६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न

Article also available in :

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न

१. ६१ टक्के पातळी कशी गाठायची ?

अ. ‘अभ्यास केला, तर परीक्षेत उत्तीर्ण होतोच. त्याप्रमाणे साधना योग्य तर्‍हेने केली, तर ६१ टक्के पातळी गाठली जातेच.
आ. व्यवहारातील परीक्षा आणि साधनेतील परीक्षा : ‘साधना सोडून इतर सर्वच विषयांत वार्षिक परीक्षा असते. परीक्षेच्या आधी केवळ २ – ३ मास अभ्यास करूनही बहुतेक जण उत्तीर्ण होतात. साधनेत मात्र प्रतिदिन, प्रत्येक क्षणी परीक्षा असते. तिच्यात उत्तीर्ण व्हावे लागते, तरच ६१ टक्के आणि पुढची पातळी गाठता येते.’
इ. साधक आश्रमात किंवा प्रसारात त्याच त्याच सेवा करतांना बाह्यतः दिसले, तरी ती सेवा अधिकाधिक परिपूर्ण, भावपूर्ण आणि अहंविरहित होत गेली की, त्यांची प्रगती होते.

२. साधकांची पातळी ओळखणे

‘एखाद्या साधकाची पातळी ६१ ते ७० टक्के झाली, हे काही साधकांना ओळखता येते. काहींना ओळखता आले, तरी निश्‍चिती नसते आणि इतर साधकांना ते ओळखता येत नाही.

अ. पातळी ओळखता न येण्याची कारणे

१. व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या प्रकारचे बोलणे, चालणे, वागणे असते. त्यामुळे या घटकांवरून पातळी ओळखता येत नाही.
२. प्रत्येकातील व्यष्टी साधनेच्या अंतर्गत असणारे स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती आणि भावजागृती हे घटक निरनिराळ्या प्रमाणात असतात, तसेच समष्टी साधनेचे क्षेत्रही निरनिराळे असते. त्यामुळेही पातळी ओळखता येत नाही.

आ. पातळी ओळखता येण्यासाठी उपयुक्त घटक

१. साधकाचा चेहरा सात्त्विक किंवा आनंदी दिसणे
२. साधकाची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होणे
३. साधकाचे बोलणे ऐकतांना, त्याच्या सहवासात असतांना किंवा त्याच्या छायाचित्राकडे पाहून चांगले वाटणे
४. त्याच्यात अंतर्मुखता जाणवणे
हे घटक लक्षात घेऊन इतर साधकांचा अभ्यास करावा. त्यामुळे हळूहळू कोणाची पातळी किती आहे, तसेच पातळी वाढण्यासाठी कोणी काय प्रयत्न केले पाहिजेत, हे लक्षात येईल आणि इतरांना साहाय्य करता येईल. तसेच पातळी चांगली असलेल्यांतील गुणही लक्षात येतील आणि ते आत्मसात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  (वर्ष २०१२)

 

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महत्त्व

‘ईश्‍वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची ० टक्के मानली, तर सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. या पातळीची व्यक्ती केवळ स्वत:च्या सुख-दु:खाचा विचार करते. समाजाशी तिचे काही देणे-घेणे नसते. ती ‘मीच सर्व करते’, असा विचार करते. आध्यात्मिक पातळी ३० टक्के होते, तेव्हा ती ईश्‍वराचे अस्तित्व थोड्या प्रमाणात मान्य करू लागते, तसेच साधना आणि सेवा करू लागते. मायेची आणि ईश्वरप्राप्तीची आढे सारखीच झाली की, व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्के होते. आध्यात्मिक पातळी जेव्हा ६१ टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि विश्‍वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून तिला महर्लोकात स्थान प्राप्त होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

६१ टक्के आणि ६५ टक्के पातळीचा टप्पा गाठण्यातील महत्त्व

१. ६१ टक्के पातळीचे साधक

अ. अनिष्ट शक्तींचे त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करण्याची क्षमता : ४ थ्या पाताळातील अनिष्ट शक्तींशी अनुमाने ४ मास (महिने) लढू शकतात.

आ. पुढील उन्नती : या साधकांनी साधनेत सातत्य राखले आणि अहं वाढू दिला नाही, तर हे साधक ४ ते ५ वर्षांत संत बनू शकतात. (७० टक्के पातळीला साधक संत होतो.)

