विविध योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार जिवांकडून कलियुगात साधना करवून घेणारी गुरुमाऊली !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे. त्यांनी अनेक जाहीर सभांमधून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे विचार अनेक जिवांच्या अंतःकरणात पेरले आहेत.

प.पू. डॉक्टरांनी सर्व साधनामार्गांतील जिवांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सर्व स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमांतून मार्गदर्शन केले आहे.

श्री. परशुराम गोरल

 

 १. कर्मयोग

प्रत्येकच कृती ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ या उक्तीप्रमाणे कशी करायची, हे प.पू. डॉक्टर स्वतःच्या प्रत्येक कृतीतून शिकवत आहेत. कर्म करत असतांना त्याला भगवंताचे नाम आणि भक्ती यांची जोड देऊन त्याचे श्रेय (कर्तेपण) भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने जिवाची जलद आध्यात्मिक उन्नती होते आणि साधनेत विशिष्ट टप्प्याला न थांबता पुढे पुढे जाता येते, हे प.पू. डॉक्टरांनीच दाखवले. त्यामुळे अनेक कर्ममार्गी जिवांचीही प्रगती होत आहे.

 

२. भक्तीयोग

‘भक्ती हीच भक्तीमार्गी जिवाच्या ईश्‍वरप्राप्तीची शक्ती आहे’, हे प.पू. गुरुदेवांनी ओळखून अशा जिवांना ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवला. प.पू. गुरुदेवांनी यासाठी अनेक उदाहरणे शिकण्यासाठी समोर आणली. यामध्ये प्रत्येकजण ईश्‍वरावर वेगवेगळ्या प्रकारे प्रेम (भक्ती) करतोय. कुणी गोपी बनून, तर कुणी देवाला सखा बनवून भावानुरूप देवाला अनुभवतोय. हे सर्व समजण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी गोपींसंदर्भातील ग्रंथ, तसेच भाव, भावाचे प्रकार या विषयांवर अनेक ग्रंथ प्रकाशित केले.

 

३. ध्यानयोग

प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधकांना समष्टी साधनेअंतर्गत सतत सेवा उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक जिवाचे ध्येय निश्‍चित होण्यास साहाय्य झाले. त्यांनी हे ध्येय साध्य होण्यासाठी अखंड साधना सांगितली. यामुळे या कार्यात सहभागी झालेले जीव एक प्रकारे सतत ध्यानावस्थेतच आहेत.

 

४. ज्ञानयोग

प.पू. डॉक्टरांनी ज्ञानयोगमार्गे साधना करणार्‍या जिवांचा उद्धार करण्यासाठी त्यांना त्यानुसार मार्गदर्शन केले. आपल्या ज्ञानाचा धर्मकार्यासाठी योग्य वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करून ते त्या जिवांचा उद्धार करत आहेत.

 

५. गुरुकृपायोग

या सर्व योगांचे (ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांचे) एकत्रीकरण (combinations) असू शकते. गुरुकृपेने जिवाची जलद प्रगती होत असल्याने प.पू. गुरुदेवांनी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती केली. याचाच परिणाम म्हणून आज सनातन संस्थेतच नव्हे, तर समाजातही अनेक जीव जीवन्मुक्त आणि संत होत आहेत. हे केवळ प.पू. गुरुदेवांची अपार कृपेमुळेच घडत आहे.’

– श्री. परशुराम गोरल (१८.९.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment