचर सृष्टीही आतुर झाली आहे, तत्पर झाली आहे, हे आपण अनुभवलेच आहे. मग प्रत्यक्ष श्रीगुरूंनीच त्यांच्या सेवेसाठी आपल्याला आणले आहे, तर आपण किती भाग्यवान जीव आहोत ? आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार श्रीगुरूंच्या या कार्यात सहभागी होतच आहोत. प्रत्येक जण गुरुसेवेतील भरभरून आनंद घेत आहे.

२. आपण जेथे नोकरी करतो, तेथे काम म्हणून न
पहाता तीही गुरुसेवाच आहे या भावाने करण्याचा प्रयत्न करूया !

यापुढे आपल्याला जेवढा वेळ श्रीगुरूंनी दिला आहे, तेवढा वेळ मनापासून गुरुसेवा करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. श्रीगुरूंच्या कृपेने मिळालेला प्रत्येक क्षण गुरूंना अर्पण करून आपल्या सेवेची आणि वेळेची फलनिष्पत्ती वाढवण्याचा प्रयत्न करूया. आपल्यातील भावामुळे ती फलनिष्पत्ती वाढणार आहे. त्यागात मिळणार्‍या आनंदामुळे आपल्या मनाला सतत सेवा करूया असे वाटत असते; परंतु काही अडचणींमुळे आपल्याला हे शक्य होत नाही. अशा वेळी आहे ती स्थिती स्वीकारून मिळालेल्या सेवेतून आनंद घेऊया. आपण जिथे नोकरी करतो, तिथे पहाण्याचा दृष्टीकोन पालटायला हवा. तिथे काम म्हणून न पहाता तीही गुरुसेवाच आहे या भावाने करण्याचा प्रयत्न करूया.

 

प्रसारातील सेवा अथवा प्रसारात
पूर्णवेळ सेवा करणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

१. मनावर नामाचा संस्कार करणे

गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या मनावर कृतज्ञतेचा संस्कार बिंबवण्याचा हा दिवस आहे. तो संस्कार आपल्या मनावर कसा होणार ? त्यासाठी काय करायला हवे ?, ते आपण आता पाहूया. नामजपाचे उदाहरण पाहूया. आपण नामजप करत असतो, तेव्हा आपला नामजप होत नाही. त्याचा आपल्याला विसर पडतो किंवा तो प्रयत्नपूर्वक करायला लागतो. मग आपण जपमाळ अथवा काऊंटर घेऊन पुटपुटत जप करतो. असे नियमितपणे केल्याने आपला जप सातत्याने होऊ लागतो. पुढे पुढे नामाचा विसर न पडता आपोआप जप व्हायला लागतो. त्याही पुढे जाऊन सेवा किंवा कोणतीही कृती करत असतांना आपल्या लक्षात येते की, आपला जप चालू आहे. सातत्याने प्रयत्न केल्याने आपल्या मनावर नामाचा संस्कार होतो.

२. प्रत्येक कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे

त्याचप्रमाणे कृतज्ञतेचा संस्कार आपल्या मनावर होण्यासाठी या क्षणापासूनच आपल्याला आरंभ करायचा आहे. काहींनी प्रयत्न चालू केले असतील, तर त्यांना गती द्यायची आहे. प्रत्येकच कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या गुरुपौर्णिमेचे नियोजन या व्यापक अशा श्रीविष्णूनेच केले आहे. पृथ्वीवरील जिवांपर्यंत तोच आपल्याला नेणार आहे.

३. भगवंताने दिलेली कृतज्ञता पुष्पे समवेत घेऊन प्रसाराला जाऊया !

प्रसारात जाण्यासाठी आपल्याला चैतन्यमय अशी सात्त्विक उत्पादने, नियतकालिके, ग्रंथ हे सर्व दिले आहे. त्याच वेळी त्यांनी आपल्याला आणखी काय दिले आहे ? आपल्याला ब्रह्मांडनायक श्रीविष्णूने या भावसत्संगाच्या माध्यमातून पुष्कळ सुंदर अशी कृतज्ञता पुष्पे दिली आहेत. ती कृतज्ञता पुष्पे घेऊनच आपल्याला सेवेसाठी बाहेर पडायचे आहे, कृतज्ञता पुष्पे न विसरता घेऊन जाऊया, नाहीतर कर्तेपणा लगेच जागृत होईल. भगवंताने आपल्याला असंख्य, न संपणारी फुले दिली आहेत.

४. सेवेअंतर्गत प्रत्येक सूत्र झाल्यावर कृतज्ञता पुष्पे देवाच्या चरणी अर्पण करूया !

भगवंताने ईश्‍वराची स्तुती समाजाला सांगण्यासाठी आपली निवड केली. प्रसारात एका घरात माहिती सांगून झाली की, आपल्याला कृतज्ञता पुष्पे अर्पण करायची आहेत. सेवेअंतर्गत प्रत्येक सूत्र झाल्यावर, वितरण झाले, काही अर्पण मिळाले की, लगेच आपल्याला कृतज्ञता पुष्पे देवाच्या चरणी अर्पण करायची आहेत. जे जे साहित्य, उत्पादने आपल्याला साहाय्य करत असतात, त्यांनाही आपल्याला ही फुले अर्पण करायची आहेत.

५. ही कृतज्ञता पुष्पे जेवढ्या भावाने आपण
अर्पण करू, तेवढा तेथे ईश्‍वराचा दैवी सुगंध दरवळणार आहे !

कृतज्ञता पुष्पे भगवंताच्या चरणी अर्पण केल्यावर दरवळणारा दैवी सुगंध आपल्यातील आत्म्याला स्पर्श करून आपल्यातील कृतज्ञताभाव वाढणार आहे. श्रीविष्णूने दिलेले ही दैवी कृतज्ञतेची पुष्पे आपण अर्पण न करता स्वतःजवळच ठेवली, तर ती फुले कोमेजतील. ती स्वकोश आणि स्वविचार यांत अडकून रहातील. आपल्याला ही फुले कोमेजू द्यायची नाहीत, असे वाटत असेल, तर ती फुले टवटवीत रहाण्यासाठी एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे ती फुले भगवंताच्या चरणी अर्पण करणे.

६. येणार्‍या प्रत्येक प्रसंगात स्थिर राहून
ते स्वीकारूया आणि तेथेही कृतज्ञता पुष्पे अर्पण करूया !

एखाद्याच्या जीवनात गुरु येतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काहीच वाईट घडत नाही. जे काही घडते, ते शिष्याच्या केवळ हितासाठीच घडत असते. प्रसाराला जातांना आपल्या समवेत सहसाधक असो वा नसो, तरी प्रसाराला जाण्यातच आपले हित आहे. हे नियोजनही श्रीविष्णूनेच केलेले आहे, या भावाच्या स्तरावर राहून जी काही परिस्थिती आपल्यासमोर येईल, जे काही प्रसंग आपल्यासमोर येतील, त्यांमध्ये तसेच स्थिर राहूया, त्यांना स्वीकारूया आणि तेथेही आपण कृतज्ञता पुष्पे अर्पण करूया.

७. प्रसाराला जातांना भाव कसा ठेवावा ?

अ. प्रसाराला जातांना ‘प्रसार म्हणजे गुरुचैतन्याचा प्रसार करायचा आहे’, हा भाव मनात ठेवून आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचूया.

आ. ‘प्रत्येक घरापर्यंत गुरूंचे चैतन्य आणि गुरूंची महती (कार्याची महती, अवतारत्वाची नव्हे) सांगायची आहे’, या भावाने जाऊया.

इ. श्रीगुरु अवतारी रूपात सार्‍या सृष्टीचा उद्धार करण्यासाठी आले आहेत. आपल्या सर्वांना हे समजू लागले आहे. हेच आपल्याला समाजाला समजावण्यासाठी एक दूत बनून जायचे आहे.

ई. गुरूंची ही महती विश्‍वभर पोहोचवण्यासाठी गुरूंनी आपल्याला माध्यम केले आहे. हा कृतज्ञताभाव ठेवून जाऊया.

उ. गुरूंनी आपल्याला प्रसारात जातांना त्यांचे चैतन्य आणि त्यांचा ज्ञानाचा ठेवा आपल्याला समवेत दिला आहे. त्यांनी दिलेला हा मोलाचा ठेवा समाजाला जागृत करण्यासाठी आपण अत्यंत कृतज्ञताभावाने समवेत घेऊन जाऊया.

ऊ. प्रत्येक जिवाला आपण जी काही माहिती सांगणार आहोत, आपण ग्रंथ आणि उत्पादने दाखवणार आहोत, ती अत्यंत नम्रपणे, गुरूंप्रतीच्या भावाने ओतप्रोत भरलेल्या वाणीने दाखवूया.

ए. ज्या भगवंताने सृष्टीची निर्मिती केली, त्याच्या चरणी सर्वस्व अर्पण करायचे आहे. श्रीगुरूंच्या कृपेने आपल्याला ‘त्यागामध्ये काय आनंद आहे’, ते कळलेलेच आहे. तो आनंद समाजाला कळावा, यासाठी आपण त्यांना गुरूंच्या कार्यासाठी अर्पण देण्याचे महत्त्व सांगूया.

८. समाजात प्रसाराला जातांना अनुसंधान कसे साधता येईल ?

अ. प्रसाराला समाजात गेल्यावर प्रत्येक प्रसंगात मन स्थिर आणि श्रीगुरूंच्या अनुसंधानात ठेवावे !

हे सांगत असतांना काही ठिकाणी आपल्याला चांगले अनुभव येतील, तर काही ठिकाणी कटू अनुभव येतील. या प्रत्येक प्रसंगात आपले मन स्थिर आणि श्रीगुरूंच्या अनुसंधानात राहील, यासाठी प्रयत्न करूया.

आ. श्रीकृष्णाला भेटण्यासाठी सुदामा ज्या आर्ततेने आणि व्याकुळतेने गेला, तो भाव मनी बाळगूया !

आपल्या सर्वांना द्वापरयुगातील एक गोष्ट ठाऊक आहे. श्रीकृष्णाचा परम मित्र असलेला सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जातांना त्याला अनेक अडथळे आले. आताच्या कलियुगामध्येही भगवंताकडे जाण्यात अनेक अडथळे आहेत. भगवंताकडे घेऊन जाणार्‍या आपल्या सेवेमध्येही अनेक अडथळे येतील. सुदाम्यामध्ये व्याकुळता होती, त्यामुळे त्याचा श्रीकृष्णसखा त्याच्या भावभेटीसाठी सारे काही विसरून धावत आला होता. तीच व्याकुळता, तीच आर्तता आपण आपल्या मनात ठेवूया. ही आर्तता वाढल्यावर आपल्या मनात आनंदस्वरूप भगवंत हळूच येणार आहे. त्याचे ते आनंदस्वरूप अस्तित्व भरभरून घेऊया.

इ. मध्येमध्ये कृतज्ञता व्यक्त करूया !

प्रत्येक जिवापर्यंत जात असतांना आपल्याला देह, मन, बुद्धी आणि वाणी या गुरूंच्या चरणी झिजवण्याची संधी मिळाली आहे. आपल्या उद्धारासाठी मिळालेल्या या संधीबद्दल आपण सेवा करतांना मध्येमध्येे कृतज्ञता व्यक्त करूया.

ई. आपल्याकडून झालेल्या प्रत्येक सेवेचे कर्तेपण श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करूया !
उ. दिवसभरातील केलेल्या सेवेचे चिंतन करूया !

दिवसभरात श्रीगुरूंनी आपल्याकडून जी काही सेवा करवून घेतली, त्यासाठी अखंड कृतज्ञताभावात राहूया. सेवा संपल्यावर आश्रमात, सेवाकेंद्रात किंवा घरी येऊन दिवसभरातील प्रसंगांमध्ये आपल्याला कसा आनंद मिळाला, प्रत्येक प्रसंगाने आपल्याला कसे घडवले, याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करूया.

 

आश्रमात अथवा सेवाकेंद्रात राहून
पूर्णवेळ सेवा करणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

आश्रमात पूर्णवेळ रहाणार्‍या साधकांनी भाव ठेवून भगवंताला कसे अनुभवायचे, हे आता आपण बघूया.

१. भगवंताने साधकांना सर्व सोयींनी युक्त आश्रम देणे

भगवंताने साधकांना साधना करण्यासाठी या घोर कलियुगातही चैतन्यमय आश्रम आणि सेवाकेंद्रे निर्माण केली आहे. या आपत्काळात भगवंताने आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून भगवंताने साधकांच्या उद्धारासाठी चैतन्याचे पवित्र व्यासपीठ दिले आहे. या पवित्र अशा व्यासपिठाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने कृती करूया.

२. सहसाधक

त्याच वेळी भगवंताने आपल्याला सहसाधक दिले. ‘साधक म्हणजे गुरूंचे रूप’, हा भाव ठेवून त्यांच्याविषयी कोणताही पूर्वग्रह, कोणतीच अपेक्षा न ठेवता त्यांच्याशी बोलूया. साधकांप्रती मनात सकारात्मकता ठेवून त्यांच्याशी बोलूया.

३. संत

आपल्याला आश्रमात संतांचा सहवास मिळतो. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळते. त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. या कलियुगात संतांचे दर्शन होणे किती कठीण असते; पण आपल्याला देवाने हे किती सहज उपलब्ध करून दिले, यासाठी मनात कृतज्ञता वाढवूया. दिवसभर त्यांचे चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना वाढवूया.

४. वस्तू

या आश्रमामध्ये गुरुदेवांनी आपल्याला सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्याच वस्तूची, कोणत्याच गोष्टीची कधीही आपल्याला उणीव भासू दिली नाही. त्यामुळे त्या वस्तू कृतज्ञताभावाने आणि काळजीपूर्वक हाताळूया.

 

प्रत्येक क्षणी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया !

प्रत्येक साधकाने आपल्यावर श्रीगुरुमाऊलीची जी कृपा आहे, त्या कृपेचे स्मरण करावे. ‘आपण आधी कसे होतो आणि श्रीगुरूंनी आपल्यात किती परिवर्तन केले आहे’, याची आठवण करूया. त्यांच्याप्रती प्रत्येक क्षणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया.

– सौ. कीर्ती जाधव, कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, कु. योगिता पालन, कु. वैष्णवी वेसणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१७)

Leave a Comment