२. ६५ टक्के पातळीचे साधक

अ. अनिष्ट शक्तींचे त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करण्याची क्षमता : ६५ टक्के पातळीचा एक साधक म्हणजे ६१ टक्के पातळीचे ३० साधक. हे साधक ४ थ्या पाताळातील बलाढ्य अनिष्ट शक्तींशी अनुमाने ७ मास लढू शकतात आणि ५ व्या पाताळातील बलाढ्य अनिष्ट शक्तींशी अनुमाने २ मास लढू शकतात. या दृष्टीने अनिष्ट शक्तींबरोबर सूक्ष्मातून चालू असलेल्या लढ्याला हळूहळू बळ प्राप्त होत आहे.

आ. पुढील उन्नती : या साधकांनी साधनेत सातत्य राखले आणि अहं वाढू दिला नाही, तर हे साधक २ ते ३ वर्षांत ७० टक्के पातळी गाठू शकतात, म्हणजेच संत होऊ शकतात.

३. ६१ टक्के पातळी गाठल्यानंतर साधकांना स्वर्गप्राप्तीची
इच्छा न उरता महर्लोकापासून मोक्षापर्यंत वाटचाल होण्याची कारणे

अ. ६१ टक्के पातळीपर्यंत साधकांच्या चित्तावर त्याग करण्याचा संस्कार झालेला असतो. तो संस्कार पुढे मायेत अडकू देत नाही.

आ. ६१ टक्के पातळीनंतर आनंदाची अनुभूती येऊ लागल्यामुळे मायेतील पृथ्वीवरील सुखाचाच काय; पण स्वर्गसुखाचाही ते विचार करू शकत नाहीत.

इ. त्यांच्या मनात ईश्‍वरप्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यांची पुढील वाटचाल चालूच रहाते.

ई. काहींची वृत्ती जलद उन्नती करण्याची असते. पृथ्वीवरील १०० वर्षांची साधना म्हणजे महर्लोकामध्ये १०००० (दहा सहस्र) वर्षांची साधना, असे गणित असल्याने पृथ्वीवर जन्म घेऊन अधिकाधिक साधना करून लवकर मोक्षापर्यंत जाण्याचा पर्याय ते निवडतात; म्हणून महर्लोकामध्ये गेलेले काही जीव पृथ्वीवर परत जन्म घेतात. यामुळे साधक देहधारी असो किंवा त्याने देह सोडलेला असो, त्याची मोक्षापर्यंत वाटचाल होत रहाते.

४. ६१ टक्के पातळीचे साधक आणि ७० टक्के पातळीचे संत यांची वैशिष्ट्ये

अ. सनातनच्या ६१ टक्के पातळी गाठलेल्या साधकांची वैशिष्ट्ये

१. मायेपासून अलिप्त होता येते.
२. अंगाला आणि वापरत असलेल्या काही वस्तूंना सुगंध येतो.
३. मनोलयाला आरंभ होतो. विश्‍वमनातील विचार ग्रहण करता येतात.
४. ४थ्या पाताळापर्यंतच्या अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर आध्यात्मिक उपाय करता येतात.
५. मृत्यूनंतर जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटून महर्लोकात स्थान मिळते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २०१२)

 

६१ टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांमुळे कुटुंबियांना होणारा अप्रत्यक्ष लाभ

‘हल्ली बहुतेक जण श्राद्ध करत नसल्यामुळे त्यांचे पूर्वज कुटुंबाला त्रास देतात. एखाद्याने श्राद्ध करायचे ठरवले, तरी त्याला सात्त्विक पुरोहित मिळत नाहीत. त्यामुळे विधी करूनही न केल्यासारखे होते. ६१ टक्क्यांहून अधिक पातळीचे साधक मृत्यूनंतर महर्लोकात जातात. त्यामुळे ते त्यांच्या मुलांवर श्राद्ध-पक्ष करण्याचाही भार घालत नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  (वर्ष २०११)

 

साधकांनो, ६१ टक्के पातळी गाठायची असल्यास हे लक्षात घ्या !

‘जोपर्यंत ‘मी सेवा चांगली केली’, ‘माझी प्रगती’, ‘माझी पातळी’ असे विचार असतात, तोपर्यंत ६१ टक्के पातळी गाठता येत नाही. ते विचार संपल्यावर सेवेतील किंवा नामातील आनंद अनुभवता यायला लागला की, पातळी ६१ टक्के होते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  (वर्ष २०१२)

 

साधकांनो, एखाद्या साधकाने ६१ टक्के पातळी गाठल्यावर निराश होऊ नका !

