ज्यांची संस्कृती, विचारसरणी, इतिहास भिन्न आहे, जे एकमेकांचे वैरी आहेत, अशा लोकांच्या समुदायांना आपण राष्ट्र म्हणू शकत नसणे

आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

‘ज्यांची संस्कृती, विचारसरणी, इतिहास हे सर्व भिन्न आहेत, ज्यांच्या स्वहिताच्या कल्पना परस्परविरोधी आहेत, जे एकमेकांचे वैरी आहेत आणि ज्यांचे परस्परसंबंध भक्ष्य अन् भक्षकासारखे आहेत, त्यांचे येथे रहाण्याचे मूळ कारणसुद्धा वेगवेगळे आहे, अशा लोकांच्या समुदायांना (समाज) आपण राष्ट्र म्हणू शकत नाही.’- डॉ. केशव बळीराम हेडगेवार (मासिक अभय भारत, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०१०)

 

हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे !

‘हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे आणि हिंदूच त्याचे मालक आहेत. ही गोेष्ट सत्य आहे; पण या सत्याला व्यवहारात स्थान मिळवून देण्याचे दायित्वही आपल्याच शिरावर नाही काय ? हे तत्त्व आचरणात आणण्याचे काम आपल्याला करायला नको का ? आपणास जे पाहिजे ते करू शकण्यासारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच आपले तत्त्व आपण कृतीत उतरवू (आणू) शकू.’

– आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (संदर्भ : ‘लोकजागर’, दिवाळी २०१४)

 

डॉ. हेडगेवार : एक असामान्य व्यक्तीमत्त्व !

आपल्या समाजाचा अभ्युदय साधण्यासाठी असंख्य माणसे उभी करावीत, या दिशेने आद्य सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार यांचा सारा व्यवहार चाले. त्यात त्यांची व्यक्तीगत अशी कोणतीच अभिलाषा गुंतलेली नसे. त्याग, आत्मसमर्पण, स्वार्थाचे होमहवन, असे शब्द वापरावयास मुळात मीपणा जिवंत पाहिजे; पण डॉ. हेडगेवार हिंदु समाजाच्या जीवनाशी तादात्म्य पावले होते. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचे असंख्य पैलू मांडत असतांना शब्दांच्या आवाक्यात त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे सर्व दिव्यत्व येऊ शकलेले नाही, याची मला तीव्र जाणीव आहे. डॉक्टरांच्या वरून शांत; पण आतून ज्वलंत असणार्‍या जीवनाचा अनुभव सांगण्यापेक्षा जाणण्यासारखा आणि प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा होता, असे म्हणावे लागते.

१. सात्त्विक आणि आस्तिक

डॉक्टर वृत्तीने सात्त्विक आणि आस्तिक होते. देवाच्या अधिष्ठानावर त्यांची नितांत श्रद्धा असे. श्री अथवा ॐ लिहिल्यावाचून त्यांनी पत्राचे अथवा दैनंदिनीचे पान लिहिण्यास प्रारंभ केलेला दिसत नाही.

२. संघकार्याविषयी दृष्टीकोन

संघकार्य हे ईश्‍वरी कार्य आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा त्यांचे बोलणे आणि पत्रे यांतून वारंवार उमटे. आपण परमेश्‍वराच्या हातातील एक बाहुले असून त्याच्या सूत्रचालकत्वाखालीच या सर्व गोष्टी आपल्या हातून घडत आहेत, अशी त्यांची सदैव धारणा असे. संघकार्य हे ईश्‍वरी कार्य म्हणतांना सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करणारे ईश्‍वरी कार्यच संघ करत आहे, हा अर्थही त्यांना अभिप्रेत असे. त्याचप्रमाणे दासबोधाचे हृद्गत जाणून घेऊन ते प्रयत्नपूर्वक अंगी मुरवणार्‍या डॉक्टरांना यत्न तो देव जाणावा आणि अचूक यत्न तो देवो । चुकणे दैत्य जाणिजे या ओव्यांतील अर्थ संघकार्य हे ईश्‍वरी कार्य, असे म्हणत असतांना डोळ्यांपुढे येणे सहज शक्य होते.

३. लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य

लोकसंग्रह हा डॉक्टरांचा स्वभाव होता आणि त्यातून त्यांच्या सहज अशा गोष्टी घडत. एखाद्या विक्रेत्याप्रमाणे त्यांच्या व्यवहारात उसनेपणाचा वा वरपांगीपणाचा अंश नसे. असे व्यवहार शिकवणारे ग्रंथ हे डॉक्टरांवरून ओवाळून टाकावेत, असेच त्यांची लोकांशी मैत्री करणे असे. त्यात अशी अपूर्वता, सहजता आणि आकर्षकता होती. ज्या हिंदु समाजात चार हिंदूंंची तोंडे एका दिशेला झाली, तर ती अंत्ययात्रेच्याच वेळी काय ती होतात, असे म्हणण्याची पाळी आली होती, त्याच समाजात सहस्रावधी तरुणांची हिंदु राष्ट्रोत्थानासाठी एक देशव्यापी संघटना डॉक्टरांनी पंधरा वर्षांत साकार करून दाखवली. हे त्यांचे असामान्यत्वच होय.

(लोकजागर)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment