प्रतिकूल परिस्थितीत मन वज्रशाली करण्यासाठी गीतेचे साहाय्य घेणारे सावरकर

सावरकरांना लंडनमध्ये पकडून बोटीने भारतात आणले जात होते. फ्रान्सच्या मार्सेलिसहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते पकडले गेले. त्यांना बोटीवर खोलीत कोंडले. मुसलमान पहारेकरी नेमले. आता आपला अमानुष छळ होणार, हे जाणून मनाला वज्रशाली करण्याकरिता त्यांना गीता आठवली. कवचमंत्र म्हणून ही कविता रचली. त्यातील आशय आणि शब्द गीतेतीलच आहेत.

अनादि मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ॥
अग्नि जाळी मजसि ना खड्ग छेदितो ।
भ्याड मृत्यु मजसि पाहुनि पळत सुटतो ॥
यातील शब्द आणि तत्त्वज्ञान गीतेतच आहे.
अजो नित्य: शाश्‍वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ – श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २, श्‍लोक २०)

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ॥ – श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २, श्‍लोक २३)

अर्थ : हा आत्मा अजन्मा, नित्य, सनातन आणि पुरातन आहे. शरीर मारले गेलेले असतांनाही हा आत्मा मारला जात नाही. या आत्म्याला न शस्त्रे कापू शकतात, न अग्नी जाळू शकतो.

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील वरील श्‍लोकाचेच हे प्रतिबिंब आहे. गीतेच्या या शब्दांनी त्या घोर संकटात त्यांचे मन स्थिर आणि युसुत्सू झाले अन् छळ करायला आलेल्या पहारेकर्‍यावर ते ओरडले, खबरदार, पुढे याल तर मी तुमच्यापैकी एकाचा मुडदा पाडल्याशिवाय रहाणार नाही. त्यामुळे पहारेकरी घाबरले आणि त्यांनी सावरकरांच्या अंगाला हात लावला नाही.

– भागवताचार्य वा.ना. उत्पात

संदर्भ : स्वातंत्र्यवीर – दिवाळी विशेषांक २०१६

Leave a Comment