‘काही साधकांना एखाद्या साधकाने ६१ टक्के पातळी गाठल्यावर ‘आपण गाठली नाही’; म्हणून निराशा येते. त्यांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. ६१ टक्के पातळी गाठणार्‍या साधकात कोणते गुण आहेत ?
२. आपण न्यून (कमी) कुठे पडतो ?
३. दोघांची साधना सारखीच असली, तरी एकाची प्रगती जलद होते, दुसर्‍याची नाही. याचे कारण पहिल्यात प्रारब्धाची तीव्रता अल्प असते, तर दुसर्‍यात प्रारब्धाची तीव्रता अधिक असते.
४. निराशा येण्याऐवजी ‘त्या साधकाने ६१ टक्के पातळी गाठली, तर मीही गाठू शकेन’, असा विचार करावा किंवा त्यासंदर्भात स्वयंसूचना द्याव्यात.
५. चांगले साधकत्व असल्यास निराशा न येता पातळी गाठणार्‍या साधकाचे कौतुक केले जाते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

एखाद्या साधकाने ६१ टक्के पातळी गाठल्यावर सर्वांनाच
‘आनंदी आनंद गडे । जिकडे तिकडे चोहीकडे ।’, याची अनुभूती येणे

‘एखाद्या साधकाची पातळी ६१ टक्के झाली की, सगळ्यांना आनंद होतो आणि त्यांचा आनंद पाहून ६१ टक्के पातळी गाठलेल्या साधकालाही आनंद होतो. एकूण काय तर सर्वांनाच ‘आनंदी आनंद गडे । जिकडे तिकडे चोहीकडे ।’, याची अनुभूती येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  (वर्ष २०१२)

 

गुरुकृपेने लाभलेला आध्यात्मिक स्तर घसरू नये, यासाठी
आपल्या चुका आणि दोष दूर करण्याचा गांभीर्याने प्रयत्न करा !

साधनेमध्ये ६१ टक्के पातळीचा स्तर होणे हे गुरुकृपेने लाभलेले वरदानच आहे; कारण या पातळीच्या पुढच्या प्रवासात ईश्‍वराचे साहाय्य सहजतेने आणि अधिक प्रमाणात मिळू लागते. त्यामुळे कृतज्ञताभाव ठेवून त्यापुढे साधनेचे मनोभावे प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्य आहे; पण सध्या असे लक्षात आले की, ६१ टक्के पातळी गाठलेल्या काही साधकांची त्यांच्यातील चुका, दोष आणि गांभीर्याचा अभाव यांमुळे घसरण होत आहे. असे झाले, तर पुढील आपत्काळात अशा साधकांचा टिकाव लागणे कठीण आहे. साधकांनी आपले दोष दूर करून साधनावाढीसाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत. अशा साधकांनी साधनावाढीचे प्रयत्न झाले नाहीत, तरी निदान चुका तरी होऊ देऊ नयेत, म्हणजे साधकांची पातळी वाढली नाही, तरी ती घसरणार तरी नाही.’

 

कुठे केवळ भारतातच तात्कालिक महत्त्व असलेले
सरकारी पुरस्कार, तर कुठे ६१ टक्के आणि त्यापुढील पातळी !

‘भारत सरकार प्रतिवर्षी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण इत्यादी, तसेच विविध विषयांच्या संदर्भातही अनेक पुरस्कार प्रदान करते. पुरस्कारप्राप्तकर्त्यांना फक्त त्या वर्षी आणि केवळ भारतात थोडेफार महत्त्व मिळते. राज्य पुरस्कारप्राप्तकर्त्यांच्या संदर्भात तर विचारही करायला नको. याउलट ६१ टक्के आणि त्यापुढील आध्यात्मिक पातळी गाठल्यावर ती मोक्षाला जाईपर्यंत विश्‍वात सर्वत्र साहाय्यभूत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

‘एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करण्याचा उद्देश म्हणजे त्याला आपण कुठपर्यंत वाटचाल केली हे समजावे, पुढे संतत्वाकडे वाटचाल करण्याची त्याची गती वाढावी आणि त्यातून इतरांनाही स्फूर्ती मिळावी, हा असतो.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे ही असामान्य घटनाच आहे; कारण त्यामुळे ब्रह्मांडातील एक जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो.’ – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

 

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय जलद साध्य होण्यासाठी साधना करा !

समर्थ रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, त्याप्रमाणे हिंदूंना आता राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना करून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करावे लागणार आहे. हिंदु राष्ट्र येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे; परंतु हिंदूंनी शरणागत भावाने साधना करून आध्यात्मिक प्रगती केली, तरच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय लवकर साध्य होणार आहे. आज सनातनच्या १ सहस्र साधकांसमवेत सनातनच्या कार्याशी जोडलेले अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि वाचक हेही साधना करून आध्यात्मिक उन्नती करत आहेत. हा आदर्श समोर ठेवून हिंदुत्वाचे कार्य करणार्या् सर्वत्रच्या हिंदूंनी तीव्र साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. या आध्यात्मिक बळावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment