सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !

श्री. प्रकाश सुतार

एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच ! त्यांनी बांधकामाशी संबंधित सर्व बारकावे सांगून आम्हाला खर्‍या अर्थाने बांधकाम क्षेत्रात आध्यात्मिक स्तरावर घडवले.

 

१. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्यास शिकवणे

‘पूर्वी एखादी वस्तू बनवतांना त्यासाठी मला नवीन आणि चांगले साहित्य वापरायला आवडायचे. मी आश्रमात आल्यावर आपल्याकडे विविध प्रकारची जुनी लाकडे आणि प्लायवूड अर्पण यायचे. प.पू. डॉक्टरांनी ‘त्यांतून वस्तूंतून चांगले कसे करू शकतो’, हे शिकवले.

 

२. साहित्याचा योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी उपयोग करण्यास शिकवणे

आपल्याकडे लाकडे आहेत; म्हणून ती कशीही वापरली, तर त्यातून आपली साधना होणार नाही. योग्य लाकूड योग्य ठिकाणीच वापरले गेले पाहिजे. न्यूनतम साहित्याचा उपयोग करून चांगली वस्तू बनवता आली पाहिजे. हा दृष्टीकोन देऊन तशी कृती करवून घेतली.

रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू असतांना त्यासंदर्भात जाणून घेतांना प.पू. डॉक्टर आणि समवेत श्री. श्रीहरी मामलेदार
गुरुपौर्णिमेच्या वेळी केळीच्या खोडाच्या मखरातील बारकावे सांगतांना १. परात्पर गुरु डॉ. आठवले, २. श्री. प्रकाश सुतार
बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून साधकांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री. प्रकाश सुतार

अ. गिट्या (खिळ्याला आधार देण्यासाठी घालायचे छोटे लाकूड) बनवण्यासाठी मोठे आणि चांगले लाकूड वापरण्याऐवजी लाकडाचे छोटे तुकडे वापरू शकतो, हे त्यांनीच शिकवले.

आ. संगणकीय सेवा करणार्‍या साधकांना सेवेसाठी आसंदीवर बसल्यावर त्यांचे पाय खाली टेकत नाहीत, तर काही जणांना पाय खाली सोडून पुष्कळ वेळ बसावे लागल्याने पाय दुखतात. अशा साधकांना पायाखाली पायथळ लागते. ते कसे असावे ? ते शिल्लक साहित्यातून कसे सिद्ध करू शकतो ? हे त्यांनीच आम्हाला शिकवले.

इ. काम झाल्यावर जळाऊ लाकूड आम्ही बंबाकडे पाठवायचो. त्या वेळी ते आम्ही पाठवलेली सर्व लाकडे पडताळून त्यात चांगले लाकूड गेले नाही ना, हे पहायचे. त्यांच्या या कृतीमुळे पुढे जळाऊ लाकडे पाठवतांना ती पडताळून मगच पाठवण्याची आमची वृत्ती बनली.

 

३. साहित्य योग्य प्रमाणात वापरण्यास शिकवणे

चौकटीला दार लावतांना आम्ही बिजागिरे (हिंजिस) लावली. ते पाहून प.पू. डॉक्टरांनी आम्हाला विचारले, ‘‘दाराला सर्वसाधारण किती बिजागिरे लावतात ?’’ मी सांगितले, ‘‘तीन.’’ त्यांनी आम्हाला चुकीची जाणीव करून दिली. प्रत्येक दाराला एक याप्रमाणे किती बिजागिरे अनावश्यक वापरली गेली असती, हे त्यांनी सांगितले.

 

४. साहित्याची काळजी घेण्यास शिकवणे

पूर्वी प.पू. डॉक्टर प्रतिदिन सकाळी बांधकाम विभागात यायचे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलेल्या त्रुटी ते आम्हाला सांगायचे.

अ. खोल्यांना दारे लावतांना आम्ही दार भूमीवर खालीच आडवे ठेवायचो. प.पू. डॉक्टरांनी ते पाहिल्यावर आम्हाला सांगितले, ‘‘दार खाली ठेवल्याने पाणी लागून भिजल्याने ते खराब होऊ शकते. त्याच्या खाली काही तरी घालावे. शक्य असल्यास उभे करून ठेवावे.’’

आ. रंग देतांना वस्तू आणि भूमी यांवर रंग पडतो. त्यामुळे तो स्वच्छ करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. भूमीवर कागद किंवा प्लास्टिक अंथरल्यास खाली पडलेला रंग स्वच्छ करण्यात पुन्हा वेळ जाणार नाही. तसेच वापरात नसणार्‍या वस्तू झाकून ठेवल्यास धूळ बसून त्या स्वच्छ करण्यात वेळ वाया जाणार नाही.

 

५. अल्प व्ययात चांगली सेवा करण्यास शिकवणे

दाराला कड्या लावतांना त्या कुठे आणि कशा प्रकारे लावाव्यात, याचा आमचा अभ्यास नव्हता. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला तो करायला शिकवले. अशा व्यावहारिक छोट्या-छोट्या कृती आणि त्यानुसार आवश्यक त्या सोयी कशा करायच्या, हे प.पू. डॉक्टरांनी शिकवले. असे केल्याने व्ययही अल्प होतो, हेही शिकायला मिळाले.

अ. आपण दाराला बाहेरून मोठे कुलूप लावतो. त्यामुळे बाहेरच्या बाजूला मोठी कडी लावावी. आतून कुलूप लावत नसल्याने लहान कडी चालू शकते. आगाशीच्या दाराला बाहेरून कडी लावत नाही. त्यामुळे त्या दाराला बाहेरून कडी लावण्याची आवश्यकता नाही.

आ. ‘पडद्यासाठी दांडी (‘कर्टन रॉड’) लावतांना ‘ती किती अंतरावर लावायची ? किती लांबीची असावी ?’ याचाही प.पू. डॉक्टरांनी अभ्यास करवून घेतला. पडद्यासाठीच्या दांडीची लांबी खिडकीच्या दोन्ही बाजूंना न्यूनतम ६ ते ८ इंच अधिक असावी. त्यामुळे बाहेरून आतले दिसणार नाही. ही दांडी खिडकीच्या ३ इंच वर असावी.

इ. पडदा शिवतांना रुंदीला एकूण मापाच्या ३० प्रतिशत कापड अधिक ठेवावे आणि उंचीला एकूण मापापेक्षा ८ इंच अधिक कापड ठेवावे. त्यामुळे पूर्ण खिडकी झाकली जाते.

ई. संगणक पटल बनवतांना प्रत्यक्ष सेवा करणार्‍या साधकांचा विचार करून ‘संगणकावर सेवा करणे सोयीचे कसे होईल’, असा विचार आमच्याकडून होत नव्हता. पटलाची उंची, तसेच कळफलकाची (कीबोर्डची) उंची यांविषयीही प.पू. डॉक्टरांनी आम्हाला शिकवले.

 

६. सेवेतील बारकावे शिकवणे

६ अ. मनाची ऊर्जा वाचवण्यास शिकवणे

प्रत्येक सेवांची सूची करायला प.पू. डॉक्टरांनी शिकवले. त्यामुळे सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी मनाची ऊर्जा व्यय होत नाही. सेवा झाल्यानंतर सूचीवर खूण करायची. असे केल्याने सेवेची व्याप्ती, लागणारे साहित्य, निरोप ही सूत्रे  अंतर्भूत होतात. त्यामुळे मनाची ऊर्जा वाचून सेवा परिपूर्ण होते.

६ आ. अभ्यास करण्यास शिकवणे

एखाद्या नकाशामध्ये काही न्यून राहिल्यास ते आम्हाला सांगायचे, ‘‘अजून अभ्यास करा.’’ त्यामुळे ‘सेवा कशी करायची ? त्याचा वापर कसा होणार ? त्याला काय साहित्य लागणार ? किती पैसे लागणार ? ती वस्तू किती टिकणार ?’, असा अभ्यास करायची सवय लावली.

६ इ. नियोजन करण्यास शिकवणे

ते आमच्या प्रत्येक सेवेचे नियोजन पहायचे. त्यात ‘प्राधान्यक्रमाने कोणती सेवा करायची ? प्राधान्य कसे ठरवायचे ? आश्रमातील खोल्यांची दारेे कशी लावायची ? साहित्य आत नेता यावे, यासाठी दार किती मोठे असावे ? उंच व्यक्तीला दाराची चौकट लागू नये, यासाठी चौकटीची उंची किती असावी ? या आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या.

६ ई. सात्त्विकतेचा विचार करण्यास शिकवणे

१. लाकडामध्ये सर्वांत अधिक सात्त्विक लाकूड चंदनाचे, नंतर सागवान, फणस इत्यादी. चंदनाचे लाकूड महाग असल्याने सर्वसामान्यांसाठी सागवान वापरणे योग्य. शक्य असल्यास घरासाठी सागवानाचा उपयोग करणे चांगले. हे शक्य न झाल्यास निदान घराची मुख्य चौकट आणि मुख्य दार सागवानी असावे. त्यातून घरात सात्त्विक स्पंदने येतात.

२. संगणकासाठी लागणारे साहित्य (हार्डवेअर साहित्य) खरेदी करतांना त्या वस्तूंचा आकार, त्यांचे माप, त्यांची नक्षी सात्त्विक असावी.

६ उ. सूक्ष्मातून अभ्यास करण्यास शिकवणे

‘एखादी चौकट सिद्ध करतांना कसा विचार करायचा ? त्याचे लाकूड कसे पहायचे ? त्यातून चांगली स्पंदने येण्यासाठी त्याचा आकार, त्याचे माप व्यवस्थित असण्याचे महत्त्व काय ?’, हे शिकवले. कागदावरील नकाशा पाहून त्यातील स्पंदनांचा अभ्यास करून त्याची सात्त्विकता ते टक्केवारीमध्ये सांगायचे.

६ ऊ. स्पंदनशास्त्राचा अभ्यास करण्यास शिकवणे

रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतील कडी लावण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या हाताने खूण करून दिली.

 

७. वस्तूंप्रती कृतज्ञता निर्माण करणे

एकदा ते म्हणाले, ‘‘झाड जिवंत असतांना औषधे, फळे आणि फुले देते. मेल्यानंतर त्या लाकडाचा उपयोग घर, तसेच फर्निचर आणि विविध वस्तू बनवण्यासाठी होतो. त्यातून राहिलेल्या लाकडाचा उपयोग जळणासाठी होतो. माणसाचा उपयोग जिवंत असेपर्यंतच होतो. मेल्यानंतर काहीच उपयोग होत नाही. त्याला जाळतात !’’ आमची सेवा लाकडाशी निगडित असल्याने लाकडांप्रतीही त्यांनी ‘कृतज्ञता कशी ठेवायला हवी’, हे शिकवले.

 

८. प्रत्येक कृतीतून साधना करण्यास शिकवणे

प्रत्येक सेवा करतांना ते म्हणायचे, ‘‘युद्ध जिंकायचे आहे.’’ त्यातून ‘प्रत्येक सेवा एक युद्ध असते. आपण नामजप, प्रार्थना आणि देवाशी अनुसंधान ठेवून ‘सेवा देवच करवून घेत आहे’, असा भाव ठेवला, तर ती देवाला आवडते, हे लक्षात आले. भावपूर्ण सेवा झाली की, ते म्हणायचे, ‘‘सेवा आवडली. छान सेवा केलीत. युद्ध जिंकलात !’’ त्यामुळे उत्साह वाटायचा. ते नेहमी म्हणायचे, ‘‘नुसती सेवा नको. त्यातून साधना होऊन साधनेची इमारत उभी राहिली पाहिजे.’’

 

९. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्यास शिकवणे

कलामंदिर, चित्रीकरण कक्ष (स्टुडिओ), अधिवेशन किंवा धर्मसभा असो, सर्व ठिकाणी सेवा कशी अपेक्षित आहे, ते त्यांनी शिकवले. भावाची दृष्टीही त्यांनीच निर्माण केली. सेवा कुठे, कशासाठी करतो, यानुसार त्यात पालट कसे करायचे, प्रत्येक साधकाच्या क्षमतेनुसार सेवा कशी करून घ्यायची, अशी सूत्रे त्यांनी आम्हाला कृतीतून शिकवली.

 

१०. ‘प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि अधिक योग्य
कशी करायची ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

अ. खाच असलेल्या लाकडी पट्टीच्या ‘मोल्डींग’पेक्षा सपाट ‘मोल्डींग’ लाभदायक असल्याचे सांगणे

‘एकदा एका खोलीतील खिडक्यांना काचा (फिक्स्ड ग्लास) बसवायच्या होत्या. त्या वेळी लाकडी पट्टी मारून काच बसवायची होती. आम्ही त्या पट्टीला ‘मोल्डींग’ मारले. तेव्हा त्या ‘मोल्डींग’ला खाच होती. ते पाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘यात कचरा, धूळ अडकणार. स्वच्छ करायला वेळ जाणार.’’ त्यावर आम्ही चिंतन करून दुसर्‍या लाकडी पट्टीला सपाट (प्लेन) ‘मोल्डींग’ केले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘याची स्पंदने छान वाटतात.’’

आ. चांगल्या लाकडाचे पायथळ (फूटरेस्ट) बनवल्यावर
‘तो साध्या लाकडाचा चालतो. खराब झाला, तर पालटू शकतो’, असे सांगणे

संगणक सेवेसाठी खुर्चीवर बसणार्‍यांना पाय ठेवायला पायथळ (फूटरेस्ट) हवे होते. ते चांगले दिसावे; म्हणून मी चांगल्या लाकडाचे बनवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘एवढे चांगले लाकूड दुसर्‍या चांगल्या कामाकरता वापरता येते. ‘फूटरेस्ट’ साधा चालतो. तो खराब झाला, तर पालटू शकतो.’’

इ. ‘वासे लावण्याची सेवा करतांना जाड पट्टी वापरून अधिक अंतरावर वासे बसवू शकतो’, असे सांगणे

छप्पर बनवायची सेवा होती. ‘त्याचे वासे कसे लावायचे ?’, ते ठरवले होते. तेव्हा ‘नेहमी वासे किती अंतरावर लावतात ?’, असे प.पू. डॉक्टरांनी विचारले. ‘१८ इंचांवर लावतो’, असे मी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण जाड पट्टी वापरली, तर वासे थोड्या अधिक रूंदीवर (अंतरावर) बसवू शकतो.’’ नंतर तसा अभ्यास करून वासे बसवले. त्यातून ‘आपण किती बारीक अभ्यास करायला हवा ?’, ते शिकायला मिळाले.

ई. प्रत्येक कृतीतून शिकवून घडवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक कृतीतून आम्हाला शिकवत होते. त्यातून आम्हाला घडवत होते. ‘खोलीची रचना, मांडणी कशी असायला हवी ?’, हेही त्यांनी आम्हाला शिकवले.’

– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

११. केवळ साधकांचा नव्हे, तर प्रत्येक जिवाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

अ. कामगारांसाठी सत्संग चालू करणे

‘आश्रमाच्या बांधकामासाठी काही ठिकाणाहून कामगारांना आणले जायचे. त्यांतील काही कामगार फार चांगल्या प्रकारे आणि परिपूर्ण सेवा करायचे. ‘परात्पर गुरु डॉक्टर संत आहेत’, हे कळल्यावर ते त्यांना भोळ्या भावाने नमस्कार करायचे. ‘काही कामगारांमध्ये फार चांगला भाव आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी हेरले आणि त्यानुसार त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांच्या कामाचा वेळ न्यून करून त्यांचा कन्नड सत्संग घेण्यास सुचवले, तसेच त्या कामगारांकडून अतिरिक्त कामाची अपेक्षा न करता सत्संग झाल्यावर त्यांना घरी जाऊ देण्यास सांगितले.

आ. कामगारांनाही खाऊ आणि सणाच्या वेळी गोड पदार्थ देणे

सत्संग चालू झाल्यावर अनेक कामगारांचा कृतज्ञताभाव वाढला. परात्पर गुरु डॉक्टरांनीही सत्संगातील कामगारांसाठी खाऊ पाठवून दिला. आश्रमात सण किंवा इतर काही सोहळे व्हायचे, त्या वेळी त्यांनी या कामगारांना आश्रमातच जेवण द्यायला सांगितले. कामगार पुष्कळ असतील आणि जेवण देणे शक्य नसेल, तर ते एखादा गोड पदार्थ देण्यास सांगत असत. यामुळे कामगारही त्यांना दिलेले काम सेवा म्हणूनच करत होते.

एकदा गुरुमाऊलीने मला सांगितले, ‘‘दोन दिवसांनंतर मकरसंक्रांत आहे. तेव्हा आश्रमातर्फे सर्व कामगारांना तिळाचे लाडू दे.’’ दोन दिवसांनी ‘‘कामगारांना लाडू दिले का ?’’, असे गुरुमाऊलीने मला विचारले. मी विसरलो होतो. गुरुमाऊलीने मला त्याची जाणीव करून दिली आणि माझी चूकही लक्षात आणून दिली. त्या वेळी ‘देवाचे सर्वांवर किती प्रेम असते !’, हे लक्षात आले. ’

– श्री. घनश्याम गावडे, रामनाथी, गोवा. (१६.५.२०१७)

इ. साधकांच्या बरोबरीने रात्री जागून त्यांना सेवेसाठी प्रोत्साहन देणारी गुरुमाऊली !

‘सनातनच्या रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू असतांना बांधकामाचे पुष्कळसे साहित्य रस्त्याच्या बाजूला आणि आश्रमाच्या तळमजल्यावर होते अन् सेवा तिसर्‍या माळ्यावर चालू होती. गवंड्यांना लागणारे सर्व साहित्य (चिरे, वाळू, सिमेंट, लाद्या) खाली असल्याने त्यांना काम करतांना अडचण येत होती; परंतु ‘आश्रमाचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे’, हेच सर्वांचे ध्येय असल्याने सर्वजण तिकडे दुर्लक्ष करत. या परिस्थितीत एकदा ‘रात्रभर सेवा करायची आणि साहित्य वर न्यायचे’, असे सर्वानुमते ठरवण्यात आले. सायंकाळी ७ वाजता बांधकाम विभागातील साधकांनी सेवा चालू केली. काही वेळाने इतर विभागांतील साधकही सेवेत सहभागी झाले. त्या वेळी गुरुमाऊली तिथे यायची आणि आम्हाला खाऊ द्यायची किंवा आमच्याशी काहीतरी बोलून जायची. तेव्हा आमचा उत्साह पुष्कळ वाढायचा आणि सेवा करायला आम्हाला शक्ती मिळायची.

अशा रितीने गुरुमाऊली स्वतः न झोपता अधून-मधून येऊन आमचा उत्साह वाढवत होती. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता आम्ही सेवा थांबवली. तेव्हा गुरुमाऊली येऊन म्हणाली, ‘‘आता सर्वजण विश्रांती घ्या.’’ संघटितपणे सेवा केल्यामुळे पुष्कळ साहित्यही तिसर्‍या माळ्यावर नेता आले. हे सर्व आम्ही गुरुमाऊलीच्या प्रेमामुळेच करू शकलो.’

– श्री. घनश्याम गावडे, रामनाथी, गोवा. (१६.५.२०१७)

 

१२. कृतज्ञता

एकदा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘दत्तगुरूंनी २४ गुरु केले, तसे आपण प्रत्येक कृतीतून शिकले पाहिजे.’’ त्यांनीच आमच्यात ‘मन लावून आणि उत्साहाने सेवा केली, तर त्यातून आपण शिकू शकतो’, हा दृष्टीकोन निर्माण केला. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करतांना त्यातून आमची साधना होत रहावी आणि त्यांची कृपादृष्टी अखंड रहावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’

Leave a Comment