देहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र

Article also available in :

अनुक्रमणिका

संत तुकाराम महाराज

‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्‍या, तसेच आपल्या अभंगातून सार्‍या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणार्‍या संत तुकारामांची महती थोडक्यात देत आहे.

 

१. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक
अवतारच असण्याचे उदाहरण,म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे

श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते, असे म्हणावे लागेल.

 

२. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असल्याने देहात
असूनही नसल्यासारखेच असणे आणि म्हणून त्यांच्यात पूर्णरूपी देवत्व असणे

संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प, म्हणजेच जीवनातील नित्य कर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. पूर्णरूपी देवत्व असेच असते.

 

३. संत तुकाराम महाराज साक्षीभूत अवस्थेत असणे

त्यांनीच वर्णन केलेल्या त्यांच्याच अभंगाच्या महतीनुसार ते किती साक्षीभूत अवस्थेत होते, हे कळते. देवच देवाला ओळखू शकतो. संत किती द्रष्टे असतात आणि ते याच भूमिकेत शिरून त्या त्या स्तरावर लिखाण करून त्यांतील अमूल्य चैतन्याद्वारे ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी कसे कार्य करतात, तेच यातून लक्षात येते.

 

४. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला वृक्ष
तुकाराम बीज या दिवशी बरोबर दुपारी १२.०२ वाजता हलणे

देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२.०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.

 

५. प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते;
कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे

प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्‍वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने ‘संतांना सर्व ज्ञात असते’, असे म्हटले जाते; कारण ईश्‍वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्‍वर त्यांना त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात, यालाच ‘ईश्‍वरी ज्ञान’ म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.

 

६. देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी असलेला वृक्ष तुकाराम
बिजेच्या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलण्यामागील अध्यात्मशास्त्र

अ. वैकुंठगमन केलेल्या स्थानी श्रीविष्णुतत्त्वाशी संबंधित
क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्‍याच्या स्वरूपात कार्यरत असणे

देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी विष्णुतत्त्वाशी संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्‍याच्या स्वरूपात कार्यरत आहे. त्यामुळे त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्थळ, काळ आणि वृक्ष हलण्याचा तो क्षण यांच्या एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते अन् वैकुंठातील विष्णु-ऊर्जा स्थळाला १२.०२ मिनिटांनी स्पर्श करते. त्याच वेळी विष्णुतत्त्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलतांना दिसतात.

आ. भक्तांच्या आणि लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेपायी
श्रीविष्णूची क्रियाशक्तीनामक काळऊर्जा तुकाराम बिजेच्या दिवशी
विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून बरोबर दुपारी १२.०२ वाजता भूमीच्या
दिशेने येणे आणि हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असणे

नांदुरकी वृक्ष हलणे, यामागे स्थळमहात्म्य असण्याबरोबरच काळमहात्म्यही आहे. येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे. तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी वैकुंठगमन केले. या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठलोकातून खाली आली, ती तेथेच, म्हणजे नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली; कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाजमंडळी एकत्रित जमली होती. श्रीविष्णूचा वैकुंठलोक हा क्रियाशक्तीशी संबंधित आहे. आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवर्‍याच्या रूपात वास करत आहे. अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेपायी वैकुंठलोकातून ही काळऊर्जा तुकाराम बिजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून बरोबर दुपारी १२.०२ वाजता भूमीच्या दिशेने येते. हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असते.

इ. ज्या वेळी ही काळाच्या स्तरावरील ऊर्जा भूमीतील स्थळविषयक ऊर्जेला बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी स्पर्श करते, त्या वेळी नांदुरकी वृक्ष आपादमस्तक हलतो. त्याचे हलणे आपल्याला पानांच्या हलण्याच्या रूपात दिसते.

ई. नांदुरकी वृक्ष हलतो, याची प्रत्यक्ष प्रचीती आम्हाला घेता येणे

याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला आहे. भारतातील संतपरंपरा आणि या परंपरेच्या रूपाने वर्षानुवर्षे भक्तकल्याणासाठी देव देत असलेली ही अवतरण साक्ष किती महान आहे, याचीच आम्हाला या वेळी प्रत्यक्ष प्रचीती घेता आली. याचे आम्ही चित्रीकरणही केले आहे.

उ. नांदुरकी वृक्ष हलतो, त्या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होणे

या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते. जणुकाही इतर पशु-पक्षी, झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध झालेले असतात, असे वाटते.

ऊ. वैकुंठलोकातून येणारी काळऊर्जा भूमीवर अवतरित झाल्याने नांदुरकी वृक्ष हलणे

तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. त्या वेळेपासून भूमीत घनीभूत झालेल्या स्थळविषयक क्रियाशक्तीच्या भोवर्‍याला बरोबर तुकाराम बिजेदिवशी वैकुंठलोकातून येणारी काळऊर्जा ज्या वेळी स्पर्श करते, त्या वेळीच याची साक्ष म्हणून हा वृक्ष हलतो.’

– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.३.२०१६)

Leave a Comment