भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कुठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ?

 

तेव्हाचा भारत आणि आजचा भारत !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे. जेमतेम १० ते २० परदेशी कंपन्या असणारा भारत आज ५,००० हून अधिक परदेशी कंपन्या उरावर वागवत आहे. एकही संवेदनशील जिल्हा नसलेल्या भारतात आज ३०० हून अधिक जिल्हे संवेदनशील झाले आहेत. प्रत्येक नागरिकामागे एक-दोन गायी असे प्रमाण असणारा भारत अनिर्बंध गोहत्येपायी आज १२ व्यक्तींमागे एक गाय बाळगतो आहे. परदेशात जाऊन अत्याचारी कर्झन वायली, ओडवायर अशांना ख्रिस्तसदनी पाठवणार्‍या भारताने आज संसदेवर आक्रमण करणार्‍या अफझलला फाशी द्यायला १३ वर्षे घेतली !

देशाभिमान जागृत असलेला भारत ते देशाभिमान गहाण टाकलेला भारत, भ्रष्टाचार निचांकावर असलेला भारत ते भ्रष्टाचाराच्या उच्चांकापर्यंत पोहोचलेला भारत, अटकेपार झेंडा रोवणारा भारत ते ‘काश्मीर हातातून आज जातोय कि उद्या’, याची वाट पहाणारा भारत… ही सूची लिहितांनाही मन आक्रंदत आहे; पण ‘जनाची सोडाच, मनाचीही लाज’ न बाळगणारे राज्यकर्ते मात्र वर तोंड करून सर्वत्र मिरवत आहेत. मुसलमान आक्रमक आणि धूर्त ब्रिटीश यांनीही भारतीय जनतेला जेवढे नागवले नाही, त्याच्या शतपटीने लोकशाहीने दिलेल्या शासनकर्त्यांनी अवघ्या ६ दशकांत येथील जनतेला नागवले, हे ठळक सत्य आहे.

‘लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकांचे शासन’, ही लोकशाहीची व्याख्या भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या देशासाठी मात्र ‘स्वार्थांधांनी स्वार्थासाठी निवडून दिलेले स्वार्थी शासनकर्त्यांचे शासन’, अशी झाली आहे. काहींच्या मनात शंका उत्पन्न होईल की, ‘हिंदु राष्ट्रा’त तरी समस्या कशा काय सुटतील ? असे इतिहासात तरी कधी घडले आहे का ? अशांनी हे समजून घ्यावे की – होय, इतिहासात असे घडले आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र (हिंदवी स्वराज्य)’ स्थापन होताच त्या वेळच्या अशाच समस्या दूर झाल्या होत्या !

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’स्थापन होताच सर्व ठीकठाक !

आजच्यासारखेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीही हिंदु स्त्रियांचे शील सुरक्षित नव्हते, प्रत्यक्ष जिजामातेच्या जाऊबाईंनाच पाणवठ्यावरून यवन सरदाराने पळवून नेले होते. त्या काळी मंदिरे भ्रष्ट केली जात होती आणि गोमातेच्या मानेवर कसायाचा सुरा कधी फिरेल, हे सांगता येत नसे. महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होताच मंदिरे पाडणे थांबले एवढेच नव्हे, तर मंदिरे पाडून उभ्या केलेल्या मशिदींचे पूर्ववत् मंदिरांत रूपांतर झाले. डोळ्यांतून मूकपणे आसवें गाळणार्‍या गोमाता आनंदाने हंबरू लागल्या. ‘गोहत्या बंद करा !’, अशा मागणीसाठी शासनाकडे लाखो स्वाक्षर्‍या गेल्या नाहीत कि महाराजांनींही एखादे ‘गोहत्या प्रतिबंधक विधेयक’ मंत्रीमंडळात मांडले नाही. केवळ ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हिंदुद्वेष्ट्यांच्या उरात धडकी भरवायला पुरेशी ठरली ! आज आपल्याला महागाई दिसते. ‘महाराजांच्या सत्ताकाळात महागाईने प्रजा भरडून निघाली होती’, असे कधी वाचले आहे का ? ‘जय जवान, जय किसान’ची घोषणा करणारे शासनकर्ते आज जवान आणि किसान या दोघांनाही कुत्र्याच्या मोलाने मरू देत आहेत. महाराजांना तर शेतकर्‍यांचे प्राणच नव्हेत, तर त्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपालाही मोलाचा वाटत होता. ‘शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये’, अशी आज्ञाच त्यांनी केली होती. महाराजांनी ‘किसानां’च्या बरोबरीने ‘जवानां’चीही काळजी घेतली होती. लढाईत घायाळ झालेल्या अनेक सैनिकांना पुरस्कारासह सोन्याचा अलंकारही देऊन ते सन्मानित करीत. कारगील लढाईत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या विधवांसाठी वर्ष २०१० मध्ये ‘आदर्श’ सोसायटी बांधली गेली; पण तिच्यात एकाही सैनिकाच्या विधवेला सदनिका (फ्लॅट) मिळाली नाही. भ्रष्टासुरांनीच त्या सर्व सदनिका लाटल्या ! याउलट महाराजांनी तर सिंहगडच्या लढाईत कामी आलेल्या तानाजीच्या पुत्राचा विवाह लावून देऊन त्याच्या कुटुंबियांची काळजी घेतली !

 

भारतासमोरील बाह्य समस्याही ‘हिंदु राष्ट्रा’त सुटतील !

‘हिंदु राष्ट्रा’त अंतर्गत समस्या सुटतील, तशाच बाह्य समस्याही सुटतील. बाह्य समस्यांमध्ये पाकिस्तान आणि चीन यांचे भारतावर केव्हाही होऊ शकणारे आक्रमण, ही मुख्य समस्या आहे. शिवकाळातही अशीच स्थिती होती. औरंगजेब ‘सिवा’चे टीचभर राज्य बुडवण्यासाठी टपून बसला होता; मात्र ‘महाराजांना राज्याभिषेक होऊन ‘हिंदु राष्ट्रा’ची विधीवत् स्थापना झाली’, हे ऐकूनच तो हादरला ! त्यानंतर पुढे महाराज स्वर्गारोहण करीपर्यंत तो केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिणेतही उतरला नाही ! एकदाका ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना झाली की, आपले सर्व शेजारी सुतासारखे सरळ होतील !

 

‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?

‘हिंदु राष्ट्रा’चा विषय निघाला की, एक फाजील प्रश्‍न तथाकथित निधर्मीवाद्यांकडून विचारला जातो, तो म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?’ खरे म्हणजे हा प्रश्‍न मुसलमानांना पडायला हवा. त्यांना तो पडत नाही. ते ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान !’ असेच म्हणत रहातात. अर्थात् या प्रश्‍नालाही उत्तर आहे. आगामी ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांनाच नव्हे, तर सर्वच पंथियांना शिवशाहीत दिली गेली, तशीच वागणूक मिळेल !

थोडक्यात, सूर्य उगवण्यापूर्वी सर्वत्र काळोख दाटून राहिलेला असतो, भूमीवर विसर्जित केलेल्या मल-मूत्राचा दुर्गंध येत असतो; परंतु सूर्य उगवताच काळोख आपोआपच नष्ट होतो, सर्व दुर्गंध वातावरणात विरून जातो. काळोखाला किंवा दुर्गंधाला कोणी सांगत नाही की, ‘दूर जा, सूर्य उगवतो आहे !’ आपोआपच हे सारे घडते. त्याचप्रमाणे आज भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख आणि दुर्गंध ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होताच नष्ट होईल. धर्माचरणी राज्यकर्त्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल !

 

एकट्यादुकट्या समस्येच्या विरोधात लढण्यापेक्षा ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे आवश्यक !

केवळ भारतातीलच लोकांसाठी नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी स्थापन करावयाचे ‘हिंदु राष्ट्र’ मात्र आपोआप स्थापन होणार नाही. पांडवांना केवळ पाच गावे हवी होती, तीही त्यांना सहजासहजी मिळू शकली नाहीत. आपल्याला तर काश्मीर ते कन्याकुमारी असे अखंड ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे. यासाठी अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतासमोरील एकट्यादुकट्या समस्येच्या (उदा. गोहत्या, धर्मांतर, गंगेचे प्रदूषण, काश्मीर, राममंदिर, स्वभाषारक्षण) विरोधात स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा सर्व समविचारी व्यक्ती आणि संस्था यांनी मिळून ‘हिंदु राष्ट्र स्थापना’ हेच ध्येय बाळगून कृती केली, तर हा लढा थोडा सुकर होईल. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, प.पू. गोळवलकर गुरुजी अशा हिंदु धर्मातील थोर-थोर पुरुषांनी चिंतिलेले असे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य हिंदुत्वनिष्ठांना मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

 

हिंदु धर्मातील चैतन्याचे वास्तव विरोधकांना निपचित करणारे !

संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था आणि श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

‘हिंदु राष्ट्र’ हे मागासवर्गीय विरोधी असून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू केली जाणार, हा मिथ्यारोप !

श्री. चेतन राजहंस

वास्तव : काही राजकीय पक्षांनी ‘देशात ‘हिंदु राष्ट्र’ आल्यास ते मागासवर्गीय विरोधी असून त्यामुळे देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू केली जाणार आहे’, असा खोटा प्रचार चालू केला आहे. संविधानातील कोणतीही सुधारणा संसदेत मान्य व्हावी लागते. अयोग्य सुधारणेविषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका करता येते. त्यामुळे कोणतीही सुधारणा सद्यस्थितीत होणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या मूळ संकल्पनेतच धर्म कोणाचेही शोषण करणारा नसून तो सर्व प्राणिमात्रांच्या हितासाठीच कार्यरत असण्याचा उल्लेख आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘मला अभिमान आहे की, मी अशा एका संस्कृतीतून आलो आहे, जेथील संस्कृत भाषेत ‘बहिष्कार’ शब्दासाठी कोणताही पर्यायी किंवा समानार्थी शब्द नाही.’ संत तुलसीदास म्हणतात, ‘परहित सरिस धरम नही भाई । पर पीडा सम नही अधमाई ॥’ अर्थात ‘दुसर्‍याला दुःख देणे, सर्वांत मोठा अधर्म, तर दुसर्‍याला सुख देण्यासारखा मोठा धर्म नाही.’ हिंदु धर्मात जन्माधारित वर्णव्यवस्था नसून गुण-कर्माधारित असल्याचे भगवंताने गीतेत सांगितले आहे. यजुर्वेदात म्हटले आहे, ‘‘हे भगवंता, आम्हा ब्राह्मणांत, क्षत्रियांत, वैश्यांत, तसेच शूद्रांमध्ये ज्ञानाची ज्योत प्रदान करा. मलाही सत्याचे दर्शन होण्यासाठी ती ज्ञानज्योत प्रदान करा.’’ स्वामी विवेकानंद ‘माझा भारत, अमर भारत’ या ग्रंथात म्हणतात, ‘भारतातील सर्व समाजसुधारकांकडून झालेली मोठी चूक म्हणजे त्यांनी काही स्वार्थी धर्ममार्तंडांच्या अयोग्य कृतीसाठी धर्मालाच उत्तरदायी ठरवले आणि धर्मालाच नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला. जातीभेदाला धर्माचे अंग मानून जातीभेदासह धर्मच नष्ट करण्याचा प्रयत्न राजाराम मोहन रायसारख्यांनी केला.’ यावरून हिंदु धर्मात कोणावरही अन्याय करण्याचे समर्थन नाही. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’त समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय करण्याचा विचारही नाही.

‘हिंदु राष्ट्रवादा’च्या तुलनेत ‘विकासवादी राष्ट्रवादा’ला श्रेष्ठ समजणे, हा भ्रम !

श्री. रमेश शिंदे

वास्तव : आजकाल ‘विकासवादी राष्ट्रवाद’ श्रेष्ठ समजले जात आहे. तसेच निवडणुकांमध्येही ‘विकासवादी राष्ट्रवादा’साठी मत देण्याचे आवाहन केले जात आहे. विकासवादी राष्ट्रवादामुळे रस्ते बनतील, ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘मेट्रो’ इत्यादी मिळेल; पण या विकासानंतर ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘मेट्रो’ यांमध्ये बलात्कार, विनयभंग घडणार असतील, तर तो विकास आम्हाला हवा आहे का ? सीतेचे अपहरण करणारी रावणाची सोन्याची ‘लंका’ही आजची ‘स्मार्ट सिटी’ होती. आम्हाला तशी ‘स्मार्ट सिटी’ हवी आहे का ? धर्म ही अशी गोष्ट आहे की, जी काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपूंवर विजय मिळवण्यास शिकवते. त्यामुळे धर्मासह विकास नैतिक असतो, तर धर्माविना म्हणजेच अधर्मी विकास अनैतिक ठरतो. धर्म पर्यावरणपूरक असतो, म्हणून धर्माविना विकास पर्यावरणाचा विध्वंस करतो. आजकाल प्राचीन मंदिरे पाडून विकास केला जात आहे. आम्हाला मूर्तीभंजक गझनीचा विकास नको, तर मंदिर आणि तीथर्र्क्षेत्रे यांचे संवर्धन करणार्‍या अहल्याबाई होळकर यांचा विकास हवा आहे; कारण या विकासात धर्म आहे, म्हणून नैतिकता आहे. त्यामुळे त्यात पर्यावरण संरक्षण आहे आणि भ्रष्टाचारही नाही ! धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे तो आनंददायी नाही. ज्या दिवशी तो ‘विकासवादी हिंदु राष्ट्रवाद’ होईल, त्या दिवशी भारतीय मन विकासामुळे आनंदित होईल आणि खरोखरंच भारताला ‘अच्छे दिन’ येतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment