परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार म्हणण्यामागील शास्त्र जाणून न घेता त्यांच्यावर टीका करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘१८ आणि १९ मे या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. त्या वेळी त्यांनी महर्षींच्याच आज्ञेने श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते. या सोहळ्यावर काही बुद्धीप्रामाण्यवादी टीका करत आहेत. वास्तविक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःला ‘अवतार’ म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनीच सांगितले आहे. नाडीभविष्य हे एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे. लक्षावधी वर्षांपूर्वी सप्तर्षींनी शिव-पार्वती यांच्यातील संवाद ऐकला आणि तो नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून शब्दबद्ध केला. तमिळ भाषेत असलेल्या अशा अनेक नाडीपट्ट्या आजही तमिळनाडू, तसेच अन्यत्रही उपलब्ध आहेत. अनेकांची त्यावर श्रद्धा आहे. साधकांची महर्षींवर श्रद्धा असल्यानेच साधक त्यांचे आज्ञापालन करत आहेत.

यापूर्वीही अनेक शिवावतारी, तसेच दत्तावतारी संत होऊन गेले आहेत. दत्तावतारी संत प.प. टेंब्येस्वामी महाराज, अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ, स्वामी दत्तावधूत यांना ‘दत्तावतार’ म्हणून तसेच शिवावतार म्हणून कोल्हापूरचे प.पू. शामराव महाराज यांना समाजाने आदराचे स्थान दिले. त्यांच्या अवतारत्वाविषयी त्या काळी त्यांचे भक्त, तसेच समाजातील अनेक जणांना अनुभूती आल्या आणि आताही येत आहेत. त्या अवतारांप्रमाणेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाही ‘श्रीविष्णूचे अवतार’ म्हणून संबोधले जात आहे. त्यांच्या अवतारत्वाविषयी अनेक साधक आणि धर्माभिमानी यांना अनुभूतीही येत आहेत.

अध्यात्माच्या क्षेत्रात अमूल्य कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा आहे. त्यांनी साधना सांगून सहस्रो साधकांचे जीवन आनंदी केले. ‘अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यासाठी ते या वयातही रात्रंदिन प्रयत्नरत आहेत; मात्र शास्त्र जाणून न घेता त्यांच्यावर टीका करणे, म्हणजे स्वतःचे अध्यात्माच्या क्षेत्रातील अज्ञान प्रकट करण्यासारखेच आहे.

प.पू. डॉक्टरांना महर्षींनी ‘अवतार’ म्हणण्यामागचे शास्त्र

‘एखाद्या संतांना एखाद्या ‘देवतेचा अवतार’, उदा. ‘दत्तावतार’ म्हटले जाते, तेव्हा संबंधित देवतेचे तत्त्व त्या व्यक्तीमध्ये अधिक प्रमाणात असते. माझ्या व्यष्टी साधनेत श्रीकृष्णाची आणि समष्टी साधनेत (रामराज्याची म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्यामुळे) श्रीरामाची उपासना असल्यामुळे माझ्यात विष्णुतत्त्व अधिक प्रमाणात आहे. (मला गुरुमंत्रही ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा मिळाला आहे.) त्यामुळे मला नाडीभविष्याच्या भाषेत ‘विष्णूचा अवतार’ म्हटले आहे.

‘श्रीविष्णूचे दशावतार’ आणि महर्षींनी मला ‘अवतार’ म्हणणे यांतील मुख्य भेद म्हणजे विष्णूच्या दशावतारांत विष्णुतत्त्व खूप अधिक प्रमाणात आहे, तर माझ्यामध्ये ते अंशाअंशात्मक आहे. काही वेळा माझा उल्लेख ‘कृष्णावतार’ असाही करण्यात येतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या साधनेत गीतेतील ज्ञान, भक्ती आणि कर्म या योगांत सांगितलेली साधना आहे आणि तीही समष्टी कृष्णतत्त्व रूपात आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment