महर्षि भृगु यांच्या फलादेशानुसार सनातन संस्थेचे साधक श्री. गौरव सेठी हरिद्वारला गेले असतांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

महर्षि भृगु यांच्या फलादेशानुसार सनातनचे साधक श्री. गौरव सेठी यांना उत्तराखंडमधील हरिद्वार (मायाक्षेत्र) येथे १५ ते १८.९.२०१६ या कालावधीत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

 

१. श्री. गौरव सेठी यांना आलेल्या अनुभूती

१ अ. पहिला दिवस

महर्षि भृगु

१ अ १. संपूर्ण प्रवासात भगवान शिव आणि महर्षि भृगु यांचे अस्तित्व जाणवणे : ‘सर्वप्रथम सेवा आरंभ करण्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना केली, ‘ही सेवा तुम्हाला अपेक्षित अशी होऊ दे. ‘मी सनातन संस्थेचा प्रतिनिधी आहे’, ही जाणीव सतत माझ्या मनात जागृत राहू दे.’ मी सद्गुरु (सौ.) बिंदाताई (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ), सद्गुरु (सौ.) अंजलीकाकू (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ), संत आणि साधक यांच्या चरणी वंदन करून चंडीगडहून डेहराडूनला जायला निघालो. मध्ये एक रात्र माझ्या मावशीकडे मुक्काम करून दुसर्‍या दिवशी पहाटे मी हरिद्वारकडे प्रयाण केले. या संपूर्ण प्रवासात मला भगवान शिव आणि महर्षि भृगु यांचे अस्तित्व जाणवत होते.

१ अ २. मावशीकडे मुक्कामाला असतांना खोलीत अनेक लिंगदेह दिसणे, महर्षि भृगु यांनी सुचवल्यानुसार सात्त्विक उदबत्त्या लावणे आणि श्रीकृष्ण अन् महर्षि भृगु दिसल्याने शांतपणे झोपणे : मावशीकडे मुक्कामाला असतांना रात्री झोपतांना मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होऊ लागला. मला त्या खोलीत अनेक लिंगदेह दिसत होते. त्या वेळी महर्षि भृगु यांनी सुचवल्यानुसार सनातन-निर्मित सात्त्विक उदबत्त्या लावल्या. मी श्रीकृष्णाला श्रद्धेने आणि कळकळीने प्रार्थना करत होतो. मला खोलीत श्रीकृष्ण आणि महर्षि भृगु दिसले अन् मी शांतपणे झोपलो.

१ अ ३. गंगेच्या घाटावर स्नान करतांना भगवान शिवाचे दर्शन होणे : हरिद्वार येथे गंगेच्या घाटावर स्नान करतांना मला भगवान शिवाचे दर्शन झाले. त्या वेळी प्रार्थना करतांना ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले, संत आणि साधक यांच्या वतीने प्रार्थना करत आहे’, असा भाव ठेवून ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ देे’, अशी प्रार्थना केली.

श्री. विशाल शर्मा

१ अ ४. डॉ. विशाल शर्मा यांच्या आजोबांच्या खोलीतील त्यांच्या गुरूंच्या छायाचित्राला नमस्कार करून प्रार्थना केल्यावर त्यांनी दोन्ही हातांनी आशीर्वाद दिल्याचे आणि त्यातून लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या खाली पडल्याचे दिसणे : त्यानंतर भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा मला त्यांच्या आजोबांच्या खोलीत घेऊन गेले. तिथे महर्षि भृगु यांचा दरबार असून खोलीच्या मध्यभागी भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशालजी यांच्या गुरूंचे छायाचित्र लावले होतेे. माझ्या नकळत मी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु बिंदाताई, सद्गुरु अंजलीकाकू, संत आणि साधक यांच्या वतीने त्यांना नमस्कार करून प्रार्थना केली, ‘रामराज्याची स्थापना होऊ देे’ यावर त्यांनी हसून आशीर्वाद देण्यासाठी आपले दोन्ही हात उचलले अन् त्यातून लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या खाली पडल्या. काही वेळाने मी डॉ. विशालजी यांना ‘हेच तुमचे गुरु आहेत का ?’, असे विचारल्यावर त्यांनी होकार दिला. डॉ. विशालजी यांच्या गुरूंविषयी मला आठवड्यापूर्वी एक अनुभूती आली होती. (यापूर्वी मी त्यांच्या गुरूंना कधीही पाहिले नव्हते.)

भृगु महर्षींच्या आदेशाने विद्यार्थ्यांना सनातन वहीचे विनामूल्य वितरण
हरिद्वार येथील विशालजी यांच्या आश्रमात साधूंना केलेले अन्नदान (लंगर)

१ अ ५. डॉ. विशालजी यांच्या गुरूंनी सूक्ष्मातून इच्छा विचारल्यावर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ असे सांगणे आणि ते कठीण असूनही साधकांच्या प्रबळ इच्छेवर प्रसन्न होऊन त्यांनी ‘तसेच होईल’, असा आशीर्वाद दिल्याचे जाणवणे : ६.९.२०१६ या दिवशी संध्याकाळी आमचा हरिद्वारचा दौरा ठरल्यावर मी डॉ. विशालजी यांच्या हरिद्वार आश्रमातील गुरूंना परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे सर्व संत आणि साधक यांच्या वतीने सूक्ष्मातून साष्टांग नमस्कार घातला. त्या वेळी डॉ. विशालजी यांचे गुरु (साधूसिंग शास्त्री) आणि माझ्यात पुढील संवाद झाला.

गुरु साधूसिंग शास्त्री (प्रसन्न होऊन) : तुमची काय इच्छा आहे ?

मी : हिंदु राष्ट्राची स्थापना

गुरु साधूसिंग शास्त्री (काही क्षण थांबून आणि नंतर हसून) : तसेच होईल. माझा आशीर्वाद आहे.

काही क्षण थांबले असतांना गुरु साधूसिंग शास्त्री यांच्या मनात पुढील विचार होते, ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणे अवघड आहे’, असे साधकांना कित्येक वेळा सांगण्यात येऊनही त्यांची तीच इच्छा प्रबळ आहे.’ या प्रबळ इच्छेवर प्रसन्न होऊन त्यांनी आशीर्वाद दिला.

१ अ ६. साधूंच्या भोजनाच्या वेळी त्यांच्याशेजारी उभे राहून प्रार्थना केल्यावर बलवान अस्वल आणि वाघ यांचा एक पाय दिसणे, साधूंच्या गटाभोवती सूक्ष्मातून दोन वाघ फिरतांना दिसणे आणि तेथे श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवल्याने कृतज्ञता व्यक्त होणे : येथील आश्रमात होणार्‍या भंडार्‍याला एका प्रमुख साधूंच्या नेतृत्वाखाली ३० ते ४० साधूंचा गट भोजनासाठी येऊन बसला. एक गट गेला की, दुसरा येतो. असे सकाळी आणि दुपारच्या भोजनाच्या वेळी चालू असते. त्या दिवशी साधूंचे एकूण ५ गट आले होते. साधूंच्या भोजनानंतर साधारण ७० ते ८० भिकार्‍यांच्या एका गटाला वेगळे भोजन दिले.

डॉ. विशालजी यांनी मला त्यांच्या शेजारी उभे राहून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे कार्य यांसाठी आशीर्वाद घेण्यास सांगितले. मी डोळे मिटून श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांना प्रार्थना केली, ‘सनातन संस्थेसाठी आशीर्वाद मागण्यासाठी मार्गदर्शन आणि साहाय्य करा.’ मी डोळे मिटून नमस्काराच्या मुद्रेत उभा असतांना मला एक मोठा आणि बलवान (जांबुवंतासारखा) अस्वलाचा पाय अन् वाघाचा एक पाय माझ्या दिशेने येतांना दिसला. काही वेळाने साधूंच्या गटाभोवती सूक्ष्मातून दोन वाघ फिरतांना दिसले. मला तिथे श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवल्याने मी तिला श्रद्धापूर्वक नमस्कार केला. ही अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासाठी जे करत आहेत, त्याचे मोजमाप होऊ शकत नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, तुमच्याच कृपेने मला आलेल्या सर्व अनुभूतींची जाणीव होऊ देत आणि ज्या कार्यासाठी तुम्ही मला हरिद्वारला पाठवले आहे, त्याचा मला विसर पडू देऊ नका’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी मला ‘एका साधूच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले हसत चालले आहेत’, असे दिसले.

१ अ ७. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे डोळे मिटल्यावर साधूंचे आत्मे दिसणे, अकस्मात् श्रीरामाचे दर्शन झाल्याने डोळे उघडणे, प्रत्यक्षात वृद्ध आणि ठेंगणे असलेले एक साधू दिसल्यावर त्यांना नमस्कार करणे अन् त्यांच्या रूपातील श्रीरामाने आशीर्वाद देणे : मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘महाप्रसादाला, भंडार्‍याला आलेले सर्व साधू भोजन करून पटकन निघून जातात. मी कुणाचा आणि कसा आशीर्वाद घेऊ ?’ यावर श्रीकृष्णाने ‘तू डोळे बंद कर. कुणाचे आशीर्वाद घ्यायचे ?’, तेे मी तुला सांगीन’, असे सांगितले. मी डोळे बंद केले, तेव्हा माझ्या पुढून अनेक साधूंचे आत्मे जातांना दिसले. त्यांतील कित्येक जण त्यांच्या मागील जन्मातही साधू होते आणि या जन्मातही ईश्‍वरप्राप्तीसाठी ते साधना करत होते. अकस्मात् मला श्रीराम दिसला आणि श्रीकृष्णाच्या संकेतानुसार मी डोळे उघडले.

प्रत्यक्षात मात्र मला वृद्ध आणि ठेंगणे असलेले एक साधू सर्व साधूंसमवेत चालतांना दिसले. थोडी द्विधा मनःस्थिती झाल्यानंतर मी त्यांना ‘कृष्णा, कृष्णा, हे ईश्‍वरा…’ अशी हाक मारू लागलो; परंतु ते न थांबता चालत राहिले. शेवटी मी त्यांच्या पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला. ते साधू थांबले अन् हसले. मी परात्पर गुरु डॉ. आठवले, संत आणि सर्व साधक यांच्या वतीने श्रीरामाचा चरणस्पर्श करून नमस्कार केला. श्रीरामाने आशीर्वाद दिला आणि ते पुढे गेले.

१ अ ८. भंडार्‍याच्या वेळी आलेल्या साधूंच्या दुसर्‍या एका गटाच्या वेळी मला भगवान व्यंकटेशाचे दर्शन झाले.

१ अ ९. डॉ. विशालजी त्यांच्यासमवेत गुरुद्वारात जाऊन ‘गुरु ग्रंथ साहीब’ला नमस्कार केल्यावर गुरुनानक देवजी आणि गुरु गोबिंद सिंगजी यांचे दर्शन होणे : डॉ. विशालजी यांनी त्यांच्या आश्रमाच्या परिसरात असलेल्या गुरुद्वारात ‘अखंड पाठ’ आणि राममंदिरात रामायण पूजेचे आयोजन केले होते. मी त्यांच्यासमवेत गुरुद्वारात जाऊन ‘गुरु ग्रंथ साहीब’ला नमस्कार केला. त्या वेळी मला गुरुनानक देवजी आणि गुरु गोबिंद सिंगजी यांचे दर्शन झाले. मी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले, संत आणि सर्व साधक यांच्या वतीने नमस्कार करून हिंदु राष्ट्राची स्थापना, तसेच संस्थेवर आलेल्या संकटाचे निवारण, यांसाठी प्रार्थना केली.

१ अ १०. गुरुद्वारात असतांना मी डोळे बंद केल्यावर माझ्या कपाळावर पांढरा प्रकाश पडत होता, तसेच तिथे मला प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले.

१ अ ११. डॉ. विशालजी यांचे गुरु साधूसिंग शास्त्री यांनी देहत्याग केल्यावर महर्षि भृगु यांनी त्यांच्या फलादेशात सांगितलेले सूत्र : साधूसिंग शास्त्री गुरुनानक देवजी यांच्या चरणी एक ज्योत झाले असून गुरुनानक देवजींची इच्छा असेल, तरच एखादा त्यांचे दर्शन घेऊ शकतो.

१ अ १२. रामायणाचे पठण ऐकतांना चांगले वाटणे : रामायण पाठ आणि पूजा दोन दिवस चालू होते. मी पुष्कळ दमलो असल्याने मला रामायण पाठाचे भावपूर्ण श्रवण करता आले नाही; पण रामायणाचे पठण ऐकायला छान वाटत होते.

१ आ. दुसरा दिवस

१ आ १. दुसर्‍या दिवशी मी उत्तररात्री ३.३० वाजता ‘हरि की पाउरी’ येथे गंगा स्नान करतांना मला भगवान शंकर आणि गंगामाता यांच्या दर्शनाचेे भाग्य लाभले.

१ आ २. पहिल्या लंगरच्या वेळी मला पुन्हा तिथे दोन वाघ फिरतांना दिसले. नंतर मला भगवान शंकर अस्पष्टपणे; मात्र त्यांचा त्रिशूळ स्पष्टपणे दिसला.

१ आ ३. ‘पंडितजींनी एक विशिष्ट श्‍लोक म्हणावा’, असे वाटणे आणि तसे झाल्याने ‘गुरु आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतात’, याची अनुभूती येणे : सकाळी गंगामातेच्या काठावर बसलो असतांना तेथील एक पंडितजी काही श्‍लोक विशिष्ट चालीत म्हणत होते. त्यांतील एक श्‍लोक मला पुष्कळ आवडतो. ‘तो कोणता आहे ?’, हे ठाऊक नसतांनाही तो ऐकतांना मी ईश्‍वराशी जोडला जातो. ‘पंडितजींनी तो श्‍लोक म्हणावा’, असे मला वाटत होते आणि मी त्याची वाट पहात होतो. नंतर भंडार्‍यासाठी आलेल्या साधूंच्या दुसर्‍या गटाने महाप्रसादाला आरंभ करण्यापूर्वी माझी इच्छा असलेला तोच श्‍लोक म्हटला. ‘गुरु आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतात’, हे मी अनुभवले. या दोन्ही भंडार्‍यांना परात्पर गुरु डॉ. आठवले साधूंच्या रूपाने उपस्थित होते.

१ आ ४. तिसर्‍या भंडार्‍याच्या वेळी मला पुष्पवृष्टी करणारा गरुडदेव दिसला आणि परात्पर गुरु डॉ. आठवलेही दिसले.

१ आ ५. काळ्या हंसांच्या रूपात श्री बगलादेवीने दर्शन दिल्याचे डॉ. विशालजी यांनी सांगणे : त्यानंतर मला ‘मोठे काळे हंस पक्षी दाणे खात आहेत’, असे दृश्य दिसले. डॉ. विशालजी यांनी ‘त्यांना ‘बगला’ म्हणतात’, असे सांगून श्री बगलादेवीने त्या रूपात दर्शन दिल्याचे सांगितले.

१ आ ६. विद्यार्थीभोजनाच्या वेळी ‘अन्नपूर्णामाता आेंजळीतून पांढर्‍या धान्याचा वर्षाव करत आहे’, असे मला दिसले.

१ इ. तिसरा दिवस

१ इ १. गंगेवर स्नान करतांना भगवान शंकर आणि नंतर गंगामाता यांचे दर्शन होणे : उत्तररात्री ३.३० वाजता गंगेवर स्नान करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला भगवान शंकर आणि नंतर गंगामाता यांचे दर्शन झाले. या तीनही दिवशी मी गंगामातेला आर्ततेने हाक मारली. गंगामातेच्या प्रती एवढा भाव मी यापूर्वी कधीही अनुभवलेला नव्हता.

१ इ २. भंडार्‍याच्या कालावधीत स्वामींच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्याचप्रमाणे बगळा दाणे खातांनाचे अन् वाघ फिरतांनाचे दृश्य दिसले.

१ इ ३. अंकविद्येच्या आधारे फलादेशाचे वाचन : सकाळी डॉ. विशालजी यांनी अंकविद्येच्या आधारे फलादेशाचे वाचन केले. (यामध्ये १ ते ९ अंकशास्त्रानुसार एखाद्याच्या संदर्भातील फलादेश वाचला जातो.) डॉ. विशालजी म्हणाले, ‘‘मायाक्षेत्रातील (हरिद्वार येथील) हा तीन दिवसांचा कार्यक्रम गुरु साधूसिंग शास्त्री यांच्यासाठी केला गेला.’’

१ इ ४. मी डोळे बंद केल्यावर दोन वेळा मला भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशालजी यांचा हसरा तोंडवळा दिसला.

१ इ ५. भंडार्‍याच्या वेळी मला सूक्ष्मातून सद्गुरु (सौ.) बिंदाताई दिसल्या.

१ इ ६. भंडार्‍याच्या कालावधीत डाव्या पायाला आल्हाददायक वार्‍याचा मऊ स्पर्श होणे : भंडार्‍याच्या कालावधीत मी एका गृहस्थांशी बोलत असतांना माझ्या डाव्या पायाला काहीतरी मऊ स्पर्श करून गेले. वातावरण शांत असतांनाही माझ्या पायाला स्पर्श करणारी ती आल्हाददायक वार्‍याची झुळूक होती. मी आजूबाजूला पाहून नमस्कार केला.

१ इ ७. ‘प्रसाद रुचकर असल्याने तो आणखी मिळावा’, ही इच्छा गुरूंच्या कृपेने पूर्ण होणे : गुरुद्वारात गेल्यावर प्रसाद घेण्यासाठी भाविक एका ठिकाणी बसतात आणि तेथील सेवक त्यांना प्रसाद देतात. त्या दिवशी मला मिळालेला प्रसाद अत्यंत रुचकर असल्याने ‘तो मला आणखी मिळावा’, असे वाटत होते. गुरु प्रत्येक इच्छा ऐकतात आणि ती पूर्णही करतात. याची जणू साक्ष देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने तेथील सेवकाने मला दोनदा प्रसाद दिला.

 

२. श्री. गौरव सेठी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. पहिल्या दिवशी आलेल्या अनुभूतींमुळे अपेक्षा वाढल्याने दुसर्‍या दिवशी भावाचे
प्रमाण अल्प झाल्याचे श्रीकृष्णाने सांगणे, त्या उत्तराने समाधान न झाल्याने प्रार्थना केल्यावर श्रीकृष्णाने मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा दाखवणे आणि मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळणे

दुसर्‍या दिवशी माझ्यातील भावाचे प्रमाण उणावल्याने मला आदल्या दिवशी दिसलेल्या आणि आकलन झालेल्या गोष्टी अनुभवायला आल्या नाहीत. मला भावजागृतीसाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागत होते. असे मला सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत झाले. त्यानंतर मी श्रीकृष्णाला प्रार्थना करून त्याचे कारण विचारले. त्या क्षणी मला उत्तर मिळाले, ‘पहिल्या दिवशी आलेल्या अनुभूतींमुळे माझ्या अपेक्षा वाढल्याने दुसर्‍या दिवशी माझ्यातील भावाचे प्रमाण उणावले.’ या उत्तराने माझे समाधान झाले नसल्याने बुद्धीचा अडथळा दूर करण्यासाठी मी पुन्हा श्रीकृष्णाला प्रार्थना केली. श्रीकृष्णाने माझ्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा दाखवली आणि मला माझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.

२ आ. पहिल्या दिवशी असलेल्या कृतज्ञतेच्या भावामुळे स्थूलदेहाचे
अस्तित्व न जाणवणे, भावात तरंगल्याप्रमाणे जाणवणे आणि त्यामुळे पुष्कळ अनुभूती येणे

पहिल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सनातनचा प्रतिनिधी म्हणून येथे पाठवलेे असल्याने माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव होता, तसेच त्या वेळी माझ्यातील भाव परात्पर गुरु डॉ. आठवले, संत आणि साधक यांचे प्रतिनिधित्व करत होता. गुरूंनीच (गुरुतत्त्वानेच) मला भावावस्थेत ठेवण्याची कृपा केली असल्यामुळे मला माझ्या स्थूलदेहाचे अस्तित्व जाणवत नव्हते आणि मी त्या भावातच तरंगत होतो. त्यामुळेच मला पुष्कळ अनुभूती आल्या.

२ इ. दुसर्‍या दिवशी मनातील गुरूंप्रती कृतज्ञतेचा भाव उणावल्याने देहबुद्धी वाढणे,
भावजागृतीसाठी पुष्कळ संघर्ष करावा लागणे, गुरुतत्त्वाचे महत्त्व लक्षात आणून दिल्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त होणे आणि त्यानंतर आदल्या दिवशीप्रमाणे भाव पुन्हा जागृत होणे

दुसर्‍या दिवशी माझ्या मनातील गुरूंप्रती कृतज्ञतेचा भाव उणावल्याने देहबुद्धीही वाढली. त्यामुळे भावजागृतीसाठी माझा संघर्ष वाढला आणि भावाचे प्रमाणही उणावले. गुरुतत्त्वाचे महत्त्व माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल आणि अशाच प्रकारे कित्येक जीव आयुष्यभर भावजागृतीसाठी संघर्ष करत रहात असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ही जाणीव होताक्षणी आदल्या दिवशीप्रमाणे माझा भाव पुन्हा जागृत झाला. ‘आपण स्वतः काही करण्यास असमर्थ असून गुरुच आपल्याला वरच्या स्तराला नेेतात. गुरूंची इच्छा असल्यास ते एखाद्याला कोणत्याही पातळीला घेऊन जाऊ शकतात’, याची जाणीव झाली.

२ ई. स्वभावदोषांच्या अडथळ्यांमुळे ईश्‍वराशी असलेले अनुसंधान
खंडित झाल्याचे अनुभवणे आणि सूक्ष्म स्वभावदोषांची जाणीव होण्यास
आवश्यक ती सतर्कता स्वतःत निर्माण होण्यासाठी गुरुकृपा अत्यावश्यक असल्याचे लक्षात येणे

आपल्यातील स्वभावदोषांमुळे आपले ईश्‍वराशी असलेलेे अनुसंधान खंडित होते. ईश्‍वराने मला विविध अनुभूती दिल्या. त्यांतील एक म्हणजे एकदा मी डोळे मिटले होते, तेव्हा मला भृगुसंहिता वाचक आणि भृगुशास्त्री विशालजी यांचा हसरा तोंडवळा दिसला. त्या वेळी माझा ‘पूर्वग्रह’ हा दोष उफाळून आल्याने ‘ते नसावेत’, असा विचार माझ्या मनात आला आणि माझे ईश्‍वराशी असलेले अनुसंधान खंडित झाले. मी ईश्‍वराची क्षमा मागून प्रार्थना केल्यावर खंडित झालेले अनुसंधान पुन्हा साधता आले. श्रीकृष्णाच्या कृपेने माझ्या लक्षात आले की, आपल्या स्वभावदोषांमुळेच आपण श्रीकृष्णाला अनुभवण्यापासून वंचित रहातो. भावनिक किंवा मनाच्या स्तरावरील स्वभावदोषांच्या अडथळ्यांमुळे आपल्याला अनुभूती येत नाहीत. या सूक्ष्म स्वभावदोषांची जाणीव होण्यास आवश्यक ती सतर्कता स्वतःत निर्माण होण्यासाठी गुरुकृपा अत्यावश्यक आहे, अन्यथा मानसिक स्तरावरील या सूक्ष्म विचारांची जाणीव होण्याची प्रक्रिया अतिशय संथ आणि कठीण बनतेे. याचे एक उदाहरण पुढे देत आहे.

मी गुरुद्वारात गेलो, तेव्हा तिथे (शबाद) कीर्तनातून गुरूंची स्तुती चालू होती. त्या वेळी माझा भाव जागृत झाल्याने मी ते ऐकण्यात तल्लीन होतो आणि गुरूंप्रती माझा भाव दाटून आला होता. ‘गुरुनानक यांच्यासारखा गुरु’ असे वाक्य उच्चारल्यावर क्षणभर माझ्या मनात विकल्प आला. त्या वेळी श्रीकृष्णाने मला जाणीव करून दिली की, माझा भाव गुरुतत्त्वाप्रती असता, तर माझ्या भावावस्थेत खंड पडला नसता.

 

३. सेवेची संधी मिळाल्याबद्दल आणि विविध अनुभूती दिल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

आपले गुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला देवतांच्या सान्निध्यात सेवा करण्याची ही सुंदर संधी दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! त्यांच्याच कृपेने मला भगवान श्रीराम, गंगामाता, भगवान शंकर आणि महर्षि भृगु यांचे दर्शन झाले. मी त्याचे वर्णनही करू शकत नाही. ‘माझे गुरु कोण आहेत ?’ याची जाणीवही त्यांनी मला करून दिली. परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून तीनही दिवस तिथेच होते, तरीही त्यांनी मला ही सुंदर सेवा करण्यासाठी निवडले. कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!

श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. गौरव सेठी, पंचकुला, हरियाणा. (२१.९.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Facebooktwittergoogle_plusmail