साधकांचे मन ओळखून त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय (वय ६४ वर्षे) !

१. प्रत्येक कृती करतांना ती अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्याचे महत्त्व सांगणे

पू. महेंद्र क्षत्रीय

‘एकदा ४ – ५ दिवस पोळ्या पुष्कळ चिवट होत होत्या. ‘त्या तशा का होतात ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, तरी पोळ्या चिवटच होत होत्या. तेव्हा काहीही केले, तरी पोळ्या चिवटच होतात; म्हणून मी नाद सोडून दिला. त्या वेळी पू. बाबांनी मला एका पद्धतीने पोळ्या करायला सांगितल्या. त्याप्रमाणे पोळ्या केल्यावर त्या व्यवस्थित झाल्या. तेव्हा पू. बाबांनी मला सांगितले, ‘‘असे का झाले ? काय करायला हवे होते ? अजून चांगले कसे होईल ?’, असे सतत शोधत रहायचे. हे केवळ याविषयीच नाही, तर सर्वच गोष्टींत असा विचार करायला हवा.’’ पू. बाबा हे सांगत असतांना ‘ते आतपर्यंत जात आहे’, असे जाणवले आणि ‘मी किती वरवरचा विचार करते’, याची जाणीव झाली.

 

२. एखाद्या कृतीचे आधी कौतुक करून ती अधिक चांगली करण्यास शिकवणे

कु. वृषाली क्षत्रीय
कु. अमृता क्षत्रीय

घरी एखादा नवीन पदार्थ केला की, ते आधी कौतुक करतात. नंतर ‘अजून कसे केले असते, तर तो अधिक चांगला झाला असता ?’, हे सांगतात आणि पुढच्या वेळी तशा पद्धतीने करायला सांगतात.

३. पू. बाबांचा प्राणीमात्रांविषयीचा प्रेमभाव

३ अ. वाहनातून उतरताच चरत असलेले वासरू जवळ येणे

‘एकदा आम्ही सर्व जण देवीच्या मंदिरात गेलो होतो. मंदिराबाहेर उभ्या केलेल्या वाहनापासून ४ – ५ फूट अंतरावर एक वासरु चरत होते. पू. बाबा वाहनातून उतरताच ते वासरु त्यांच्याजवळ आले आणि पू. बाबांकडे तोंड करून जणूकाही पू. बाबा आल्याचा आनंद व्यक्त करत होते. पू. बाबा त्या वासराशी काहीतरी बोलले आणि म्हणाले, ‘‘हं, हं, जा.’’ तेव्हा ते वासरु शांतपणे तिथेेच उभे राहिले. – कु. अमृता क्षत्रीय (धाकटी मुलगी), नाशिक

३ आ. फुलांच्या दांड्यातील मुंग्या कुंडीत झटकून मगच फुले न्यायला सांगणे आणि मुंग्यांना घर शोधावे लागू नये; म्हणून तसे केल्याचे लक्षात आणून देणे

‘एकदा मी आणि पू. बाबा झाडांना पाणी घालण्यासाठी आगाशीत गेलो. तेव्हा झाडांना पुष्कळ फुले आली होती; म्हणून मी काही फुले तोडून खाली घेऊन निघाले. ते पाहून पू. बाबांनी मला बोलावले आणि माझ्या हातातील फुले घेऊन फुलांच्या दांडीला हळूच टिचक्या मारल्या. तेव्हा त्या फुलांमधून काही काळ्या मुंग्या बाहेर पडल्या. त्या मुंग्यांना पू. बाबांनी कुंडीतच झटकले आणि फुले माझ्या हातात देत म्हणाले, ‘‘आता तू फुले खाली नेऊ शकतेस. फुलांमधील मध खाण्यासाठी काळ्या मुंग्या फुलांच्या दांड्यांमध्ये जातात. तू ही फुले अशीच खाली नेली असतीस, तर त्या मुंग्यांना बाहेर आल्यावर त्यांचे घर शोधावे लागेल; म्हणून त्यांना इथेच सोडले. आता त्या बरोबर आपल्या घरी जातील.’’ हे ऐकल्यावर मला ‘काय बोलावे ?’, हेच समजेना. या प्रसंगातून ‘संतांमध्ये किती प्रेमभाव असतो’, हे शिकायला मिळाले आणि माझी भावजागृती झाली. – कु. वृषाली क्षत्रीय (थोरली मुलगी), नाशिक

 

४. वाढदिवसाच्या दिवशी बहिणीने ध्येयाविषयी विचारल्यावर
दुसर्‍या दिवसापासून ध्येयाची जाणीव करून देऊन प्रयत्नांचा आढावा घेण्यास आरंभ करणे

‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सिद्धीने (बहिणीने) ‘तू काय ध्येय ठेवलेस ?’, असे मला भ्रमणभाषवरून विचारले. तेव्हा पू. बाबा ते सर्व ऐकत होते. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी माझा आढावा घ्यायला आरंभ केला. आढावा घेतांना ते मला सतत ध्येयाची जाणीव करून देत होते. त्या वेळी त्यांची तळमळ मला दिसत होती. त्यामुळे ‘तळमळीने प्रयत्न करण्यास मी किती अल्प पडते’, याची मला जाणीव झाली आणि मी प्रयत्नांना पुन्हा आरंभ केला.

 

५. समोरच्या व्यक्तीचे मन अचूक ओळखणे

५ अ. नामजप बंद पडून मनात इतर विचार चालू झाले असतांना नामजपाची आठवण करून देणे

एकदा मी आणि पू. बाबा जेवायला बसलो होतो. तेव्हा त्यांनी मला नामजपाची आठवण करून दिली आणि ‘नामजप चालू आहे ना ?’, असे मला विचारले. तेव्हा नामजप बंद पडून माझ्या मनात विचार चालू झाले असल्याचे माझ्या लक्षात आले. अशा अनेक प्रसंगांतून लक्षात येते की, पू. बाबा समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार अचूक ओळखतात.

५ आ. ‘सत्संगात साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत आहेत ना ?’, याकडे लक्ष असणे, प्रयत्न करणार्‍या साधकांना पुढचे मार्गदर्शन करणे आणि प्रयत्न न करणार्‍या साधकांना त्याची जाणीव करून देणे

घरी सत्संग असतांना पू. बाबा बैठकीत जाऊन बसतात. तेव्हा ‘सत्संगात केवळ सूत्राकडे सर्व साधकांचे लक्ष आहे कि भावप्रयोग, प्रार्थना, कृतज्ञता आणि उपाय यांकडेही सर्वांचे लक्ष आहे ? सत्संग झाल्यावर झालेल्या चुकांसाठी कान धरून देवाची क्षमा मागतात का ?’, अशा सर्वच गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. जे प्रयत्न करतांना दिसतात, त्यांना सत्संग झाल्यावर बोलावून पुढचे मार्गदर्शन करतात आणि ज्यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत, त्यांना त्याची जाणीव करून देतात.’

– कु. अमृता क्षत्रीय

५ इ. कामाचा ताण असल्यास न सांगता त्याविषयी विचारणे आणि ‘देवाच्या अनुसंधनात राहून काम करायला हवे’, याची सतत आठवण करून देणे

‘पुष्कळ वेळा मला कामाशी संबंधित विषयाचा ताण असतो. तेव्हा ते मला बोलावतात आणि स्वतःजवळ बसवतात. माझ्या पाठीवरून हात फिरवून ‘कसला ताण आहे ?’, असे विचारतात. सर्व ऐकून घेतल्यावर ‘आपल्याला हे सर्व (कामे) करतांना देवाकडेच लक्ष ठेवायचे आहे. ‘काम करणे’ हे आपले ध्येय नसून ‘देवाला मिळवणे’ हे आपले ध्येय आहे. काम करतांना देवाला आठवायचे नाही, तर देवाच्या अनुसंधानात राहून काम करायचे आहे’, याची ते सतत आठवण करून देतात. त्यांचे बोलणे ऐकल्यावर ताण जातो आणि सकारात्मक रहाण्यास साहाय्य होते.

५ ई. साधनेची आणि मनाची स्थिती चांगली नसतांना त्याविषयीच विचारणे

जेव्हा साधनेची आणि मनाची स्थिती चांगली नसते, तेव्हा पू. बाबांना ते लगेच कळते आणि ते मनाची स्थिती किंवा साधना यांविषयीच विचारतात. असे पुष्कळ साधकांच्याही लक्षात आले आहे.

५ उ. पू. बाबा व्यष्टी साधनेविषयी विचारतील; म्हणून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करणार्‍या साधकांना बोलावून त्याविषयीच विचारणे

‘पू. बाबा व्यष्टी साधनेविषयी विचारतील’, या विचाराने काही साधक त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. अशा साधकांना पू. बाबा आवर्जून बोलावतात आणि व्यष्टी साधनेविषयी विचारतात. हा अनुभवही पुष्कळ साधकांना आला आहे.’

– कु. वृषाली क्षत्रीय

 

६. ‘मनातले विचार किंवा अडचणी पू. बाबांना सांगितल्यावर मन लगेच हलके होते आणि उपाय सुचून लगेच अडचणीवर मात करता येते.’ – कु. अमृता क्षत्रीय

 

७. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि इतर संत यांच्याप्रतीचा भाव

अ. ‘दैनिक सनातन प्रभात वाचतांना त्यात छापून आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले आणि इतर संत यांची छायाचित्रे बघून पू. बाबा त्यांना नमस्कार करतात.

आ. पू. बाबांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळीवेळी केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे ऐकायला पुष्कळ आवडतात.

इ. पू. बाबांचे बोलणे स्पष्ट व्हावे, यासाठी ते प्रतिदिन एका ‘मोबाईल अ‍ॅप’वर (mobile app वर) बोलण्याचा सराव करतात. त्यातील बाराखडी म्हणत असतांना ‘ज्ञ’ या अक्षराच्या वेळी ज्ञानेश्‍वर महाराज यांचे छायाचित्र येते. पू. बाबा प्रत्येक वेळी त्या छायाचित्राला नमस्कार करतात आणि पुढचा सराव करतात.’

– कु. वृषाली क्षत्रीय (१६.२.२०१७)

Leave a Comment